प्रिय अहो(इकडची स्वारी),
आज खुप दिवसांनी विसावा मिळाला. मग मनाने थोडं वेगळे काही करायचे ठरवले. म्हणूनच हा तुम्हाला पत्र लिहण्याचा पत्रप्रपंच केला.तसे खुपदा तरूण वयात तुम्हांला मी चोरून पत्र लिहायची पण,पोस्टाच्या पेटीत टाकायचे धाडसंं व्हायचे नाही. उगाच वाटायचे त्या पोस्टमनने मी तुम्हाला लिहिलेले पत्र मामांजींच्याच हातात आणून दिले तर? उगाच रामायण नको. तसं पाहता कधीतरीच घराबाहेर जाणं व्हायचे.
हळदीकुंकवाच्या निमित्ताने वगैरेच. पण बरोबर सासुबाईं, धाकट्या वन्स असायच्याच. मनाजोगतं काही करताच आले नाही असो जाऊद्या.
आज सगळे आठवते पण आठवणीचे पुस्तके बंद केले तरी भुतकाळ जो मनात कोरला गेला आहे त्याची पाने फडफडताचं ना?आणि वर्तमानकाळातही काही थोड्या फार फरकाने त्यांचीच पुनरावृत्ती आहे.येतेयं ना ध्यानात?
आता हेच बघा आता सुध्दा आपली थोडक्यात विभागणीच मुलांच्या सोयीनुसार.वाईट ह्याचेच वाटतं कि, आपण कधी आपले वैवाहिक जिवन जगलोच नाही.
आजच्या पिढीकडे बघितले कि,तसा मी दुस्वास नाही करत हो! पण या पिढीचा पण खुप हेवा वाटतो.किती बिनधास्त आहे ना हि पिढी?
शेवटी आपण दिलेले स्वातंत्र्य त्याचा हा परिणाम.कोणत्याही गोष्टीचे टेंशन नाही.ना जबाबदारी. जाऊ द्या शेवटी आपलीच लेकरं कशाला त्यांचा हेवा करायचा पण राहवले नाही. आज थोडं मनमोकळे बोलते मी.
आता फोन आहे माझ्याकडे काय तो स्मार्ट फोन म्हणतात ना तो जयने दिला तो म्हणाला,आई हा वापर तु हा फोन. त्याने नवीन घेतला. काहीही झाले नाही फोनला पण कारण काय तर कंटाळा आला तो फोन वापरून, मग अथर्वने शिकवले सगळे मला म्हणून तर बिनधास्त वापरते. तुमच्याशीच काय पण भारतातील सगळ्यांशी मी बोलते. कधी व्हिडीओ कॉल कधी असेच, फेसबुक यूट्युब व्हाट्सअपबरोबर छान जुळवून घेतले बरका मी, ते तुम्ही पाहता आहेतच. तुमच्याशी तर रोज व्हिडीओ कॉल करूनच बोलते ना!
पण म्हणलं आज जरा गतकाळात फेरी मारावी काय उणे काय दुणे याची पडताळणी करावी म्हणूनच हा जरा पत्र प्रपंच केला हो!
आज सगळा इतिहास आठवतो. मला बघूया जमते का प्रेमपत्र लिहायला.तो पत्राद्वारे तुमच्या पर्यंत पोंहचवण्यांचा प्रयत्न.
कारण त्याकाळातही मी हुशार होते. पण घरात तसे वातावरण मिळाले नाही. मला पण लिहिता वाचता येतं होतं.चांगली इंटरपर्यंत शिकलेले कि हो! त्याकाळी मी पण नोकरी करू शकले असते पण मामांजींचा विरोध नोकरी करणार्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर मीरे वाटतात आसो.
तुम्ही खुप शिकलेले. तुमची फिरतीची नोकरी,त्यात कुटुंब मोठं आणि घरात तुम्हींच मोठे म्हणजे सगळी जबाबदारी तुमच्यावरच.
मामांजींनी तर फतवाच काढला,दादा आता तुझं लग्न झाले.घरात तु मोठा पुर्ण कुटुंबाची जबाबदारी तुझीच. मी आता संसारातून विरक्ती घेणार.
मग काय तुमच्या किती बदल्या झाल्या,तरीही माझी मात्र काही घरातून बदली झालीच नाही. तुम्ही कधीच मला बदलीच्या गावी नेऊ शकला नाहीत. किती धाक होता नाही मामांजीचा!
मी आपली कुटुंबाला साभांळत गावीच.तुम्ही तिकडे बाहेर मेसचं जेवायचा तर, कधी घरी करून हाताने खायचा,महिन्याकाठी येत होतात गावी. तेवढेच संसारसुख. परत तुम्ही बदलीच्या गावी गेले कि, दोन ध्रुवावर दोघे. निसर्ग नियमानुसार मुलं झाली. मग त्याची संगोपण. मग ती थोडी मोठी झाली. मग तुमच्या येण्याची ते वाट पाह्यची. मग तुम्ही सुट्टीवर आल्यावर तुमची विभागणी व्हायची.
थोडक्यात माझ्या वाट्याला कमीच येत होतात.असा हा आपला संसार झाला.
