Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..भाग १

Read Later
दुरावलेली प्रीत..भाग १

कथेचं नाव - दुरावलेली प्रीत

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका              दिशा निवांत हॉस्टेलवर बसली होती. नुकतीच असाइनमेंट लिहून पूर्ण झाली होती. तिच्या रूममध्ये ती एकटीच राहत होती. छोटीशी रूम, एक बेड, छोटं कपाट, लॉकर आणि स्टडी टेबल एवढाच काय तो पसारा ! ती झोपायला जायचा विचार करणार तोच तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. नाव बघूनच ती फार खुश झाली. 


"संजू कॉलिंग..! "

तिने कॉल रिसिव्ह केला. 


"हॅलो.. " संजना. 


"हा बोल संजू. कशी आहेस ? " दिशा फारच आनंदी झाली होती. 


"मी एकदम मस्त. तू कशी आहेस दिशू ? " संजनाच्या बोलण्यातही आनंद जाणवत होता. 


"मी पण एकदम भारी आहे." दिशा. 


"काय आहे ना, तुमच्यासारखी मोठी माणसं काय आम्हांला कॉल करत नाहीत. मग आम्हांलाच कॉल करावा लागतो तुम्हांला. " संजना ड्रामॅटिक टोनमध्ये बोलत होती. 


"यार संजू या महिन्यात असाइनमेंट्सचा लोड खूप आहे ग. " दिशा. 


"हा हा असूदे. किती दिवस झाले ना यार.. आपण परत भेटायला हवं. जवळजवळ दीड वर्ष झालंय तुला तिकडे जाऊन." संजना. 


"अग पण चार महिन्यापूर्वीच तर भेटलोय." दिशा हसत म्हणाली. 


"दिशू, चा..र..महिने..! म्हणजे १२० दिवस! तुला नाही का येत आठवण आमची ? आम्हीच मूर्ख आहोत आठवण काढतोय." संजना. 


"अग तसं नाही. भेटूया ना. पण प्लॅन करून भेटू. असंच अचानक सांगशील ना भेटायचं आहे तर सुट्ट्या पण एडजस्ट नाही होणार आणि असाइनमेंट्स पण चुकतील. " दिशा. 


"हा.हा. ठरवून भेटूया. विकी पण बोललेला भेटूया एकदा सगळे. मिस करतोय तो पण जास्त. " संजना. "विकी, कुठे असतो यार आता ? " दिशा. 


"विकी पुण्यालाच असतो. बघ ना आधी आपण सगळे रत्नागिरीत एकत्र होतो. आता विकी पुण्याला, तू मुंबईत आणि अमय तर थेट रांची. किती दूर गेलोय आपण ! " संजनाचा आवाज गहिरा वाटत होता. 


"तु काय रडतबिडत नाही आहेस ना ग ? आहेत सगळे अजून. भेटूया की प्लॅन करून ! " दिशा. 


" रडत नाही आहे ग. जस्ट खूप जास्त मिस करतेय. भेटणार तर आहोतच. माझं आणि विकीचं काय कधीही टायमिंग एडजस्ट होईल. मुंबई काय दूर नाही. पण आपल्या रांचीवाल्या साहेबांचं काय करायचं ? " संजना. 


"हं..हं.." दिशाने फक्त हुंकार भरला. 


"हं काय ? कॉल करून सांग अम्याला, सांगू त्या दिवशी हजर राहायचं." संजनाने ऑर्डर दिलीच. 


"हा." दिशा फक्त होकार भरत होती. 


"तू तुटक तुटक का बोलतेय ?  बाय द वे, अमय काय करतोय सध्या ? काय म्हणतोय त्याचा अभ्यास ?" संजनाला दिशाच्या बोलण्याच्या टोनिंगवरून संशय आला होता. 


"मला काय माहित ? मी अमय आहे का ? " दिशा थोडीशी नाराजीनेच म्हणाली. 


"दिशू, असं का बोलतेयस ? अमय आणि तू भांडला आहात काय ? " संजना.


"नाही. मी का भांडेन ? " दिशा फार शांतपणे उत्तरली. 


"मग अमयबद्दल तू असं का बोलतेयस ? म्हणजे.." संजना खूपच कन्फ्यूज दिसत होती. 


"संजू, मी क्लिअरच सांगतेय तुला. अमयचा आणि माझा काहीही संबंध नाही. त्याची खबरबात त्याला कॉल करून विचार. मला नाही." दिशाचा आवाज थोडा कठोर वाटत होता. 


"हा.हा.ओके." संजनाने अधिक न ताणता तिथेच थांबायचं ठरवलं. 


"अजून काय ? " दिशाचा टोन परत नॉर्मल झाला होता. 


"बाकी काही नाही. तुझा अभ्यास कसा चालला आहे ? नवीन मित्र, नवीन बेंचमेट वगैरे.. " संजना. 


