Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..अंतिम भाग

Read Later
दुरावलेली प्रीत..अंतिम भाग

कथा - दुरावलेली प्रीत..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


               दिशा आणि तरुण दुपारी लॉजवर पोहोचले. नुकतेच साडेतीन वाजले होते. तासाभरात लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर जायला निघायचं होतं. दिशाला मात्र आज तरुणच्या बोलण्यात काहीतरी विचित्र जाणवत होतं. सतत बडबडणारा तो अतिशय शांत होता. जणू त्याच्या मनात काहीतरी गहन विचार सुरू होता. रत्नागिरीत आल्यावर दिशाच्या मनात सहज विचार आला. 


“अमय आला असेल का? किती छान दिवस होते ते! त्यातलाच आजचा एक. पण आजही तो येऊ शकला नाही. असो, मी यापुढे एकतर्फी प्रेम करणार नाही. प्रेम असेल तर ते दोघांकडूनही हवं. एकतर्फी प्रेम म्हणजे स्वतःहून स्वतःला घाव देण्यासारखं आहे.”


"दिशा, आपण आज लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर न जाता दुसरीकडेच गेलो तर चालेल का ?" 


तरुणच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.


"नाही तरुण. मी माझ्या मित्रांना भेटायला आले आहे. तू मला किनाऱ्यापासून थोडं अंतर दूरवरच सोड आणि परत इथेच लॉजवर ये. आपण उद्या जाऊया परत तुला हवं तिथे." 


दिशा त्याला समजावण्याचा सुरात म्हणाली. 


"तसं नाही दिशा. खरं तर मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. " 


"काय दाखवणार मला? रत्नागिरीतलं असं काय आहे जे मला माहीत नाही?" 


दिशाने हसत विचारलं. 


तरुण मुळचा मुंबईचाच होता. त्यामुळे रत्नागिरीतील त्याला काही माहित असेल याची शाश्वती नव्हती. 


"तू बघायला तयार आहेस का सांग? आपण समुद्रकिनाऱ्यावर जायच्या आधी थोडा वेळ जाऊन येऊया." 

तरुण विनवणी करत होता. अखेर दिशाने होकार दिला. त्याला तरी का दुखवावं असा विचार करत तिने होकार दिला होता. पंधरा मिनिटांत दोघेही तयार झाले आणि निघाले. दिशाने संजनाला मेसेज केला की ते अर्ध्या तासात पोहचतील. नेहमीप्रमाणे तिने लोकेशन पण संजनाला पाठवून दिलं. तरुण तिला कुठे घेऊन जात आहे हे तिला कळत नव्हतं. हा परिसर तर ओळखीचा होता. पण इकडे तो का नेत असावा याची तिला कल्पना नव्हती. तो एका सुंदर बागेसमोर थांबला. ते दोघेही मोटारसायकल वरून खाली उतरले. 


"वा ! हे तर खूप सुंदर आहे रे. पण इथे का आलोय आपण?" 


दिशाच्या चेहऱ्यावर मंद स्मित पाहून तरुण खुश झाला होता. 


"ये ना आत. सांगतो." 


            तरुण दिशाच्या हातात धरून तिला घेऊन बागेत आला. ती विविधरंगी फुलांची बाग होती. त्या बागेत वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे होती. बागेच्या मध्यभागी विविध रंगाच्या गुलाबांनी काहीतरी तयार करण्यात आलं होतं. तरुण दिशाला तिथेच घेऊन आला होता. विविधरंगी गुलाबांनी तिथे अतिशय सुंदररित्या 'आय लव्ह यू' असा मेसेज तयार करण्यात आला होता. दिशाचं लक्ष त्यावर पडलं तसं तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. स्मित जाऊन आता तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. तिने मागे वळून तरुणकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाहून हसत होता. 


__________ 


            दुसरीकडे लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर विकी, संजना आणि अमय आधीच पोहोचले होते. ते दिशा येण्याची वाट पाहत होते. संजनाने दिशाचं लोकेशन पाहिलं. 


"अरे विकी, दिशू तर गण्याच्या बागेत गेली आहे. तिकडून इथे कधी येणार ती?" 


