दोन बोटे आनंदाची.

एका टोचणाऱ्या प्रथेला संपवून आनंद वाटण्याची सुंदर गोष्ट



दोन बोटे आनंदाची


आज सकाळपासून सुलभाताई गडबड करत होत्या.
गेले पंधरा दिवस चाललेले नियोजन आणि गडबड विसरून त्या जवळपास दहाव्या वर्षी हा कार्यक्रम करत होत्या.

सुंदर काळी पैठणी,नाकात मोत्याची नथ,गळ्यात तन्मणी आणि कपाळावर चंद्रकोर.

शेवटी काळ्याभोर केसांचा आंबडा बांधून त्या मेजर शिंदेंच्या फोटोसमोर उभ्या राहिल्या.

फोटोतील काचेत स्वतः चे प्रतिबिंब पाहताना नकळत सुलभाताईंचे मन पंधरा वर्ष मागे पोहोचले.


सौ.सुलभा सूर्यभान शिंदे. अशी लफ्फेदार सही ऑफिसच्या मस्टर वर करताना त्यांना सूर्या आपल्या आजूबाजूला असल्याचा भास होत असे.

सुलभा आणि सूर्यभान अगदी ठरवून झालेले लग्न. सैन्यात असलेला नवरा नको अशी आईची ठाम धारणा.

त्यामुळे वडिलांच्या मित्राच्या मुलाचे स्थळ येताच आई म्हणाली,"सैन्यातला नको. त्याच उद्या काही बर वाईट झाले तर पोरीच्या आयुष्याशी खेळ."


वडील म्हणाले,"माणसाला मरण येणे काही आपल्या हातात आहे का?"

तरीही शिक्षिका असूनही आई मुलीच्या काळजीपोटी नकार देत होती.

परंतु शेवटी वडील म्हणाले,"सुलभाला मुलगा पाहू दे. तिला आवडला नाही तर मग विषय बंद."

सुलभाने पहिल्यांदा सूर्यभानला पाहिले आणि तिच्या मनाने कौल दिला. तिने लाजून होकार कळवला आणि ती सौ. सुलभा सूर्यभान शिंदे झाली.

सुरुवातीची वर्षे त्याच्यबरोबर राहिली. सैन्यात असलेला सूर्या खूप हळवा होता.

सुलभा सालंकृत तयार झाली की म्हणायचा,"सुलभा,तू नेहमी अशीच रहा. आयुष्यात कधीही हे अलंकार उतरवू नकोस."

सुलभा रागाने म्हणायची,"ह्याच अलंकारात तुम्ही माझ्या सोबत असता. तुम्हाला बरी जाऊ देईल."


लवकरच दोघांच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली. दोन्ही मुले लहान होती.

मग सूर्या म्हणाला,"सुलू,मुलांसाठी तू आता शहरात रहा. त्यांचे उगीच हाल नको."

सुलभाने वास्तव स्वीकारले. सासू सासरे आणि दोन मुलांना घेऊन सुलभा पुण्यात राहू लागली. तिने तिच्या शिक्षणाचा उपयोग करावा म्हणून सासू सासरे दोघांनी आग्रह धरला आणि सुलभा नोकरी करू लागली.


सूर्या सुट्टीवर आला की मग आनंदाला उधाण यायचे.

सुलभा त्याला म्हणायची,"कधी येणार तुम्ही? मला नाही करमत."

सूर्या हसून म्हणायचा,"फौजीच्या बायकोने असे रडायचे नाही."


काळ पुढे सरकत होता आणि अचानक एक दिवस सूर्यभान शिंदे यांना वीरमरण आल्याची बातमी धडकली. सुलभाचे जग थांबले.


सूर्या नाही ही कल्पनाच तिने केलेली नव्हती. तिरंग्यात लपेटुन आलेले पार्थिव पाहून तिला टाहो फोडावा वाटत असूनही अश्रू मनात साठून राहिले.


स्तब्ध सुलभाला पाहून सासू सासरे गहिवरले. तरीही जनरीत पाहून पुढील विधी केले गेले.


