Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

डोंबाऱ्याची पोर- भाग १

Read Later
डोंबाऱ्याची पोर- भाग १

ईरा राज्यस्तरीय करंडक कथामालिका

संघ- रायगड-रत्नागिरी

विषय-सामाजिक

 

 

शहराच्या मुख्य चौकाला लागूनच असलेल्या मैदानात आज एक डोंबारी कुटुंब खेळ करून दाखवत होते. त्या कुटुंबाचा पुरुष  प्रकाश उर्फ पक्या एका लयबद्ध तालात ढोल वाजवत होता. त्याची आठ वर्षाची चिमुरडी लेक, मुक्ता सहा-सात फूट उंचीवर बांधलेल्या दोरीवरून आपला भार सावरत चालत होती. आजूबाजूची गर्दी आणि इतक्या उंचीवर सुरक्षेविना असल्याचं दडपण तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत असलं तरी बहुधा पोटात ओरडणारे कावळे तिला पुढे पुढे चालण्यासाठी भाग पाडत होते. कारण साधसरळ हिशोब होता, जमलेल्या गर्दीला खेळ आवडला नाही तर पैसे मिळणार नाही आणि पैसे नाही तर कालसारखंच आजही उपाशी झोपावं लागणार. पक्याची बायको दिड वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन जमलेल्या गर्दीतून पैश्यासाठीचे ताट फिरवत होती. गर्दी जरी जास्त असली तरी ताटात पैसे टाकणारे अगदीच विरळ होते. मुलीच्या प्रत्येक पाऊलामागे भले शिट्या आणि टाळ्यांचा आवाज शिगेला पोहचत असला तरी दर दहा-बारा माणसांमागे कोणी रुपया-पाच रुपये टाके. एक गोलाकार चक्कर फिरून झाली तशी तिने फिरून पक्याकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली.

 

पक्याने आता ढोलाचा ताल बदलला आणि बायकोला इशारा केला तसे तिने बाजूला पडलेली मळकट भांडी पोरीपर्यंत पोहचवली. पोरीने तोंड वाकडं करतच भांडी डोक्यावर ठेवली आणि ती काहीशी एका बाजूला कलंडल्यासारखी झाली तसा गर्दीच्या काळजाचा ठोका चुकला. आपला तोल सावरण्यासाठी मुलीने हातात लांबलचक काठी पकडली होती. त्या काठीच्या आधाराने ती आपला तोल सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. तिला गडबडताना पाहून पक्या ढोल अधिकच जोरात बडवू लागला होता. त्याच्यामते त्याचे जोरजोरात ढोल वाजवणे ऐकून मुलीला जोश मिळेल आणि ती आपले कौशल्य सराईतपणे दाखवू शकेल. खेळ जितका धोकादायक तितके पैसे मिळण्याची शक्यता अधिक. पोटाची खळगी भरण्याच्या गरजेपुढे लेकीच्या जीवाला होणाऱ्या दुखापतीची शक्यता गौण ठरत होती.

 

दोरीवरून चालतानाच डोक्यावरील भांडी, हातातील काठी आणि स्वतःचे शरीर यांचा तोल सावरत चालणे त्या चिमुरडीला क्षणोक्षणी काहिसे अवघड होत चालले होते. पक्याला त्याची फिकीर नसली तरी त्याच्या बायकोच्या जीवाला घोर लागला होता. पोरीचा झुकणारा तोल पाहून तिच्या काळजात खळबळ सुरू झाली होती. मुक्तेच्या चेहऱ्यावरची वाढती भीती आता तिच्या आईच्या ह्रदयात खोलवर उतरत चालली होती. जमलेल्या गर्दीलाही खेळातील धोका कळल्यापासून एक शांतता आपसूकच प्रस्थापित झाली होती. बहुतांशी लोकांचे श्वास थांबले होते. लोकांची नजर आता मुक्ताच्या डगमगणाऱ्या तोलावर होती. पाऊलागणिक ती तिचा तोल आणि आत्मविश्वास, दोन्हींही हरवत चालली होती. पक्याच्या बायकोने लेकीच्या काळजीने पक्याकडे पाहिलं मात्र पक्याने तिच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आणि तो ढोल अधिक जोरात बडवू लागला होता. खरंतर मुक्तेला तसे गडबडताना पाहून त्याचाही जीव वरखाली होत होताच पण कुटुंबाचे पोट भरण्याची चिंता त्याच्यातल्या बापाच्या मायेला भारी पडली होती.

 

मुक्तेची सुरू असलेली तगमग दुरून एक व्यक्ती पाहत होती. आलिशान गाडीत बसलेली ती व्यक्ती तो खेळ पाहत असतानाच पूर्णपणे त्यात गुंतून गेली होती. मुक्तेच्या प्रत्येक गडबडीसोबत त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील घामाचे थेंब वाढवत होते. हृदय जोरजोरात धडधडू लागले होते.

