दिवेलागण -टीम दुनियादारी

अनोखी दिवेलागण

*दिवेलागण*

संध्याकाळची वेळ होती. गावात सर्वत्र भक्तीभावाने दिवेलागण होत होती. परवचा म्हणतानाचा ध्वनी आणि प्रार्थनेचे स्वर आसमंत व्यापून टाकत होते. कुठेतरी दूरवरून घंटेचा मंजुळ ध्वनी ऐकू येत होता.
इतक्यात एक हलकीशी वाऱ्याची झुळूक आली. तिने साऱ्या गावावरून फेरफटका मारला आणि.....

इतका वेळ शांत असणाऱ्या गावाचे रंगरूप पालटले,संध्याकाळच्या मंगलमय वातावरणात ताण जाणवू लागला. तेलाने पूर्ण भरलेले दिवे अचानक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. कोणलाच कांही कमी नव्हतं पण तरीही प्रत्येक दिवा स्वतःला अपूर्ण समजतं होता.
आलेल्या मंद झुळकेने एव्हाना रोद्र रूप धारण केले आणि जोरात आवाज करत ती गावच्या वेशी पर्यंत पोहचली.वेशी जवळच्या भग्न मंदिरात त्यामुळे हालचाल जाणवली. मंदिराच्या पायरीवर खूप सारा पालापाचोळा जमा झालेला होता. बारीक माती आणि धूळ त्या पाचोळ्यावर साचत गेल्यामुळे   तो पाचोळा त्या पायरीला अधिक घट्ट धरून होता.
मंदिराच्या आवारातील दीपमाळही धुळीने माखली होती. त्यावर कधी काळी लावलेल्या पणत्या खूप दिवसापासून तेल वात मिळाली नाही म्हणून निपचित पडून होत्या. आवरतील वड आणि उंबराची झाडं आपल्या फांद्या चौफेर पसरून सर्वांना आपल्या छायेखाली घेऊ पहात होती. पण कितीही जोमाने वाढले तरी हवी ती प्रसन्नता त्यांना निर्माण करता येत नव्हती. त्यांच्या पारावरील पणत्या तेल वात न मिळाल्यामुळे हिरमुसल्या होऊन इतस्थत: विखुरल्या होत्या. त्या प्रत्येकीत अंधार दूर करण्याची ताकद होती, पण हेतू पुरस्सर त्यांच्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या ज्योत पेटवू शकल्या नव्हत्या. अशा असंख्य ज्योती पेटण्या आधीच विझून गेल्या होत्या.... कित्येक पणत्यांवर आघात झाल्यामुळे त्यांना तडे पडलेले होते. कांही फुटलेल्या अवस्थेतही पार सोडून जाण्यास तयार नव्हत्या... त्यांचे आपापसात बोलणे,हसणे, खेळणे, सणावाराला सुशोभित होऊन अधिक प्रकाशमान होऊन चमकणेही बंद पडले होते. कित्येक दिवसात पारावर झिम्मा फुगडी,अट्यापाट्या,चूल बोळकी, भातुकली, बाहुला बाहुलीच लग्न लागलंच नव्हत. एक दोनदा वडाच्या पारंब्यांनी सर्वत्र पसरून त्या बाहुलींचा शोध घेतला. बहुसंख्य बाहुल्या नकट्या करून कोपऱ्यात दडवून ठेवलेल्या होत्या. वड बिचारा हताशपणे आभाळाकडे बघत बसला...
आज मात्र ही कुठून कशी आलेली वाऱ्याची झुळूक रोद्र रूप घेऊन मंदिराच्या आवारात घुसली,आणि  तीने इतक्या वर्षांनी पणत्याच्या जखमा पुन्हा उघड्या करण्याचा प्रयत्न केला...
