डोंबाऱ्याची पोर- भाग ३

This story is about effect of alcohol on society

राज्यस्तरीय ईरा करंडक कथामालिका

संघ- रायगड-रत्नागिरी

विषय-सामाजिक

डोंबाऱ्याची पोर- भाग ३

असाच एक दिवस रत्ना अचानकच कामावर आली नव्हती. करुणालाही तिने आदल्या दिवशी कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. मुक्ताने करूणाजवळ भुणभुण लावली तशी ती मुक्ताला घेऊन रत्नाच्या घरी जाण्यासाठी निघाली. मध्येच तिच्या मनात काही शंका आली तसे तिने मुक्ताला घरी राहून अभ्यास पुर्ण करण्यास सांगितले आणि ती एकटीच बाहेर पडली होती.

काही वेळातच ती पक्याच्या झोपडीबाहेर पोहचली होती. झोपडीचे दार तसेच उघडे होते अन आतले दृश्य पाहून करुणा जागीच थिजली होती. घरातले सामान अस्ताव्यस्त पसरले होते. रत्ना एका कोपऱ्यात बेशुद्ध पडली होती. तिचा चेहरा काळा-निळा पडला होता. अंगावरचे कपडे विस्कटलेले होते. पक्या आणि त्याचा छोटा मुलगा घरात दिसत नव्हते. सारी परिस्थिती पाहून करुणा आतून हादरून गेली होती. तिने पटकन आत जाऊन, बाजूला पडलेल्या माठातील पाणी रत्नाच्या तोंडावर शिंपडले तशी ती काहीशी शुद्धीत आली होती.

'तायसायब, माझ पोर, माझी अब्रू.'- रत्ना मोजकेच बोलून पुनः बेशुद्ध पडली होती.

धास्तावलेल्या करुणाने परत एकदा रत्नाच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वेळी प्रयत्न करूनही ती शुद्धीवर येत नसल्याचे पाहून तिने आपल्या गाडीचालकाच्या मदतीने तिला जवळच्या डॉक्टरकडे दाखल केले होते. उपचारानंतर काही वेळाने तिला शुद्ध आली तशी ती पुन्हा विलाप करू लागली होती. 

'रत्ना, शांत हो. आधी शांत हो. स्वतःला सावर आणि मला नीट सांग, नेमके काय झालेय तुझ्यासोबत?'- करुणा तिला आपल्या कुशीत घेत हळुवार थोपटून विचारत होती.

'मेला माझा नवरा, मुडदा बशीवला त्येचा. त्येच्यामुळे काय दिस बघाय लागला तायसायब. गुत्त्यावर उधारी थकवली म्हणून त्यो गुत्त्यावाला रघु त्याला शोधत सकाळीच आमच्या घरी आला व्हता. पक्यासोबत भांडला तसा माझा #$@ नवरा मला एकटीला घरात सोडून पळून गेला. त्ये रघुच्या डोसक्यात आधीच उधारीचा राग व्हता अन त्यात पक्याने पळ काढल्यावर तर त्याच पार टकूर फिरलच. त्याने थेट माझ्या साडीलाच हात घातला तायसायब. मी त्येला माझ्या अंगाला हात लावू दिला नाय तर चिडला त्यो. जनावरासारखा मला मारत सुटला. मी मोडले पर अंगाला शिवू नाय दिला तायसायब. पर..पर.. माज पोरगं घेऊन गेला ओ त्यो. म्हणला एकतर पैक दे नायतर रातच्याला घरला झोपाय ये तरच पोरगं देईल . आणि आज काय नाय दिल तर उद्या पोराच नरड दाबीन बोललाय. त्यो गुंड हाय तायसायब, काय बी करेल.'- रत्नाने रडत रडत सारा प्रसंग वर्णन केला तसा करुणाच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

'आपण सोडवूया तुझ्या लेकाला. तू चिंता नको करुस.'- करुणेने पक्याची थकबाकी विचारून तेवढे पैसे आपल्या गाडी चालकाच्या हाती देत त्याला रघुच्या पत्त्यावर पाठवले होते आणि ती स्वतः रत्नाला घेऊन तिच्या झोपडीत परतली होती.

