घटस्फोट ( अंतिम भाग )

About Married Life
मनिषा तिच्या आयुष्यात सुखं शोधत होती. महेश परिस्थितीशी जुळवून घेत जीवन जगत होता आणि आर्यही आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले होईल या आशेवर जगत होती.


असेच दिवस जात होते.

आणि एके दिवशी मनिषाला आयाचा फोन आला,
"मॅडम, आर्यहीला खूप ताप आहे आणि ती तापात सारखी बडबड करत आहे.तुम्ही सांगितलेले तापाचे औषध दिले पण ताप काही जात नाही आहे."

आर्यहीला सकाळी थोडा ताप होता. मनिषाने तिला डॉक्टरांना दाखवून औषधे आणली होती व आयाला सर्व सांगून ऑफिसमध्ये गेली होती.

पण आता आयाचा फोन आल्यामुळे मनिषा अस्वस्थ झाली व आर्यहीसाठी कामे सोडून घरी आली.
डॉक्टरांनी आर्यहीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितले.

महेशला हे कळताच तो पटकन हॉस्पिटलमध्ये आला.
आर्यहीची अवस्था पाहून त्याला रडूच आले. तिच्या आजारपणाचे कारण त्याला माहीत होते.

"यापुढे आर्यही माझ्या कडेच राहील. "
असे आपण आता मनिषाला सांगू आणि आर्यही चांगली झाली की तिला आपल्या घरी घेऊन जाऊ. असे महेशने ठरवले.

डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारांमुळे व आई बाबा दोघेही आपल्याजवळ असल्याने आर्यही लवकर बरी होऊ लागली.ती बरी झाल्याचे पाहून महेशला आनंद झालाच होता पण मनिषाला ही खूप आनंद झाला होता.
आर्यहीच्या आजारपणामुळे मनिषाची खूप धावपळ झाली होती. ऑफिसचे काम ती करतच होती आणि आर्यहीला वेळही देत होती. महेश तर आर्यही जवळच असायचा.
महेशसोबत आर्यही किती छान राहते आणि आनंदी दिसते. हे मनिषाने पाहिले होते,अनुभवले होते.
मुलांना फक्त पैशांनीच सुख,आनंद देता येत नाही तर आपण त्यांच्यासोबत प्रेमाने वागलो, त्यांना वेळ दिला,त्यांना समजून घेतले तर मुलांना मिळणारे सुख हे पैशाच्या सुखापेक्षा खूप जास्त असते. हे मनिषाला जाणवायला लागले होते.
आईवडील आपल्या सुखाचा विचार करून आपल्या इच्छेने घटस्फोट घेतात पण त्यात मुलांचे खूप नुकसान होते. त्यांना आई व वडिल दोघांचे प्रेम हवे असते. आपली एक छान फॅमिली असावी. असे त्यांना वाटत असते. पण आईवडिलांच्या घटस्फोटामुळे दोघांपैकी एकाचेच प्रेम त्यांना मिळत असते.

नवरा बायकोच्या आयुष्यात खरचं खूप समस्या असेल. त्रास असेल ,अजिबातच सुख नसेल तर घटस्फोट घेणे. योग्य ठरते. पण फक्त क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट घेणे म्हणजे आपल्या बरोबर आपल्या मुलांच्याही आयुष्याचे नुकसान करणे होय.
महेश खूप चांगला होता पण मनिषाने आपल्यातील अहंकारामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.
ती आर्यही ला सर्व काही सुख देत होती पण तिच्या चेहऱ्यावर खऱ्या सुखाचा आनंद देवू शकत नव्हती. येथे ती हारली होती.
आणि ही चूक तिच्या लक्षात आली होती.
अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आर्यहीला खरे सुख देवू शकतो आणि त्यासाठी महेशसोबत पुन्हा एकत्र संसार करू शकतो. हा विचार तिच्या मनात आला आणि नुसत्या विचारानेच तिला खूप छान वाटले.

आर्यही पूर्णपणे चांगली झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला घरी जाण्यास परवानगी दिली आणि तिची काळजी घेण्याचे महेशला व मनिषाला सांगितले. तिला नेहमी आनंदात ठेवा. असेही सांगितले.

'आर्यहीला मी माझ्याकडे घेऊन जातो.' असे महेश मनिषाला सांगणारच होता,तेवढ्यात मनिषाच त्याला म्हणाली,
"महेश, आपण सर्व पुन्हा एकत्र राहू या.."

मनिषाचे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच आर्यही मनिषाला येऊन बिलगली आणि "थँक्यू मम्मी ..लव्ह यू मम्मी.." म्हणू लागली.
जणू ती या क्षणाची वाटच पाहत होती.
आर्यहीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून महेश व मनिषाला आनंद झाला.आणि
तिघेही पुन्हा एकत्र आनंदाने राहू लागले. महेश व मनिषा आपली नोकरी सांभाळून एकमेकांना व आर्यहीला वेळ देऊ लागले. आणि जीवनाचा खरा आनंद घेऊ लागले.

समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all