Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..भाग ८

Read Later
दुरावलेली प्रीत..भाग ८

कथा :- दुरावलेली प्रीत..

विषय:-  प्रेमकथा

फेरी:- राज्यस्तरीय करंडक कथामालिका


               दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चारच्या सुमाराला विकी मित्राची गाडी घेऊन आला होता. नेहमी ते एकत्र जायचे. मात्र आज अमयने मागाहून मोटारसायकलने येणार असल्याचं सांगितलं होतं. विकीनेही होकार कळवला होता. उगाच इथपासूनच भांडणं नकोत. तिथे जाऊन मागच्यासारखी मजामस्ती करता येणार आहे की असंच तणावग्रस्त वातावरण राहणार आहे, याची काळजी विकी आणि संजना दोघांनाही होती. दिशा अगदीच मागच्या सीटवर बसून काचेतून बाहेर बघण्यात व्यस्त होती. बराच वेळ ते समुद्रकिनाऱ्यावर अमयची वाट पाहत होते. साडेपाच वाजत आले होते. दूरवर मोटारसायकलचा आवाज आला तसं तिघांनीही त्या दिशेने पाहिलं. अमय तर होता, पण त्याच्यासोबत कोणीतरी अजून होतं. त्यांच्याजवळ येत त्याने मोटारसायकल थांबवली. तशी झगमगीत कपड्यांमध्ये असलेली ती सुंदर मुलगी खाली उतरली. अमय पण चावी खिशात ठेवत त्यांच्याजवळ आला. त्याची नजर फक्त दिशावर खिळली होती. त्याची दिशा! पण ती मात्र त्याच्याकडे रागाने पाहत होती. 


"अम्या, ही कोण रे?" 


"अरे ती पूर्वा. माझ्यासोबतच शिकते. ती रत्नागिरीतच तिच्या मैत्रिणीकडे आली होती. तर आज मलाही भेटायला आली. तिने लाडघरचा समुद्रकिनारा पाहिला नव्हता ना, म्हणून तिने यायचा हट्ट धरला." 


"आणि तिने हट्ट धरल्यावर तू लगेच तिला घेऊन आलास?" संजनाचा आवाज चढला होता. 


"संजू, असूदे. तिला पण छान वाटेल." विकी संजनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. 

            कारण त्यांचा मुख्य उद्देश अमय आणि दिशाची भेट घडवून देण्याचा होता. पूर्वा आलेली त्यालाही आवडली नव्हती; पण संजनासारखं तो फटकळपणे बोलूही शकत नव्हता. 


"तू गप रे. तुला बोलायला सांगितलं मी? काय रे अमय, तुला माहित होतं ना ही फक्त आपल्या चौघांची, नेहमी करतो तशी पिकनिक आहे. ज्यात आपण चौघे सोडून कुणीच नसतं.. कधीच! मान्य आहे तिला समुद्रकिनारा पहायचा होता. पण दहा दिवस आहेस ना आता? तेव्हा घेऊन जायचं. आज फक्त आमचं भेटायचं ठरलंय असं सांगता येत नव्हतं?" 


संजना फारच भडकलेली दिसत होती. 


"संजू, गप्प रहा. असं बोलू नये. पूर्वा, तू बघ. असा नजारा बघणं पुन्हा पुन्हा शक्य होईल न होईल. संजू, आपण निघूया?" 


दिशाने तितकंच थंडपणे उत्तर दिलं. 


"अरे यार, माझ्यामुळे तुम्ही जाऊ नका. मला माहित नव्हतं असं काही असेल. तो नकोच म्हणत होता मीच अडून बसले होते. आता मी एवढा हट्ट केल्यावर तो नाही कसं म्हणेल ना मला?" पूर्वा ओशाळून म्हणाली.


            तिच्या शेवटच्या वाक्याबरोबर मात्र दिशाच्या मस्तकात तिडीक गेली. आपल्या जवळची व्यक्ती आणि तिचं प्रेम आपल्या कधीच भागीदारीत नको असतं. ते पूर्ण आपलंच असावं अशी आपली इच्छा असते. दिशाही त्याला अपवाद नव्हती.


"तुला नाही कसं म्हणेल म्हणजे? अमय, तुला नाही म्हणता येत नाही का कोणाला? एवढी कोण लागून गेली आहे ही?"


            दिशाने पहिल्यांदा त्याला अमय म्हणून हाक मारली होती. पण त्या हाकेत प्रेम नाही राग होता. 


"नीट बोल. त्याच्याशी असं का बोलत आहेस तू? माहित आहे तू मैत्रीण आहेस त्याची वगैरे. पण सांगितलं ना चूक माझी होती. कसली कुसकी वाटतेयस तू!” पूर्वाही रागाने म्हणाली.

अर्थातच तिला कल्पना नव्हती की यातली एक दिशा असणार आहे. 


"अम्या, निघ. हिला घेऊन निघ. नाहीतर मी कानाखाली वाजवेन हिच्या. आमचा आनंद कुस्करून वर पुन्हा आमच्यावरच आवाज नाही चढवायचा." संजनाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. 


"संजू, ऐक ना. तिला माहित नाही गं तुम्ही. मी चुकून घेऊन आलो तिला. पण आता ती आली आहे तर आपण नको ना असं वागूया तिच्याशी. तुम्ही बोलाल ती शिक्षा मान्य असेल मला, पण भांडूयात नको. सहलीला आलो आहोत ना, थोडी मजामस्ती करूया.” 


          अमयला पूर्वाचा थोडा रागच आला होता. पण तो सांभाळून बोलत होता. 


