Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत.. भाग ६

Read Later
दुरावलेली प्रीत.. भाग ६

कथेचे नाव :- दुरावलेली प्रीत..

विषय :- प्रेमकथा

फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका


           संजना आणि दिशाच्या आताच्या मोबाईलवरील संभाषणाला बरेच दिवस उलटून गेले होते. सत्र परीक्षा सुरु झाल्यामुळे सर्वजण अतिशय व्यस्त झाले होते. विकी आणि संजना मात्र अगदीच तासनतास बोलत नसले तरी दिवसातून किमान अर्धा तास वेळ काढून एकमेकांशी बोलत होते. टॉम आणि जेरीला एकमेकांशिवाय कसं करमत नाही ना ? अगदी तसंच होतं त्या दोघांचं. भेटले की भांडत राहणार आणि दूर गेले की आठवण काढणार. विकीने कालच संजनाला सांगितलं होतं की अमयचा कॉल येऊन गेला. पण विकीने तो नेहमीप्रमाणे उचलला नव्हता. हो, आता ही सवयच बनली होती त्यांची. विकी, संजना आणि दिशा, यांच्यापैकी कोणीच अमयचे कॉल उचलत नव्हतं. विकी व्यस्त होतो असं सांगून नंतर मेसेजवर जुजबी बोलायचा. संजना तर दोन तीन दिवसांनी हो किंवा नाही अशी उत्तरं द्यायची. दिशा तर अमय या व्यक्तीपासून पूर्णतः अलिप्तच झाली होती. अमय म्हटल्यावर आधी तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता असायची. आता राग जाणवायचा. उटी वरून आल्यानंतर अमयने त्या सर्वांना सतत कॉल केले होते. पण ते त्याच्याशी नीट बोलत नव्हते. त्यालाही लक्षात आलं होतं की हे बदल कशामुळे झाले आहेत. त्याने सुट्टी टाकण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र काही प्रोजेक्ट्स अंगावर पडल्यामुळे त्याला सुट्टी मिळाली नव्हती. तो शैक्षणिक नुकसान करून घेऊ शकत नव्हता. त्याचीही अशी बाजू होती. पण ती मांडण्यासाठी त्याला संधीच मिळाली नव्हती. तो अतिशय त्रस्त आयुष्य जगत होता. त्याला दिशाची फार आठवण यायची. नकळत आपण तिला फार दुखावलंय हे लक्षात यायचं. पण काय करावं हे सुचत नसल्याने त्याने आहे तसंच सर्व चालू दिलं होतं. 

             आज १५ जानेवारी होता. रात्री बारा वाजता अमय, त्याचे काही खास मित्र आणि मैत्रिणी त्याच्या एका दुसऱ्या मित्राच्या घरी आले होते. म्हणजे मित्रमैत्रिणींनी त्याला खेचत आणलं होतं. कारणही तसंच होतं. आज अमयचा वाढदिवस होता. सर्वांनी केक वगैरे आणला होता. 


"अरे हे सगळं कशाला पाहिजे होतं ?" 


"बस काय भावा ! बाकी सगळ्यांसाठी तू करतोस, मग तुझ्यासाठी आम्ही नाही करणार का ? " 


"हो ना. आमच्यासोबत तू साजरा करत असलेला पहिला वाढदिवस आहे. मागच्या वर्षी वाढदिवसाला तू प्रोजेक्ट टूरवर होतास. मग स्पेशल तर असणारच ना ?" 


"थँक्स यार. अरे केक पण माझ्या आवडीचा आहे." 


"ते आम्हांला पूर्वाने सांगितलं रे !" कोणीतरी मिश्किल हसत म्हणालं. 

                तशी पूर्वा चक्क लाजली. अमयचं लक्षही नव्हतं गेलं तिच्याकडे. अमयने केक कापला. पण त्याच्या मनात येऊन विचार येऊन गेला. आज दिशा इथे हवी होती. तिलाही आवडतो हा केक. माझी साथीदार म्हणून माझ्या बाजूला उभं राहून केक कापताना तिला फार आनंद झाला असता. 


"अमय, अरे झालं का ?" बऱ्याच वेळाने पूर्वाने विचारलं. 


             रात्र झाल्यामुळे हॉस्टेल बंद झाले होते. त्यामुळे ते त्या मैत्रिणींना त्यांच्यातल्याच एकीच्या रूमवर सोडणार होते. पूर्वा तर वेगळी रूम घेऊन राहत होती. मला अमयच सोडेल असा हट्ट पूर्वाने धरला होता. त्यामुळे तो नाईलाजाने निघाला होता. तिला तिथे सोडून तो मित्राच्या घरी परतणार होता. पूर्वा मोटारसायकलवर त्याला जरा खेटूनच बसली होती. 


"पूर्वा, आपण दोघेच आहोत. ट्रिपल सीट नाही जायचंय आपल्याला. जरा मागे सरकून बस. " 

             अमयच्या सांगण्यासरशी पूर्वाने तोंड वाकडं केलं. ते अमयच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तो पूर्वाच्या रूमजवळ आला.  


"चलो बाय." 


"अरे बाय काय ? आत ये ना. " 


"आता ? काय माणसात आहेस की ? रात्रीचे एक वाजून गेलेत. " 


"अरे, ते तुझं गिफ्ट द्यायचं राहिलंय. मी एवढं छान गिफ्ट तयार केलंय ना तुझ्यासाठी. इथपर्यंत आला आहेस तर आत पण चल ना." 


             हो नाही करता करता पूर्वा अमयला आत घेऊन आली. आतमध्ये सर्वत्र लाल फुगे पसरले होते. खूप सुंदर सजावट केलेली होती. अमयचे डोळे विस्फारले गेले. पण त्याचबरोबर त्याला राग आला. 


"हे काय आहे पूर्वा ?" 


"काय आहे म्हणजे ? मला तुझा हा वाढदिवस आपल्या दोघांत परत साजरा करायचा आहे. तुझी जीवनसाथी म्हणून. " पूर्वाने लाजतच सांगितलं. 


"नाही पूर्वा. तुला माहित तरी आहे का तू काय बोलते आहेस ? मी तुला माझी खूप चांगली मैत्रीण मानतो. " 


"पण मला तुझी फक्त मैत्रीण बनून राहण्यात काहीही रस नाही आहे अमय. काय कमी आहे माझ्यात ?" 


"तुझ्यात काही कमी नाही आहे पूर्वा. पण मी आधीच कोणाला तरी वचन दिलं आहे. दिशा नाव आहे तिचं. मी कायम तिचाच होतो आणि तिचाच राहणार. " 


"ही दिशा कोण आहे अमय ?" पूर्वाच्या डोळ्यांतून संतापाने अश्रू वाहू लागले होते. 


अपेक्षाभंगाचं दुःख जहाल असतं. 


"दिशा माझं सर्वकाही आहे पूर्वा. ती माझी जिवलग मैत्रीण आहे, मार्गदर्शक आहे, माझी होणारी जीवनसाथी आहे. दोन महिन्यांपूर्वीच आमच्या प्रेमाची सेकंड एनिव्हर्सरी होती. त्यासाठी मी किती धडपडत होतो तू पाहिलंस ना ? नाही जाता आलं मला. पण मी फक्त तिच्यासाठीच जात होतो. पण त्यावेळेला तू मी का जातोय विचारलं नाहीस. म्हणून मी सांगितलं नाही. नाहीतर मी तुझा हा गैरसमज आधीच दूर केला असता." अमय शांतपणे तिच्याशी बोलत होता. 


                काहीही झालं तरी ती त्याची मैत्रीण होती. तो तिच्याशी रागाने तर वागू शकत नव्हता. पूर्वा दोन मिनिटं सुन्न झाल्यासारखी जमिनीकडे पाहत होती. अमयच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. 


"पूर्वा, मला माफ कर. तुला दुखवायचं नव्हतं गं. पण माझं फार प्रेम आहे दिशावर. मी नाही इतर कोणावर प्रेम करू शकणार. " अमय मान खाली झुकवून बोलत होता. 


"अमय, मी इतकी निष्ठुर नाही आहे की कोणाचं प्रेम हिरावून घेऊ पाहीन. मला वाटलेलं तू एकटाच आहेस, म्हणून मी माझं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करत होते. पण तू काळजी करू नकोस. मी काही प्रेम नाही मिळालं तर जीव वगैरे देणारी भ्याड नाही आहे. दिशा आणि तू कायम आनंदी रहा. " पूर्वा भरलेल्या डोळ्यांनी पण आत्मविश्वासाने बोलत होती. 


"थँक्स पूर्वा. " 


"पण माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम कधीच कमी नाही होणार अमय. एखाद्या वेळेस मी तुझ्याशी प्रेमाने वागले तर त्याकडे दुर्लक्ष करायची तेवढी तयारी ठेव. शेवटी मी ही माणूस आहे. मनावर कितीही ताबा ठेवला तरी प्रेम लपत नाहीच. " पूर्वा शांतपणे पण खरं बोलत होती. 


             अमयने होकारार्थी मान डोलावली. पूर्वाला समजावून तो बाहेर पडला. तो पूर्वासमोर कमीत कमी वेळा येण्याचा प्रयत्न करणार होता. कारण त्याला तिला दुखवायचं नव्हतं. पण तो तिच्याकडे त्या नजरेने कधीच पाहू शकणार नव्हता. कारण त्याचा जीव फक्त त्याची दिशा होती. 


_______________________________________________ 


             त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता दिशा महाविद्यालयाच्या वाचनालयात बसून नोट्स काढत होती. जीवशास्त्र म्हणजे तिचा आवडीचा विषय. त्यात आज जीवशास्त्रातील आपल्या आवडत्या पाठाचे काही मुद्दे काढून प्रत्येकाने उपक्रम करायचा होता. त्यासाठी ती बारीकसारीक मुद्दे काढत होती. आपलं काम आटोपताच पुस्तक जागेवर ठेवून ती ग्रंथापालांपाशी आली. आपल्या नावाची नोंदणी करून ती बाहेर पडली. तिच्या मागोमाग लगेच तरुणही बाहेर आला. 


"दिशा !" 


हाक ऐकून दिशा थांबली. 


"काय रे ? झालं तुझं एवढ्यात ?" 


"मी कालच पूर्ण केलेलं गं. मी तुलाच भेटायला आलेलो. पण आज खूपजण होते आत. मग तर आमच्या कर्वे बाई बोलायला द्यायच्या नाहीत. त्यामुळे तुझं आटोपेपर्यंत शांत बसून होतो. " 


"का रे ? एवढं काय काम काढलंस ?" 


दिशा आणि तरुण चालत चालत बोलत होते. 


"नाही सहज. ऐक ना, आज शेवटचा तास होणार नाही आहे. आपण बाहेर जाऊया का ? म्हणजे समुद्र किनाऱ्यावर फिरून येऊया. " तरुणच्या डोळ्यांतील आनंद तिला लक्षात आला होता. 


तिलाही खूप आवडायचा समुद्रकिनारा ! 


"नाही रे. सध्या शक्य नाही. माझं अजून थोडं काम राहिलं आहे. पण वही हॉस्टेलवरच विसरले. त्यामुळे परत चालले आहे." 


"अगं नंतर कर ना ते. तसंही जे सर हे सर्व घेणार होते ते तर आलेले नाहीत. म्हणजे आता १५ जानेवारी तर नसणार आहे तारीख. दुसरी तारीख देईपर्यंत पूर्ण करू शकतेस ना ते ?" तरुण आपल्याच तंद्रीत विचारत होता. 


दिशा मात्र विचारांत हरवली होती. 


'१५ जानेवारी ? आज अमयचा वाढदिवस आहे. करावा का एखादा मेसेज त्याला ? पण त्याने पाहिलाच नाही तर ? तो नेहमीप्रमाणे व्यस्त असेल आणि मीच मागे लागलेय असं तर होणार नाही ना ? ' 


"दिशा, कुठे हरवली आहेस ? सांग ना, जाऊया का ?" तरुणने तिला हलवत विचारलं. 


तशी ती भानावर आली. 


"अं ? नाही नको तरुण. माझी तब्येतही तितकीशी ठीक नाही आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्यामुळे अजून बिघडेल. नंतर कधीतरी जाऊ." दिशा वेगाने त्याच्यासमोरून निघाली. 


              नाहीतर त्याच्याकडे काहीतरी दुसरा पर्याय किंवा दुसरं ठिकाण असेलच हे दिशाला अनुभवातून कळलं होतं. तरुण थोडा हिरमुसला. पण नंतर कधीतरी बघूया असं स्वतःलाच समजावत निघून गेला. दिशाने आत येत दार लावून घेतलं आणि तिने पलंगावर स्वतःला झोकून दिलं. तिला अमयसोबत साजरा केलेला त्याचा दोन वर्षांपूर्वीचा वाढदिवस आठवत होता. ज्या आठवणींपासून ती इतके दिवस दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, आज त्याच आठवणींमध्ये तिने स्वतःला झोकून दिलं होतं.


क्रमशः. 


© तनुजा प्रभुदेसाई.

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//