घटस्फोट ( भाग 2 )

About Married Life
सर्व अगदी छान सुरू असताना, मनिषाने असे अचानक घटस्फोट घेण्याचे का ठरवले?
हाचं प्रश्न सर्वांना पडला होता.आपल्याला याबाबतीत यापूर्वी ती काही बोलली नाही. असे मनिषाच्या आईबाबांना वाटले आणि तिला घटस्फोट घेण्यामागचे कारण विचारले, तेव्हा ती म्हणाली,
"आयुष्यात माझी खूप सारी स्वप्ने आहेत ..मला ती सर्व पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मला भरपूर पैसा कमवायचा आहे.मला माझ्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग करून आयुष्यात खूप पुढे जायचे आहे.फक्त नवरा,मुल,संसार यात गुंतून नाही राहयचे.माझ्यासारखी महत्त्वकांक्षा मला महेश मध्ये दिसतच नाही. त्याचे जीवन अगदी चाकोरीबद्ध आहे. घर,संसार, मुल यातचं तो समाधानी वाटतो आणि म्हणून तो जास्त पगाराची नोकरी न शोधता पहिल्याच नोकरीत समाधानी आहे. मी त्याच्या सारखी नाही आहे. मला जास्त पगार देणारी नोकरी मिळाली की मी पहिली नोकरी लगेच सोडते म्हणून तर आज त्याच्यापेक्षा मी जास्त कमावते आहे.महेश आतापर्यंत तरी मला कोणत्याही बाबतीत काही बोलला नाही आणि आमच्यात तसे वादही नाही पण असेच सुरू राहिले तर मी खूप पुढे निघून जाईल आणि महेश आहे तिथेच राहिल आणि मग कधीना कधी त्याचा पुरूषी अहंकार दुखावला जाईल. तो मला नोकरी सोडून घरी राहण्यास सांगणार आणि मला ते अजिबात पटणार नाही. त्यामुळे तेव्हा वाद होण्यापेक्षा आताच गोडीने वेगळे झालेले चांगलेचं ना ! आर्यही कायद्याने माझ्या कडेच राहणार आणि तिच्या सर्व सुखसुविधा पूर्ण करण्यासाठी मी तेवढी सक्षम आहेच. "

मनिषाचे हे सर्व ऐकून सर्वजण एकदम स्तब्धच झाले.

तिच्या आईवडिलांना तिच्या बाबतीत वाटलेली भीती खरी ठरली होती.

मनिषा जिद्दीही आहे. तिच्या मनात जी गोष्ट येते,ती पूर्ण करतेचं. ती घटस्फोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ती तिच्या उद्दिष्टांपुढे बाकीच्या गोष्टींना महत्त्व देत नाही. हे सर्व तिचे आईबाबा जाणून होते.
घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या जीवनावर काहीही परिणाम होणार नाही .. आणि ती करुन घेणारीही नाही. पण महेशचे आणि छोट्या आर्यहीचे काय ? मनिषाच्या निर्णयामुळे या दोघांचे आयुष्य किती बदलून जाईल ? मनिषाचे महेशवर प्रेम आहे आणि खरचं महेश खूप चांगला आहे. मनिषाचा असा स्वभाव असूनही तो तिच्यावर खूप प्रेम करतो, तिला प्रत्येक वेळी समजून घेतो. मनिषा जितकी हट्टी, रागीट तितकाच महेश शांत,परिस्थितीशी जुळवून घेणारा. मनिषाचे महेशशी लग्न झाले आणि आतातरी तिच्या स्वभावात,वागण्यात फरक पडेल असे तिच्या आईबाबांना वाटत होते. आर्यही ची आई झाल्यानंतर आईच्या जबाबदारीमुळे तरी ती बदलेल या आशेवर ते होते.


क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all