Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..भाग ७

Read Later
दुरावलेली प्रीत..भाग ७

कथा :- दुरावलेली प्रीत..

विषय :- प्रेमकथा

फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिकासुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

तुझेच मी गीत गात आहे

अजुन ही वाटते मला की

अजुन ही चांद रात आहे.. 


              लतादीदींच्या आवाजातील गाणे बाजूच्याच खोलीत वाजत होते. त्या गाण्याच्या बोलांनी दिशाला अजून उमाळे येत होते. असा कसा ना आपलाच माणूस परका होऊन जातो ? एकदाही विचार आला नसेल का अमयच्या मनात माझ्याबद्दल ? खोट्याच होत्या का त्या प्रेमाच्या आणाभाका ? सत्र परीक्षा संपल्या असल्यामुळे दिशा आज तशी निवांत होती. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षा पुढे गेल्या होत्या. हेच सत्र डिसेंबरच्या शेवटी सुरु झाल्यामुळे दुसऱ्या वर्षाच्या अंतिम परीक्षा कदाचित जुलैच्या आसपास जातील असा अंदाज होता. हेच कारण होतं की ती आठवणींमध्ये एवढा वेळ गुंतून पडली होती. नाहीतर नेहमीच्या व्यस्त आयुष्यात ती सहज अमय आणि त्याच्या आठवणींना सहज दूर सारत होती. इतक्यात तिच्या मोबाईलचा आवाज कानावर पडल्याने ती डोळे पुसतच उठली. संजनाचं नाव पाहून तर तिने पटकन घसा खाकरून आवाज व्यवस्थित असल्याची खात्री केली. आवाज रडवेला झालेला जाणवला असता तर संजनाने चांगलीच खरडपट्टी काढली असती तिची. तिने कॉल उचलत मोबाईल कानाला लावला आणि ती निवांत पलंगावर बसली. 


"नमस्कार दिशा बाई ! कशा आहात ?" 

संजनाचा आवाज फार मिश्कील वाटत होता. 


"आज चक्क बाई वगैरे ? काय गं संजू, ठीक आहेस ना नक्की ?" 


"दिशू, रडली आहेस तू ? कोण काय बोललं सांग तुला ? कुठे प्रवेश घेतला आहेस तू ? असं असतं का शिक्षण ? रडत कुढत ?" 


"ए बाई, मी नाही रडलेय गं. तुला लगेच सुतावरून स्वर्ग गाठायची गरज आहे का ?" 


"स्वर्ग ? अगं विक्या तर कायम म्हणतो मला की त्याचा छळ करून मी नरकात जाणार आहे. "


"संजू ! प्रत्येक शब्दाचा शब्दश: अर्थ नसतो गं घ्यायचा. जाऊ दे. तुला सुधारणं मला एवढ्या वर्षांत कधी जमलं जे आता जमणार आहे ! तू कशाला कॉल केलेलास ते सांग. " 


"आधी तू मला सांग तू का रडली आहेस ?" 


              संजना अडून बसली होती. दिशाला जाणवलं की किती जोडले गेले आहेत ते सर्वजण एकमेकांशी. फक्त आवाजातला थोडासा बदल आणि संजनाने ओळखलं होतं की ती रडते आहे. अमयसोबत पण आपण एवढेच जोडले गेलो होतो. मग त्याला का येत नसावी आठवण ? त्याला का जाणवत नसतील माझे अश्रू ? 


"दिशू, परत परत तेच विचार का करत असतेस गं ? येतोय अम्या. तो आला ना की त्याला चांगलंच सुनावणार आहे मी." 


"अं ? नाही. तुला कोणी सांगितलं मी त्याचा विचार करतेय म्हणून ? काहीही बोलू नकोस. " 

दिशाची सारवासारव संजनाला कळली होती. 


"असूदे गं. कळतं तेवढं मला. कारण मी हुशार आहे. बरं ऐक, मी काय सांगायला कॉल केलेला ती मी विसरूनच जाईन. तुला माहित आहे ना आज अमयचा वाढदिवस आहे ?" 


"हं !" 

दिशाचा कोरडा होकार ऐकून संजनाला फार वाईट वाटलं. 


"शुभेच्छा दिल्या नाहीस ना ? असूदे. त्याला तसंच पाहिजे. आपल्याला धोका देतो म्हणजे काय ? अम्या येतोय वीस तारखेला गोव्यात. सत्र नुकतीच संपली आहेत. त्यामुळे आता काही दिवस सुट्ट्या पण असतील. तू येतेयस ना रत्नागिरीला ?" 


              दिशाला आपल्या मनाची तार पुन्हा छेडली गेलेली जाणवली. अमय येतोय ? एवढ्या दिवसांनी, छे दिवसांनी काय महिन्यांनी ! इतक्या महिन्यांनी तो भेटणार होता प्रत्यक्षात. पण काय बोलणार आपण ? ते नातं, ते प्रेम, तो विश्वास राहिला आहे का ? मुळात त्याला मला भेटायची इच्छा असेल का ? 


"ए दिशू, तू काय झोपतेय का बोलता बोलता ? सांग ना, कधी येतेस रत्नागिरीत ?" 


"मी नाही यायचं म्हणतेय. थोडी पुढच्या सत्राची तयारी आधीच करायचा विचार आहे. या सत्राला थोडी गडबडच झाली गं प्रश्न सोडवताना. अजून थोडा सराव करायची गरज आहे. मी नंतर कधीतरी येईन." 

