Feb 28, 2024
डॉक्टर्स डे स्पेशल

डॉक्टर्स डे

Read Later
डॉक्टर्स डे


१ जुलै हा दिवस \" डॉक्टर्स डे \" म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आयुष्यात डॉक्टरांचे किती महत्वाचे स्थान असते नाही का ? सर्दी, पडसे, खोकला, ताप यांची लागण झाली की, आपण पहिलं डॉक्टरांकडे धाव घेतो. नाकातुन वाहणारे पाणी - शेम्बुड पुसत, लपवत डॉक्टरांनाचं तर आपल्या आजाराची कर्मकहाणी सांगतो. हे तर झाले प्राथमिक आजार. रुग्णांना असाध्य रोगांमधून मुक्त करण्याचे कसब डॉक्टरांकडेच असते. डॉक्टर हे देवाचेच रूप असते रुग्णांसाठी.
ह्या स्पर्धेद्वारे आमच्या फॅमिली डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत \" डॉक्टर बी. के. शहा.\" सायन मुंबई येथे त्यांची डिस्पेनसरी होती. सध्या आमचे डॉक्टर वयोमानाने थकले आहेत त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या काळात निवृत्ती घेतली. अगदी चौऱ्यांऐंशी - पंच्याऐंशी वर्षांपर्यंत त्यांनी त्यांचे कर्तव्य अगदी चोख बजावले. त्यांच्या घरापासून त्यांच्या डिस्पेन्सरीचे अंतर जास्त नसल्याने ते चालत यायचे. अगदी पावसापाण्यात सुद्धा त्यांनी खंड पडू दिला नाही. अगदीच कंबरेपर्यंत पाणी भरल्यावर त्यांचा नाईलाज व्हायचा. रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असे ते मानत. औषधांचे देखील माफक दर ठेवले असल्याने त्यांच्याकडे तळागाळातल्या लोकांचीही गर्दी असायची. ज्यांना औषध आणि फी साठी पैसे द्यायला परवडायचे नाही त्यांना अगदी मोफत देखील ते औषधे ध्यायचे.
डॉक्टर शहांकडे माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या ओळखीने जाऊ लागलो. डॉक्टरांची डिस्पेन्सरी लहान जरी असली तरी कमालीची स्वच्छता. डॉक्टर तेव्हा साठीचे असतील बहुतेक. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, हसरा चेहरा, अगदी साधे राहणीमान, बोलण्यात एक करारीपणा पण तितकाच गोडवा. प्रथमदर्शनीचं डॉक्टरांविषयी आदर, आपुलकी निर्माण झाली. डॉक्टर अतिशय रसिक. सुंदर सुंदर फ्रेम लावून त्यांनी डिस्पेन्सरीची शोभा वाढवली होती. त्यांच्या रूममध्ये मंद संगीत लावलेले असायचे. आशा, लता, रफी, मुकेश ह्यांच्या दर्जेदार गाण्यांचा संग्रह त्यांच्यापाशी होता. आमची लेक लहान असल्यापासून आम्ही त्यांच्याकडे जाऊ लागलो होतो. माझी लेक लहानपणापासून अतिशय नाजूक, तिची त्वचा देखील तितकीच कोमल. तिला सगळ्या प्रकारची ऍलर्जी. शाळेतल्या बेंचवर जरी जास्त वेळ तिचा हात राहिला तरी रॅशेस उठायचे तिला. डॉक्टरांनी तिच्या ऍलर्जीसाठी गोळ्या चालू केल्या. बहुतांशी तिची ऍलर्जी कमी झाली. बाकी इतर खुटू खुटू आजारांसाठी घरातील सगळेच सदस्य डॉक्टरांकडे जाऊ लागले. त्यांच्या हातगुणाने, आश्वासक विश्वासाने डॉक्टर अगदी आमच्या घरचेच झाले. त्यांच्याशी अगदी घरातले प्रॉब्लेम सुद्धा शेअर करू लागलो. त्यांचे वैयक्तिक मत देखील जाणून घेऊ लागलो. ते देखील मोकळेपणाने चर्चा करत. योग्य ते मत मांडून आमच्या डोक्यावरील तणावाचा भार ते हलका करत असत. त्यांच्या हळुवारपणे समजावण्याच्या पद्धतीने मन देखील हलके होत असे.
एके दिवशी मी, माझे मिस्टर आणि माझी लेक ओला टॅक्सी करून बाहेर फिरायला निघालेलो तर एसी गाडीत देखील माझ्या मिस्टरांना अचानक दरदरून घाम आला. आम्ही तिघेही घाबरलो. ह्यांच्या कंपनीचे हॉस्पिटल जवळ जवळच्या अंतरावर होते त्यामुळे आम्ही लगेच तिथे गेलो. तिथे त्यांचा ecg काढला असता तो खराब आला त्यामुळे अजूनच घाबरलो. त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट न घेता आम्ही तिथून तडक निघून लगेच आमच्या डॉक्टरांकडे त्यांचा सल्ला घ्यायला गेलो तर त्यांनी प्रथम आम्हाला शांत केले. मी आहे असा धीर दिला आणि दुसरीकडे ecg काढायला लावला तो अगदी नॉर्मल निघाला. म्हणजे जर पहिल्या ecg वर विश्वास ठेवला असता तर ह्यांना किती टेस्टना सामोरे जावे लागले असते याचा विचार न केलेलाच बरा.
डॉक्टरांविषयी किती लिहावे ते कमीच पडेल. देवाकडे एकचं मागणे आहे की, अशा देवासमान डॉक्टरांना भरभरून आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Neha Ujale

पूर्णवेळ गृहिणी

मी इरा वर नवीनच लेखिका म्हणून आले आहे. मला वाचन आणि लिखाणाची प्रचंड आवड आहे.

//