Jan 19, 2022
General

मुल होणं हेच अंतिम ध्येय?

Read Later
मुल होणं हेच अंतिम ध्येय?

#मुलं_होणं_हेच_अंतिम_ध्येय?

आशा नि लता दोघी पाठोपाठच्या बहिणी. आशा थोरली. आशाला बघायला पाहुणेमंडळी येणार होती. बैठकीच्या खोलीतील तक्क्यांना नवेकोरे कशिदाकाम केलेले कव्हर घातले होते. फुलदाणीत नुकतेच फुललेले डेरेदार लाल,गुलाबी गुलाब खोवले होते. 

आशा दिसायला सुंदर,गोरीपान, थोडीशी स्थूल अंगकाठी. पाहुणेमंडळी येऊन बसली. नवरामुलगा सुजित मधोमध बसला होता. त्याच्या उजव्या हाताला त्याचे वडील,वसंतराव(तात्या) व डाव्या बाजूला त्याचे मामा,सुभानू व बाजूच्या खुर्चीवर नवऱ्या मुलाची आई,सगुणाबाई(माई) बसली होती.

स्वैंपाकघरात कांदेपोह्यांना फोडणी पडली, घरच्या दुधाचा फक्कड चहा मांडला गेला. शेजखोलीत आशाच्या मामीने आशाला नटवली. तिची ठेवणीतली मोरपिसी रंगाची साडी चापूनचोपून नेसवली, केसांची बटवेणी घालून त्यावर डिस्को गजरे माळले, अगदी श्रीदेवी माळायची तसे. माफक पावडर,डोळ्यात काजळ व ओठांना गुलाबीसर लिपस्टीक..सगळा मेकअप झाल्यावर मामीने  स्वतःच्या डोळ्यातलं काजळ बोटाने टिपलं व आशाच्या कानामागे तीठ लावली. 

आशाने मामीला तिच्या मनातली भीती बोलून दाखवली. मामी म्हणाली,"काही घाबरु नकोस. तीही माणसंच आहेत हाडामासाची. चहाचा ट्रे घेऊन जायचं. टिपॉयवर ट्रे ठेवायचा व सगळ्यांना चहा द्यायचा नि खाली वाकून नमस्कार करायचा." मामीने आशाला अगदी खाली वाकून नमस्कार करुन दाखवला. 

लती म्हणाली,"बघ गो आक्की. नाहीतर तिथे जाऊन साष्टांग नमस्कार घालशील." आशा लतीला मारायला धावणार इतक्यात आईने त्या दोघींना नजरेनेच दटावलं तरी आशा बोललीच,"पाहुणे जाऊदेत मग बघतेच तुझी." लतीने तिला वेडावून दाखवलं. 

लताच्या आईने लताला विहिरीवरून पाणी आणायला सांगितलं. खरंतर लताला भाओजी बघायचे होते पण आईच्या मनात शंका होती की न जाणो धाकटीला पसंत केली तर म्हणून लतीला मागीलदारी पिटाळलं होतं. लती हंडा,कळशी,राजू(दोर) घेऊन नाराजीनेच विहिरीवर गेली. राजूची गाठ कळशीच्या गळ्यात घट्ट अडकवून तिने कळशी पाण्यात सोडली.

 कसा बरं असेल आक्कीचा नवरा?छे,आईने जरा पाहू पण दिलं नाही. मिशी असेल का त्याला? आक्की नीट जाईल न चहा घेऊन..किती घाबरलेय ती! एक न् दोन..अनेक विचारांची दाटी तिच्या मनात झाली. 

इकडे आशा डोक्यावर पदर व हातात चहाचा ट्रे घेऊन बैठकीच्या खोलीत गेली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिने एकेकापुढे कपबशी धरली. नंतर खाली वाकून मामीने दाखवला तसा नमस्कार केला व तिच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीवर सासऱ्यांनी बस म्हणून सांगताच बसली. 

