Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..भाग ४

Read Later
दुरावलेली प्रीत..भाग ४

कथेचे नाव - दुरावलेली प्रीत..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


              तो दिवस रविवार होता. उटी ट्रीप काढण्यामागचा सगळा प्लॅन विकीचा होता. खरं तर तो तिकडे एका प्रोजेक्टसाठी येणारच होता. पण चौघे एकत्र असताना प्रोजेक्ट कमी भटकंंती जास्त होणार होती. त्यात उटी म्हणजे थंड हवेचं ठिकाण होतं आणि दिशाला अशा ठिकाणी फिरायला फार आवडायचं. तासनतास अशा ठिकाणी ती हिंडत फिरायची. नाहीतर कधी पुस्तकातून तिची मान वर व्हायची नाही. उटीला येण्याचं खास कारण होतं त्यांच्याकडे. आजच्या दिवशी त्यांच्या मैत्रीला पाच वर्षे पूर्ण होणार होती. त्याच्याच आनंद साजरा करायला ते फिरायला आले होते. विकी, संजना आणि दिशा आदल्या दिवशीच रात्री येऊन लॉजवर राहिले होते. अमयही येणार होता. मात्र अजूनतरी त्याचा काही पत्ता नव्हता. त्याचा मोबाईलही संपर्कक्षेत्राच्या बाहेर होता. दिशा थोडी हिरमुसली होती. पण येईल तो उद्या म्हणून संजनाने आणि विकीने तिला समजावलं होतं. आज सकाळ सकाळी ते भटकायला निघाले होते. 


"संजू, यार खूप चुकीच्या ठिकाणी आलोय आपण. इथे सगळीकडे जोडपीच दिसत आहेत. कालपासून इतकी जोडपी दिसली आहेत ना, माझं तर डोकं फिरत आलंय. " विकीच्या शब्दांत वैताग जाणवत होता. 


"तुझ्यासारख्या सिंगल माणसाला वैतागच येणार रे. ती दिशा बघ. आजूबाजूला कोणी आहे की नाही याचा पत्ता नाही आहे तिला. आपल्याच विश्वात खुश आहे ती. " संजना दिशाकडे बघून जरा मोठ्यानेच बोलत होती. 


"ऐकलं हं मी संजू. टोमणे नकोत. पण ह्या अमयला काय झालंय ? मी माझे लेक्चर्स बुडवून चार दिवस इकडे फिरायला आले कारण आपण सगळे येणार होतो. हा कुठे राहिला मग ?" 


"हो ना. काय रे विकी ? तू त्याला सोबत घेऊनच का आला नाहीस ? आजकाल ना अम्या बिनभरवश्याचा माणूस झाला आहे. " 


              संजना चांगलीच रागावली होती अमयवर. दिशाला दुखावतो म्हणजे काय ! 


"जाऊ दे ना यार. मी विचारलं होतं त्याला. पण तो थेट इथेच येतो म्हणाला. येईल तो. आपण आता नुसती त्याची वाट पाहत राहायची की एन्जॉय पण करायचं ?" 


            विकीचा हिरमुसलेला चेहरा पाहून दिशाला वाईट वाटलं. उगाचच विषय काढला आपण. आजकाल अमय कॉल पण नाही करत तितके. व्यस्त असेल तो तर नाही येणार. त्यासाठी विकी आणि संजूला दुखावून काय मिळणार आहे आपल्याला ? 


"विकी, चल सोड तो विषय. कसली थंड हवा आहे बघ ! चल ना तिकडे जाऊन उभे राहूया. " 


"हा चल. आम्हांला फोटो काढायचे आहेत. तुला फोटोग्राफर म्हणूनच आणलंय सोबत. हो ना दिशू ?" 