"छान चाललंय सगळं. अभ्यास तर मस्तच सुरु आहे. मित्र नाहीत यार फार. आपल्या ग्रुपसारखा ग्रुप परत भेटणार आहे का ? आहेत थोडेफार फ्रेंड्स म्हणण्यासारखे आणि बेंचमेट आहे तरुण म्हणून ! तो खूप चांगला आहे. स्वभावाने पण छान आहे आणि हुशार पण आहे. " दिशा सगळं एक्साईटमेंट सांगत होती. 


"अच्छा आताचा बेंचमेट चांगला आहे का मग ? " संजनाचा पुन्हा ड्रामॅटिक टोन दिशाला जाणवला. 


"नाही ग संजू राणी. माझ्या संजूसारखी बेंचमेट परत कुठून भेटणार मला. त्यामुळे आहे त्याच्यावर एडजस्ट करून घेतेय. किती बिचारी आहे न मी ! " दिशा हसू आवरत बोलत होती. 


"कळलं हा.. बिचारेपण अगदी उफाळून येतंय. " संजना. 


"संजू, चल. खूप उशीर झालाय. झोपूया आता. मला मॉर्निंग शिफ्टला क्लास आहे परत." दिशा. 


"हा.हा.झोप. नंतर बोलू." संजना. 


"बाय. गुड नाईट डिअर ! " दिशा. 


"गुड नाईट !" संजना. 


             दिशाचा कॉल कट करून संजना शांत बसली होती. दिशाला काय झालं असेल असा विचार ती करत होती. दिशा बाकी तर व्यवस्थित बोलत होती. फक्त अमयचं नाव आल्यावरच तिचा टोन बदलला होता. ती रागवलेली किंवा त्रासलेली वाटत होती. अमयबद्दल बोलण्याची तिची बिलकुल इच्छा नाही हे संजनाला तिच्या बोलण्यावरून जाणवलं होतं. संजनाने आपलं कपाट उघडलं. त्यातून तिने एक सुंदर फोटोफ्रेम बाहेर काढली. कॉफीबीन्सच्या सहाय्याने तयार केलेली ती चौकट होती. तो फोटो दोन वर्षांपूर्वीचा होता. समुद्र किनाऱ्यावरचा तो फोटो पाहून संजनाचे डोळे पाणावले. त्या चौघांचा फोटो! एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असलेले ते चौघे. विकी, संजना,दिशा आणि अमय! 


                रत्नागिरीतील लाडघरच्या समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी सहाच्या सुमाराला मस्ती सुरु होती. विकी पाण्यात उसळ्या मारण्यात व्यस्त होता. तर संजना थकून वाळूवर बसून फक्त पाहत होती. 


"अमय,नाही. अरे नको ना ! नाही आवडत मला एवढ्या पाण्यात ! " दिशा ओरडत होती. 


              पण ऐकेल तो अमय कसला ? अमय तिला खेचत तिथे पाण्यात घेऊन गेला होता. संजना आता त्यांच्या त्या मस्तीचं शूटिंग करत होती. हळूहळू सूर्य मावळतीला जाऊ लागला तसे ते तिघेही पाण्याबाहेर आले. 


"ए संजू, सूर्यास्त होत आला. चल ना, काढायचा आहे ना आपल्याला फोटो ? " दिशा. 


"हो, चला रे. मी आलोच कॅमेरा सेट करून. " विकी म्हणाला. 


             तसे ते तिघे फक्त पायापर्यंत पाणी येईल इथपर्यंत किनाऱ्यावर जाऊन उभे राहिले. विकीने कॅमेरा स्टॅण्डवर ठेवला आणि फोटोचा अँगल सेट केला. दहा सेकंदाचा टायमर लावून तो ही धावत त्यांच्याजवळ गेला. तोच होता हा सुंदर फोटो..! त्यांच्या मैत्रीची ठेव ! दिशा आणि अमयच्या नात्यात आलेली कटुता संजनाला जाणवली होती. दुरावलेली प्रीत पुन्हा सांधायचा ती पूर्ण प्रयत्न करणार होती. 


क्रमशः. 

- © तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा : रायगड - रत्नागिरी.


( वाचक मित्र मैत्रिणींनो, 

\"माझ्या अकाउंटवर सुरु असलेल्या \"obsessed with you या कथेला तुम्ही अपेक्षेपेक्षाही जास्त प्रेम देताय. thank you so much. ही कथा राज्यस्तरीय स्पर्धेकरिता असल्याने मध्येच सुरु करावी लागत आहे. या कथेलाही तुमचं तितकंच प्रेम लागेल हिच इच्छा ! यामुळे OBSESSED चं पोस्टिंग स्लो होणार नाही. तुमचा या कथेला सपोर्ट माझ्या पहिल्यावहिल्या लेखन स्पर्धेत मला जिंकून देऊ शकतो. त्यामुळे प्लिज जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि कळवत रहा. कथा कशी वाटतेय..! )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//