"गण्याच्या बागेत? दिशा तिकडे कशाला जाईल? तुला नीट दिसत नसेल गं लोकेशन." 


"मी तुम्हांला पण पाठवलंय. जरा बघून सांगता का?" 


"अरे हो विक्या. ही गण्याच्या बागेत गेली आहे." 


"पण कशाला जाईल रे ती?" 


"तरुण! तरुण येणार होता तिला सोडायला. त्याच्यासोबत गेली असेल का?" 


संजनाच्या वाक्यासरशी सर्वांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. ते आपल्या गाडीच्या दिशेने धावत गेले आणि त्यांनी गाडी लोकेशनवर आणली. 


___________              दिशा हसणाऱ्या तरुणकडे काहीशी अनोळखी नजरेने पाहत होती. तिच्या नजरेतला हा बदल एव्हाना तरुणच्याही लक्षात आला होता. आपल्यासमोर उभा आहे हा तरुण आणि नेहमी आपल्यासोबत असतो तो तरुण यात फरक आहे हे दिशाला उमजलं होतं. 


"दिशा, काय झालं? तुला आवडलं नाही का हे सगळं?" 


तरुण आता चिंतित दिसत होता. 


"मला हे नाही आवडलं तरुण. मला माहित नव्हतं तू असा काही विचार करतो आहेस. " 


"दिशा, यार त्यात चुकीचं काय आहे? एखाद्याबद्दल आपल्याला प्रेम भावना निर्माण होणं हे पाप तर नाही ना?" 


"तरुण, या सगळ्याला माझा नकार आहे." 


दिशा अतिशय थंडपणे उत्तरली. 


"असं का दिशा? एवढे दिवस आपण एकत्र आहोत. एकत्र फिरतो आहोत, एकत्र अभ्यास करतो आहोत. ते काय होतं मग? प्रत्येक वेळेला आपण एकमेकांची काळजी घेणं हे काय होतं? प्रेम नव्हतं का ते?”


"तू निःस्वार्थ मैत्री आणि प्रेम यातला भेद विसरतो आहेस तरुण. तू कधी पाहिलंस मला तुझ्याकडे कोणत्या गोष्टीचा हट्ट धरताना, उगीच तुझ्या पुढेमागे करताना किंवा निदान तुझ्याकडे एकटक बघताना? नाही ना? कारण मी मैत्रीच्या सीमा जाणून आहे. मैत्री तितकीच सीमित राहिलेली बरी." 


"जे काही असेल दिशा. पण नकाराचं कारण काय? मी चांगला तर वागतो ना तुझ्याशी? माझ्यात कुठला अवगुण सापडला का तुला? मग नाही का म्हणायचंय तुला? अगदीच नाही म्हणण्यापेक्षा विचार करते किंवा नंतर कळवते असं उत्तर का देत नाहीस तू? तुला तोडायचं का आहे सगळं?" 


"कारण नंतर विचार करूनसुद्धा मी हेच उत्तर देणार आहे. मी याआधी तुला कधी सांगितलं नाही कारण विषय निघाला नाही. मी वचनबद्ध आहे प्रेमाच्या बाबतीत. माझं एका मुलावर फार प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर. आमच्या नात्याला काही दिवसांपूर्वीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तुला माहीत आहे की मी जे आता आहे तेच नातं मी कायम टिकवून ठेवणार. त्यामुळे माझ्या आयुष्यात तुला माझा प्रियकर म्हणून स्थान मिळणं निव्वळ अशक्य आहे. तू कायम माझा मित्र होतास आणि मित्रच राहणार." 


दिशाच्या बोलण्यात ठामपणा होता. पण ते ऐकून तरुण मात्र चांगलाच निराश झाला होता. त्याला दिशाकडून नकार अपेक्षितच नव्हता. 


"दिशा, कोण आहे तो मुलगा? म्हणजे काय नाव आहे त्याचं?" 


त्याने स्वतःला सावरत विचारलं. 


"अमय." 


तरुणला वाईट वाटलं होतं. पण दुसऱ्या बाजूला त्या तिघांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. पाचच मिनिटांपूर्वी ते बागेत पोहोचले होते. 


