Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत..भाग ३

Read Later
दुरावलेली प्रीत..भाग ३

कथेचं नाव - दुरावलेली प्रीत..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


संजना अजूनही त्या आठवणींमध्ये रमली होती. 


            सर्वजण पार्टीकरिता संजनाच्या घरी जमले होते. सॉफ्ट ड्रिंक्स, चिप्स, वेगवेगळे स्नॅक्स यांची रेलचेल दिसत होती. मस्त मूव्ही नाईट प्लॅन केलेली होती. उद्यापासून परीक्षा सुरु होणार होत्या. निकालानंतर कोण कुठे असेल हे काही सांगता येणार नव्हतं. त्यामुळे आजचा दिवस ते एकमेकांसोबत आनंदात साजरा करत होते. सर्वजण घरी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. आयुष्याचा एक मोठा काळ एकमेकांसोबत जगून ते आता वेगळे होणार होते. 

                 यथावकाश बारावीच्या परीक्षा झाल्या. त्यानंतरचा वेळ प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबतच घालवला. त्यात अधून मधून अमय आणि विकी एकत्र फिरायला जायचे. पण दिशा आणि संजनाचे पालक अत्यंत शिस्तीचे असल्याने त्यांना ते करता आलं नाही. बारावीचा निकाल लागला. सर्वांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांचे फॉर्म भरले होते. अमयचा निकाल आला होता. उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तो रांचीला जात होता. तिथे त्याच्या मनपसंत महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी शिकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. दिशाचं तर आधीपासूनच ठरलेलं होतं. निकाल येताच ती वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. त्यासाठी तिने मुंबईत प्रवेश घेतला. संजना रत्नागिरीतच शिकणार होती तर विकीने स्पेशल डिप्लोमा करण्यासाठी पुण्याला प्रवेश घेतला. एकूणच चौघे चार दिशांना जात होते. 

               अमय कधीच रांचीला निघून गेला. विकी उद्या पुण्याला जाणार होता. दिशा आजच मुंबईसाठी निघणार म्हणून संजना तिच्या घरी आली. दिशाची तयारी सुरु होती. बॅगा भरून झाल्या होत्या. 

“दिशू, आता आपण कधी भेटणार परत?” 

संजनाने पाणावल्या डोळ्यांनी विचारलं. दिशाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. 

"मला माहित नाही संजू. तुला माहित आहे ना, आई मला नेहमी रत्नागिरीत नाही येऊ देणार आता. अभ्यासात व्यस्त राहायला लावेल. तरी ठरवून कधीतरी भेटूच. पण आईच्या नकळत करायचं म्हणजे प्लॅनिंग ठीक झालं पाहिजे आपलं." 

"विकी, उद्या चालला आहे. जाण्यापूर्वी एकदा कॉलवर बोलून घे त्याच्याशी. तुझी आई काही घरात येऊ देणार नाही त्याला. मीच कशीबशी आले आहे." 

"बघ की गं संजू. आईला मी काल म्हटलं की नाही करणार उशीर. तासाभरात सगळ्यांना भेटून येते. पण तिने येऊच दिलं नाही. तयारी सोडून कुठे जायचं नाही म्हणाली. मला तर अमयला भेटता पण आलं नाही.” 

दिशा पाणावल्या डोळ्यांनी सांगत होती. 

"अगं, तू अमयला भेटलीच नाहीस? तो तर पार रांचीला जाणार होता. तो सारखा सारखा थोडीच येईल.”

"माहित आहे गं. पण काय करणार मी? कॉलवर बोलणं झालं. तो असू दे म्हणाला. जेव्हा सुट्टीसाठी रांचीतून परत येईल तेव्हा भेटून जाईन असं सांगितलं त्याने." 

"चांगलंय की मग. अम्या कसला राहतोय तुला न भेटता? तू चिल कर. भेटू आपण सगळेच लवकर.” 

संजना कशीबशी उसनं हसत म्हणाली. 

                 संजनाला अजूनही जसाच्या तसा आठवत होता तो दिवस! दिशा खूप रडली होती. विकीसोबत बोलतानाही ती रडत होती. त्यानंतर प्रत्येक दिवस असाच जात होता. सगळे एकमेकांना खूप जास्त मिस करत होते. एवढ्या दुरून कुठे येऊन भेटणार? म्हणून दिवसभर चाललेलं चॅटिंग, कधी कधी कॉन्फरन्स कॉलवरून चाललेल्या तासनतास गप्पा आणि रोज रात्री व्हिडीओ कॉल असं सर्व सुरु होतं. एकमेकांशिवाय राहत असल्याची कल्पनाच त्यांच्यापैकी कुणालाही पटत नव्हती. संजना रूमवर एकटीच असायची त्यामुळे तिला काही बंधनं नव्हती. ती कितीही वेळ ऑनलाईन असायची. विकीही पुण्यात रूममध्ये एकटाच होता. पण अमयच्या रूममध्ये आणखी तिघेजण होते. रात्री अकराच्या सुमाराला ते आले की अमय लेफ्ट व्हायचा. दिशाही हॉस्टेलच्या वेळेनुसार लेफ्ट व्हायची. त्यातल्या त्यात विकी आणि संजनाच रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसलेले असायचे. 

               संजना आठवणींत इतकी रमली होती की कॉल आलेला तिच्या लक्षात आला नव्हता. काही वेळाने तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं. 

"विकी? हा एवढ्या रात्री का कॉल करतोय?" 

घड्याळाने दोनचा ठोका दिला होता. संजनाने काहीशा चिंतेनेच कॉल रिसिव्ह केला. 

"हॅलो" 

"मेलीस की जिवंत आहेस ?" 