ज्या बांगड्यांची किणकिण ऐकत सूर्या झोपी जायचा त्या फोडल्या गेल्या.

तिच्या कपाळावरील कुंकुम तिलकावर कपाळ टेकवून सूर्या तिचा निरोप घेई. तो तिलक पुसला गेला.

ज्या जोडव्यांचा आवाज घेऊन तो सुलभाचा माग काढे ती उतरवली गेली.

सुलभा स्तब्ध होऊन फक्त पहात होती.


दिवस कार्य उलटली. जग रहाटी थांबत नसते. सुलभाला आता उभे राहायचे होते. मुलांसाठी,सासू सासरे आणि स्वतः साठी.


ती नेहमीप्रमाणे तयार व्हायला गेली आणि तिचा हात थबकला. सूर्याला आवडते म्हणून ती नेहमी कुंकूच लावत असे. आज मात्र तिला ते कपाळावर रेखायचा धीर होईना.

डोळ्यात पाणी आले तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला,"सुलू,डबा भरलाय ग."

तिची तंद्री भंग पावली. पण मनाला एक टोचणी मात्र लागली.

ऑफिस गाठले. मस्टर उघडले आणि सुलभाची बोटे थरथरली.

तेवढ्यात मागून कुजबुज ऐकू आली,"ये,आता श्रीमती लिहावे लागेल ना?"

दुसरी फिसकन हसली.


सुलभाने फक्त सुलभा शिंदे एवढीच सही केली आणि कामाला लागली. असे अनेक टोचणी देणारे प्रसंग घडत होते.


एक दिवस सुलभा आली तशी सगळ्या बोलायच्या बंद झाल्या. तिला काही कळेना.


थोड्या वेळाने कॉफी आणायला गेली तेव्हा मिसेस किरमिजे बोलत होती,"तिला काही सांगू नको. उद्या वटसावित्री आहे."


सुलभा कॉफी न घेता तशीच येऊन टेबलवर बसली. डोळे भरून येत होते.

एवढ्यात समोर वाफाळलेला कॉफीचा मग आला. तिने वर पाहिले.

सफाई काम करणाऱ्या मावशी होत्या.

त्या म्हणाल्या,"पोरी,आता ह्या टोचण्या अशाच टोचत राहणार बघ."


मावशी निघून गेल्या आणि इतक्या वर्षात पहिल्यांदा सुलभाला त्यांचे पांढरे कपाळ जाणवले.


सुलभाचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत होता. पुढील चार पाच वर्षात सुलभा पूर्ण मिटून गेली होती.

एक दिवस लेकाला शाळेत सोडून सुलभा निघाली. तेवढ्यात तिला सुलू! सुलू! अशी हाक ऐकू आली.


तिने इकडे तिकडे पाहिले आणि तिचा डोळ्यांवर विश्र्वासच बसेना. वैजयंती तिची बालमैत्रीण समोर उभी होती.

सुलभा ओरडली,"वैजू तू?"


दोघींनी गळा भेट घेतली. वैजयंती नुकतीच पुण्यात शिफ्ट झाली होती. दोघींनी नंबर घेतले. वैजू सुलभाच्या आयुष्यात आनंदाची झुळूक बनून आली.


थोडे का होईना हसणारी आई पाहून मुले खुश होत.


एक दिवस ऑफिसात घोषणा झाली. नवीन अधिकारी येणार होते. सुलभाला सुद्धा प्रमोशन मिळाले होते.

लवकरच नवे अधिकारी रुजू झाले. रमेश पाटील अगदी दिलखुलास आणि हळवा पण कामात तरबेज माणूस.

सुलभा सोबत काम करताना सुलभा कायम उदास असल्याचे रमेशने पाहिले.

एक दिवस ऑफिस पार्टीची घोषणा झाली.