"दिशा.." 


अमयने तिला हाक मारली तशी ती चमकून मागे वळली. अमय येणार आहे हे तिला माहित नव्हतं. तिने शांतपणे एक नजर त्या तिघांवर टाकली आणि ती बागेत चालत पुढे निघून गेली. 


"संजू, विकी मी आलोच. तोपर्यंत त्याला बघा." 


अमयसुद्धा दिशाच्या मागोमाग धावत गेला. जमिनीवर हताश होऊन बसलेल्या तरुणला जाणवलं की हाच अमय असावा. इतक्यात त्याच्यासमोर ते दोघे येऊन उभे राहिले. 


"तुम्ही कोण आहात?" 


"आम्ही दिशाचे खूप खास मित्र आहोत. ज्यांना भेटायला ती इकडे आलेली ना ते!" 


"हं." तरुणने नुसता हुंकार भरला. 


"काय झालं? नकार दिला म्हणून निराश आहेस?" 


एखाद्याला बोलतं कसं करायचं हे संजनाला चांगलंच ठाऊक होतं. तरुणने मागे चमकून तिच्याकडे पाहिलं. निराश झालेल्या माणसाला कोणी थेट असं जाऊन विचारत का? पण संजू ती संजूच! 


"अच्छा अच्छा कळलं मला. पण असूदे. तुला माहित आहे तरुण, दिशाने मला जेव्हा तुझ्याबद्दल सांगितलं ना तेव्हाच मला संशय आलेला की तुला ती आवडतेय. पण एक गोष्ट लक्षात घे, तिच्या मनात एका सेकंदासाठीही तुझ्याबद्दल तसा विचार आलेला नसणार." 


"माहित आहे. पण मला नकार अपेक्षित नव्हता. वाईट वाटणं साहजिक नाही का? तिने अमयच्या आधी मला का निवडू नये?" 


"साहजिक आहे मित्रा. पण कुठेतरी तुला मदत व्हावी म्हणून सांगतेय. मला सांग, जर मी एक मुलगी आहे जी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण तू आणि आणखी कोणीतरी आधीच नात्यात बांधलेले आहात. अशा वेळेला तू जिच्यावर प्रेम करतोस तिला सोडून मला होकार देशील का?" 


तरुणला लक्षात येत होतं की संजनाला काय म्हणायचं आहे. दिशा आणि अमयच्या नात्याला पाठींबा देणारे असे सच्चे मित्र लाभलेत याचा त्याला हेवा वाटत होता. तो उठून उभा राहिला. 


"फक्त वाईट वाटलं होतं. पण दिशाचा निर्णय मान्य करण्याइतपत सुज्ञ मी आहे." 


"अरे वा! बघ विक्या पोरगं हुशार आहे. एकदा सांगितल्यावर लगेच कळतंय त्याला. नाहीतर तू म्हणजे.." 


"ए, माझा काय विषय मध्येच? तुला सारखं माझ्यावर यायलाच पाहिजे काय?" 


"येणार. काय करणार तू?" 


"गप गं माकडे. तुला दाखवतो थांब." 


क्षणभरापूर्वी जिवलग असणारे ते क्षणांत एकमेकांच्या झिंज्या उपटत असलेले पाहून तरुण अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत होता. 

__________ 

      

            तिकडे दिशा फुलांच्या ताटव्यांत पुढे जाऊन उभी होती. अमयही तिच्यामागोमाग धावत तिथे आला होता. त्याचा आवाज येताच ती मागे वळली. दोघेही एकमेकांकडे शांतपणे पाहत होते. 


"सर बाजूला." 


"दिशा, दहा मिनिटं. फक्त दहा मिनिटं दे मला. अग काय चाललंय आपल्यात? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू ही अजूनही माझ्यावर प्रेम करतेस याची कबुली आताच दिली आहेस. त्या प्रेमाखातर जरा तरी ऐकून घे.” 


अमय मनापासून बोलत होता. 