दिशा टाळाटाळ करते आहे हे संजनाच्या लक्षात आलं. 


"वा वा ! छान होती हा कथा ! तुला तर मराठी विषय पण नाही आहे ना गं तिथे ? कशा इतक्या उत्कृष्ट कथा रचतेस मग ?" संजनाचा सूर रागीट जाणवत होता. 


"संजू !" 


"खूप झालं. आधी शिस्तीत विचारत होते तर नाही सांगितलंस. तू वीस तारखेला मला रत्नागिरीत हजर पाहिजे दिशू. आपण लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत. तयारीत ये. चांगलं दहा दिवस राहायचं आहे. कळलंय ?" 


"येते." दिशाने जास्त वाद न घालता होकार दिला. 

             कारण एकतर संजना ऐकून घेणाऱ्यातली नव्हती आणि दुसरं तर तिचं मनही ओढ घेत होतं. कुठेतरी वाटत होतं की एकदा त्याच्याशी बोललं पाहिजे. मग ती नात्याची नवी सुरुवात ठरो किंवा अनोखा शेवट ! संजना मात्र खूप खुश झाली. 


"वा ! हे ठरलंय मग. मी विकीला कळवते की तू यायला तयार झाली आहेस. अमय यावेळेला काहीही करून येणार आहे. नाहीतर तो आपल्यापासून कायमचा दूर जाईल अशी धमकीच विकीने त्याला दिली आहे. " 

             संजना आपल्याच तंद्रीत सगळं सांगत होती. तिच्याशी थोडा वेळ बोलून दिशाने मोबाईल बाजूला ठेवला. तिलाही आता वेध लागले होते. इतक्या महिन्यांनी समुद्रावर घडू पाहणाऱ्या भेटीचे ! 


_______________________________________________ 


                पाहता पाहता एकोणीस जानेवारी उजाडला. उद्या काहीही करून आपण तिथे पोहोचायलाच लागेल हे माहित असल्याने दिशा भाड्याची गाडी करून रत्नागिरीला निघाली होती. निघण्यापूर्वीच तिचं तरुणसोबत बोलणं झालं होतं. ते सगळेजण मिळून महाबळेश्वर फिरायला जाणार होते. दिशानेही यावं अशी त्याची इच्छा होती. पण दिशा रत्नागिरीला जाणार म्हटल्यावर तो चांगलाच हिरमुसला होता. त्याच्याही नकळत तिने आपल्याला विचारून निर्णय घ्यावेत हा विचार त्याच्या मनात रुजला होता. नकळतच तो तिच्यावर हक्क गाजवू पाहत होता. इतक्या दिवसांनी दिशाच्या हे लक्षात आलं होतं. पण आता त्याला न दुखावता समजवायला तिच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे सुट्टीनंतर त्याच्याशी थोडं स्पष्टच बोलायचं ठरवून ती बाहेर पडली होती. 

           संध्याकाळच्या वेळेला संजना दिशाच्या घरी आली. दिशा आपल्या पलंगावर लोळत गाणी ऐकत होती. संजना दबक्या पावलांनी तिच्या खोलीत आली. 


"एवढं लपून कशाला येतेस. सरळ ये की." दिशा दरवाजाकडे नजर टाकत म्हणाली. 


"पाल ! अगदी पाल आहेस तू. एवढं कसं ऐकू गेलं ?" 


            दिशा पलंगावरून खाली उतरली आणि तिने संजनाला घट्ट मिठी मारली. दोघीही एकमेकींना मिठी मारून बराच वेळ गोलगोल फिरत होत्या. बऱ्याच दिवसांनी भेटल्याचा आनंद त्यांना शब्दांत वर्णन करता आला नसता. ती भावनिक मिठीच पटवून देत होती की गेल्या काही महिन्यांत त्यांनी एकमेकींची किती आठवण काढली आहे. 


" तयारी झाली सगळी ? " संजनाने दूर होत विचारलं. 


"कसली तयारी ? मी अशीच येणार आहे. आपण एकच दिवस समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत तर ? मग तर आपल्या नेहमीच्याच ठिकाणी फिरायचं आहे. " 

          दिशा बोलत होती तेव्हा संजना मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. 


"काय गं ? काय झालं ?" 


"अम्या आलाय. आता घरी जाईल तो. उद्या संध्याकाळची सहल पक्की म्हणायची आता. " संजनाने आनंदाने सांगितलं. 


             दिशाच्या चेहऱ्यावरही स्मितलकेर उमटली. थोड्या वेळाने संजना निघून गेल्यावर दिशा कपाटातला एकेक पोशाख काढून घालून पाहत होती. पण कुठलाही तिला पसंत येत नव्हता. शेवटी तिने लाल रंगाचा कुर्ता आणि हिरव्या गडद रंगाचा चुडीदार निवडला होता. काय प्रतिक्रिया असेल अमयची जेव्हा तो इतक्या दिवसांनी आपल्याला समोर बघेल या विचारानेच ती मोहरून गेली होती.


क्रमशः. 


© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा - रायगड - रत्नागिरी.


(प्रिय वाचक, 

कथा स्पर्धेसाठी लिहित असल्यामुळे दिलेल्या मुदतीत पूर्ण करायची आहे. यामुळे obsessed ला होत असलेला उशीर मला माहित आहे. त्याबद्दल मनःपूर्वक माफी मागते. ऑगस्ट संपला की obsessed रेग्युलर पोस्ट होईल. या कथेवर तुमचे अभिप्राय नक्की कळवा. 

Stay Connected ! )


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//