दिपावली... सण आनंदाचा!

About Diwali


दिपावली ... सण आनंदाचा!

"आई, एवढी मिठाई, नवे कपडे हे सर्व कोणासाठी घेतले ? आपण तर तीनच जण आहोत ना ...तू ,मी व बाबा. मगं एवढे सर्व कशासाठी? "
चिमुकला श्लोक आपल्या आईला विचारतो.

" अरे, हो ..आपण घरात तीनचं जण राहतो. पण आपला परिवार खूप मोठा आहे. त्या परिवारासाठी घेतले हे सर्व. "
आई श्लोकला म्हणाली.

" अच्छा ..म्हणजे घरकुलसाठी घेतले तर .." श्लोक म्हणाला.

" हो, बरोबर ओळखले बाळा तू..घरकुल म्हणजे आपला परिवारचं ना.."
आई श्लोकला म्हणाली.


\"घरकुल अनाथाश्रम\" म्हणजे छोट्याशा कोमलसाठी घरच होते. तिला काही कळतही नव्हते, त्या वयापासून ती घरकुलात आली होती. कशी आली,कुठून आली,तिथे कोणी आणले हे तिला काहीच माहित नाही आणि कधी कळालेही नाही. आपले आईवडील कोण ? कुठे असतील किंवा या जगात आहेत की नाही हे सुद्धा कधी समजले नाही. कोमल नाव सुद्धा अनाथाश्रमातील मावशीनेच दिले. ती अनाथाश्रमात आली तेव्हा खूप नाजूक होती. म्हणून त्या मावशीने कोमल नाव ठेवले.
घरकुलात आपल्यासारखीच इतर मुलेही आहेत,ज्यांना कोणीही नाही किंवा असूनही कोणी या मुलांचा स्विकार केलेला नव्हता.


आपल्या जन्मदात्या आईवडीलांच्या कर्मांची फळे या मुलांना भोगावी लागत होती.

समाजात अनेक आईवडील आपल्याला बाळ होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असतात आणि दुसरीकडे अनाथाश्रमातील मुलांची संख्या वाढत असते.

आई,बाबा हे शब्द तर कोमलला माहितच नव्हते. तिला काही समजण्यापूर्वी तिची अनाथ म्हणून ओळख झालेली होती. जेव्हा काही कळायला लागले,बोलायला लागली तेव्हा ताई,मावशी, काका,दादा,सर,मॅडम हेचं शब्द ऐकायला यायचे आणि तेचं ती बोलायला शिकले.
घरकुलात मुलांची काळजी घेण्यासाठी ज्या स्त्रिया होत्या ,त्याच तिच्यासाठी सर्व काही होत्या.आणि आपल्यासारखीच ही अनाथ मुले म्हणजे आपले बहीण-भाऊ आणि आपले कुटुंबसुद्धा!

जेव्हा आईवडील आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
अनाथाश्रमात यायचे,सर्व मुलांना केक,कपडे,खेळणी किंवा इतर काही भेटवस्तू द्यायचे तेव्हा आनंदही व्हायचा आणि ती मुले आपल्या आईवडिलांना आई,बाबा म्हणून हाक मारायचे...तेव्हा तिच्या मनाला खूप वाईट वाटायचे. आपण किती कमनशिबी आहोत म्हणून तर आपल्याला आईवडिलांचे प्रेम मिळाले नाही. आई,बाबा हाक मारण्याची कधी संधी मिळाली नाही.
प्रेम,कुटुंब हे सर्व आपल्यासाठी नव्हते का ? आईवडिलांचे प्रेम व कुटुंबात असणारे मुलांचे विश्व व आपल्यासारख्या अनाथ मुलांचे विश्व यात किती फरक असतो ना ? आई म्हणजे काय असते ? बाबा कसे असतात? हे सर्व त्या मुलांकडे ,आईवडिलांकडे पाहून कळायचे.

खाणे-पिणे,कपडेलत्ते, आवश्यक वस्तू ,शिक्षण या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. काळजी करणारेही होते. कोमल कुटुंबातील प्रेमाला पारखी होती. जे खायला मिळेल ते खायचे,जे दिले ते घ्यायचे, लोकांच्या देणगीतून, दानधर्मातून या मुलांच्या गरजा पूर्ण व्हायच्या . त्यामुळे या सर्व लोकांना ते मनापासून धन्यवाद देत असत.
घरासारखा हट्ट वगैरे करणे , या गोष्टी तर कधी केल्या ही नसतील .
सर्व कामे वेळेत व शिस्तीत करण्याची सवय लागली होती.

घरकुलातील हे जीवन जगता, जगता कोमल लहानाची मोठी होत होती. तिला शिक्षण घेऊन नोकरी करुन स्वावलंबी बनायचे होते. आणि त्यासाठी ती चांगला अभ्यास करून शिक्षण घेत होती. शिक्षण घेता घेता एके ठिकाणी पार्ट टाईम नोकरीही करू लागली.

एके दिवशी घरकुलाची व्यवस्था पाहणाऱ्या काकांनी त्यांच्या ओळखीतील एका मुलाविषयी तिला सांगितले.
रोहन, दिसायला चांगला होता आणि शिक्षणही चांगले झालेले होते. त्याला चांगली नोकरीही होती आणि त्यालाही आईवडील नव्हते. लहानपणीच आईवडील वारल्यामुळे तो त्याच्या नातेवाईकांकडे राहत होता. आणि अनाथ मुलीशीच लग्न करणार अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याची इच्छा ऐकताच काकांना कोमलचा विचार मनात आला.

काकांच्या मध्यस्थीने कोमल व रोहन एकमेकांना भेटले. कोमलला रोहन आवडला आणि रोहनलाही कोमल आवडली.

साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले. लग्नाला कोमलकडून होता तो घरकुल अनाथाश्रमाचा परिवार..आणि रोहनकडून मोजकेच नातेवाईक.
लग्नानंतर कोमल आपल्या नवऱ्याच्या घरी,आपल्या हक्काच्या घरी जाणार होती. जिथे तिला आपले जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते.या आनंदाच्या क्षणीही ती घरकुल सोडून जाताना रडत होती. जिथे ती लहानाची मोठी झाली. एका अनाथ मुलीला कोमल नाव मिळाले. खाणेपिणे, शिक्षण या सर्व गरजा पूर्ण झाल्या आणि लग्नासारखी महत्त्वाची जबाबदारी ही काकांनी छान पार पाडली. या सर्व आठवणी येथेच सोडून जाताना तिला वाईट वाटत होते.

आपल्या आयुष्यात कुटुंबाचे महत्त्व, आईवडिलांचे अस्तित्व काय असते?हे अनाथ मुलांचे जीवन पाहिल्यावर कळते. अनाथ मुलांची दया केली जाते, त्यांना मदत करणारेही भरपूर असतात. पण हे जीवन कोणाच्याही वाटेला येऊ नये. असेच प्रत्येक अनाथ मुलाला वाटत असते.

कोमल व रोहन आपल्या संसारात छान रमले होते. दोघेही खूप आनंदी होते.आपल्या आयुष्यात ती सुखी होती तरीही ती आपल्या घरकुलाच्या परिवाराला विसरली नव्हती. ती अधूनमधून जात होती. शक्य होईल तेवढी प्रत्येकाला मदत करत होती. रोहनही तिला साथ देत होता.

जेव्हा ती श्लोकची आई झाली तेव्हा तिला आईपण कळाले. आणि रोहन बाबा झाला तेव्हा त्याला खूप आनंदही झाला आणि आपल्या आईवडिलांची खूप आठवण आली.

श्लोक जेव्हा कोमलला आई व रोहनला बाबा म्हणून हाक मारायचा तेव्हा त्या दोघांचे कान आणि मन आनंदाने तृप्त व्हायचे. जो आनंद आपल्याला मिळाला नाही तो आपण आईवडील या नात्याने श्लोकला देत आहोत ,यातच त्यांना समाधान वाटायचे.

घरकुलातही सर्व सण साजरे व्हायचे. पण कोमल ,रोहन आपल्या घरी सर्व सण छान उत्साहाने साजरे करायचे.
वाढदिवस असो किंवा एखादा सण समारंभ त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण असायचे आणि हा आनंद ते घरकुलातील मुलांनाही द्यायचे.
सणांचे आपल्या आयुष्यात खूप मोठे महत्त्व असते. सणांमुळे आयुष्यात आनंद,उत्साह येतो. नात्यानात्यांमधील आपुलकी वाढते,कुटुंबातील प्रेम वाढते.
दिपावली या सणाचे महत्त्व ही खूप मोठे आहे.
प्रत्येक नाते जपणारा हा सण आहे.
आनंदाचा,उत्सवाचा,
तिमिरातून तेजाकडे जाण्याचा , अज्ञानरूपी अंधाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचा ,मनामनात चैतन्य निर्माण करण्याचा हा सण!
दिपावली म्हणजे सण आनंदाचा!
दिपावली म्हणजे उत्सव नात्यांचा!

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोमल आणि रोहन आपल्या घरी तर दिपावली आनंदाने, उत्साहाने साजरी करणारचं होते. पण आपल्या कडून घरकुलातील मुलांनाही काही आनंद देता येईल का ? या उद्देशाने मिठाई,कपडे व इतर भेटवस्तू घेतले होते .

कोमल,रोहन व श्लोक हे जेव्हा आपल्या घरकुलातील सदस्यांना या भेटवस्तू देत होते, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि कोमल व रोहनच्या जागी आपले आईवडील शोधत होते व श्लोकच्या ठिकाणी आपण आहोत असे जाणवत होते.
कोमलच्या व रोहनच्या मनातही या मुलांबद्दल सहानुभूती वाटून रडू येत होते.