"मी खूप वाट पाहिली तुझी. प्रत्येक क्षणी तुझ्या येण्याची. पण तू ना मृगजळ झाला होतास माझ्यासाठी. आहेस असं वाटत होतं पण नव्हतासच. आपल्यातील अंतर काय वाढलं आणि सगळ्या भावनाच संपून गेल्या. हो ना?" 


"नाही दिशा. मला माहित आहे तुझा राग कशावरून आहे. इथे बस मी सांगतो." 


अमयने तिचा हात धरून तिला खाली बसवलं. 


"मला तू आता माझ्या आयुष्यात नको आहेस अमय." 


दिशाचा आवाज फार गंभीर झाला होता. 


"अगं असं काय करतेस दिशा. ऐकून तर घे ना. पहिले काही महिने आपण सर्वच दर दिवशी अकरा वाजेपर्यंत बोलत होतो. त्यानंतर भेटायचं ठरलं होतं. उटीला जाणार होतो तेव्हा. दिशू, आपल्या प्रेमाशप्पथ सांगतो मी जायला निघालो होतो. उद्या निघायचं म्हणून मी रात्रभर जागून माझ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्या होत्या. पण अपलोड करताना चुकून पूर्वाची असाइनमेंट माझ्याकडून डिलीट झाली. ती पूर्वा जी माझ्यासोबत आलेली. तिचं नुकसान करून तर येऊ शकणार नव्हतो ना मी! पटलं असतं का ते तुला तरी? " 


"तू दुसऱ्या दिवशीही आला नाहीस अमय. आपल्या प्रेमाचा महत्वाचा दिवस होता. मी पहाट होईपर्यंत वेड्यासारखी वाट पाहत थांबले होते आणि माझ्यासोबत बिचारे विकी आणि संजू पण रात्रभर जागले होते." 


"दिशू, तिची असाइनमेंट पुन्हा करून द्यायला, तेवढी माहिती परत गोळा करायला मला तीन दिवस लागले. कसा येणार होतो गं दुसऱ्या दिवशी? वाढत असलेल्या अभ्यासामुळे मी हळूहळू मेसेज, कॉल पण कमी केले. मी तुला त्याबाबतीत गृहीत धरलं ही माझी चूक मी मान्य करतो. पण मला लक्षात आल्यावर मी तुम्हां सगळ्यांना मेसेज, कॉल करत होतो. पण ना तू आणि ना त्या दोघांनी मला उत्तर दिलं. माझ्या आयुष्यात तू फार महत्वाची आहेस दिशा. मला माहित आहे की सगळे गैरसमज मी उटीला न आल्यामुळे झाले होते. पण तू करशील ना गं माफ?" 


"मला माहित नाही अमय. विश्वास संपत चालला आहे जणू आपल्यातला. काहीतरी अधुरं, रिकामं असं जाणवतंय मला ह्या नात्यात. " 


"दिशू, आपल्यातील अंतर वाढलं होतं. त्यात नंतर संपर्कही कमी झाला. त्यामुळे दुरावा निर्माण झाला आहे. आज तरुणने तुला विचारलं तेव्हा तू त्याला नकार दिलास. हेच माझ्यासोबतही झालं. मलाही पूर्वाने विचारलं होतं आणि मीही तुझं नाव घेऊन तिला नकारच दिला. आपल्यातलं प्रेम संपलं असतं ना तर आपण होकार दिले असते. पण आपण तसं नाही केलं. कारण अजूनही आपण प्रेम करतो एकमेकांवर." 


         बोलताना अमयच्या डोळ्यांत अश्रू होते. तर नुसतं ऐकत असूनही दिशाचे डोळे भरून आले होते. खरंच इतके दिवस ते गैरसमजात जगत होते का? एकदा सर्व विसरून स्वतःहून संभाषण सुरु करून त्यांना ते व्यवस्थित करता आलं असतं की.. त्यांनी एकमेकांचे चेहरे आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले. तिला त्याच्या चेहऱ्यावर त्याचा खरेपणा दिसत होता आणि त्याला तिच्या चेहऱ्यावर तिने सहन केलं दुःख दिसत होतं. एकमेकांशिवाय ते किती अधुरे आहेत, याची जाणीव होत होती. 