आता सगळ्या पणत्या पारावर एकत्र आल्या. प्रत्येकीला आपापली जखम मोठी वाटतं होती. कधी एकदा दुसरीला आपल्या मनातील दुःख सांगते असं प्रत्येकीला झालं होत. खूप वर्षांपासून मनात दाबून ठेवलेला हुंदका आज आक्रोश बनला होता. हळदी कुंकवाची दोन बोट तरी आपल्याला कोणी लावावीत या आशेने बिचाऱ्या पारावर बसून होत्या. काळ पुढे सरकत गेला आणि त्या मात्र कोऱ्याच राहिल्या. अशा पणत्यांना  आपलं दुःख कोणासमोर कस मांडाव ते समजत नव्हत. आता तर त्यांच्या पुढे अनेक प्रश्न होते.आपल्या जन्माचे प्रयोजन काय होते ? आपल्या उत्पत्तीचे कारण काय? बर जर झालीच होती आपली निर्मिती, तर सामान्यपणे का जगू दिल नाही आपल्याला? आपल्यामध्ये क्षमता असतांना आपल्याला प्रकाशमान का होऊ दिल नाही ? गावात नांदू न देता असं गावाबाहेरच्या पडक्या देवळात आपलं आयुष्य का जाव? एक ना दोन असे अनेक प्रश्न कित्येक दिवस मनात दाबून ठेवल्याने आता त्याचा स्फ़ोट झाला आणि आवाजाने कमाल मर्यादा ओलांडली... परिणामी गाभाऱ्यातली समई, निरंजन यांच्या पर्यंत आवाज पोहचला. इतक्या दिवसाची मरगळ झटकून त्यांनी गाभाऱ्याच्या बाहेर डोकावले. खूप दिवसापासून हालचाल नसल्याने अंग आंबुन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतके वर्ष  सणवार म्हटले की पहिला आणि महत्वाचा मान मिळवणारी समई अशी अडगळीला पडली होती. अजूनही तिच्या प्रकाशात अमंगळ बाजूला सारून वातावरणात प्रसन्नता निर्माण करण्याचे सामर्थ होते. वर्षानुवर्षं वापर झाल्यामुळे कांही भाग जास्त तेलकट किंवा काजळी धरल्यामुळे काळा झालेला होता आणि हे सहाजिकही होतच. तरी तो स्वच्छ घासला तर समई अधिक प्रसन्नतेणे उजळत असे. पण त्याच्यातही एक गोष्ट अशी झाली की जाणत्या लोकांनी नवीन पिढीला नको तितकं डोक्यावर बसवलं. नवीन तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी जाणत्या हातातला कारभार विभागला गेला.
 नवीन मंडळींनी समई अधिक चमकवण्यासाठी तीच्यावर नवीन प्रयोग केले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. समई नको तिथे गळू लागली. प्रसन्न ज्योतीची जागा प्रखरतेने भडकणाऱ्या ज्योतीने घेतली. जुन्या नव्याची सांगड कांही केल्या बसली नाही . कुटुंबातली समंजस बाई नवीन सुनेच्या हातात घराची सूत्रे आणि तिजोरीच्या चाव्या देऊन वनप्रस्थाश्रम स्वीकारते, तसे समईने सुद्धा या भग्न मंदिराचा आश्रय घेतला.थोडक्यात काय तर, "नवे आले गावात आणि जुने गेले पेवात. " अशी सर्वत्र अवस्था होती.
 --आणि अशी विविध दुःखे उराशी कवटाळून या पणत्या, निरंजन, समया इथे येऊन पडल्या होत्या. नाकासमोर चालणाऱ्या व सरळसोट आयुष्य जगणाऱ्या बहुसंख्य माणसांच्या आयुष्यात मोहाचे, पतनाचे, दिवस येतच नाहीत, असे नाही. ते येतातच किंवा ते आणले जातात. अश्या कित्येक क्षणाचे शिकारी बनलेले किंवा बनवलेली अनेक उदाहरणे गावा गावातून सापडतात. वृद्धाश्रम, महिला आश्रम, परीतक्त्या महिलासाठीचे आश्रम यांची निर्मिती म्हणजे या दुःखाची परिनीती होय. त्याचेच नमुने दाखल उदाहरणे या निरंजन, पणत्या, समईच्या रूपात दिसून येत होत्या. पणती मर्यादित प्रकाश देत असली तरी एका पणतीने दुसरी, दुसरीने तिसरी असं करत असंख्य पणत्या लावल्या तर आसमंत नक्कीच तेजोमय होईल यात शंका नाही!