"कसली सहल? आम्ही एवढं ठरवून इथे आलोय याची कल्पना असती ना तर तू एकटाच आला असतास अम्या. ती आल्यापासून मी काही नाही बोललो तिला. पण आली तर आली आणि आमच्यावरच आवाज चढवतेय. का तर तुला बोललो म्हणून? अधिकार नाही आता आम्हांला तुला बोलायचा?" 


"तसं नाही आहे विकी." 


"आमचं सोड. आमची किंमत किती आहे ती दिसली! पण दिशाचाही अधिकार नाही का आता तुला बोलायचा? ही कोण आहे ती इथे येऊन दिशाला शिकवणार कसं बोलायचं ते?" 


        संजनाचाही पारा आता चांगलाच चढला होता. पण दिशा मात्र शांत झाली होती. 


"विकी, भांडणं नकोत. निघूया?" 


"हं. तू चल पुढे दिशा. मी जरा तो कॅमेरा ठेवला आहे तिथे तो घेऊन येतो. संजू, हे खायचं सामान उचल आणि चल." 


दिशा बोलली तसे ते निघाले. अमयने रागीट नजरेने पूर्वाकडे पाहिलं. 


"तुला सांगत होती येऊ नकोस म्हणून? वर येऊन तू दिशाला कुसकी का म्हणालीस? पूर्वा, प्लिज यार. असं नको करुस. तू फारच हट्ट करून आली आहेस इथे. आता जायचं का परत? मला बोलायचं आहे दिशासोबत." 


        पूर्वाचे डोळे भरून आले. पण तिने फक्त होकारार्थी मान डोलावली. आपण जरा अतीच बोलून गेलो दिशाला हे तिला जाणवलं होतं. उगाच अमय मैत्रीही तोडून टाकेल अशी भीती आली तिच्या मनात. अमय काहीही न बोलता मोटारसायकलवर बसला. ते दोघेही घरी परतले. अमयने घरी आल्यावर इतर तिघांना कॉल करायला सुरुवात केली. मात्र कोणीही दाद देईना. काय करावं त्याला कळत नव्हतं. त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली होती. एकमेकांवरची हळवी प्रीत खरंच दुरावू लागली होती. 

___________________________

भूतकाळात.. 


 "अगं संजू का आलोय आपण इथे. असं कुठेही टेकडीवर फिरायला यायला वेळ आहे का? अभ्यास तर सोडूनच दिला आहे तुम्ही." 


दिशा वैतागलेली दिसत होती. 


"अरे यार दिशा, तू पाहिलंच कुठे आहेस अजून काही. आम्ही तुला काहीतरी दाखवायला आणलंय इथे." 


विकी गालात हसत म्हणाला. 


"हा हसतोय म्हणजे काहीतरी घोळ आहे." 


दिशाने आपली नजर संजनावर रोखत विचारलं. 


"नाही गं. तो माकड आहे. म्हणून हसतोय. विक्या गप हा.” 


संजनाने रागाने त्याच्याकडे पाहिलं. इतक्यात मागून शिट्टीचा आवाज आला. ते मागे वळले. अमय हातात एक मोठा बुके घेऊन उभा होता. दिशा त्याच्याकडे पाहतच राहिली. तो हळूहळू दिशाजवळ आला. 


"दिशू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सुरुवातीला अगदी अनोळखी म्हणून आपण भेटलो. तुझ्यामुळे मी पार बदलून गेलोय.. तुझ्या असण्याने माझ्या आयुष्यातला आततायीपणा निघून गेला आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी दिशा काय विचार करेल एवढाच विचार करू लागलो आहे मी. माझं पूर्ण आयुष्यच तुझ्या येण्याने बदलून गेलंय. म्हणून मला आज तुझ्यापाशी काहीतरी व्यक्त करायचं आहे." 


            अमय दिशाच्या नजरेला नजर मिळवून बोलत होता. दिशाही विस्फारल्या नजरेने लक्ष देऊन ऐकत होती. थरथरत्या हातांनी अमयने खिशातला कागद काढला आणि थोडी चुळबुळ झाल्यावर एक घाबरता निःश्वास सोडून तो वाचू लागला. 


तुझे शब्द, तुझे वाद 

शब्दांनाही तुझा नाद 


तुझे प्रेम, तुझे बंध 

तुझे गाणे मुक्तछंद 


तुझा स्पर्श पारिजात 

तुझे बिंब आरशात 


तुझा चंद्र, तुझे तारे 

तुझे वारे वाहणारे 


दुनिया ही माझी सारी 

तुझ्यामध्ये मावणारी 


कळेल का कधी तुला? 

प्रेम माझे प्रीत फुला 


           दिशा भारावून सगळं पाहत होती. तिलाही अमय मनापासून आवडत होता. थोडा अतरंगी असला तरी अभ्यासू होता. आयुष्यात एक परिपूर्ण जोडीदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाऊ शकेल असाच होता. अमयने बुके तिच्यासमोर धरला. दिशानेही तो हसत स्वीकारला. त्या दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. संजना आणि विकी आनंदाने टाळ्या वाजवत होते. त्यांच्यातीलच दोघांना एकमेकांसोबत खुश पाहून त्यांना खूप भारी वाटत होतं. 


___________________________ 

वर्तमानात..

अमय तेव्हा त्यांनी काढलेला फोटो पाहत होता. 


"दिशू, आपल्यामध्ये एक खूप मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. प्रेम आजही तेच आहे. पण मधे हा दुरावा आहे. मला अजूनही विश्वास आहे की तू मला समजून घेशील. आपण लवकरच पुन्हा एकमेकांच्या हातात हात गुंफून एकत्र असू."


            अमयच्या मनात विश्वास जागला होता. ती प्रीत खरी होती, जी कधीच त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं होऊ देणार नव्हती.

______________________________________

क्रमशः. 


© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा- रायगड - रत्नागिरी.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//