Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

डोंबाऱ्याची पोर- भाग २

Read Later
डोंबाऱ्याची पोर- भाग २

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

संघ- रायगड-रत्नागिरी

विषय-सामाजिक

डोंबाऱ्याची पोर- भाग २

“मी करुणा.. पण ते जास्त महत्वाचे नाही. मुलगी एवढी गडबडताना पाहूनही तुम्ही खेळ पुढे चालू ठेवण्याची जोखीम कशी काय स्विकारू शकता?”

 

“कालपास्नं पोटात अन्न नाय बाय.. खेळ नाय केला तर कोण पैकं देईल?”-पक्याची बायको काकुळतीला येऊन बोलली.

“पण हिच्या जीवाला काही बरं-वाईट झाले असते तर?”-करुणाने मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले.

“त्ये आमाला बी कळतंय तायसायब पर दुसरा काय पर्याय बी नाय बगा.. हा आमचा पिढीजात व्यवसाय.. याच्या बिगर आमाला दुसरं काय येत नाय बगा..”

पक्याने त्याची असहाय्यता व्यक्त केली.

“हे काही पैसे घ्या. तुम्ही राहता कुठे?”

करुणाने पर्समधून काही पैसे काढून त्या उभयतांच्या हाती ठेवले.

“नको तायसायब, पैसे नको.. आताच्याला आम्ही इथेच मैदानात झोपडी बांधून राहतोय. पुढे जसं मैदान मिळेल तसं..”

पक्या वर आकाशाकडे पाहत उत्तरला.

“ताई बोललात ना? मग त्या हक्कानेच देतेय मी. आता ठेवून घ्या. हि छोटी माझ्या अंतःकरणात उतरली पार. मी परत येईन..”

करुणाने पैसे जबरदस्ती पक्याच्या बायकोच्या हाती कोंबले आणि ती तशीच उठून उभी राहिली. मुक्ताला हातानेच बाय म्हणून ती आपल्या गाडीच्या दिशेने निघूनही गेली होती. पक्याचे कुटुंबिय तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना अजूनही गोंधळलेलेच होते.

करुणा गाडीत बसली तोच तिला आमदार पटेलांचा फोन आला आणि त्यांनी तिला एका फार्महाऊसचा पत्ता दिला होता. चालकाला तो पत्ता देत ती पुनः मुक्ताच्या काळजीत बुडाली होती.

रात्री उशिरा तिच काम आटपले तशी ती घरी येण्यासाठी निघाली. आज दिवसभर अशीही मुक्ता तिच्या मनात घर करून होतीच त्यामुळे येताना तिने चालकाला विनंती करत, गाडी सकाळच्या मैदानाजवळ घेण्यासाठी सांगितली.

मैदानाजवळ पोहचताच तीची नजर पक्याची झोपडी शोधत होती. तिकडे असलेल्या वीस-पंचवीस झोपड्यांमधून पक्याची झोपडी शोधणे तसे फारसे कठिण नसले तरी त्या मिट्ट काळोखात शिरणे तिला काहीसे भीतीदायक वाटत होते. शेवटी मुक्ताचा चेहरा डोळयासमोर ठेवून, मनाचा हिय्या  करून ती पुढे सरकली. 

 

पुढे सरकताच तिच्या कानावर कुण्या दारुड्याचे शब्द पडले तशी ती तो आवाज लक्ष देऊन ऐकू लागली. कोणीतरी आपल्या बायको-मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होता. करुणाला आवाज ओळखीचा वाटला तसे तिच्या नाकपुड्या रागाने फुगून लाल झाल्या होत्या. डोळे मोठे अन मुठी नकळत आवळल्या गेल्या. भराभर पाऊले टाकत ती आवाजापर्यंत पोहचली होती. 

 

“आज तुमच्या मुळे मला त्या बायच्या हातून भीक घ्यावी लागली. एवढे खाऊन पण अंगाला लागत नाय तुमच्या. जरा बी धीर नाय व्हय तुज्या अंगाला. काय हवा आली व्हती का त्या टायमाला? लगेच डूलायला लागली व्हती तू? आणि तू.. तू काय लगेच तिला खाली उतरवलं? कोण बोललं व्हतं तुला? बोल की.. आता का दातखिळी बसली तुमची?”