                संजनाच्या बोलण्यावर दिशा हसू लागली. विकी मात्र संजनाला मारायला धावला. त्यांची पळापळ दिशा पाहत होती. अमय किती सगळं मिस करतो आहे हे ही तिच्या मनात येऊन गेलं. त्यानंतर ते बॉटनिकल गार्डन पाहायला गेले होते. ठिकठिकाणी त्यांनी बरेच फोटो काढले. दुपारी थोडं हलकंच जेवण करून ते चहाच्या बागा पाहायला गेले. निलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेलं उटी त्यांना फारच भावलं होतं. हिरवीगार वनराई, विविध वनस्पती, दूर पठारांवर दिसणारा मनोरम्य नजारा, अप्पर भवानी लेक अशी निरीक्षणं करत ते माउंटन रेल्वेपाशी आले. नोव्हेंबरच्या थंडीत उटी म्हणजे अगदी पर्वणीच ! विकी आणि संजनाने तर पार धिंगाणा सुरु ठेवला होता. जरा म्हणून गप्प बसत नव्हते दोघे. कुठे एकत्र फोटो काढ, कुठे काहीतरी खात रहा असं चाललं होतं दोघांचं. भांडणं तर अजिबात थांबत नव्हती. जेवढे भांडत होते, तितकेच लगेच एकमेकांची समजूत घालत होते. पण दिशा या सर्वांपासून अलिप्त होती. फिरत असलेला पूर्ण वेळ ती त्या दोघांना उत्तरं तर देत होती. पण ती त्यांच्या मस्तीत तितकीशी सहभागी झालेली नव्हती. अमय आतातरी यायला पाहिजे हेच तिच्या मनात सतत येत होतं. 

              दिवसभराच्या मस्तीने थकून ते रात्री लॉजवर परत आले. लॉज पण अगदी निसर्गरम्य पद्धतीने बांधण्यात आला होता. बाहेर पाईपने पाणी ओढून धबधब्याचा देखावा साकारण्यात आला होता. थकले असले तरी त्यांना झोप येत नव्हती. ते आपले स्पेशल डबे घेऊन लॉनवर येऊन बसले होते. संजना आणि विकीच्याही लक्षात आलं होतं की दिशा दिवसभर उदासच होती. ते दिवसभर सतत तिला हसवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. ती ही खोटं हसत प्रतिसाद देत होती. संजनाने सोबत आणलेले डबे उघडले. घरून ती खास गुलाबजामून करून घेऊन आली होती. तर दिशाने स्वतः काजूकतली बनवून आणली होती. दरवर्षी ते त्यांचा मैत्री दिवस असाच साजरा करत होते. स्वतः बनवून आणलेलं काहीतरी गोड खाऊन आणि खूप सारे फोटो काढून ! 


"विकी, एकदा अम्याला कॉल करून बघ ना. अरे कुठे अडकला वगैरे नाही ना तो ? रात्र झाली तरी याचा पत्ता नाही. आज पहाटे येणार होता ना तो ? " 


"संजू, सकाळपासून मी शंभर कॉल केले असतील त्याला. तो संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे त्याला मी काय करू सांग. " 


"दिशू, तू टेन्शन नको घेऊस. आज नाही तर तो उद्या नक्की येईल. दोन दिवसांनी फार महत्वाचा दिवस आहे. तो असा विसरणार नाही. " संजना दिशासोबत स्वतःचीही समजूत घालून घेत होती. 


                दिशाने फक्त हुंकार भरला. त्यांनी ती मिठाई चाखून फोटो तर काढले. पण त्यांना सतत अमयची कमी जाणवत राहिली. दिशा तर मनोमन फार चिडली होती. महत्वाचे लेक्चर्स मागे ठेवून ती फक्त या चार दिवसांसाठी आली होती. त्यातही ती खास अमयसाठी आली होती. बरेच दिवस तो भेटला नसल्याने आणि अपेक्षित तितकं बोलणं होत नसल्याने तिला त्याला भेटायची ओढ लागली होती. अमयही येतो म्हणाला होता. मग का आला नसेल तो ? काही झालं असेल का ? त्याचा कॉलही लागत नाही आहे. आता दिशाचं मन शंकाकुशंकांनी भरून गेलं होतं. इतक्यात तिच्या कानावर विकीचा आवाज पडला. 