तिच्या ह्रदयाचे ठोके तिला अगदी स्पष्ट ऐकू येत होते. गोरापान चेहरा लाजेने,भितीने लाल झाला होता. कांदेपोह्यांच्या प्लेटी तिच्या मामेभावाने आणून दिल्या. मामीने सांगितलन,"आमची आशा अगदी चारीठाव स्वैंपाक करते. उकडीचे मोदक,पुरणपोळी,सांजोऱ्या,मसालेभात..सगळं उत्तम करते. चव आहे आमच्या आशीच्या हाताला." 

सुजितच्या वडिलांनी तिला शिक्षण, वगैरे विचारलं. तिने हळूच एकदा नजर वर करुन नवऱ्या मुलाला पाहिलं. सावळा वर्ण,उंचापुरा,बांधेसूद शरीर,कुरळे केस..आशाला नवरामुलगा आवडला. तिला कळलं,सगळ्या नजरा आपल्याकडेच बघताहेत. तिने लाजून मान खाली घातली. 

पाहुणेमंडळी नंतर निरोप पाठवतो सांगून जायला निघाली. पाणंदीच्या वाटेने गाडीच्या दिशेने जायला निघाली. इतक्यात वाटेतल्या शेणाच्या पोमधे सुजितचा बुट बुडाला.

"अरारा..चल परत पाहुण्यांकडे जाऊन पाणी घेऊ,"सुजितचे वडील म्हणाले.

"नको तात्या थांबा तुम्ही इथेच. ती बघा विहीर दिसतेय. मी आलोच पाय धुवून,"असं म्हणत सुजित विहिरीच्या दिशेने गेला.

लताची शेवटची दूड न्यायची होती. हंड्यातलं पाणी डुचमळल्याने तिचा फुलाफुलांचा सुती परकरपोलका ओला झाला होता. घामाने पोलका अंगाला फिट बसला होता ज्यातून तिचं सौष्ठव उठून दिसत होतं. 

सावळ्या वर्णाची, अपऱ्या नाकाची,टपोऱ्या डोळ्यांची लती प्रश्नार्थक नजरेने सुजितकडे पाहू लागली व त्याने शेणाने भरलेला बूट दाखवताच तिला एकदम
 हसू फुटलं. हसताना तिच्या दंतपंक्ती मोत्यासारख्या चमकू लागल्या. लतीने सुजितला बुट धुवायला मदत केली पण कुणीकडे आलात विचारायचं विसरली.

 बाजूच्या वकीलांच्या घरात कोण ना कोण सदा येतजात असे. लतीला वाटले,असेल त्यांच्यापैकीच कोणीतरी.

 सुजितला लता मनापासून आवडली. तिची निरागसता,खट्याळपणा.. सुजितला तिची भुरळ पडली नसती तर नवलच. तो तिचे आभार मानून तात्यांच्या दिशेने गेला. चारेक तासात ती मंडळी घरी पोहोचली.

 इकडे आईचं,मामीचं बोलणं चालू होतं. 
मामी म्हणाली,"आपली आशा नक्की आवडली असणार त्यांना."
आई म्हणाली,"असंच होवो ग सरे. तुझ्या तोंडात साखर पडो."

लता मात्र गाल फुगवून बसली होती. तिला तिच्या होणाऱ्या भाओजींना भेटता आलं नव्हतं. आशा तिच्याच मनोराज्यात गुंग होती. तिचे डोळे सुजितमय झाले होते. सुजितचं व्यायामाने कमवलेलं बांधेसूद शरीर,कुरळे केस,अगदी सरळ नाक,मिस्कील हासू,कोरीव मिशी..छे! झोप कुठची लागायला तिला. मनाने ती कधीची सुजितकडे पोहोचली होती. 

तिकडे सुजित माडीवर झोपला होता. त्याने डोळे मिटले की उन्हात चांदणं सांडणारं लतीचं मनमोकळं हसू,तिच्या गालावर खेळणारी लडिवाळ बट,परकर खोचून घेतल्याने गुडघ्यापर्यत दिसणारे ओलेते पाय,चमचमणारी पैंजणं..सगळं अगदी जसंच्यातसं त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं. 

सुजितने त्या मुलीविषयी मित्रांकडे चौकशी केली असता त्याला कळालं की ती आशाची धाकटी बहीण लता आहे.

 सुजितची आई,माई त्यास विचारावयास आली,"होकार कळवायचा ना. आज दिगंबर भटजी तिकडे जाणार आहेत. पत्रिकाही बघून घेतील. तसा तू काही आमच्या शब्दाबाहेर नाहीस म्हणा आणि मुलगीही अगदी नक्षत्रासारखी आहे." 

असं म्हणत रिकामं तांब्याभांड घेऊन माई जाऊ लागताच सुजित म्हणाला,"थांब माई,मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. मला आशा नाही लता पसंत आहे."

"अग्गोबाई,ही लता कोण रे?"

"लता आशाची धाकटी बहीण."

"अरे पण ती कुठे दिसली तुला? मला तर नाही बाई कुठे दुसरी एखादी मुलगी दिसली तेथे."

"माई माझा पाय शेणात भरला तो धुवावयास पाणवठ्यावर गेलो होतो ना तेथे उभी होती ती. तिनेच पाणी दिलं मला."

"अरे सुजा, काय मति फिरलेय का रे तुझी. मोठ्या बहिणीला पहावयास गेलास नि धाकटी पसंत आहे म्हणतोस. आता निरोप तरी कोणत्या तोंडाने द्यायचा पाहुण्यांना! अजून विचार कर. दोनाचे चार दिवस घे पण आशेच्या बाजूने कौल दे राजा." असं म्हणत माई तिथून निघाली. तिच्या मनात भीतीचं काहूर उठलं. साहजिकच होतं ते. धाकटीला थोरलीच्या आधी उजवतील कसे!

दोन दिवस होत आले. सुजा माडीवरचा खाली येईना. तात्यांच्या नजरेला दिसेना. चौथ्या दिवशी दिगंबर भटजी यायचे होते. तात्या कचेरीत जायचे थांबले. ते दिगंबर भटजींना होकार कळवणार इतक्यात माई म्हणाली,"अहो थांबा. जरा ऐकून घ्याल का?"

"आता काय?"

"अहो,चिरंजीवांच मन नाही त्या मुलीत."

"न आवडायला काय झाले त्याला. मुलगी लाखात एक आहे. दिसायलाही गोरीपान,नाकीडोळी नीटस..मेट्रीक पास आहे. अजुन कोणती अप्सरा मिळणार त्याला का शोधली आहे कुणी मड्डम?"

"अहो,इतका त्रागा नका हो करु. त्याचं मन धाकटीवर बसलय. लता नाव तिचं."

"काय बोलता तुम्ही? त्याला नाही काडीची अक्कल. आता पाहुण्यांस काय सांगावे. थोरलीस काय वाटेल आणि त्यांचे वडील तयार होतील,धाकटीचे लग्न आधी करावयास? सगळा घोळ घालून ठेवला दिवट्याने!"

तात्या स्वतः मुलीच्या घरी गेले. त्यांना येताना पहाताच नाना आनंदले. त्यांनी पाण्याचं तांब्याभांड आणावयास सांगितलं. बाहेरच्या काळ्याभोर फडतरीवर तात्या व दिगंबर भटजींनी हातपाय धुतले. नानांनी पुढे केलेल्या पंचाच्या सहाय्याने त्या दोघांनी हातपाय पुसले व घरात आले. 

नानांनी त्यांना बसण्याचा आग्रह केला. तात्यांनी मग नानांना अगदी खालच्या आवाजात सांगितलं की मुलाला तुमची कनिष्ठ कन्या पसंत पडली आहे.
नाना म्हणाले,"हे नितीस धरून होणार नाही. थोरलीचं लग्न झाल्याशिवाय मी धाकटीचं लग्न लावून देणार नाही."

तात्या म्हणाले,"आपण आशासाठी माझ्या स्नेह्याच्या मुलाचे स्थळ पाहू. अरविंद नाव त्याचे. तोही सुजितसारखाच आहे दिसावयास. सरकारी नोकर आहे. घरचं सगळं चांगलं आहे. तुम्हास ठाऊक असावा. तुमच्या गावातच शिक्षक आहे तो.  उद्याच घेऊन येतो त्यांना."

अरविंदला आशा पसंत पडली आणि घरात दोघी मुलींच्या लग्नाची तयारी सुरु झाली. आधी आशाचं मग दहाएक दिवसांनी लताचं लग्न झालं. आशीच्या मनात मात्र लतीविषयी थोडी असूया निर्माण झाली होती. ती लतीशी नीट बोलेनासी झाली.

दोघींचीही लग्न थाटामाटात झाली. थोड्याच काळात दोघी बहिणी आपापल्या संसारात रुळल्या.आशाच्या नवऱ्याने,अरविंदाने  जाण्यायेण्याचा त्रास वाचावा म्हणून त्याच्या शाळेलगतच्या घरात भाड्याने खोली घेतली. 

 आशा आठवड्यातून दोनतीनदा तरी माहेरी फेरी मारायची. कधी संध्याकाळी अरविंद व आशा दोघंजणं आशाच्या माहेरी जायचे. गप्पा,खाणं व्हायचं. अरविंदच्या बोलक्या स्वभावामुळे व सेवाभावीपणामुळे तो नानांना मुलासारखाच वाटू लागला. परकेपण हळूहळू विरत गेलं. अरविंदाने मग तिथेच जागा घेऊन घरही बांधलं व आईवडिलांना नवीन घरात रहावयास घेऊन आला.

 लता वर्षातून दोनदा माहेरी यायची. यायची ती साताठ दिवस रहायला. लताचा नवरा,सुजित वकील होता. तो त्याच्या कोर्टकचेरीच्या कामात व्यस्त असल्याकारणाने लताला आणायला यायचा तेव्हा सासरवाडीला एखादी रात्र रहायचा.

 सुजित येणार असला की नाना मोठ्या जावयाला सुजितकरता मिठाई,फळे आणावयास सांगायचे. खरंतर नानांना तसे सांगणे रुचत नव्हते पण गुडघेदुखीमुळे त्यांना जास्त चालवत नसे व अरविंदही न संकोचता सगळं आणून द्यायचा. व्यवहारालाही चोख. पण आशाला सुजित येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी तिच्या नवऱ्याने वावरणं आवडत नव्हतं पण ती ते बोलूनही दाखवू शकत नव्हती.

लता प्रत्येकवेळी येताना नवीन सोन्याचा डाग घालून यायची. आई,मामी,इतर सख्याशेजारणी कौतुकाने तिचे स्त्रीधन पहायच्या पण आशाकडे असे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. घर बांधण्यासाठी काढलेल्या कर्जाचे हफ्ते व सासूसाऱ्यांच्या आजारपणाच्या खर्चात अर्धाअधिक पगार संपत होता.

लताला दोन जुळी मुले झाली. लव,कुश नाव ठेवले. अगदी राजबिंडी होती दोन्ही बाळं. आशाला मात्र मुल होत नव्हतं. नवससायास झाले. डॉक्टरी उपचार करुन घेतले. त्यात कळले की अरविंदापासून तिला मूल होऊ शकत नाही. आशा हे ऐकून हादरली. 

अरविंदा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता की मुल नसलं म्हणून काय झालं,आपण आहोत नं दोघं एकमेकांना शेवटपर्यंत. आशाला ते मान्य नव्हतं. तिला तिचं बाळ हवं होतं. अरविंदा म्हणाला,"माझे शाळेतले विद्यार्थी ही माझी मुलंच आहेत. आपल्याकडे शिकवणीला येतात तेंव्हा तुही त्यांना जीव लाव."
आशाचं मन मानत नव्हतं. आशा म्हणे,"हेच माझ्याबाबतीत झालं  असतं तर तुम्ही राहिला असता बाळाशिवाय?"

अरविंदाचं आशीवर खूप प्रेम होतं पण तो तिला ते पटवून देऊ शकत नव्हता. त्याने आईवडिलांनाही तो पिता बनण्यास असमर्थ आहे सांगितल्यापासून ती दोघंही बिचारी खालमानेनं राहू लागली. आशा आता तरुणपणीच म्हातारी वाटू लागली होती. जीवनाचा आस्वाद घेण्याची तिची इच्छाच नाहीशी झाली होती.

