घटस्फोट ( भाग 1 )

About Married Life

"मला घटस्फोट हवायं. " मनिषा महेशला म्हणाली.

घटस्फोट ..हा शब्द ऐकताच महेश मनिषाकडे पाहतच राहिला. त्याला वाटले,'मनिषा आपली गंमत करते आहे की काय ? '

"काहीही हं मनिषा..गंमत करते का तू माझी ? "
महेश हसत हसत मनिषाला म्हणाला.

"गंमत नाही करत आहे मी...खरं तेचं बोलते आहे."
मनिषा ठामपणे म्हणाली.

मनिषाचा निर्णय ऐकून महेश त्यावर जास्त काही न बोलता,वाद न घालता शांत राहिला . महेशला मनिषाचा स्वभाव चांगला माहित होता.तिच्याशी वाद घालणे आपल्याला शक्य नाही. ती अभ्यासात तर हुशार आहेच पण बोलण्यातही समोरच्या व्यक्तिला पराभूत करणारी आहे. कधीही हार न मानणारी आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याने मनिषाच्या आईवडिलांना घरी बोलावून घेतले आणि तिचा निर्णय त्यांना सांगितला.
ते ऐकून तिच्या आईवडिलांना ही आश्चर्यचं वाटले. सर्व व्यवस्थित असताना मनिषाने असा निर्णय का घेतला? यावर ते विचार करू लागले.

लहानपणापासून मनिषा खूप हुशार, शांत स्वभावाची,महत्त्वकांक्षी व ध्येयवादी होती. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणारी होती.आपल्या बहिण व भावापेक्षा गुणांनी व स्वभावाने थोडी वेगळीच होती.
आईवडिलांना तिच्या सुंदरतेचे, तिच्यातील गुणांचे खूप कौतुक वाटायचे. पण कधी कधी तिच्या अति महत्त्वकांक्षी स्वभावाची भीतीही वाटायची.
'आयुष्यात ध्येयवादी, महत्त्वकांक्षी जरूर असावे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असावी. आपल्यातील चांगले गुण त्यांच्या अतिरेकीपणामुळे आपल्याला घातक ठरू नये. याची काळजी घेतली पाहिजे.'

असे ते मनिषाला नेहमी समजावून सांगत असत.


आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षणात तिची घोडदौड सुरूच होती. बारावीनंतर इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली. जीवनात काहीतरी चांगले ध्येय गाठायचे या उद्देशाने ती जोमाने अभ्यासाला लागली.

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना महेशच्या प्रेमात कधी पडली हे तिलाही कळलेच नाही. ओळख,मैत्री व प्रेम छान जुळून आले होते.
दोघांचीही मने,विचार,आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन,भविष्यातील स्वप्ने सर्व काही चांगले जुळत होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरी मिळताच त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
दोघांमध्ये कुठेही नाव ठेवण्यास जागा नसल्याने, दोघांच्याही घरातल्यांनी काहीही विरोध न करता लग्नाला परवानगी दिली.
मनिषा व महेशचे छान थाटामाटात लग्न ही झाले आणि ते संसाराला लागलेही.
नोकरी,संसार व जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद ..सर्व काही व्यवस्थित सुरू होते. आणि आर्यही च्या जन्माने तर त्यांच्या आयुष्याचा आनंद द्विगुणित झाला होता.

क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all