D- Mart - ची कहाणी ( राधाकृष्ण दमानी - डि मार्ट चे मालक )

Dmart Story

प्रेरणादायी कथा...

एकाच छताखाली विविध उत्पादनं सहज मिळण्याचं हे ठिकाण आणि तेही एम आर पी पेक्षा कमी किंमतीत वस्तू मिळणारं ठिकाण अशी लोकांमध्ये असलेली याची ओळख. असं लोकप्रिय स्टोअर सुरू करणारे हे उद्योजक.


या उद्योजकांचं नाव आहे श्री. राधाकृष्ण दमाणी, म्हणजेच एवेन्यू सुपरमार्ट लिमिटेडचे मालक.

आज यांचं नाव भारतातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गणलं जातं. यांनी आपल्या करिअरची सुरुवात वडिलांच्या बिझनेसमध्ये सहभागी होऊन केली.

पण वडिलांच्या निधनानंतर हा बिझनेस बंद पडला. अशा वेळी त्यांचे भाऊ राजेंद्र दमाणींनी त्यांना मदत केली.
 
दोन्ही भावांनी मिळून स्टॉक ब्रोकिंगचा बिझनेस सुरू केला. सुरूवातीला या व्यवसायातल्या खाचाखोचा त्यांना काहीच माहीत नव्हत्या.

अनुभवी व्यक्तींचे सल्ले घेऊन, शिकून त्यांनी भरपूर नफा कमावला. व्यवसायातली समज आणि दूरदृष्टी या आधारावर ते कोट्यधीश झाले.
दमाणींना सुरूवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. पण पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने अडचणी येत होत्या. स्टॉक मार्केट मध्ये भरपूर नफा कमावल्यावर २००० साली त्यांनी रिटेल मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा चंग बांधला.

छोटे व्यावसायिक, दुकानदार यांच्या भेटी घेऊन, लहान शहरांवर लक्ष केंद्रित करून ‘डि मार्ट’ या नावाने रिटेलिंग बिझनेस सुरू केला.

सध्या भारतात ४५ शहरांमध्ये डि मार्टच्या ११८ शाखा आहेत.
 
विशेष म्हणजे कोणतीही शाखा सुरू करताना या कंपनीने भाडोत्री जागा घेतली नाही. मिळणाऱ्या नफ्यातील रक्कम जागेचं भाडं भरण्यात जाण्यापेक्षा स्वतःची जागा असावी हा यामागचा विचार होता.

भाडं देण्यासाठी जाणारे पैसे वाचवून त्या किंमतीत ग्राहकांना डिस्काउंट देऊन उत्पादनं उपलब्ध करून द्यायची, असं वेगळं नियोजन त्यांनी केलं आणि त्यात ते यशस्वी झाले.

या योजनेतून त्यांच्या कंपनीला इतका नफा मिळाला की, रिटेल क्षेत्रात त्यांनी रिलायन्स रिटेल, फ्युचर रिटेल अशा बलाढ्य कंपन्यांनाही मागे टाकलं.

अलिकडेच या कंपनीने आपला IPO २९९ रूपयांच्या किमतीने बाजारात आणला आणि या IPO ची ६४१ रूपये अशा चढ्या किमतीने स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली.
यात केवळ दमाणींचाच फायदा झाला असं नाही तर त्यांच्या कंपनीत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी देखील कोट्यधीश, लक्षाधीश झाले.

डि मार्टचे उच्च पदस्थ अधिकारी नेविल नरोना यांनी घेतलेल्या शेअर्सची किंमत ९०० करोड रुपये इतकी झाली.

काही वर्षांपूर्वी नरोना यांनी हिंदुस्थान युनिलीवर कंपनी सोडून दमाणींच्या व्यवसायात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या वित्तीय सल्लागारांनादेखील २०० कोटींचा फायदा झाला. कंपनीतल्या इतर कर्मचाऱ्यांनाही लाखोंचा फायदा मिळाला. सध्या कंपनीची किंमतही ४० हजार करोडोंपेक्षा जास्त आहे.
 
दमाणींच्या मते, व्यवसाय वाढवायचा म्हणजे सरसकट सगळीकडे शाखा सुरू करायच्या असं नव्हे तर ज्या ठिकाणी कमतरता असेल तेथील नेमकी गरज ओळखून व्यवसाय सुरू करायचा.