'तायसायब, तुमी लय केलात बघा . अवो, इकडं स्वतःचा नवरा असा ढुंगणाला पाय लावून पळाला पर तुमी कोण कुठल्या माझ्या मागे उभ्या राहिल्या. कुठं फेडू तुमचं मी उपकार?'- रत्ना झोपडीच्या दारातच करुणाच्या पायाशी लोटांगण घेती झाली होती.

'अग, असे काय करतेस? असे नको करुस. वेडी झालीस का?'

'तायसायब पर तुमी आमच्यासाठी एवढं का करताय? कळलं नाय बघा.'

'आत चल सांगते तुला.'

दोघी घरचे दार ढकलून आत जाताच त्यांना भिंतीच्या एका कोपऱ्यात पक्या भेदरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला. पाय मुडपून बसलेला पक्या अजूनही थरथर कापत होता. त्याला त्याही अवस्थेत पाहून रत्नाच्या रागाचा भडका उडाला होता.

'मुडद्या, #@%@, @^#*@, नीच माणसा, मला त्या सैतानाच्या हवाली करून पळून गेलास व्हय. तुझ्यामुळे माझ लेकरू..'- रत्ना दात ओठ खात नवऱ्याच्या अंगावर धावून जातच होती की करुणेने तिला मागे ओढून धरले होते.

इतक्यात करुणेचा गाडीचालक रत्नाच्या छोट्या मुलाला घेऊन तिथे पोहचला होता. त्याला सुखरूप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. करुणाने चालकाला गाडीत थांबण्याची विनंती करत त्याला पुढे पाठवले होते.

'रत्ना शांत हो, बस मी जे सांगते ते निमूटपणे ऐक. तू काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होतास ना की मी काम काय करते म्हणून?'

'व्हय. पर माझ्या मनात..'- करुणाने हाताच्या इशाऱ्याने रत्नाला बोलता बोलता थांबवले होते.

'मी सांगते ते नीट ऐक आधी. आज मी तुला माझा वर्तमान आणि भूतकाळ दोन्ही सांगते. तुझ्या बऱ्याच प्रश्नांची तुला उत्तरे त्यातून मिळून जातील.'

'बरं तायसायब. बोला तुमी.'

'रत्ना मी एक वैश्या आहे. एका आमदाराची रखेल. त्याला जेव्हा हवे तेव्हा, जिथे हवे तिथे मला माझे शरीर पोहचवावे लागते.'- करुणाच्या डोळ्यांच्या कडा आता पाण्याने भरल्या होत्या.

'साली, तू वाटलंच होत मला. %$ कुठली.'- इतका वेळ घाबरून बसलेला पक्या पटकन उठून बोललाच की तितक्यात त्याच्या गालावर रत्नाची पाच बोट उमटली होती आणि त्या अचानक  झालेल्या आघाताने तो एका बाजूला कलंडला होता.

'नीच माणसा, सकाळच्याला माझी अब्रू खतऱ्यात टाकून तूच पळला व्हता ना रे @%@&? खबरदार माझ्या तायसायबला काय बोललास तर. नरडीचा घोट घेईल म्या तुज्या.'- रत्नाने कमरेला पदर खोचत जवळपास धमकी दिली तसा पक्या जागीच गपगार झाला होता.

' थँक्स रत्ना. समजून घेतल्याबद्दल. मी माझा वर्तमान सांगितला आता भूतकाळही सांगतो. पक्या तू पण नीट ऐक.'- डोळ्यातले पाणी पुसत करुणा सावरून बसली.

