डॉक्टर हे देवदूत

लघुकथा


खरं तर डॉक्टर म्हणजे देवदूतच. आत्म्याचा परमत्याशी जो काही जवळचा संबंध आहे. तो अवर्णनीय आहे. तसाच संबंध डॉक्टर आणि रुग्णांचा असतो. डॉक्टरांनी अहो, तुम्हांला काहीही झाले नाही. असे जरी सांगितले. तरी आपण आनंदी होतो आणि अशा जीवदान देणारे जे हा त्यांना , त्यांच्या कर्तृत्वाला , त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जो कोणी आपल्याला वेळेवर मदत करतो तोच खरा आधार असतो. पण, आपली भिस्त मात्र डॉक्टरांवर असते.
     अशीच एक घटना राधाच्या आयुष्यात घडून गेली. १८मे २०२२ दिवस. अतिशय रखरखत ऊन. जीवाची लाही लाही होत होती. तरीही काही मैत्रीपूर्ण संबंध टिकवण्यासाठी अविनाश लग्नाला गेला. त्याची पत्नी राधा आणि मुलगा सचिन घरी होते आणि मुलगी काॅलेजला. दररोज प्रमाणे सगळेजण आपापल्या कामात व्यस्त. राधालाही लग्नाला जायचे होते. पण, उन्हामुळे तिने जायचे टाळले. कारण, वीस तारखेला त्यांना एका कार्यक्रमासाठी नागपूरला जायचे होते. त्याची तयारी सुरू होती. त्यामुळे अविनाश एकटाच साडेअकराच्या सुमारास लग्नाला गेला. तीस किलोमीटर दूर असलेल्या वेरुळच्या वाडी तांड्यावर अविनाश लग्नासाठी गेला होता. लग्न पार पडले आणि अविनाश घरी निघाला. पण, वाटेत काळाने घाला घातला. मोठा अपघात झाला.‌ राधाला घरी काहीच माहिती नव्हते. ती घरी वाट बघत होती. पण, अचानक आलेल्या फोनने त्यांची झोपच उडाली.
पहिला फोन आला....
"वहिनी सर आले का ? कुठे पोहोचले?"
राधाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

दुसरा फोन आला....
" वहिनी अविनाशचा अपघात झाला आहे ॲम्ब्युलन्सआली आहे आणि तुम्ही ताबडतोब निघा. हे ऐकताच राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढाच फोन. काय झालं , किती लागलं काही कळायला मार्ग नव्हता.‌ त्यांच्या सोबत दोन तीन मित्र होते. पण, अशा परिस्थितीत काय करावे सुचेना.
तिसरा फोन मुलाला आला. मुलाने कंपनीचे काम बंद केले आणि दोघेही ताबडतोब निघाले. अर्ध्या रस्त्यात त्यांची भेट झाली आणि राधा ॲम्ब्युलन्स मध्ये बसली.
अविनाशला अशा अवस्थेत पाहून तिचा राधचा चेहरा पांढराफटक पडला. अश्रुंच्या धारांनी तिचा चेहरा निस्तेज दिसू लागला. पहिली अशी वेळ असेल ती स्वतःच्या कुकूंवासाठी प्रार्थना करत होती. मुलगा ॲम्ब्युलन्सच्या मागे गाडी घेऊन येत होताच. पण, राधाचे मन मात्र साशंक होते. आपल्या नवऱ्याला अशा बेशुद्ध अवस्थेत बघून ती घाबरली होती. पण, सोबत असलेल्या मित्रांनी खूप धीर दिला.
दवाखान्यात पाय टाकताच मनावर आणखी दडपण वाढले. स्ट्रेचरवरून अविनाशला वर नेले गेले. क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब डॉक्टरांनी तपासले आणि आवश्यक त्या चाचण्या करण्यासाठी सांगितले.
रिपोर्ट येईपर्यंत राधा आणि सचिनची घालमेल चालली होती. डॉकटरांनी सरळ आयसीयू मध्ये ॲडमिट करून घेतले. डॉक्टरांची चाललेली धावपळ, काय करायचे याचा निर्णय, कोणाला काय सांगायचे , कोणते निदान करायचे. याची सविस्तर चर्चा झाली आणि रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती काळजी घेतली गेली. डॉक्टरांचे लाघवी बोलणे, त्यांचा तो मैत्रीपूर्ण आधार, ते देत असलेला दिलासा यामुळे राधाला बरे वाटले.ताबडतोब मुलीलाही दवाखान्यात बोलावले गेले. अठरा वर्षांची मुलगी पण, मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. पण, सचिनने दिलेला धीर फार मोठा होता. जवळपास दोन तासांनंतर रिपोर्ट आले. डॉक्टरांनी दाखविलेला विश्वास आणि आलेले सर्व रिपोर्ट ‌नाॅर्मल आले आहेत. हे सांगताच सगळ्यांच्या जीवात जीव आला. नव्हे संकट टळल्याचा आनंद झाला आणि आनंदाश्रू तरळले.
      खरंतर दवाखान्यातील गंभीर वातावरण, प्रत्येकाची वेगळीच गडबड, कोणी पेशंट सोबत आलेले , तर वाॅडबाॅय कोणाला घेऊन चाललेले, कोणी जेवण करीत होते, तर कोणी टेंशन मध्ये बसलेले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक जण आपापल्या मर्यादेत राहून वागत होता.
तेवढ्यात राधाने जवळजवळ डॉक्टरांच्या पायावर डोकेचे टेकवले. खरे आभार त्या डॉक्टरांचे ज्यांनी वेळीच उपचार केले आणि प्राण वाचवले. वेळोवेळी बदलत जाणारी ड्युटी, त्यांची आकलन शक्ती, त्यांचे धैर्य पाहून राधाला बराच धीर आला होता.
डॉक्टर तुम्ही माझा संसार , एका कुटुंबाचा आधार, मुलांचा बाबा, बहिणीचा भाऊ, दोस्तांचा दोस्त याला जीवदान दिले. त्याबद्दल खूप खूप आभार मानते.
तीन दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवून तब्येत सुधारत होती. तेव्हाच डॉक्टरांनी सुट्टी दिली आणि मग चौघेही आनंदाने घरी परतले.
     परत एक सुखी कुटुंब आणखी सुखी झाले.

हा लेख सत्य घटनेवर आधारित आहे.फक्त पात्रांची नावे बदलली आहे.

©®आश्विनी मिश्रीकोटकर