 

'मॅडम, ए. सी. वाढवू का?'- गाडीच्या चालकाने दोन-तीनदा विचारूनही तिच त्याच्याकडे लक्ष नव्हते.

 

इकडे रिकाम्या पोटामुळे मुक्ताच्या शरीराने हळूहळू असहकार पुकारायला सुरुवात केली होती. ती अधिकच गडबडू लागली तसा गर्दीचा आवाज वाढला होता. पक्याही आता आतून घाबरला होता. बापाची काळजी थेट दाखवू शकत नसल्याने ढोलावर पडणाऱ्या थापेतून तो आपली हतबलता दाखवू पाहत होता.

 

गाडीतील व्यक्तीला मात्र पुढचा धोका कळला होता तशी ती लगबगीने गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडली होती. गाडीचालक काही विचारणार त्याआधीच ती रस्ता ओलांडून त्या मैदानात खेळाच्या ठिकाणी पोहचली होती.

 

'थांबवा हा खेळ. मी म्हणते थांबवा.'- जिवाच्या आकांताने ती ओरडली तशी सारी गर्दी  फिरून मागे पाहू लागली. 

 

पक्याच्या बायकोचाही धीर सुटला तसा तिनेही लगोलग पुढे होत, लेकीला पटकन खाली उतरवले होते. मुक्ताचा चेहरा संपूर्ण घामाने डबडबला होता. चेहऱ्यावरची भीती अजूनही तशीच दाटली होती. तिची तशी अवस्था पाहून तिच्या आईने तिला आपल्या उराशी घेतले होते. पक्याही गळ्यातली ढोल उतरवून लेकीजवळ पोहचला होता. भेदरलेल्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवताना त्याच्यातला बाप आतल्या आत आक्रंदत होता.

 

काही क्षण गेल्यावर त्या तिघांनी आजूबाजूला पाहिलं तर एरव्ही खेळ जरातरी थांबवला तरी लगेच पांगणारी गर्दी आज जागच्या जागीच उभी होती. साऱ्या गर्दीची नजर खेळ थांबवण्याचा आवाज देणाऱ्या त्या व्यक्तीवर खिळली होती.

 

त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अजूनही ताण स्पष्ट दिसत होता. नजर आताही मुक्तावरच खिळलेली होती. मुक्ता आईच्या कुशीत असल्याने तिचा चेहरा पाहण्यासाठी ती व्यक्ती आपल्या टाचा उंचावून तो पाहण्याचा प्रयत्न करत होती. त्या व्यक्तीचे ते भाव पाहून पक्याचे कुटुंबही चकित झाले होते.

 

'कोण हाय हे?'- पक्याच्या बायकोने दबक्या आवाजात नवऱ्याला विचारले.

 

'मला न्हाई माहीत बघ. पर त्ये मुक्तेला अशे काय बघते ते कळे ना.'- पक्याही आता त्या व्यक्तीकडे पाहत होता.

 

निळ्याशार रंगाची साडी आणि तश्याच फिक्कट रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेली ती काहीशी सावळी स्त्री होती. रंगाने सावळी असले तरी चेहरा  विलक्षण रेखीव होता. शरीर बांधेसूद अन इतके कमनीय की पाहणारा अगदी निर्लज्ज होऊन पाहत रहावा. 

 

तीस-पस्तीशीची ती तरुणी हळूहळू पुढे सरकत पक्याच्या कुटुंबाजवळ पोहचली आणि तिने अजूनही भेदरलेल्या अवस्थेत असणाऱ्या मुक्ताच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तिच्या डोळ्यातले कारुण्य पक्या आणि त्याच्या बायकोला गोंधळात टाकत होते.

 

'आपण कोण जी?'- पक्याने अदबीने विचारलं.

 

'खेळ संपला, तुम्ही आपापल्या मार्गाने जाऊ शकता.'- अजूनही तिथेच घुटमळत असलेल्या गर्दीला पाहून ती कडाडली. यावेळी मात्र तिच्या डोळ्यात एक अनामिक राग होता, आवाजात जरब होती. तिचा बदललेला अवतार पाहूनच लोकांनी तिथून काढता पाय घेण्यास सुरुवात केली होती.

 

'बाळ, हे पाणी घे.'- हातातली मिनरल पाण्याची बॉटल तिने मुक्तासमोर धरली.

 

अनोळखी व्यक्तीला असे आपल्या जवळ पाहून घाबरलेली मुक्ता आईच्या कुशीत अधिकच तोंड खुपसून राहिली.

 

'कोण तुमी? सांगितलं न्हाई?'- यावेळेस पक्याची बायको विचारती झाली.

क्रमशः

©® मयुरेश तांबे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..

//