"मला वचन हवं आहे दिशा. यापुढे काहीही झालं तरी आपण बोलून मिटवू. एवढं ताणून उपयोग नाही की आपला एकमेकांवरचा विश्वास तुटून जाईल." 


"मी कधीचीच वचनबद्ध आहे अमय. मी आतापर्यंत फक्त एकाच बाजूने विचार करत होते. मी तुझ्यावर प्रेम करतेय पण तुला कदर नाही असे विचार सुरु होते माझ्या डोक्यात. कदाचित गैरसमजांनी व्यापलं होतं मन. मला माफ कर." 


"मलाही माफ कर माझे राणी.. आपण यापुढे हा दुरावा निर्माण होऊच नाही द्यायचा." 


दिशा हुंकार भरत त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही मिठी घट्ट केली. 


"आपले खूप स्पेशल दिवस मी व्यर्थ घालवले. पण निदान आजच्या दिवशी आलोच. आजचा दिवसही स्पेशलच आहे आपल्यासाठी. खूप आठवणी आहेत आजच्याही. हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे दिशू!" 


"हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे अमय !" 


"ओहो, अब जाके मेरे दिल को सुकून आया है !" 


अचानक संजनाचा आवाज ऐकू येताच ते दोघे उठून उभे राहिले. 


"थँक यू यार. खूप मदत केलीत तुम्ही दोघांनी." 


दिशा त्यांच्याकडे पाणावलेल्या नजरेने पाहत होती. 


"अगं वेडी आहे का तू? हमारा तो फर्ज बनता है जानेमन." 


संजना हसत म्हणाली. 


"हो ना. तुम्ही भांडलात वगैरे हे ऐकायला चांगलं नाही वाटत गं. आम्हांला अजूनही तेच आठवतं ना हसरं, गोड कपल !" 


"तरी थँक यु सो मच यार." 


"एक गप तू. तुझं काय? आम्ही आमच्या दिशूसाठी केलंय. तुझ्यासाठी नाही." 


संजना फणकारून म्हणाली. 


"अरे.." 


तसं अमयला हे काही नवीन नव्हतं. 


"पण मी अम्यासाठी केलंय ना?" 


विकीही मुद्दाम मधेच म्हणाला. 


"तुझ्या तर.. तुला मधे बोलायला कोणी सांगितलेलं.” 


संजना धावत त्याच्या मागे पळू लागली. पुढचा जवळपास अर्धा तास बागेत गोंधळ सुरु होता. शेवटी थकून ते दोघे थांबले. 


"झालं?" 


दिशाने शांतपणे विचारलं. 


"हो. बरं ऐका ना, ही बाग किती भारी आहे यार! गण्याची पण कमाल आहे. छान ठेवलीय बाग एकदम. आपण इथे चौघांनी एक फोटो काढूया का?" 


"पण कॅमेरा?" 


"काळजी करू नका मित्रांनो. मी आठवणीने घेऊन आलोय." 


"तेवढाच उपयोग आहे तुझा. फुकटचा कॅमेरामन." 


संजना एकही संधी सोडत नव्हती. विकीने तिला खुन्नस देत गाडीतून कॅमेरा आणला आणि स्टॅण्ड ठेवून सेट केला. एक म्हणता म्हणता त्यांनी बरेच फोटो काढले. फोटोच्या अँगलवरून संजना आणि विकीमध्ये परत खडाजंगी सुरु झाली होती. अमय आणि दिशा मात्र आपल्याच विश्वात होते. त्यांना पटलं होतं, की प्रेम व्हायला खूप वेळ लागतो. पण प्रेमाचं बंधन तुटायला फक्त एक क्षण पुरेसा होता. त्यांची प्रीत दुरावायला गैरसमजचं कारणीभूत होता. त्या गैरसमजाला दूर सारूनच त्यांची दुरावलेली प्रीत आता कात टाकून नव्याने बहरणार होती. 


दुराव्यास या सारुन मागे 

प्रीत होईल पुन्हा नवी.. 

जन्मोजन्मी नशिबामध्ये

तुझीच मजला साथ हवी..

_____________

समाप्त.


© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा - रायगड - रत्नागिरीईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//