कालांतराने लहानथोर घरातील बरेच सदस्य संसाराला लागली.सासूबाई मामांजी कैलासवासी झाले.
मुलं मोठी झाली.नव्या जबाबदारीत वाढ झाली. पण नव्याने संसार सुरू झाला.आता थोडा मनासारखा विसावा मला घेता येऊ लागला.
मग वेगळी जबाबदारी अंगावर येऊन पडली. मुले मोठी झाली मग मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे शाळा कॉलेज सांभाळताना दिवस कमी पडू लागला. या काळात आपण जवळच होतो पण, तुमचे प्रमोशन वर प्रमोशन मग तुमचा तो वाढता व्याप मग या न त्या कारणाने प्रेम करायला वेळ कोठे होता आपल्याला.
पुढे मुले शिकून आपपल्या उद्योगाला लागली.त्यांच्यासाठी वर, वधू संशोधन मग यांची लग्न, सणवार आगदी सगळे कर्तव्य व्यवस्थित पार पाडली पुरती मी गुंतत गेली.अर्थात आर्थिक बाजू तुम्ही सांभाळून घेत होतात व नियोजनाचा भार मात्र माझ्यावर.
पण छानच झाले सगळे. हे होता होता मग तुमची रिटायरमेंट आली. मग नंतर चे आयुष्य आपलेच आहे असे वाटू लागले.तश्यातच पुन्हा नवीन जबाबदारी?
मग मात्र जबाबदारी,जबाबदारी,नी मी, हे तत्व अंगवळणीच पडलं माझ्या!
नंतर मुलं नोकरीमुळे दुर गेली निलू अमेरिकेत तर जय लंडनला.त्यामुळे जिथे गरज तिथे मी! हे समीकरणच बनले. परत आपण दोन धुर्वावर दोघे आपण!
तुम्हांला कोठे मुलामुलीकडे चला म्हटलं कि,तुमचं आपलं ठरलेलं वाक्य तिकडे सगळे आहे ग, पण मोकळा श्वास नाही. सोन्याचा पिंजरा आहे.
मी राहतो इथेच.जेवणाची सोय तेवढी लावून जा. मग मी माझं बाडबिस्तारं बांधायचं तुमची सोय लावायची आणि निघायचं.
मलाही वाटायचं तुम्ही पण बरोबर असावे. कोणे एकेकाळी लालपरीचा प्रवास नाही जमला साथीने करायला, तर हवाईप्रवास तरी करावा जोडीने. बोलूनही दाखवलं कित्येकदा मुलं पण म्हणायची बाबा तुम्ही या म्हणजे आई बिनधास्त राहते हो! पण तुम्ही मला शब्दात गुंतवायचा आणि आपलेच खरे करायचात आजूनही.
लिहिण्यासारखे खुप आहे पण तुर्तास एवढेच.इकडे सध्या खुप थंडी आहे.आपल्याकडे असेलच? आतल्या कपाटात तळाशी गरम कपडे ठेवलेत ते काढून घ्या. बाहेर फिरायला जाणं थोडे दिवस थांबवा. सकाळी सकाळी खुप गारवा असतो. पायात मोजे घालत जा. आणि च्यवनप्राश खात थोडे सकाळी तब्येतीला बरे असते.
सकाळी कामासाठी इंदूआली कि, व्हिडीओ कॉल करा,मग मेथीचे लाडू करायला सांगेन तिला.स्वयंपाक करते ना चांगला? नवीन काही खावेसे वाटलं तर तिला सांगत जा.बाहेरचे जास्त मागवत जाऊ नका.
आजकाल तुम्हाला ते online शॉपिंगचे व्यसन लागले आहे.तो अथर्व (नातू) तुम्हांला चढवतो, आजोबा हे मस्त ते मस्त आणि लगेच तुम्ही ऐकता.आवर घाला आणि सतत तुम्ही मला online दिसता? जरा मोबाईल बाजूला ठेवत जा डोळ्याला त्रास होतो समझले. आणि त्या Youtube च्या रेसिपी मला पाठवत जाऊ नका मी सुगरण आहे. तुमच्याच आईच्या हाताखाली राहून मी खुप पदार्थ शिकले.
नवनवीन काय आहे ते सुनबाईं आणि निलूला करू देत.चला पुढच्या पत्रात भेटूया.
शेवटी काय लिहू? शब्द ते शब्दच भावनांच्या पुराला शब्दांचे बांध नेहमी घालता येतातच असे नाही, बहूधा बांध वाहून जातात व डोळ्यातून नद्या उसळतात.
हे सगळं मी आधुनिक तांत्रिक युगानुसार स्वतःहा मोबाईलवर टाईप करून तुमच्या what's app ला forwarded करत आहे पत्राच्या रूपात.
आवडली ना माझी कल्पना आणि माझी ही सुधारित आवृत्ती?आवड असली कि सवड मिळतेच हो!पत्रोत्तर अपेक्षित.
तुमचीच प्रिया, (ईश्)
साधना
ता. क. हे मी तुम्हाला लिहिलेले पत्र आहे वाचून बघा उगाच कोणालाही forward करू नका, आपल्या दोघांच्या संसाराची भावनिक कहाणी आपल्या पुरतीच मर्यादित. नाहीतर उगाच न बघता forward करायचात!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा