कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच

It's the memory of childhood which refreshes mind ,some memories are very beautiful which cherishes us when we will become nervous . Childhood plays very important role in everyone's life ,it's full of innocence and funny things.

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच

कथेचं नाव वाचून, तुम्हाला वाटेल, हे काय नाव आहे, ही तर म्हण आहे ,अगदी बरोबर ओळखलत. आता या क्षणाला, खरंच असे वाटते, बालपणीचा काळ किती सुखाचा होता ,कोणत्याही प्रकारचे टेन्शन नव्हते, मन अगदी स्वच्छंदी होते, निर्मळ होते, मनात पटकन कुणाबद्दल द्वेष येत नव्हता, थोडक्यात काय, तर दुनियादारीपासून खूप दूर होतो ,स्वतःच्याच विश्वात रममाण होतो ,या गोष्टीचीही कधी फिकीर नव्हती, की आपल्याबद्दल कोण काय विचार करते, आता मात्र जगताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. 

आम्ही सारे, प्राथमिक शाळेत ,चौथीपर्यंत बालभारतीच्या पुस्तकातून शिकलो. अशीच एक आठवण ,जी आठवण वाचल्यावर, तुमच्याही डोळ्यासमोर, तुम्हालाही तुमच्या लहानपणीच्या, काही तरी आठवणी आठवतील, मनाच्या कोपऱ्यात छान आठवणी आहेत, त्यांना उजाळा मिळेल.

उगाच  नाही म्हणत, लहानपण देगा देवा ,मुंगी साखरेचा रवा.

आम्ही प्राथमिक शाळेत शिकत  असताना,चौथी इयत्तेत स्कॉलरशिपची परीक्षा असायची, पहिली ते तिसरीच्या वर्गात ,जी मुलं नेहमी पहिली दहा ते वीसमध्ये यायची, त्यातल्या काही मुलांना स्कॉलरशिपसाठी निवडण्यात यायचे .त्यांचा वेगळा वर्ग भरवला जायचा, त्यात त्यांच्याकडून स्कॉलरशिप आणि चौथीचा अभ्यासही करून घेतला जायचा ,त्यांच्या शाळेची वेळ इतरांपेक्षा थोडी जास्त होती. आम्ही जेव्हा चौथीत गेलो ,तेव्हा माझ्यासह बारा जणांची, स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी निवड झाली ,मग काय चौथीचा अभ्यास आणि स्कॉलरशिपचा अभ्यास दोन्ही अभ्यास करण्यात वेळ कसा जायचा, ते समजतच नव्हते .पण त्यातल्या त्यात अभ्यास करता करता, वात्रटपणा करायचं मात्र आमचं काही कमी झालं नव्हतं, ते वयच अल्लड असतं ,त्यात वाटतच नाही की ,आपण वात्रटपणा करतो ,आता जाणवते .आम्हाला आमच्या  बाईंनी म्हणी शिकवल्या, त्यात म्हण होती, कुत्र्याची शेपूट कितीही नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच .

आम्हाला सगळ्यांना सांगितलं ,उद्या येताना सगळ्या म्हणी पाठ करून यायच्या आणि त्याची काही उदाहरणे द्यायची, त्यावेळी म्हणींचा वापर कसा करायचा ,एवढं काही माहिती नव्हतं ,शब्दशः अर्थ काढण्याची सवय लागली होती. मग काय शाळा सुटल्यावर ,आमची चौकडी सगळे एकत्र आले आणि या सगळ्यातून विचारविनिमय झाला, शाळेजवळच एक छोट कुत्र्याचे पिल्लू होतं, त्याला पकडण्यात आलं ,खूप परिश्रम घेऊन एक नळी शोधण्यात आली, मग काय त्या कुत्र्याचे शेपूट नळीत घातले गेले, बिचार्‍या त्या कुत्र्याला हे सगळं नवीन होतं ,ते क्यां क्यां ओरडायला लागलं, तरी कुणी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.  सगळ्यांचं लक्ष पुढे काय होतं यावर होतं, दहा ते पंधरा मिनिटानंतर, कुत्र्याचे शेपूट नळीतून बाहेर काढण्यात आले .बाईंनी सांगितल्याप्रमाणे ,शेपूट वाकडे ते वाकडेच होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की, उद्या आता आपण बाईंना छान उदाहरण देऊ ,पण त्यात एकाने शंका काढली की, नळी मोठी होती, म्हणून कदाचित असं झालं असेल, मग काय अजून छोटी नळी शोधण्यात आली ,परत एकदा कुत्र्याचा शोध घेण्यात आला , परत एकदा तीच कृती करण्यात आली,  या वेळेसही शेपूट वाकडीच होती,आता मात्र सगळ्यांची खात्री पटली. सगळे खूश होऊन आपापल्या घरी गेलो.

