दोघांत तिसरा? भाग २

विवाहित स्त्रीवर प्रेम करणाऱ्या त्याची कथा


दोघांत तिसरा? भाग २


"मॅम, घरी निघालात?" आकाशने बाहेर पडणाऱ्या सुमेधाला विचारले.

" हो.. का रे?" मगाशी आलेल्या वादळाच्या खुणा अजूनही सुमेधाच्या चेहर्‍यावर दिसत होत्या. आकाशच्या हृदयात कळ आली. इतक्या चांगल्या मुलीला रडवणारा क्रूरच असला पाहिजे.

" मी घरी सोडू का तुम्हाला? ते तुम्हाला रडताना पाहिले मी दुपारी." आकाश अडखळत बोलला. ते ऐकून सुमेधाच्या डोळ्यात परत पाणी आले.

" नको. जाते मी. तशी ही सवय आहे मला." ती निग्रहाने डोळ्यातले पाणी पाठी ढकलत म्हणाली.

" मॅम प्लीज. करा ना माझ्यावर फेवर. " काकुळतीने आकाश बोलला. सुमेधाला त्याचे मन मोडवेना. ती त्याच्या कारमध्ये बसली.

" मॅम, रस्ता सांगताना?"

" माझ्या घरीच जाणार. तुला माहिती आहे ना.. की सांगू परत? "

" ते.. तुम्ही तुमच्या आईकडे जाणार होता ना?" आकाशने परत विचारले. सुमेधाने त्याच्याकडे आश्चर्याने बघितले.

" ते मी दुपारी तिथेच होतो." आकाश परत चाचरला.

" जाणार होते. पण आता घरीच जाणार आहे." सुमेधाने बाहेर बघत सांगितले. सुमेधा परत गप्प बसली. आकाशची एक नजर रस्त्यावर तर एक सुमेधाकडे होती. तिला बोलते करण्यासाठी त्याने विचारले.

" मॅम, तुम्ही तर माझ्या आधीपासून जॉब करत असाल ना, मग तुम्ही कार नाही वापरत?"

" मला आवडते रे चालवायला.. पण माझा नवरा.." सुमेधाने मान फिरवली.

" मॅम, राग येणार नसेल तर एक विचारू?"

" विचार ना?"

" तुम्ही सरांना पसंत कसे केले? तुम्ही एवढ्या बोलक्या ते एवढे शांत. म्हणजे मी दोनचार वेळाच भेटलो असेन पण. तुम्ही एवढ्या सुंदर आणि ते.." आकाशने वाक्य तोडले.

" ते म्हणतात ना पदरी पडले आणि पवित्र झाले तसे आहे रे. बघ तुला पण जाणवले ना? मी याच्यासाठी सगळी तडजोड करते. पण हा? नाव काढू नकोस. उलट भांडतो माझ्याशी."

" मॅम तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही सांगू शकता मला." आकाश थोडा धीट झाला होता."

" काही नाही रे सांगण्यासारखे. तूच सांग. तुझे कुठपर्यंत आले लग्नाचे?"

" मॅम मस्करी करता का? लग्न ठरल्यावर तुम्हाला समजेलच ना. नाहीतर तुम्हीच शोधा ना तुमच्यासारखीच कोणीतरी." आकाश तुमच्यासारखीच या शब्दावर जोर देत म्हणाला.

" आता म्हणशील तुमच्यासारखीच शोधा. नंतर माझ्या नावाने खडे फोडशील. " सुमेधा परत खिन्नपणे हसली.

" मॅम, मी जास्त पर्सनल होतो आहे, असे वाटले तर प्लीज सांगा हां. तुम्हाला कोणी मित्र नाही का? ज्याच्याशी तुम्ही हे सगळेच शेअर करू शकाल असा?" सुमेधा डोळे फाडून बघतच राहिली.

" तुला काय म्हणायचे आहे नक्की?"

" मॅम, प्लीज चिडू नका माझ्यावर. मला फक्त एवढेच म्हणायचे होते की जनरली एक पुरूषच स्त्रीचा चांगला मित्र होऊ शकतो असे म्हणतात. सो.. तुमचा कोणी तसा मित्र ?"

" तशी गरजच भासली नाही." सुमेधा कडवटपणे बोलली.

" तेच तर होते बायकांसोबत. त्या घरातल्यांसाठी आपल्या भावनांना कंट्रोल करतात आणि रडत बसतात. आमच्यासारखे मदत करायची इच्छा असणारे काहीच करू शकत नाहीत."

" आज तू जरा जास्तच कोड्यात बोलतो आहेस का? पटकन बोलून टाक काय बोलायचे आहे ते.." सुमेधा वैतागली होती.

" मॅम, ते म्हणजे.. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला.."

" काय?"

" मॅम मला चुकीचे नका घेऊ. तुमच्यासारख्या सुंदर, बुद्धिमान , हुशार अशा व्यक्तीचा खास मित्र व्हायला मला खूप आवडेल." आकाश सुमेधाकडे अपेक्षेने बघत होता. सुमेधा विचारात पडली. आकाशने न बोलता गाडी चालवण्याकडे लक्ष केंद्रित केले. अधूनमधून तो तिच्याकडे बघत होता. अचानक सुमेधाने विचारले.

" आकाश, शनिवारी संध्याकाळी काय करतो आहेस?"

" काही नाही मॅम.."

" मग आपण भेटू. शनिवारी संध्याकाळी सात वाजता माझ्या घरी."

" ओके सुमेधा.." आकाश हसत बोलला. तेवढ्यात सुमेधाचे घर आले म्हणून ती उतरली. आकाश शनिवारची वाट बघत स्वतःच्या घरी निघाला.


सुमेधा स्वीकारेल का आकाशचा मैत्रीचा हात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई..

🎭 Series Post

View all