दिवाळी - आशीर्वाद लक्ष्मीचा गृहलक्ष्मीला

Blessings Of Godess Laxmi To Housemaker


दिवाळी -उत्सव नात्यांचा


काय बरं राहिलं? देवघरातल्या लक्ष्मीची मूर्ती आणि समोर मांडून ठेवलेल्या पूजेकडे बघत ती मनात उजळणी करत होती. पूजेच लाल आसन चौरंगावर टाकलं होतं. त्यावर कुंकवाने, चांदीच्या कलशावर स्वस्तिक रेखुन, विड्याची पाने ठेवून, श्रीफळ अलगद विसावल होतं. कलशात सुपारी, बंदा रुपया टाकून, कलशाला लाल पिवळ्या धाग्यांना सुतवलं होतं. कलश्याच्या बाजूला विड्याच्या पानांवर सुपारीचा गणपती, मातीची लक्ष्मी गणेशाची मूर्ती, दिवाळीसाठी बनवलेल्या चकल्या ,चिवडा,लाडू,शंकरंपाळी, शेवेचा फराळ, मीठाई, काजू,बदाम,पिस्ता, मनूका,अक्रोड,अंजिर असा सूकामेवा, झाडू, फडा,चौरंगभोवतीची वेल बुटी रांगोळी, चौरंगाच्या दोन्ही बाजूच्या पंचज्योतींनी तेवणाऱ्या मोराच्या पितळी उंच समया, झेंडूची लाल पिवळी फुलं, हार, सप्तधान्यांनी भरलेली बोळकी, त्या बोळक्यावर मंद प्रकाशात तेवणाऱ्या मातीच्या पणत्या, लाह्या, बत्तासे, प्रसादासाठी फोडायचे नारळ, वही पूजनाची वही आणि पेन अगदी कुठेही कसलीच उणीव राहू नये म्हणून, ती परत परत मांडलेल्या पूजेकडे निरखून बघत होती.

तेवढ्यात आवाज आला "अग बस की जरा निवांत."
देव्हाऱ्यातली ती मातीची लक्ष्मी मातेची मूर्ती तिच्याशी बोलत होती..

"गेले पंधरा दिवस तुझी लगबग, धावपळ, साफसफाई,शेव,चकली, लाडूसाठीची जागरण बघते आहे मी. सगळं मनापासून करणारी, कशातच कुठलीच उणीव राहू नये म्हणून तुझी धडपड निरखते आहे मी. असू दे! थोडं कमी जास्त झालं तरी चालतं ग मला!! तुझं घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक नात्यासाठीची जी प्रेमळ बांधीलकी  आहे ना, हीच माझी खरी पूजा."

"नवरात्र संपता, संपता कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू होते तुझी साफसफाईची मोहीम, घरात मुलांना, नवऱ्याला त्याच्याशी काही एक घेणं देणं नसतं. तरीही, एखादा रविवार किंवा सुट्टीचा दिवस बघून घरातल्यांची मनधरणी करून, वेळ प्रसंगी काही आमिष देऊन, तर कधी दुर्गेचा अवतार घेऊन, तुझा झाडू, फडा, पोछा, माळ्यावर, सज्जावर फिरतात. फटक्याने धुळीचे, कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य क्षणात ध्वस्त केले जाते. दिवाण, अलमाऱ्या गपगुमान तू म्हणशील तशा बाजूला सरकतात आणि तासाभरात सगळं घर लखलखत. पण सासूबाईंचे एवढ्यान  समाधान होत नाही. मग स्वयंपाक घरातल्या ट्रॉल्या, भांड्यांची रॅक, पितळी-तांब्याची ठेवणीतली, रोजच्या वापरातली भांडीही नव्याने चकाकतात.


एव्हाना शेजारणीची चकली भाजणी गिरणीत आणि लाडवाची पिठी तुपावर परतवण्याची तयारी बघून, सासूबाईंचा आदेश शिरोधार्य मानून, तू अन्नपूर्णेच्या अवतारात स्वयंपाक घराचा ताबा घेते. महामारी,पगार कपात, आर्थिक मंदी यामुळे वाणसामानाची यादी, नवऱ्याच्या खिशाचा अंदाज घेऊन तू त्याला देते. नवर्याचा राग लक्षात घेऊन बळे बळेच "वर्षाचा सण आहे. आता नाही तर कधी? यावेळी थोडं थोडं करते" असं त्याला म्हणून त्याच आणि स्वतःचही न होणार समाधान करतच असते.

बघता बघता स्वयंपाक घरात खमंग, खुसखुशीत, जिभेला पाणी सुटणारे, तिखटाचे गोडाचे पदार्थ तयार होतात.

" तू एक पदार्थ बनवते पण त्यात पडणाऱ्या दहा जिन्नसांची झळ माझ्या खिशाला बसते." नवऱ्याच्या या वाक्यांना बळेबळेच गोड हसून तू बगल देते.


तुझी चकली तरी किती चवदार, नंणदेचे टोमणे आणि भावजयीचे कुजकट बोलण्याचे कडकडीत मोहन चकलीच्या पिठात घालून, आपुलकीच्या साच्याने समजूतदारीची काटेरी चकली केवळ तूच करू शकतेस. सासरच्या परंपरा, नियमांची पिठी अनुभवाच्या गरम तुपावर खमंग भाजून, त्यात माहेरच्या ओलाव्याची पिठीसाखर मिसळून, जिव्हाळ्याची वेलची आणि प्रेमाची काजू बदाम लावून लाडू बनवण्याची कला केवळ तुझ्याच हातात आहे.

नवऱ्याच्या अलवार प्रेमाची पारी लाटून, त्यात समर्पणाचे, त्यागाचे सारण भरून सुंदर नाजूक करंजी बनवण्याचे काम कुणा येरा-गबळ्याचे नाही हो!

भावाचं प्रेम आणि लहान दिराची मिश्किल मस्करी यांचा सुरेख संगम तू थट्टेच्या खसखशीवर लीलया थापून, नात्यांच्या सुंदर जाळीचा अनारसा बनवतेस ना त्याला तर तोडच नाही!

जावांचा हेवा-दावा, मत्सर, इर्षा वेळप्रसंगी संकटात केलेली मदत आणि दिलेली प्रेमळ साथ यांचा सुरेख संगम करून तुझी मसाला शेव तर चुटकीसरशी तयार होते.

वडिलांचे प्रेम,सासर्यांच्या  मायेच्या  पोह्यांमधे रोजच्या जीवनातल्या बर्या वाईट अनुभवांचे कांदे,खोबरे,शेंगदाणे,डाळ्या,कढीपत्ता,धणे,तिळ घालुन तू जो चिवडा बनवतेस ना त्याची चव तर अहाहा!

वसुबारसेला गाई गोऱ्यांना नैवेद्य करणारी,धनत्रयोदशीला सर्वांसाठी आरोग्याचे मागणं मागणारी, धन्वंतरीची पूजा करणारी ही तूच! अज्ञानाचा, आळसाचा, टाळाटाळ करण्याचा नरकासुर मारून चतुर्दर्शीच्या दिवशी प्रेमाचं, आपलेपणाचे उटणं लावून नवकलेच,नवसृजनाच, अभंग स्नान घालणारी तूच!! घरात येणारा पैसा निगुतीने आणि सद सद विवेकानं योग्य ठिकाणी वापरणारी गृहलक्ष्मी ही तूच!!!

आणीबाणीच्या प्रसंगी संसारातल्या ताणतणावात प्रसंगी स्वतःचा स्वाभिमान ही नवऱ्यावर ओवाळून टाकणारीही तूच! तुला पाडव्याच्या दिवशी अखंड सौभाग्याचा लेणं तर मिळणारच ना! सासरच नव्हे तर माहेरच्या लोकांनाही अडीनडीला मदत करणारी, त्यांच्याही भरभराटीसाठी देवाकडे मागणं मागणारी तू खरच साक्षात अष्टलक्ष्मीचे रूपच आहेस.


आज दिवाळीच्या दिवशी हे गृहलक्ष्मी घरादारासाठी अखंड झटणारी, मंदपणे तेवत राहणारी आशेची पणती आहेस तू. म्हणूनच अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी. निराशेचं, दुःखच सावट नाहीस  करण्यासाठी, सान थोरांना ज्ञानाच संस्काराच अभंग स्नान घालत जा. सदविचार, विवेकाच उटण लावून भविष्याकडे,तिमिनातून तेजाकडे जाण्याचा मार्ग तूच त्यांना दाखव!

शेवटी काय पणत्या, दिवे, रांगोळ्या, फराळाचे पदार्थ, मिठाया, नवे कपडे,फटाके, आकाश दिवे, ही सगळी दिवाळी सणाची केवळ बाह्य प्रतीके. तुझ्या अंतरीचा ज्ञानाचा,सत्याचा, प्रयत्नांचा, नवक्षितिजाचा दिवा तेवत ठेव. तीच खरी दीपावली आणि तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार हाच आज माझ्याकडून - लक्ष्मी मातेकडून तुला भरभरून आशीर्वाद.©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.