घरी गेल्यावर, आईने विचारलं ,उशीर का झाला? . मी तिला सगळं सांगितलं ,तर ती हसायला लागली ,मी तिच्यावर रागवून विचारलं ,यात हसण्या सारखं काय आहे. 

आईने मला राग आला आहे ,हे ओळखून, मला जवळ बोलावून घेऊन मला म्हणाली ,अगं ,ते काही उदाहरण नाही,त्या म्हणीचा अर्थ असा आहे की,एखाद्याची एखादी वाईट सवय असते,काही झालं तरी त्याची सवय काही सुटत नाही ,अशा वेळेस ही म्हण वापरली जाते ,जसं की तुला रोज काही तरी गोड खायला हवं असतं ,पण कितीही सांगितलं तरी तू काही ऐकत नाही, समजलं.

मी म्हणाली ,असं असतं का ,आता मी उद्या बाईंना हेच सांगेल,बरं ऐक ना आई ,आता मग मी एवढा अभ्यास केला आहे ,तर एक रुपया दे ना,चॉकलेट आणायला.

आई पटकन त्यावर म्हणाली,कितीही समजून सांगितलं,तरी कुत्र्याच शेपूट वाकडी ती वाकडीच, असं म्हणत हातावर एक रुपया दिला. तो रूपया पाहून,  मनात आनंदाच्या उकळया फुटत होत्या ,पण आईला म्हणाली ,अगं प्रात्यक्षिक करून बघितलं ,आईने हळूच गालावर चापट मारली आणि म्हणाली,लबाड कुठली ,मी काही न बोलता चॉकलेटसाठी धूम ठोकली. दुसर्‍या दिवशी शाळेत किती मजा येईल आणि बाई मला शाबासकी देतील, हा विचार करत कधी झोप लागली कळालचं नाही. आईने हाक मारताच उठले आणि शाळेत जायची तयारी केली,हे सगळं पाहून बाबा म्हणाले ,आज सूर्य पश्चिमेस उगवला तर नाही ना ? 

आईला त्यांचा टोमणा कळाला ,पण माझ्या काही लक्षात आले नाही,मी त्यांना म्हणाली ,पूर्वेस तर उगवला आहे ,काही काय बोलता , बरं ते जाऊ दे ,मी शाळेत चालले.

आई म्हणाली,अजून वेळ आहे ना, पण मी ऐकायला थांबलीच नाही. शाळेत गेल्यावर, बाईंनी विचारल्यावर, मी आईने समजावल्याप्रमाणे उत्तर दिले ,बाईंनी शाबासकी दिली ,मी खूश ,पण जेव्हा सगळ्यांकडे वळून पाहिल्यावर, मी थोडी घाबरले. सगळेच माझ्यावर ताव खाऊन होते ,लगेच माझ्या लक्षात सगळा प्रकार आला.

बाईंनी सगळ्यांना विचारल्यावर, मी बाईंना कालचा झालेला सगळा प्रकार सांगितल्यावर, कुठे सगळे थोडे शांत झाले आणि माझ्या जीवात जीव आला,बाई खूप खळखळून हसत म्हणाल्या, खूप निरागस आहात सारे,मला तुमच्याबद्दल खूप हेवा वाटतोय. आता जाऊन कुठे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळतोय. बाई वर्गाच्या बाहेर जाताच सगळ्यांनी घेराव घालून, मला म्हणाले ,की तुला शिक्षा मिळालीच पाहिजे . सगळे एकमेकांकडे बघून हसले ,मग काय गुपचूप सगळे मिळून, आमच्याच बोराच्या झाडाखाली गेलो ,सगळ्यांनीच बोराची मजा घेतली आणि शाळेत परतलो. घरी आल्यावर, आजीने माझ्यावर एक रागात कटाक्ष टाकला आणि मला कल्पना आली ,पण मी पण तिचीच नात , तिच्या जवळ जाऊन तिला बाईंनी केलेलं कौतुक सांगितलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली,गुणाची नात माझी. आई मात्र आमच्याकडे ,आश्चर्यचकित होऊन पाहत होती .आजी तिच्याकडे एक डोळा मारत म्हणाली ,हेच वय आहे ,मस्ती करायचं,माझ्यासारखी म्हातारी झाल्यावर थोडी मस्ती करणार आहे आणि माझा पापा घेतला ,मी पण आजीला आनंदाने मिठी मारली.

कशी वाटली ,बालभारतीची कथा आणि तुम्हाला तुमचं बालपण आठवलं का ? खरं सांगू खूप दिवसांनी काहीतरी लिहीत आहे,मला तर खूप छान वाटतंय, तुम्हाला जर कथा वाचून आवडली असेल तर, नावासहित शेअर करू शकता आणि हो ,अभिप्राय मात्र अवश्य द्या.

रूपाली थोरात