Login

#दिवाळी पूर्वीची आणि आत्ताची

दिवाळी आत्ताची आणि पूर्वीची कशी होती यातील फरक

सहामाही परीक्षेच्या आधीच आम्हाला
येणाऱ्या दिवाळीचे वेध लागायचे
परीक्षेच्या पेपर ऐवजी
काय आणायचं ते यादी लिहायचे

एक बॉक्स फुलबाजी आणि भुचक्र
लक्ष्मीबॉम्ब, लवंगीची लड मिळायची
कधीमधी नागगोळी, भुईनुळा जळायची
पण एवढ्यात संपूर्ण दिवाळी पळायची

लाडू, करंजी, चकली, चिवडा,
कडबोळ्यांनी फराळाचं ताट भरायचं
आढेवेढे न घेता मनसोक्त खाल्लं जायचं
देवून घरोघरी आनंदाचं वाण लुटायचं

सडा, सारवण, रांगोळी काढताना
गृहलक्ष्मीचं कौशल्य लागायचं
दणदणा-या फटाक्यांनी
अंगण ही भल्या पहाटे जागायचं

असं वाटतयं दिवाळी कडे ही आता
माणसासारखा वेळ राहिला नाही
पाच दिवसाचा मुक्काम ठरलेला पण
तीन दिवसात निघायची तिची घाई

आमच्यासारखे मुलांना आता
दिवाळीचे वेध लागतात नाही
आदल्या दिवशी पर्यंत त्यांना
कपडे, फटाके घ्यायची मात्र घाई

कितीही असले कपडे तरी
नव्याशिवाय समाधान नाही
हजारो रूपयांचे फटाके आणले
तरी एका दिवसात उडवून रिकामे होई

आई, काकी, आजी आता
फराळासाठी दिवसभर राबत नाही
झटपट देऊन ऑर्डर मागवतात लगेच
कारण खायला ही कुणाला इंटरेस्ट नाही

मामाच्या गावाला जायला
पहिल्यासारखी ओढ लागत नाही
आजची पिढी पिकनिक आणि
मोबाईल मध्ये दंग होई

वेळ नाही सबब सगळेजण सांगतात
उर फुटे पर्यंत केवळ धावतात
ज्या आनंदासाठी धावतोय
तोच सोबत घ्यायला विसरतात

पोटासाठी कमवतात सगळेच
थोडा आनंद घ्यायला ही शिका
दिवाळीच्या निमित्ताने थोडं
आपल्या माणसात रमायला शिका

दिवाळी ही मग जायची
करणार नाही इतकी घाई
माणसात रमायला तिला ही आवडेल
तिचा ही पाय लवकर निघणार नाही

@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार