दिव्यांग प्रायव्हेट लिमटेड - भाग १

Abir is a young businessman doesn't go to take award for the youngest businessman of the year. He remembers his old days when he lost his eyesight in an accident and started a business of handicrafts with more specially abled people.

दिव्यांग प्रायव्हेट लिमिटेड - भाग १

"अँड द यंगेस्ट बिझनेसमन ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू मी. अबीर सबनीस, ओनर ऑफ दिव्यांग प्रायव्हेट लिमिटेड."
निर्विकार चेहऱ्याने अबीर हळुच हॉल मधुन निघून जातो, त्याचे सी. इ. ओ. कुलकर्णी काका अवॉर्ड स्वीकारतात. आज पहिल्यांदा त्याला हा अवॉर्ड मिळाला होता आणि तो स्वतः च नाव ऐकताच निघून जातो. त्याच्या कंपनीने कमी वेळात भरगोस यश प्राप्त केलं होत पण फार कमी लोक त्याला प्रत्यक्ष ओळखत, अवॉर्ड प्रमाणेच इंडस्ट्रीत इतर पार्टी फंक्शन ही तो टाळत.
अबीर बीचवरील त्याच्या आवडीच्या बेंचवर जाऊन बसतो थोडावेळ आपला भूतकाळ आठवतो, मध्यमवर्गीय घरातील एक नुकतंच ग्रॅज्युएट झालेला तरुण, मन मेळाऊ दिलखुलास, आणि डोळ्यात खूप शिकून मोठे होण्याचे स्वप्न, जे एका दिवशीच्या अपघातात उधळले. ग्रॅज्युएट उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिप वर मॅनेजमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतली होती, नवीन वातावरण, मित्र सगळी धम्माल पण एकदा घरी येताना त्याचा अपघात झाला, त्याच्या बाईकसमोर एक ब्रेक फेल झालेली कार अचानक रॉंग साईड नी आली आणि दवाखान्यात डोळे उघडले पण दिसत काहीच नव्हतं, त्याची दृष्टी गेली. अपघातामधील एका कुटुंबाने त्यांना मदत देऊ केली पण ती घेण्याच्या मनस्थिती मध्ये कुणीच नव्हतं. सगळे स्वप्न धुळीला मिळाले. आई वडिलांवर वीज कोसळली. काही दिवस अबीर घरीच होता, आई-वडील सुनीता आणि माधव  थोडे स्थिरावले. अबीर मात्र बेचैन होत करावं तरी काय. बाकी काही नाही तर स्वतःच्या कामापुरत तरी स्वावलंबी व्हावे म्हणुन एक ब्लाइंड स्कूल जॉईन केले. पण तिथे एक वेगळेच जग समोर आले आता तो सगळं कानांनी बघत होता. कुठे कराटे प्रॅक्टिस, सिंगींग, डान्स, कंप्युटर, कुकिंग, अगदी डोळस माणूस काय करेल एवढ्या कलांमध्ये तिथे असणारा प्रत्येक जण निपुण होता काहीतर पेंटिंग सुद्धा करत ज्यांना जन्मतः दृष्टी होती. 
अबीर तिथे फक्त ब्रेल लिपी आणि कंप्युटर शिक्षणासाठी गेला होता. पण तिथे त्याला आयुष्याचे वेगवेगळे पैलू बघायला मिळाले. तिथे त्यांचे इतर लोकांप्रमाणे फक्त डोळेच काम करत नव्हते पण आपले इतर इंद्रिय जास्त पटीने वापरत. कान, स्पर्श, गंध, चव यांचा वापर करून पूर्ण जग अगदी बारकाईने जगत. अबीरने तिथे या सर्व गोष्टी अनुभवल्या. शाळेतील सावंत सर स्वतः जन्मतः अंध होते. त्यांनी अबीरला माणसाच्या चाहूल लागण्यावरून त्याच्या स्पर्श, बोल्याच्या पद्धती वरून स्वभाव ओळखण्याची कला शिकवली. त्यासोबत मार्शल आर्ट्स सुध्दा. डोळे असताना ज्या गोष्टी तो शिकू शकला नाही तेवढ्या तो तिथे शिकला. जिवाभावाचे मित्रही तयार झाले.
अबीरने लवकरच तिथे शिक्षण पूर्ण केले, ब्रेल लिपी, कंप्युटर अशा आवश्यक गोष्टींचे कोर्सही पूर्ण केले. आर्ट अँड क्राफ्ट च्याही बऱ्याच गोष्टी शिकल्या. पण नोकरी साठी खुप खटपट करावी लागली, एका छोट्याशा ठिकाणी कॉपीराइटरची पोस्ट मिळाली पण समाधान नव्हते. अधुन मधुन विरंगुळा म्हणून त्याच्या ब्लाइंड स्कूल मध्ये शिकवायला जात नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी लेक्चर देत. हळू हळू तो काऊंन्सिलर म्हणून ओळखल्या जाऊ लागला पण त्याचे पैसे कधीच घेत नसत कारण त्या शाळेनीच त्याला नवीन ओळख दिली होती.
ब्लाइंड स्कूल मध्ये आर्ट क्राफ्टचे चांगलेच व्यसन त्याला लागले होते मातीच्या मुर्त्या, गिफ्ट आर्टिकल, असं फावल्या वेळात बनवत. जवळपास सोसायटी मधील बरेच लोक बघायला येत व आग्रहाने त्याचाकडून विकत घेत. थोड समाधान वाटलं आपण अगदीच अवलंबून नाही असा वाटायला लागलं. एकदा सोसायटी जवळच्या काकांच्या ओळखीने एका मोठ्या कंपनीची ऑर्डर त्याला मिळाली त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट बनवण्याची. घरी पण सगळ्यांना आनंद झाला. त्याचे वडील एका सहकारी बँकेत मॅनेजर होते आणि आई पोस्टात, दोघांनी सुट्टी टाकून काम करायचं ठरवलं पण ऑर्डर पूर्ण करणार कशी. त्याने त्याचा स्कूलचे मित्र आणि सरांची मदत घ्यायची ठरवले पुर्ण शाळेने अगदी जीव ओतून काम केलं सुंदर अशे वेग वेगळे गिफ्ट तयार केले. तिथे सगळ्यांचं बाँडींग खूप छान होत प्रत्येकानी कामं वाटून घेऊन पूर्ण केलं, अबीर तर तिथेच राहायला गेला होता ऑर्डर होईपर्यंत.
त्याचा पहिला चेक हातात आला आणि आयुष्यात गेलेला कॉन्फिडन्स परत आला. त्यातली काही रक्कम आग्रहाने त्याने शाळेला दिली. हळु हळु जवळपासचे बरेच जण छोट्या मोठ्या ऑर्डर आणत, डिलिव्हरी साठी व इतर मदतीला 2 मुलं ही ठेवली. अबीरला बाहेर कुठे जायचं असल्यास दोघांची मदत होत. त्यांच्या शेजारी कुलकर्णी काका राहत पूर्वी स्वतःची साबणाची छोटी कंपनी होती, मुलं सेटल झाल्यानंतर त्यांनी बंद केली. काकांच्या मदतीने त्याने एक छोटीशी कंपनी चालू केली "दिव्यांग प्रायव्हेट लिमिटेड". कुलकर्णी काका ऑफिशिअली कंपनीत कामाला लागले. जेव्हा कधी मोठी ऑर्डर येत तो शाळेतून मदत घेत व रक्कमही देत. वर्षभरात बरीच कामं मिळाली पण कंपनी बद्दल हव्या तेवढ्या लोकांना माहिती होत नव्हते. त्याच्या सारखे वेग वेगळ्या अवयवात दीव्यांग असलेले काही लोक कंपनीत जोडले गेले. कोणी हातांनी तर कोणी पायांनी अधू, मुक बधीर, सगळ्यांना अबीर मुळे एक नवीन आत्मविश्वास मिळाला. त्यात बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत होते. वर्षभरात खूप दीव्यांग कारागीर जमले पण डिमांड कमी आणि कारागीर जास्त होत होते. ऑर्डर वाढवणे आवश्यक झाले होते नाहीतर आपल्या सोबतीला आलेल्या एवढ्या लोकांचा आत्मविश्वास पुन्हा कोलमडून जाईल. 
एकदा एक तरुण बिझनेसमन त्याच्या कडे आला आणि कंपनीची पार्टनरशिप मागितली व फायनान्स द्यायला ही तयार झाला, अबीरला काहीतरी वेगळाच सेन्स झाला. त्याने खूप विचारण्याचा प्रयत्न केला, एका चांगल्या बिझनेसमनला आपल्यासारख्या कंपनीत का इंटरेस्ट, आणि आमच्यासारख्या अधू लोकांना उगाच कोणी का मदत करेल, तेही असे पैशाचे लालची व्यापारी.  नक्की काहीतरी गडबड आहे, त्याने प्रपोजल रीजेक्ट केले.
काही दिवस अशेच गेले एक दिवस एका पायानी अधू असलेली मुलगी अबीरकडे जॉबसाठी आली, मृणाली धर्माधिकारी. मार्केटिंग मधे कमालीचा अनुभव होता तिला पण पाय अधू झाल्याने तिला अधीसारखे फिरता येत नसल्याने जुनी कंपनी सोडावी लागली. अबीरने तिला कंपनीची परिस्थिती सांगितली व मी आत्ता एवढ्या मोठ्या पोस्टचा पगार देऊ शकणार नाही असे सांगितले. तिने थोडा विचार केला.
मृणाली - अबीर सॉरी नावानेच बोलते पण मला एक महिना दे जर माझ्या प्रयत्नांमुळे बदल नाही दिसला तर मी स्वतःच पगार न घेता निघून जाईल.
अबीरला तीच्यातला आत्मविश्वास आणि रोख ठोक बोलणे खुप आवडले. तिचा आवाज खूप गोड होता सुर साज घालत असल्यासखा.

मृणालीच्या येण्याने पुढे काय बदल होणार...?


क्रमशः

- रेवपुर्वा

कथेला like करून comment करा व प्रामाणिक प्रतिक्रिया जरूर कळवा.
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव, शेअर करताना नावासह शेअर करावे.

🎭 Series Post

View all