Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..भाग ९

Read Later
दुरावलेली प्रीत..भाग ९

कथा - दुरावलेली प्रीत..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


               दुसऱ्याच दिवशी दिशा रागाने मुंबईला निघून गेली. तिने घरी काय कारण सांगितलं याची कोणालाच कल्पना नव्हती. पण संजनाला याचं फार वाईट वाटलं होतं. संजना आपल्याच विचारात मग्न होती. इतक्यात तिला दरवाजा ठोठावल्याचं ऐकू आलं. तिने वैतागूनच दरवाजा उघडला. बाहेर अमय उभा होता. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. पण त्याच्या मागे विकीही उभा होता. 


"काय हवंय?" 

संजना फारच तोडून बोलत होती. अर्थात हे असंच होईल याची कल्पना अमयला होती. 


"संजू, आत जाऊन बोलूया का?" 


"तुझी हिंमतच कशी झाली याला इथे घेऊन यायची? कोण आहे हा? मी ओळखत नाही याला. आताच्या आता निघा." 


"संजू, मला थोडं बोलायचं आहे. दिशूबद्दल बोलायचं आहे. आईशप्पथ काही खोटं बोलणार नाही. मी विक्याला आधीच सांगितलं आहे. तुलाही सांगायचं आहे. मग दिशाला भेटूया." 

अमय शांत स्वरात म्हणाला. दिशाबद्दल बोलायचं आहे म्हटल्यावर संजना थोडी शांत झाली. 


"या." 


तिने त्या दोघांनाही खोलीत घेतलं आणि तीही त्यांच्यासमोर येऊन बसली. 


"हं, बोल." 


"संजू, दिशू आणि माझ्यात खूप मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. तिला वाटतंय मी तिला वेळ देऊ शकलो नाही. साहजिकच आहे की तिला फार वाईट वाटलंय. पण म्हणून काय नातं तोडणार का? तुला माहित आहे की ती फार हट्टी आहे. ती लगेच सगळे संबंध तोडून मोकळी होईल. म्हणून मला तुम्हां दोघांची मदत हवी आहे." 


"नातं? कसलं नातं? हेच नातं तुला पूर्वाला सोबत घेऊन येताना आठवलं नाही?" 

संजनाने थोडं चिडूनच विचारलं. 


"मी प्रत्येक गोष्ट समजावून सांगायला तयार आहे संजू. हे सगळं एका गैरसमजातून होत गेलंय. हळूहळू नात्यातले गैरसमज वाढत जाऊन आम्ही दुरावत गेलो एकमेकांपासून." 


अमयच्या शब्दांतून उमटणाऱ्या भावना संजनाला जाणवत होत्या. त्याच्या आवाजातील वेदना तिला जाणवली आणि कितीही झालं तरी शेवटी तोही त्यांचा मित्रच होता ना. 


"मी मदत करायला तयार आहे. मात्र यावेळेला दिशाच्या डोळ्यांत अश्रू नाही दिसले पाहिजेत. ती जर मला रडताना दिसली तर मी बघ तुझं काय करेन." 


"बघ, मी म्हटलं होतं ना तुला, काहीतरी धमकी दिल्याशिवाय ती मदत करायला तयार होणारच नाही." 


विकी त्याही स्थितीत मस्करीने हसत म्हणाला. 


"तू काही लगेच त्याची बाजू घ्यायची गरज नाही आहे. आम्हांला खूप त्रास झाला आहे अम्या. त्यापेक्षा जास्त दिशाला. आम्ही विसरणार नाही तू किती सतावलंय." 

संजना थोडी गंभीरपणे आणि रागातच म्हणाली. 


"संजू, त्याने मला बऱ्यापैकी सगळं सांगितलंय. तुला खरं सांगू, मला ना दिशा चुकीची वाटतेय ना अम्या. परिस्थिती चुकीची होती म्हण किंवा निर्माण झालेल्या अंतरामुळे गैरसमज वाढलेले आहेत म्हण. आपण त्यांचे मित्र आहोत. त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. आतापर्यंत दिशाची मदत केली. आता एकदा अमयला मदत करूया. बाकी सगळं त्यांचं त्यांनाच पहायचं आहे." 