 अरविंदाने सारं लक्ष शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे वळवलं. त्याचा योग्य तो परिणाम दिसू लागला. विद्यार्थ्यांमधे उत्तरोत्तर प्रगती होऊ लागली. 

दिवस,महिने,वर्षे जात होती. लताची दोन्ही मुलं भरपूर शिकली. मोठा लव परदेशात गेला. त्याच्यापाठोपाठ धाकटाही गेला. दिवसाला येणारे त्यांचे फोन,आठवड्यातून एकदा,मग महिन्या दोन महिन्यातून एकदा येऊ लागले.

 सततच्या दगदगीने सुजित लवकर थकला. त्याला पक्षाघाताचा झटका आला.  त्याचे म्हातारे आईवडील मुलाची ही अवस्था पाहून अश्रु गाळत होते. मुलांना कळवलं पण दोघांनाही वेळ नव्हता. आशा व अरविंदा अधुनमधून बघायला जायचे. सुजितच्या तब्येतीची,औषधपाण्याची चौकशी करायचे. 

आशा बघत होती..लताकडे धनदौलत,मुलंबाळं सारं काही आहे पण नवरा बरा तर सगळं बरं. त्याचीच प्रक्रुती बिघडली की संसाराची कशी दुर्दशा होते ते पहात होती. 

याऊलट आयुष्यभर हसऱ्याखेळत्या मुलांमधे राहिल्याने अरविंदाची प्रक्रुती ठणठणीत होती. अरविंदाच्या हाताखालून मोठी झालेली मुलं आता मोठमोठ्या पदांवर कार्यरत होती. कुणी डॉक्टर, कुणी जिल्हाधिकारी, कुणी वकील,कुणी शिक्षक.. सगळे विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील लोक अरविंदाला मानत होते. .सोडून आशीला. 

आशीने मात्र अरविंदाला आयुष्यभर दु:ख दिलं होतं का तर तो तिला मुल देण्यास असमर्थ होता पण त्याच्या बाकीच्या गुणांकडे तीचं कधी लक्षच गेलं नव्हतं. 

आशीने ठरवलं,झालं ते झालं इथून पुढे तरी कोणाशीही स्वतःची,नवऱ्याची तुलना न करता गुण्यागोविंदाने संसार करायचा. जे आहे त्यात सुख मानायचं. 

नमस्कार मंडळी????,
अशी कित्येक जोडपी समाजात आहेत की जी लग्नाचे अंतिम ध्येय मुलं होणे हे मानतात. मुलं होणं हे कोणाच्या हातात नसतं. कोणाला डझनभर होतात तर कोणाला एकही नाही. यात कधी स्त्रीमधे दोष असतो तर कधी पुरुषात. डॉक्टरी उपचार फार पुढे गेले आहेत. अमाप पैसे खर्च करुन मुल न होणाऱ्या दाम्पत्यालाही आजकाल मुलं होतात. त्यावेळी त्यांना होणारा आनंद नक्कीच शब्दातीत असतो पण वयाच्या एका टप्प्यापर्यंत ठीक..अगदी एजेड झाल्यावर येनकेनप्रकारेण मुलाला जन्म दिला तर त्या मुलालाही त्याच्या आईवडिलांची साथसोबत,आधार फार कमी काळ मिळतो. त्यापेक्षा मुल दत्तक घेणं चांगलं. एका अनाथ मुलाला हक्काचे आईवडील मिळतील. पण आपल्याच रक्तामासाचं मुल हवं अशी दाम्पत्याची,त्यांच्या नातेवाईकांची अपेक्षा असते. 

या अट्टाहासाला बऱ्याच अंशी समाजही जबाबदार असतो. मग काय गुड न्यूज कधी? अजून कसं काही नाही हे असले समाजाचे प्रश्नही घातक ठरतात. 

आशाने तुलना करत आयुष्यातली सोनेरी वर्ष घालवली. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. तुलनेने काहीच साध्य होत नाही.

-----सं.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now