 

पक्या दारूच्या नशेत बायको-पोरीवर दातओठ खात बोलत होता.

“पर म्या पोरीपाई धावली व्हती.. ती पडली असती मंग?”

पक्याची बायको रडावलेल्या स्वरात बोलली.

“पडली तर पडली.. जरा डोस्कं ताळ्यावर तरी आलं असतं ना तिचं.. नुसतं खायला हवं पर खेळ दाखवाय नग व्हय?”

पक्या जवळपास मुक्तेच्या अंगावर धावून गेला होता.

“जागीच थांब नायतर जीव घेईन तुझा..”

करुणा दरवाज्यातूनच कडाडली तसा पक्या नशेतच जमिनीवर कोलमडला.

“तुमी एवढ्या रातच्याला?”

पक्याची बायको लगबगीने उठली. 

“ओ, तुमी एवढ्या रातच्याला कशापाई आलायसा? पैकं मागायला व्हय? जा..तुमचे पैसे घेऊन जा,. मला नगं त्ये..”

पक्या नशेत बोलला.

“दे मला माझे सगळे पैसे परत मग.”

“हा देतो ना. थांब आता फेकतो तुझ्यावर तोंडावर सगळे पैसे.. थांब तू इथेच.. कुठेय? कुठे गेले माझे पैसे?”

पक्या शर्ट-पॅन्ट चे खिसे चाचपडत होता.

'देतोस ना पैसे? मी थांबली आहे इथे.. पैसे दिलेस की निघून जाईन मी..”

करुणा अगदी थंडपणे बोलत होती.

“हा देतो ना. गेलं कुठं ते रुपडे? आता तर खिश्यात होते..”

“नाहीच आहेत तुझ्याकडे ते.. दारूत उडवलेस तू.. माझे पैसे मिळाले नाही तर मी मुक्ताला माझ्यासोबत घेऊन जाणार. जोपर्यंत तू माझे पुर्ण पैसे चुकवत नाहीस तोपर्यंत ती माझ्याकडे राहील..”

करुणा निग्रहाने बोलली.

“हा..जा..जा घेऊन.. असली दळभद्री औलाद हवी कोणाला? जा घेऊन जा. साला जरा ताकद नाय शरीरात.. सगळा इज्जतीचा पाला करून टाकला..”

पक्याने नशेत मुक्ताला पुनः शिव्यांची लाखोली वाहिली.

“ताई, तुझी लेक माझ्यासोबत पाठव.. मी तुला वचन देते की, मी तिचे आयुष्य सावरून देईन. तिच्यावर तुमचाच हक्क असेल पण जे दिवस तू जगत आहेस ते तिला जगायला लावू नकोस.. तिला या दलदलीतून बाहेर काढ. वाटलं तर तू पण माझ्या घरी घरकामाला ये म्हणजे तुझी लेक तुझ्या डोळ्यासमोर राहील..”

करुणा पक्याच्या बायकोसमोर बसून तिला विनंती करत होती.

“अरे, तिला काय ईचारते तू? मी बोललो ना..  ईषय कट. घेऊन जा त्या कार्टीला. नायतर इकडे जीव घेईल मी तिचा..”

पक्या पुनः लेकीच्या अंगावर धावला होताच परंतु मध्ये करुणाला पाहून जागीच थबकला होता.

'जा बायसायब घेऊन जा हिला.. इथ नरकात राहिली तर कुस्करून जाईल माझं लेकरू.. तुमच्याकडे राहीली तर भलं तरी होईल तिचं.. म्या बी तुमच्याकडे येत जाईल कामाला..  तेवढा माज्या जीवाला बी घोर लागायचा नाय.. इथे ठेवली तर हा राक्षस जीव घेईल माझ्या लेकीचा..”

 

पक्याच्या बायकोच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. त्या दोघीनीं परतून पाहिलं तर पक्या काही उत्तर न देताच बाजूलाच जमिनीवर डाराडूर झोपी गेला होता. पक्याच्या बायकोने लेकीला कसेबसे समाजवून तिला करुणासोबत जाण्यास राजी केले होते. दररोज भेटायला येईन या आश्वासनावर तिने मुक्तेला निरोप दिला होता.