'तेव्हा मी ही मुक्ताच्या वयाचीच असेल. माझाही बाप पक्यासारखाच कायम दारूच्या नशेत असायचा. मी आणि माझी माय काय करते याच्याशी त्याला काही सोयरसुतक नव्हतंच कधी. रोज सकाळी आमच्याकडून तो पिढीजात व्यवसाय करून घ्यायचा. आमच्या शरीरात त्राण आहे की नाही याच्याशी त्याला काही घेणेदेणे नव्हते. त्याला फक्त संध्याकाळी दारू ढोसायला पैसे जमा करायचे असायचे. रोज संध्याकाळी जमलेले पैसे जमा करायचे आणि हातभट्टीवर जाऊन दारू ढोसून यायचा, मला आणि मायला मारहाण करून झोपून जायचा, हाच त्याचा दिनक्रम होता. त्याकडून आम्हाला कसलेच सुख भेटत नव्हते. शेवटी मायच्या सहनशक्तीचा बांध तुटला आणि गेली ती शेजारच्या माणसाबरोबर पळून. तेव्हा वाटले की माय चुकीची होती पण जसजशी मोठी झाली तेव्हा कळलं ती बरोबर होती. तिला आभाळ मिळालं, ती उडाली. किती दिवस पिंजऱ्यात बंद राहून तडफडत राहील? मी मोठी होत होती. तारुण्याची लक्षणे ठळक होत चालली तशा अंगावरून फिरणाऱ्या नजरा बदलत चालल्या होत्या. वस्तीत सगळ्यांना बापाची दारू पिण्याची सवय माहिती झाली होती. एक दिवस बाप दारू पिण्यासाठी भट्टीवर गेला तो रात्री घरी आलाच नाही. मी जीव मुठीत धरून घरी त्याची वाट पाहत राहिली पण मध्यरात्र उलटली तरी तो काही आला नाहीच. मी दार लावून तशीच कोपऱ्यात झोपून राहिली. पहाटे कोणीतरी दार वाजवले आणि मी फट पडलेल्या दरवाज्यातून वाकून पाहिलं तर भट्टीचा मालक चंदू बापाला घेऊन उभा होता. मी लगेच दार उघडले आणि त्यांना आत येऊ दिले. बाप अजूनही दारूच्या नशेतच होता. चंदूने त्याला बाजूलाच जमिनीवर झोपवलं आणि तो मागे फिरला. मी दार बंद करायला त्याच्या मागून जात होतीच तर त्याने दाराची कडी आतून लावून घेत माझ्या अंगावर झडप घातली. मी आरडाओरडा करण्याआधीच त्याने माझं तोंड दाबून टाकलं होतं. माझ्या बापासमोरच माझ्या अब्रूची लक्तरे त्याने उधळली. नशेतल्या बापाला त्याचे काहीच भान नव्हते. त्याचा कार्यभाग उरकून झाला तसा मला जीवे मारण्याची धमकी देऊन तो बाहेर पडला. मी फारतर एकोणवीस वर्षाची होती. झाल्या प्रकाराने घाबरली तर होतीच पण मनातून पार उद्धवस्त झाली होती.'- बोलता बोलता करुणाचा कंठ दाटून आला तशी ती थांबली.

'तायसायब.'- रत्ना तिला सावरायला पुढे सरसावली होती.

'पुढे पुढे हे नित्याचेच झाले होते. चंदू बापाला पहाटे दारू पाजून घेऊन यायचा आणि माझ्या शरीराचे लचके तोडायचा. माझा बाप मज्जा करत होता, चंदू मज्जा करत होता आणि मी तेवढी त्यांच्या सुखाची किंमत चुकवत होते; माझी सारी स्वप्न, माझी इज्जत विकून. हळूहळू चंदू घरी सामान देऊ लागला, आम्हाला काय हवं नको ते पाहू लागला. मलाही आता मी काय करावे ते कळत नव्हते. बापाचे व्यसन काही कमी होत नव्हते. एकदिवस तो गेलाच. कायमचा आयुष्यातून गेला. चंदूच्या अत्याचारातून मला दिवस गेले आणि ते मी त्याच्या कानावर घातले तर त्या %^$?#@ ने मलाच बदफैली ठरवत वस्तीबाहेर काढलं.'

'तायसायब, पोलिसात नाय गेला?'

'पोलिस? आपल्याकडे पैसा आणि नाव असेल तर सार काही विकत घेता येते ग. चंदूकडे दोन्ही होते. दोन मर्डर करून मोकाट सुटलेला गुन्हेगार होता तो. त्याच्या विरोधात कोण जाणार होते?'

'पुढे?'