 दीपमाळेवर प्रकाशमान पणती जेंव्हा विराजमान होते तेंव्हा तिचा रुबाब अवर्णनीय असतो. जीवनातील अंधार प्रकाशाच्या खेळामध्ये अनुभवी असणारे जेंव्हा कार्यरत होतात तेंव्हा झालेली सुरवात ही त्या कार्याच्या अर्ध्या यशस्वीतेची नांदी असते. अशा अनुभवी, मार्गदर्शक पणत्या, दीपमाळे वर तेवत असतात तेंव्हा ते प्रकाशफुलांनी लगडलेल झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेत! दुर्दैवानेही प्रकाश फुलंच कोमेजून गेली होती.... मोठमोठया दिव्यांच्या प्रकाशात पणतीचा प्रकाश तुच्छ भासू लागला. घराघरातून  वंशाच्या दिव्याला मागणी वाढली होती. संस्कारी, तुळशी जवळ मंद तेवणारी पणती मात्र दुर्लक्षीत झाली होती... हेच शल्य आज मोठया प्रमाणात बाहेर पडलं. हुंदक्याचा आवाज हळूहळू वाढत जाऊन एकच गदारोळ सुरु झाला. प्रत्येकीच दुःख सारखंच होत...फक्त त्याच्या कडा वेगवेगळ्या होत्या. वंशाच्या दिव्याने पणत्यांची बोलती बंद केली होती. अधिकार काढून घेतले..लायकी असतांना दर्जा कमी केला होता. दिव्याच्या लख्ख प्रकाशात पणतीचे मिणमिणने क्षुद्र वाटू लागले. मोठा समारंभ, मानमरातब, महत्वाचे निर्णय अशा वेळी दिव्याचे वर्चस्व वाढले होते.
पणत्या विझवून दिवे लावू पहाणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत होती. भविष्यात त्यामुळे काय समस्या येतील याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून जो तो वंशाच्या दिव्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होता.त्यामुळे हे वंशाचे दिवटे देखील जरा माजले होते.पणतीला हवे तसे वापरून फेकून देण्यात त्यांना काहीच गैर वाटतं नव्हते. दिवसा उजेडी अनेक पणत्यांचं आयुष्य मातीमोल झालं होत अनेक पणत्याच्या वाती अकाली विझल्या होत्या... अंधार दूर सारून प्रकाश पसरवण्याचे काम ज्या पणत्या करू शकत होत्या, त्यांच्याच नशिबी अंधार पसरला होता. आज मात्र कुठून कोण ही झुळूक फिरली आणि सर्वत्र पणत्यांची चर्चा रंगु लागली. आपल्याही अस्तित्वाला कांही किंमत आहे हे तीला पुन्हा एकदा जाणवलं.
 पणत्यांच्या घटत्या संख्येमुळे जगाचा कोपरा नाही तर फार मोठा केंद्रबिंदू अंधारात सापडला होता. जो तो अंधारात चाचपडत होता... वंशाचा दिवा हाती होता असला तरी त्याला साथ देणाऱ्या पणतीच्या प्रकाशाची कमतरता भासू लागली आणि मग एकच हाहाकार उडाला.आलेली झुळूक ही झुळूक न राहता आता ति वावटळ बनली होती तीचे असे गावात घोंघावत फिरणे म्हणजे संकटाची नांदी होती. गावचे कर्तृत्व पंचक्रोशीत पसरल्यामुळे बाहेरून पणती गावात आणणेही दुरापास्त झाले होते.