--#--

करुणासोबत गट्टी होण्यासाठी मुक्ताला काही आठवडे लागले होते. एरव्ही दिवसा तिची आई सोबत असल्याने ती नव्या जागेत रुळू लागली होती. हळूहळू करुणाने तिला अभ्यास शिकवण्यास सुरुवात केली होती. मुक्ताची स्वतःची आकलनशक्ती चांगली असल्याने ती ही भरभर सारे आत्मसात करत होती. आमदार पटेलांच्या वशील्याने करुणाने तिची एका चांगल्या शाळेत भरती केली होती. आपल्या लेकीला शाळेच्या गणवेशात पाहून पक्याच्या बायकोचा ऊर आनंदाने भरून येत होता आणि करुणेमुळे हे सारे शक्य झाल्याने ती वरचेवर तिचे आभार मानत होती.

“रत्ना, हा तुझा या महिन्याचा पगार..”

करुणाने पक्याच्या बायकोला तिच्या घरकामाचा पगार पुढे केला होता. रत्नाने पदर पसरून ती रक्कम हातात घेतली होती. ती रक्कम पाहून आज पुनः तिचे डोळे भरून आले होते. तिने ती रक्कम डोळ्याला लावून परत एकदा करुणाला धन्यवाद दिले होते. काही क्षण त्या रक्कमेकडे पाहिल्यानंतर तिने त्यातील काही रक्कम बाजूला काढून आपल्या पदरात बांधून घेतली होती तर शिल्लक रक्कम तिने करुणेसमोर धरली होती.

“रत्ना? हे आणि काय ग?”

'तायसायब, तुमच्यामुळे लेकीच्या आयुष्याचं सोनं व्हायला लागलंय. माझ्या हाताला काम दिलंत तर आता पोरालाही चांगले दिस देता येतील. पर हे सगळं फुकट नगं.. फुकट मिळालं की त्याची माणसाला किंमत राहत न्हाई बगा..  तेव्हा मी ह्ये मुंगीपरी रुपये तुम्हाला पुढे करतेय ते देवापायी तरी कबूल करा. माझी विनंती समजा हवं तर..”

रत्ना अगदीच कळकळीने विनंती करत होती.

'बरं बाई.. जशी तुझी मर्जी..”

गरिबीतही रत्नाने जपलेला स्वाभिमान पाहून करुणाने मनोमन तिचे कौतुक केले होते.

“तायसायब, आता फक्त एक दया करा गरीबावर..”

“काय ग?”

“नवऱ्याची दारू तेवढी सोडवा. रोज रातच्याला इकडून गेली की त्याच्या लाथा अंगावर घ्यायला लागताय बगा. त्याचे दोस्त त्याच्या डोसक्यात कायबाय भरून सोडतात अन हा राक्षस घरी येऊन तमाशा मांडून बसतोय..”

रत्ना भरल्या डोळयांनी हात जोडून उभी राहिली होती.

“तो सध्या काम काय करतोय?”

“कसलं काम? दिवसभर घरी लोळत बसलेला असतोय, सांजच्याला भट्टीवर जायचं, दारू ढोसायची आणि रातच्याला घरी येऊन मला सुजवायचं. हेच चालू हाय त्येचं..”

“ठिक आहे.. पुढचे काही दिवस मी कामात आहे. आपण करू काहीतरी..”

करुणाने रत्नाचे अश्रू आपल्या हाताने पुसत तिला धीर दिला.

“तायसायब यक ईचारु का?”

'विचार ना ग.'

“तुमी काम काय करता? म्हणजे ते तुमी बाकीच्या लोकासारखी बॅगबिग नेत नाय ना म्हणून ईचारते.”

“वेळ आली की मी सांगेन तुला सगळं..”

डोळ्याच्या कडेत आलेले अश्रू लपवत करुणा उठून आपल्या रूम मध्ये निघून गेली होती.

क्रमशः

©® मयुरेश तांबे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..

//