विकी संजनाला समजावत होता. त्यावर संजनाने हुंकार देत होकारार्थी मान डोलावली. 


"मी काय करू शकते?" 


"दिशूसोबत बोलून तिला सांगून बघू शकतेस का?" 


"ती ऐकून घेणार नाही. तिला तुझी इतकी चीड आलेली आहे अम्या, की 'अमय' हे नाव घेतलं तरी तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात. तरीही ती इथे आलेली. पण तू ऐनवेळी गुंता करून ठेवलास सगळा." 


अमयला फार वाईट वाटत होतं. कदाचित आपण पूर्वाला भेटलोच नसतो तर बरं झालं असतं असा विचार मनात आला. तो बाजूला सारून तो दोघांकडे पाहत म्हणाला,


"मग मी आता काय करू शकतो?" 


"थोडा वेळ जाऊ दे अम्या. दिशा पटकन नाही विसरणार तू काय केलंय ते. पण शक्यतो अगदीच नातं तोडण्यावर नाही येणार ती. थोडं धीरानं होऊ दे सगळं. दोन महिन्यांनंतर परत ठरवून भेटूया.” 

विकी अमयला समजावून सांगत होता. 


"त्या वेळेला तू येशील आणि एकटाच येशील याची खात्री मात्र देऊन जा." 

संजना खोचक स्वरात म्हणाली. 


             तसं विकीने तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकला. अमयला मात्र कळून चुकलं होतं की दिशाला समाजावून सांगणं सोपं असणार होतं पण त्यासाठी तिने परत भेटायला तयार झालं पाहिजे. 


दुसऱ्या दिवशी जड मनानेच अमय रांचीला परत गेला. 


______________________________________________ 


             पाहता पाहता बराच काळ लोटला होता. सगळेजण आपापल्या जीवनात व्यस्त झाले होते. मात्र अमय न चुकता सर्वांना मेसेज करत होता. थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे काय परिणाम झालेत ते त्याने एकदा पाहिले होते. पण तिकडे दिशा मात्र अभ्यासात गढून गेली होती. एके दिवशी ती आपल्या वर्गात बसून काहीतरी लिहित होती. इतक्यात तरुण येऊन तिच्या बाजूला बसला. जेवणाची सुटी असल्याने सर्वजण बाहेर गेले होते. पूर्ण वर्ग रिकामा होता. 


"दिशा, अगं जेवायला नाही येणार?" 


"नाही रे. हे बघ, थोडं पूर्ण करायचं राहिलंय. तू जा. मी नंतर येईन." 


"थांबतो ना मग मी. एकत्रच जाऊ." 


"कशाला? मघाशी तर खूप भूक लागलेली तुला. आता का नाही जायचंय मग?" 


"तू एकटी राहशील ना, म्हणून म्हणतोय एकत्रच जाऊ." 


            तरुण तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. तिनेही त्याच्याकडे चमकून पाहिलं. ह्याच्या वाक्याचा काही वेगळा अर्थ तर नाही ना असं तिच्या मनात येऊन गेलं. पण तरुण स्वभावाने चांगला आहे. त्याने वेळोवेळी आपली मदत पण केली आहे, हे सर्व लक्षात घेऊन तिने तो विचार झटकून टाकला. तिने वही बंद केली. 


"चल, आताच जाऊ. नाहीतर तुला उपाशी मारल्याचं पाप लागेल मला." दिशा हसून उठत म्हणाली.