'मी जीव देण्यासाठी तशीच बाहेर रस्त्यावरून धावत सुटली. गाड्या पाहण्याचा काही सबंध नव्हताच उलट एखाद्या गाडीने ठोकर मारावी आणि मी जागीच मरावी याच इच्छेने मी सैरभैर धावत सुटली होती. अचानक एका क्षणी गाडीचा प्रखर झोत माझ्या डोळ्यासमोर आला आणि मला गाडीची हलकी ठोकर बसली. मी मेली नाही, बेशुद्ध झाली. मला शुद्ध आली तेव्हा मी एका फार्महाऊसवर होती. काही डॉक्टर माझा इलाज करत होते. काही दिवस माझी चांगली बडदास्त ठेवली गेली होती. पण मी कुठे आहे हे मला कोणीच सांगत नव्हते. एक दिवस अचानक एक मध्यमवयीन व्यक्ती माझ्या रुम मध्ये आले आणि त्यांनी डॉक्टरांकडे माझी चौकशी केली. डॉक्टरांनी त्यांना मी ठणठणीत झाल्याचं सांगताच ते विकृत हसले. डॉक्टरांना त्यांची फी देऊन ते माझ्याजवळ आले. शरीर तेच, प्रारब्ध तेच फक्त आता पुरुष बदलला होता. दिवस जात होते, दिवस-रात्र तो माणूस माझ्यावर बलात्कार करत होता. माझं मन आणि माझं शरीर अगदीच निर्ढावलेले झाले होते. कित्येकदा वाटायचे की एकतर जीव द्यावा किंवा घ्यावा पण कधीही हिंमत झालीच नाही. शेवटी मी हार मानली. आजही मी त्याची भूक मिटवले. त्याच्या विकृत इच्छा पुर्ण करते. रखेल आहे मी त्याची. आत्मा तर कधीच मेला आहे, श्वास चालू असेपर्यंत हे शरीर जगवायचे आहे एवढंच.'- करुणा खाली मान घालून स्फुंदू लागली होती.

'तायसायब, तुमी एवढं सगळं सहन करताय. मला काय बी माहीत नव्हतं बगा. स्वतः हे सगळं सोसून तुमी आमच्या सारख्या गरीबाच्या सहाऱ्याला उभं राहीला. माझ्यासाठी आज बी तुमी देवीच रूपच हाय बगा.'- रत्नाने करुणाचे पाय धरले होते.

'मला बी माफ करा. दारू पायी मी बी लय पाप केली हाय. पर तुमी तुमची कहाणी सांगून माझे डोळे उघडले. आता म्या बी काम शोधणार. माझं कुटुंब मी जगवणार. पोरांना शिकवणार. '- पक्याने दोघींसमोर हात जोडले होते.

'तुला उपरती झाली म्हणजे खूप झालं. फक्त दिलेला शब्द पाळ.'- करुणा डोळे पुसत उठली.

दुसऱ्या दिवशी करुणाच्याच सांगण्यावरून पक्या स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला होता. तीन महिन्यात त्याने निग्रहाने दारूचे व्यसन सोडण्यात यश मिळवले होते. केंद्रातून बाहेर येताच तो एका हॉटेलात वेटर म्हणून राहिला होता.

अशीच काही वर्षे गेली होती. मुक्ता आता पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे राहायला आली होती. करुणा आता चाळीशीकडे झुकली होती. शरीराची ताठरता गेली तशी आमदाराने तिला दिलेल्या साऱ्या सोयी काढून घेत तिला घराबाहेर काढले होते. आयुष्याच्या संध्याकाळी ती पुन्हा रस्त्यावर आली होती. आता मात्र तिची जगण्यातली आसक्ती पूर्णतः लयाला पोहचली होती. आज पुन्हा ती रस्त्यावर सैरावरा धावत होती. परत एकदा गाडीचा झोत डोळ्यावर आला होता, परत गाडीची ठोकर बसली होती, यावेळी मात्र तिला शुद्ध आली होती तेव्हा ती हवेत तरंगत होती आणि खाली तिच्या शरीराभोवती लोकांची गर्दी झाली होती.

दुसऱ्या दिवशी पक्याला वर्तमानपत्रात एका कोपऱ्यातल्या बातमीत करुणा दिसली तसा तो हादरला होता. भाऊ म्हणून त्याने तिचा बेवारस मृतदेह ताब्यात घेतला होता आणि तिचे अंतिम विधी पार पाडले होते.

'कोण व्हती ग ती? स्वतःच्या जीवनात एवढा अंधार असून आपल्या मुक्तेच्या आयुष्यात एवढा प्रकाश का म्हणून करून गेली?'- प्रकाश तिच्या जळत्या चितेकडे पाहून रत्नाशी बोलत होता.

'मुक्तेसारखी ती पण.. डोंबऱ्याची पोर!'- रत्ना रडता रडता बोलून गेली.

समाप्त

©® मयुरेश तांबे

🎭 Series Post

View all