संकट येता कळले
काय गुन्हे इथे घडले
आक्रोशली पंचक्रोश
कळले प्रत्येकाचे दोष
निसर्ग नियम मोडले
जग तिथेच थांबले
वंश पुढे चालेना 
राखी कोणी बांधेना 
वेदनेची गाऊन गीते 
होऊ लागले मन रिते 

अशा प्रकारे गावाची आवस्था या घोंगावत आलेल्या वावटळीने उघडी पाडली तेंव्हा प्रत्येकाच्या वेदनेला कंठ फुटला... ज्याने त्याने स्वतःची चूक मान्य करत या भग्न मंदिराकडे धाव घेतली. आता पणत्यांच्या आवाजापेक्षा मंदिरा भोवती जमलेल्या गावकऱ्यांचा आवाज जास्त वाढला असला तरी त्या आवाजाला कारूण्याची धार होती. घराघरांतून स्वतःला कुटुंबं प्रमुख म्हणवून घेणारे देखील कसे बसे इथपर्यंत पोचले होते. प्रवेश द्वाराजवळ खाली मान घालून उभे राहत त्यांनी आपली चूक मान्य केली. मुलीचा जन्म नाकारणाऱ्या पुरुषांना भाकरी साठी आई,लग्नासाठी बायको, भाऊबीजे साठी बहीण, चिऊ काऊ चा घास भरवण्यासाठी बाहुलीच्या रूपातील मुलगी मिळेना झाली म्हणून त्यांना आपली चूक कळाली होती. निसर्गाच्या नियमामध्ये हस्तक्षेप करून आपण मानव उत्पत्तीच्या विरोधात काम केल्याचे शल्य आता त्यांना बोचत होते. राखी पौर्णिमेला हातात राखी बांधायला कोणीच न मिळाल्यामुळे सुनेसुने हात; मुठी आवळून चुपचाप उभे होते. लाडीक हातांची गळ्याभोवती पडलेली मिठी कधीच अनुभवली नाही असे बाप शून्यात नजर लावून होते.... आपल्या हट्टामुळे या पिढीचे नुकसान आणि पुढील पिढीचे जन्मा आधीचे संपुष्टात आलेले अस्तित्व या सर्व अपराधाचे प्रायश्चित घेण्यासाठी काय करावे, या साठी त्यांच्यात जोरदार विचार संघर्ष सुरु झाला आणि.......
    एकमताने या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार  करण्याचे ठरले. सर्व दुर्लक्षित पणत्या, निरंजनी, समया यांना एकत्र  करण्यात आले. त्यांची माफी मागून पुन्हा नव्याने सुशोभित करण्यात आले. जुनी जळमटे, काजळी काढून त्यांना नव्याने तेलवात करून प्रकाशित करण्यात आले. मानसन्मानाने त्यांना त्यांची स्थाने बहाल करण्यात आली. हळव्या मनाच्या पणत्याच त्या, झालं गेलं विसरून सर्वांना माफ करून, त्या अधिक जोमाने प्रकाशित झाल्या. समई, निरंजनीने उदासीनता झटकून सर्व गाभारा तेजोमय करून टाकला. त्यांची प्रकाश किरणे आई भवानीच्या मुखकमला पर्यंत जाऊन पोचली. मातेची मुर्ती प्रसन्न चित्ताने हसून सर्वांकडे पहात होती. गावकऱ्यांनी मोठया भक्ती भावनेने आईचे नवरात्र बसवले! जागरण, गोंधळ,जोगवा, आरत्या यांनी परिसर दुमदुमून गेला. गावकऱ्यांनी नाक घासून माफी मागितली आई भवानीने प्रसन्न होऊन दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद दिला....... आणि गावातील प्रत्येक घर पणत्यांच्या उजेडाने लखलखीत झाले. ओसरीवर,अंगणात गोकुळ *हसले!*

कथा लेखिका..
अंजना भोकरे-भंडारी
नाशिक.
9921383416 

एका पणतीने दुसरी, दुसरीने तिसरी असं करत असंख्य पणत्या लावल्या तर आसमंत नक्कीच तेजोमय होईल यात शंका नाही!पणतीच्या प्रकाश फुलांनी लागडलेलं झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेईल, पण दुर्देवाने ही प्रकाश फुलंच कोमेजून जात आहेत ती जाऊ नयेत म्हणून हा कथा लेखणाचा प्रपंच. कथा नक्की वाचा आवडली तर अभिप्राय नक्की नोंदवा,कांही सुधारणा असतील तर त्यांचेही स्वागत आहे. फक्त आपली प्रतिक्रिया लाख मोलाची आहे आणि आम्ही आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहोत हे लक्षात असू द्या.
पुन्हा भेटू.