"नालायक आहे हा अम्या ! आम्ही इथे टेन्शनमध्ये  बसलोय आणि ह्याला काही पर्वा नाही आहे. निदान कॉल करून कळवण्याची पद्धत असते का नाही ?" 


"काय झालं रे विकी ? अमय येणार नाही आहे का ?" दिशाचा रडवेला सूर ऐकून संजनाही हेलावली. 


इतकंही निष्काळजी असू नये माणसाने. 


"हो. नाही येणार आहे तो. निघालाच नाही आहे तो अजून तिकडून. मी त्याच्या रूममेटला कॉल केला होता. तो म्हणाला की आताच येऊन झोपला आहे. जायचं आहे असं काही म्हणाला नाही तो त्यांना. " 


"हा अम्या ना, भेटू दे फक्त. " संजनाचा स्वर रागीट जाणवत होता. 


अचानक दिशाला कुठून बळ आलं माहित नाही. ती म्हणाली, 


"तो नाही आला तरी चालेल आता विकी. नका टेन्शन घेऊ तुम्ही. सेफ आहे ना तो ? तेवढंच बस झालं. आपण झोपूया का ?" 


"ए दिशू, नको ना गं. एवढ्या दूर काय आपण झोपायला आलो आहे का ? उद्या सकाळी रत्नागिरीला जायला  निघायचं आहे. आजच्या दिवस बसूया ना गप्पा मारत."

संजनाचा अगदी विनवणीचा सूर ऐकून दिशानेही होकार दिला. 


               तसंही त्यांची काय चूक होती ना ? दिशाला थोडं तरी आनंदी होता आलं पाहिजे म्हणूनच संजनाने तिला बसायचा आग्रह केला होता. ते मस्त गप्पा मारत बसले होते. 


__________________ 


         अमय त्या दिवशी उटीला जायला निघालाच होता. पण असाईनमेंट पूर्ण करून तो बाहेर पडणार तोच पूर्वा त्याच्यासमोर आली. पूर्वा त्याच्याच वर्गात शिकत होती. सकाळी लिंक कॉलेजच्या साईटवर अपलोड करताना चुकून पूर्वाची अपलोड केलेली असाईनमेंट त्याच्याकडून डिलीट झाली होती. तेव्हापासून ती त्याच्यावर जाम भडकली होती. माझी असाईनमेंट पूर्ण करून देऊनच तू इथून जायचं यावर ती अडून बसली होती. गेल्या दीड वर्षात अमयला बरेच मित्र मैत्रिणी भेटले होते. पूर्वाही त्यातीलच एक होती. तिचा आग्रह झिडकारणं अमयला जमलं नाही. मुळात गडबडीत त्याच्या चुकीमुळे तिचं नुकसान होऊ नये ही त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याला थांबणं भाग होतं. तो पूर्वासोबत तिची असाईनमेंट सोडवत बसला होता. त्याने आपला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला आहे हे तो पूर्णतः विसरून गेला होता. हीच उटी ट्रिप त्यांच्या नात्यातील फार मोठी दरार ठरली होती. ते तिघे तर नंतर निघून गेले होते. पण दिशाला मात्र मनोमन फार राग आला होता. अजूनही कोणालाच अमयची बाजू माहित नव्हती. संजनाही फक्त दिशाच्या बाजूने विचार करत होती. कारण त्यानंतर अमयसोबत कोणाचाच जास्त संपर्क नव्हता. 

          फोटोफ्रेम पुन्हा कपाटात व्यवस्थित ठेवून, लाईट बंद करत संजना पलंगावर पहुडली. 


क्रमशः.


© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//