रमेश सुलभा जवळ जाऊन इतकेच म्हणाला,"जो माणूस गेला तो तुमच्या हृदयात अजूनही जिवंत आहे तर मग त्याच्या अस्तित्वाच्या खुणा का पुसताय. उलट त्या खुणा तुम्हाला त्याच्या सोबत ठेवतील."


सुलभा घरी जाताना तिच्या मनात सतत हे वाक्य घोळत होते.


दुसऱ्या दिवशी सुलभाने तिची आवडती जांभळी साडी नेसली. सुर्यभानच्या फोटोला नमस्कार करताना तो हसत असल्याचा भास सुलभाला झाला.

त्या दिवशी तिला खूप दिवसांनी मोकळे वाटत होते.

घरी जाताना तिने वैजूला फोन लावला,"वैजू,कॉफिला जाऊया?"

वैजू ओरडली,"नेकी और पूछ पूछ. ये लवकर."


सुंदर जांभळी साडी घातलेली सुलभा पाहून वैजू खुश झाली. कॉफी पिताना वैजू म्हणाली,"सुलू तुझे दुःखच तुझे सामर्थ्य आहे. सूर्या कायम तुझ्या सोबत आहे."


त्यानंतर सुलभा बदलली. हळूहळू पूर्वीची सुलभा परत आली. मुले,सासू आणि सासरे आनंदी झाले. घरकुल पुन्हा हसू लागले.


संक्रांत जवळ येऊ लागली तशी सासूबाईंच्या मनाची घालमेल सुरू झाली. गेली चार वर्षे रडणारी सुलभा पाहून त्यांनी ठरवले होते की हळदी कुंकू करायचे नाही.


एक दिवस सुलभा ऑफिस मधून आली आणि म्हणाली,"आई,उद्या संक्रांतीचे वाण घ्यायला जायचे आहे."


सासूबाई म्हणाल्या,"मी नाही करणार यंदा कार्यक्रम."


सुलभा त्यांचे हात हातात घेत म्हणाली,"यंदा आपण दोघी करतोय हळदी कुंकू."


दुसऱ्या दिवशी सुलभाने सगळी तयारी केली. सासूबाई पहात होत्या. पहिलीच आमंत्रित त्यांची मोठी बहीण होती,दुसरा नंबर होता सुलभाच्या मावशीचा. तिसरा नंबर होता पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या निशाचा.


अशा सगळ्याजणी जमल्या आणि मग सुलभा बोलू लागली,"मैत्रिणींनो,कुंकू, वाण हे आनंद वाटायची साधने आहेत. आपले प्रेमाचे माणूस आपल्या हृदयात जिवंत आहे. मग त्याच्या अस्तित्वाच्या खुणा मिटवायच्या नाहीत तर मिरवायच्या. म्हणून आज ही हळदी कुंकवाची दोन बोटे आनंदाची. आपल्याच आई,आत्या,मावशी,काकू यांना वेगळी टोचणी देणारी प्रथा पाळण्याऐवजी आनंदाची दोन बोटे वाण म्हणून लावू."


त्या दिवशी प्रत्येकीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ऑफिस मधल्या मावशी भरल्या डोळ्यांनी तिचा हात हातात घेऊन म्हणाल्या,"पोरी,आज प्रत्येक क्षणी टोचणारी गोष्ट आनंदात बदलली."



सुलभाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.

एवढ्यात सूनाबाईचा आवाज आला,"आई,चला. दोन बोटे आनंदाची लावून असंख्य स्त्रियांना आनंदी वाण देऊया."

केसात मोगऱ्याचा गजरा माळून सुलभा बाहेर पडत होती आणि सूर्यभान फोटोतून हसल्याचा भास तिला आनंदाची बोटे वाटायला नवा आत्मविश्वास देत होता.


ही सत्य कथा आहे. फक्त स्थळ, काळ आणि संदर्भ बदलले आहेत. खरच नवरा नाही म्हणून दुःखाची टोचणी देण्यापेक्षा आनंदाची दोन बोटे लावुया. आनंद देऊया आणि घेऊया.


©® प्रशांत कुंजीर.