डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप

Doctor Is Second God

डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप


डॉक्टर हा मानवाचे प्राण वाचवण्यास व त्याची व्याधी बरी करण्यास मदत करतो, म्हणून आपण डॉक्टरला देवाचे रुप मानतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण येऊनच जातो की, त्यावेळी डॉक्टर आपल्यासाठी देवाच्या रुपात आलेला असतो. मी माझे छोटेसे दोन अनुभव इथे मांडत आहे.


पहिला अनुभव:- 

नेहमीप्रमाणे दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान मी शाळेतून घरी आले होते. खूप जोराची भूक लागली होती. आईने वरणभात बनवून ठेवलेला होता. शाळेतील गमती जमती आईला सांगत मी जेवण करण्यास सुरुवात केली. जेवण करताना बोलू नये असं म्हणतात, पण मी काही तसं पाळत नव्हते, कारण आईला शाळेतील गमतीजमती कधी एकदा सांगते, असं मला होऊन जायचं.


गप्पा मारत जेवण करत असताना माझी जीभ जोरात दाताखाली चावल्या गेली, त्या क्षणी माझ्या डोळ्यातून लगेच पाणी आले होते. जीभेला बरीच मोठी जखम झाली होती. मला जेवण करताही येत नव्हतं आणि काही बोलताही येत नव्हतं. जखम जरा जास्तचं दुखायला लागली होती. बोलता येत नसल्याने काय होतंय? ते आईला सांगता येत नव्हतं. 


आईने मला माझ्या भावासोबत आमच्या फॅमिली डॉक्टरकडे पाठवलं, त्यांनी त्यावेळी मला एक इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर पुढील पाच मिनिटांनी पूर्णपणे दुखणं थांबलं होतं. मला जीभेची हालचाल करता येत होती, त्याक्षणी मला हे जाणवलं की, आपण डॉक्टरला देव का मानतो? म्हणून.


जीभेची जखम पूर्णपणे बरी व्हायला पुढील पंधरा दिवस लागले, यावरुन ती जखम किती खोल होती? याचा अंदाज तुम्ही लावू शकता. डॉक्टर बद्दलचा हा अनुभव माझ्या कायम लक्षात राहून गेला.


दुसरा अनुभव:-

नेहमीप्रमाणे मी दुपारच्या वेळी क्लिनिक मध्ये जेवण करत बसले होते. जेवणाचा डबा उघडला, पहिला घास तोंडात जातो न जातो, तोच एक माणूस माझ्या केबिनमध्ये घुसून म्हणाला,


"मॅडम आमच्या पाहुण्याला काय झालंय? बघा ना. आम्ही जेवण करायला बसलो होतो आणि एकाएकीचं त्यांना बोलता पण येईना आणि त्यांचं तोंड सुद्धा बंद होत नाहीये. मॅडम प्लिज काहीतरी करा."


मी माझा डबा बंद केला. माझ्या समोर उभ्या असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरुन त्याला वाटणारी काळजी आणि भीती दोन्ही स्पष्टपणे मला जाणवत होत्या. मी त्यांना पेशंटला आतमध्ये घेऊन येण्यास सांगितले. 


पेशंट केबिनमध्ये येऊन डेंटल चेअर वर बसला. पेशंट घामाघूम झालेला होता. पेशंटला बघितल्यावर त्याला काय झाले? हे माझ्या लक्षात आले होते.

पेशंटचा खालचा जबडा त्याच्या जागेवरुन हलला होता, त्याला आम्ही dislocation of mandible म्हणतो. आपला वरचा आणि खालचा जबडा temporomandibular joint ने जोडलेला असतो, त्या जॉइन्टला जर काही दुखापत झाली तर खालचा जबडा त्याच्या जागेवरुन हलू शकतो.

अशावेळी पेशंटचा खालचा जबडा त्याच्या जागेवर आणून ठेवावा लागतो. आम्हाला चेहऱ्याची anotomy माहीत असल्याने आम्हाला ते जमतं. मीही तसंच केलं, त्या जॉइन्टवर दोन्ही हातांनी दाबून खालचा जबडा त्याच्या जागेवर आणून ठेवला. पुढील पाच मिनिटांच्या आत पेशंटला त्याचे तोंड बंद करता आले. 

तोंड बंद करता आल्याबरोबर पेशंट माझ्यासमोर हात जोडून म्हणाला,

"मॅडम तुम्ही मला देवाच्या रुपात भेटल्या."


बोलताना पेशंटच्या डोळयात पाणी आलेले होते. मला ते काम करायला पाच मिनिटे सुद्धा लागले नाहीत. मला केलेल्या कामाचं एवढं विशेष सुद्धा वाटलं नाही, कारण माझ्यासाठी ते एक काम होतं. माझा त्यावर अभ्यास असल्याने मी वेगळं काही केलं असं वाटतं नव्हतं. पण त्या पेशंटला व त्याच्या नातेवाईकाला खूप छान वाटलं होतं. माझ्या मनात त्यावेळी एकच आनंद होता की, आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर तरी आनंद आला आहे, त्याचा त्रास बरा करण्यास मी त्याची मदत करु शकले होते.


वरील दोन्ही अनुभवांवरुन मी एकच सांगू इच्छिते की, एका प्रसंगात मला डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप वाटले होते आणि दुसऱ्या प्रसंगात पेशंटला माझ्यात देव दिसला होता.


©®Dr Supriya Dighe