2 नोव्हेंबर 2021 - धनत्रयोदशी......

Festival

महाराष्ट्रात दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस असतो वसुबारस ! धनत्रयोदशी हा दिवस आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला असतो. 

देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते.

धन, संपत्ती आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. यामध्ये उपजिविकेसाठी उपयोगी असलेल्या सर्व वस्तूंचे म्हणजेच आपले काम व त्यासाठी उपयोगी असलेल्या वस्तूंचे पूजन केले जाते. ज्याद्वारे आपण धनप्राप्ती करतो त्याचेही पूजन केले जाते.

व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने, त्यामधील साहित्य या सर्वांची पूजा करतात. तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे..

ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजा करतात. येथे `धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी.  ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी !  

या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं.  घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात.

या दिवशी संध्याकाळी तेलाने भरलेला एक दिवा प्रज्वलित करून त्याचं पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते. 

सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा................

नमस्कार.. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )