Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत.. भाग ५

Read Later
दुरावलेली प्रीत.. भाग ५


कथेचे नाव - दुरावलेली प्रीत..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

                विकीचा अंदाज चुकीचा नव्हता. दिशा आणि अमयचे संबंध उटी ट्रीपनंतरच जास्त बिघडले होते. फक्त उटी ट्रीप नाही, तर नंतरही अमय आला नव्हता. उटीवरून परतल्यावर ते तिघेही रत्नागिरीत आले होते. अजून दोन-तीन दिवस तरी दिशा रत्नागिरीतच राहणार होती. त्या दिवशी ते संजनाच्या घरी जमले होते. कारण त्यांना अजून एक प्लॅनिंग करायचं होतं. अमय काल आला नाही तरी उद्या नक्की येईल अशी त्यांची खात्री होती. संजनाच्या राहत होती त्या घराच्याबाहेर शेकोटी पेटवून ते बसले होते. चांगलीच थंडी पडली असल्याने शेकोटीमुळे जीवात जीव येत होता. थट्टामस्करी करत त्यांच्या गप्पा सुरु होत्या. 


"दिशू आता तू सांग. जर तुला एक चॉईस दिली विकी की मी तर ?" 


"तू." 


"हे काय यार दिशा ?" विकी चांगलाच रागावला होता. 


"गप रे. तुला कशाला जळायला पाहिजे ? जे खरं ते खरं. " संजना जास्तच खुश झाली होती. 


              विकी अशा गोष्टी मनाला लावून घ्यायचा नाही. पण संजनाचं नाव नाही घेतलं तर तिच्या मनात राहील म्हणून दिशाने तिचं नाव घेतलं होतं. 


"बरं. आता सांग विकी की अमय ?"


"अमय." 


"यार तू मला कुठेच चॉईस नाही करणार आहेस काय ? " 


"विकी, ही ऑप्शनच कसे देतेय बघ ना. कसं चॉईस करणार मी तुला ? ही ना मुद्दाम प्लॅन करून आली आहे. " 


"खरं का संजू ?" 


"नाही रे. जेव्हा तिने मला चॉईस विचारले तेव्हा मी सारखं तुझं नाव घेत होते की. तेव्हा दिशा मध्येच बोलत होती का तुझ्यासारखी ?" 


"सॉरी सॉरी. " 


"तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर दिशू. " 


"बरं आता मी विचारतो दिशाला. दिशा, संजना की अमय ?" 


"अमय." दिशाने एक क्षणही विचार न करता उत्तर दिलं होतं. 


"काय गं दिशू ! एक मिनिटभर विचार केल्यासारखं तरी दाखवायचं." 


"का गं म्हशे, आता का मध्ये बोलत आहेस ?" 


"यार, खेळ राहूनच जाईल ह्यात. आधी तुम्ही भांडून घ्या. मग आपण खेळू." 


            दिशा असं बोलली तसे ते दोघे एकमेकांना खुन्नस देत नीट बसले. 


"ओके दिशा. आता सांग, तू की मी ?" 


"नक्कीच तू संजू." 


संजनाने एक अभिमानी कटाक्ष विकीकडे टाकला. 


"आणि मग तू की विकी ?" 


"विकी." 


          आता गर्व दाखवायची पाळी विकीची होती. त्यानेही संजनाला खुन्नस दिलीच. 


"आणि तू की अमय ?" 


"अमय." 


"दिशू, तू सगळ्यातच बाकीच्यांची नावं घेतलीस. तुझ्यासाठी तू पहिली प्रायोरिटी नाही आहेस का ?" 


"माझ्यासाठी माझी पहिली प्रायोरिटी माझा अभ्यास आणि माझं कुटुंब आहे संजू. मग अमय, मग तुम्ही दोघे आणि मग मी स्वतः." 


"अम्याने आज हे ऐकलं असतं ना तर त्याला कळलं असतं तो किती भाग्यवान आहे ते !" 


"कसला भाग्यवान ? तो सध्या अभागी आहे. एवढे आनंदाचे क्षण मिस केलेत त्याने. दिशूचा चेहरा पाहतोयस, कालपासून सतत कॉल आणि मेसेज सुरु आहेत. मात्र त्याचा काहीच रिप्लाय नाही." 


"संजू, असेल तो व्यस्त कुठेतरी. जाऊ दे ना. " 


"हे तू मला सांगते आहेस की स्वतःला समजावत आहेस ?" 


"दिशा, एकदा मेसेज करून बघ ना अम्याला. उद्या तुमची सेकंड लव्ह एनिव्हर्सरी आहे. उद्या तो नाही आला ना तर त्याला बघतोच मी." 


"हं, तू बघणार ना ? तू ही तसलाच आहेस. तुझी गर्लफ्रेंड नाही म्हणून ठीक. " 


          त्यांची भांडणं काही थांबत नाहीत हे पाहून दिशा उठून आत रूममध्ये गेली. तिने अमयला पुन्हा मेसेज केला. 


'अमय, उद्या सेकंड लव्ह एनिव्हर्सरी आहे. उद्यातरी येशील ना ? मी नेहमीच्याच ठिकाणी वाट पाहीन.' मेसेज टाकून तिने एकदा मोबाईलकडे नजर टाकली. पण अमय ऑनलाईन नव्हताच. पांघरूण ओढून ती झोपी गेली. आजच्या दिवस ती संजनाकडेच राहणार होती. उद्याची तयारी जी करायची होती. 


_______________________________________________         दुसरा दिवसही तसाच गेला होता. ना अमयचा कोणता कॉल, ना ही मेसेज आला होता. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे दिशा जवळच्या पठारावर आली होती. तिथे एक टेन्ट पण तयार केलेला होता. चांदण्या रात्री आकाश निरखायला अमयला खूप आवडायचं. दिशालाही तशी आवड असल्यामुळे ते तिथे कित्येकदा आले होते. ह्याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी अमयने आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं होतं आणि तिनेही होकार दिला होता. आजही ते सर्व तसंच होतं. तीच जागा, तीच तारीख आणि तीच दिशा. नव्हता तो फक्त अमय. पाणावलेल्या डोळ्यांनी दिशा तिथे बसली होती. संजना आणि विकीही दूरवर उभे होते. अमयला मेसेज करून झाले होते. कॉल करून झाले होते. मात्र त्याचा काही पत्ता नव्हताच. रात्र सरेपर्यंत दिशा तिथे तशीच बसली होती. संजनाने तिला परत चलण्याबद्दल बोलून पाहिलं. मात्र तिने स्पष्ट नकार दिला. विकीलाही आता अमयचा फार राग आला होता. तो सतत अमयला कॉलवर कॉल करत होता. 

          पहाटेची चाहूल लागली तशी दिशा तिथून उठली. तिचे सगळे मनसुबे धुळीला मिळाले होते. ती, संजना आणि विकीसोबत घरी तर परतली. पण तिच्या मनात प्रचंड राग भरला होता.द्वेष  हळूहळू प्रेमाची जागा घेऊ लागला होता. त्यांच्यात असलेलं अंतर आता वाढतच जात होतं. कारण आता ती फक्त भौतिक रुपाने नाही तर मनानेही त्याच्यापासून दूर जात होती.  


               या सर्व घटनाक्रमात अमयलाही स्वतःची अशी बाजू होती. पण ती अजूनही कोणासमोर आलीच नव्हती. एक खूप मोठा गैरसमज त्यांच्या नात्यातली भिंत बनून उभा राहिला.


क्रमशः. 


© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा - रायगड - रत्नागिरी.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//