तसा तरूणही हसत तिच्यासोबत चालू लागला. मात्र दिशाला आपली काळजी वाटते म्हणून ती आपल्यासोबत लगेच यायला तयार झाली अशी चुकीची नोंद तरुणच्या मनाने घेतली होती. दिवसेंदिवस तरुण तिच्याशी जास्तच जोडला जात होता. मात्र ती या सर्वापासून अनभिज्ञ होती. जेवून ते दोघे वर्गात परत आले. दिशा सहसा कधी मोबाईल पाहायची नाही. पण आज नेमकी ती मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. तो अमयचा मेसेज होता. त्याला तिला भेटायचं होतं. तो विनंतीवजा मेसेज पाहून काही क्षण तिला वाटलं की आपण उत्तर द्यावं. पण मन आणि बुद्धीच्या संघर्षात तिचा निर्णय होत नव्हता. 


"दिशा, अगं काय झालं? कुठे हरवलीस?" 


             तरुणची हाक कानावर पडताच दिशाने तो मेसेज फक्त पाहून मोबाईल बंद केला. तिकडे अमय मात्र अस्वस्थ झाला होता. दिशाने मेसेज पाहिला तर होता, पण उत्तर दिलं नव्हतं. त्याने विकीला लगेच कॉल केला. विकी नेमका संजनाकडेच आला होता. 


"मला वाटलेलंच ती उत्तर नाही देणार.” - विकी.


"संजू कुठे आहे रे?” - अमय.


"ती झोपली आहे. काही वेळापूर्वीच जेवलो ना, त्यामुळे ती सुस्तावलेली आहे सध्या." 


"अरे उठव यार तिला." 


"जागी आहे रे मी. फक्त झोपेत जागी आहे." 

मागून संजनाचा पेंगुळलेला आवाज ऐकू आला. 


"संजू, तू मेसेज केलास का दिशाला या आठवड्यात भेटण्यासाठी?" 


"हो. खूप आढेवेढे घेतले तिने. पण शेवटी तयार झाली. पूर्ण आठवडाभर सुट्टी मिळणार नाही म्हणाली. तेरा आणि चौदा तारखेला राहून परत जाईल." 


"म्हणजे तेराला तरी ती नक्की येतेय ना?" 


"हो रे. आपण चौदा तारखेसाठी ठरवतोय ना सगळं? मग ती येणार आहे तेराला." 


"बरं अम्या, संजूने तिला सांगितलं नाही आहे की तू पण येणार आहेस. नाहीतर ती तयारच झाली नसती. तेव्हा राजा वेळेवर पोहोच." 


"हो रे. मी यावेळेला काही घोळ नाही करणार." अमय त्यांना आश्वस्त करत म्हणाला. 


"अरे हो, अम्या यावेळेला तिचा एक मित्र पण तिच्यासोबत येणार आहे. फार काही सामान नाही, मग खासगी गाडी कशाला घेऊन या? म्हणून तोच येणार आहे सोबत." 


"तो कशाला येतोय पण?" 


"तुझ्यासोबत पूर्वा कशाला आलेली?" 


विकीने आठवण करून देत म्हटलं. 


"नाही. पूर्वाच्या पुढचं प्रकरण आहे. जेवढं दिशू मला सांगते त्याच्याबद्दल, त्यावरून त्या मुलाला ती आवडतेय. पण दिशूने असं काही नाही सांगितलं की तिला तो आवडतोय वगैरे. बघू आता, येणारच आहेत ना दोघे." 


"संजू, गप गं. त्याला उगाच काळजी वाटत राहील. अम्या, तू काळजी नको करुस. तो मुलगा नाही आवडणार दिशाला. " 


"हं. तिच्यासोबत जास्तीत जास्त बोलत रहा संजू. तिचं येणं रद्द नाही झालं पाहिजे काहीही करून." 


"वो तुम मुझपे छोड दो !" 


संजना त्याला आश्वस्त करत म्हणाली. दिशासोबत येणारा मुलगा कोण असेल? या विचाराने त्याच्या कपाळाला आठी पडली. याच आठवड्यात ते परत भेटणार होते. त्यांच्या नात्याचं भविष्य त्याच दोन दिवसांत रेखलं जाणार होतं.


__________________________________

क्रमशः. 


©तनुजा प्रभुदेसाई.

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//