दिवाळीचा फराळ!

Diwali Delicacies

फराळ

परतीचा पाऊस आहे तसा परतीचा फराळ हा ही प्रकार असतो बरं का. आपलयाला आठवण देऊन जाणारा, जाताजाता हुरहूर लावणारा!

घरात गृहीणी मंडळी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला confuse करायला सुरुवात करतात.मोठ्या डब्यांमधला फराळ लहान्या डब्यात टाकतात. निवडणुका संपल्यावर नेते मंडळी जसे दिसत नाहीत तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता आपल्याला शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या beauty queen मोठ्या कार मध्ये बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर तर सर्वांचाच डोळा असतो पण शेवटची चकली खाताना मात्र होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता त्याचं झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे व अपेक्षा भंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी अशी माझी इच्छा आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडूचा डबा लपवला जातो कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक expiry date असते ती गृहीणींना अचूक माहीती असते इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते पण त्यामागे expiry date च राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवतात कारण त्याचीही expiry date जवळ येत असते.

जास्त मसाला आणि मीठ वाले डब्याच्या तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत केला जातो.

शेव संपवावी लागत नाही. ती संपते पोहे आणि उपमा करुन त्याच्यावर खास सजावटीसाठी वापरून वापरून ती संपते.

असा हा परतीचा फराळ दिवाळीच्या आठवणीचा... रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा..जिभेवर राहणाऱ्या चवीचा.. जाता जाता येणाऱ्या वर्षी परत एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा..गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा..शेवटी संपत जाताना आणखी चवेदार होत जाणारा असा ..परतीचा फराळ!