"दुर्दैवाने आहे जिवंत. काय झालं? एवढ्या रात्री कसा अवतरलास?" 

"म्हशी, बारापासून कॉल करतोय. आतापर्यंत चाळीस - पंचेचाळीस कॉल लावले असतील. म्हणून म्हटलं आहेस का नाही ते पाहूया." 

विकी वैतागलेला वाटत होता. 

"सॉरी रे. ते दिशूला कॉल केलेला. मग पुन्हा बऱ्याच दिवसांनी ती फोटोफ्रेम पाहत होते. जुने दिवस आठवतायत. त्यातच तंद्री लागली. " 

संजना भावुक होऊन सांगत होती. 

"ए संजू, जास्त सेंटी नको होऊ. तुला शोभत नाही ते.”

"तसं नाही रे. पण आजकाल कॉन्टॅक्ट किती कमी झाला आहे ना? अमय कधीतरी दोन आठवड्यांतून कॉल करतो. दिशाने सांगितलं आहे कधीही कर म्हणून. पण तिचा मोबाईल दिवसभर सायलेंट असतो. तू पण आजकाल रोज कॉल करत नाहीस.”

"अबे किती सिरिअस झालीस तू? त्या अम्याचं काय चाललंय कळेना. भाऊ विसरतोय बहुतेक आपल्याला आणि दिशाचं काय? ती इथे असताना पण तेच करायची. दिवसभर मोबाईल सायलेंट. अभ्यासू मुलांची तीच गत आहे. नुसते पुस्तकांतच असतात. माझं म्हणशील तर दोन दिवस ट्रेकिंग ट्रिप होती. त्यामुळे कॉल नाही करता आला. नाहीतर रोजच बोलतो की गं.”

"हं.. तुला एक धक्कादायक गोष्ट सांगू ?" 

"तू नुसती गोष्ट सांगितलीस तरी ती धक्कादायकच वाटेल. सांग सांग." 

विकी हसू आवरत बोलत होता. 

"विकी यार, सिरिअस आहे थोडं." 

"तुला काही झालंय का संजू? "  

विकीचाही स्वर आता सिरिअस झाला होता. 

"मला काही नाही रे झालंय. दिशूला मी कॉल केलेला ना, तेव्हा मी तिला अमयबद्दल विचारलं. तर ती म्हणाली की अमयचा आणि तिचा काहीही संबंध नाही. त्याची खबरबात त्याला कॉल करून विचारायची. तिला नाही." 

"भांडले का काय ते ?" 

विकीने काळजीने विचारलं. अमय आणि दिशा एकमेकांशी भांडणं म्हणजे अगदी दुर्मिळ प्रसंग होता त्यांच्यासाठी. 

"मी पण तेच विचारलं. पण तिने उत्तर देणं टाळलं. ते दोघंही एकमेकांशी जास्त बोलत नाहीत वाटतं. " -संजना. 
   
"अरे ते उटी ट्रीपपासून फिस्कटलं आहे वाटतं सगळं. तेव्हा अम्या आला नाही ना. " 

विकीने अचानक आठवून सांगितलं. 

"हं.. असणार. आपण काहीतरी केलं पाहिजे ना ?" ~ संजना. 

"हा मग. ते करायचंच आहे. सध्या सेमिस्टर लागलेत. तेवढे होऊ देत. मग परत कुठेतरी जायचा प्लॅन करूया. पण अम्या आलाच पाहिजे याची व्यवस्था करू. " ~ विकी

"ओके. सेमिस्टरसाठी ऑल द बेस्ट. नापास होऊ नकोस रे. " 

थोडं गंभीर बोलून झाल्यावर आता संजना मूळ टोनवर परतली होती. 

"गप ए. मी नाही कधी नापास झालो. हा, पण तू एकदा काठावर पास झालेलीस ना? कुठला गं तो विषय? " ~ विकी. 

"विक्या गप हा. नाहीतर मी पण कॉल रिसिव्ह करणं सोडून देईन." 

आता संजना लटक्या रागातच काहीशी वैतागून म्हणाली. 

"हा हा हा. तू काय स्वतःला अमेरिकेत समजतेय का ? सहा तासांचा प्रवास आहे फक्त. तिथे येऊ शकतो मी. " 

"हो दिसलं. मागच्या दीड वर्षांत कितीवेळा आला आहेस रे इकडे ? " 

"आलेलो की एक दोनदा. अगं संजू, पक्का येतो सेमिस्टरनंतर. काहीही झालं तरी. तुझे पण सेमीस्टर लागले असतील ना.. ऑल द बेस्ट हा. " 

"हा. चल गुड नाईट. रात्रभर जागू नकोस." 

"तिखट - गोड अशा मिश्र स्वभावाची आहे ना तू ? तू ही लवकर झोप. डार्क सर्कल आले तर तुझं चेटकीण रूप आम्ही एवढे दिवस लपवलंय ना ते जगासमोर येईल. गुड नाईट डिअर.”

असं म्हणताना विकी खूप हसला आणि लगेच कॉल कट केला. नाहीतर संजनाच्या शिव्या ऐकाव्या लागतील, याची कल्पना त्याला आली होती. संजनाला मात्र हसू आलं. नकळतच ती पुन्हा आठवणींमध्ये रमली. विकीमुळेच तिला पुन्हा आठवली होती. त्यांची उटी ट्रिप !


क्रमशः. 


(प्रिय वाचक,
           कथेचा भाग कसा वाटतोय नक्की कळवा. तुमची दोन शब्दांची कमेंट माझं प्रोत्साहन आहे. ) 


© तनुजा प्रभुदेसाई.
जिल्हा - रायगड - रत्नागिरी. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//