दिवाळी पाडवा - माहिती...

Diwali Session

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा शुक्रवारी 05 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आहे..

सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.,

बलिप्रतिपदा- पाडवा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा निवेद्य अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा. दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…...

सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )