Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत - भाग २

Read Later
दुरावलेली प्रीत - भाग २

 कथेचं नाव : दुरावलेली प्रीत

विषय : प्रेमकथा

फेरी : राज्यस्तरीय करंडक कथामालिका


             दीड - दोन वर्षांपूर्वीची गोष्ट होती. आज कॉलेजमध्ये काही वेगळीच बहार दिसत होती. सर्वजण वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालून आले होते. प्रत्येकजण आपापल्या परीने बेस्ट लुक करून आला होता. कारण आज स्पेशल दिवस होता. बारावीचा सेन्डऑफ ! सर्वजण खास तयार झालेले होते. संजना इतर सर्वांची वाट पाहत उभी होती. तिने फिकट गुलाबी रंगाची पार्टीवेअर साडी नेसली होती. त्यावर शोभेल अशी ज्वेलरी आणि मुळातच सुंदर दिसणारे तिचे मोकळे, कुरळे केस ! फारच गोड दिसत होती ती. काही वेळात विकीही तिथे आला होता. 


"काय रे, कुठे कडमडला होतास ? " संजनाने त्याला कोपरखळी मारली. 


"आई ग ! होतो गं इथेच. इतक्या साऱ्या सोनपऱ्या अवतरल्या आहेत. म्हटलं सर्वांना भेटून, बोलून यावं. " विकी. 


"हो का ? बरं. मग सांग मी कशी दिसतेय ? " संजना कमरेवर हात ठेवत अगदी पोज देऊन म्हणाली. 


"अरेरे ! हजारो सोनपऱ्यांमध्ये एक चेटकीण पाहिल्यासारखं वाटतंय. " विकी डोक्याला हात लावून उभा होता. 


"काय म्हणालास ? चेटकीण ? विक्या तुझ्या तर.." संजना. 


"ए थांब थांब ग ! मारू नकोस यार. सगळेजण बघतायत. माझं रेप्युटेशन डाऊन करशील, जा ! " विकी कॉलर उडवत म्हणाला. 


"मग सरळ उत्तर दे. " संजना. 


"हो ग संजू. भारी दिसतेय तू! " विकी. 


"खरं ना ?" संजना. 


"हो ग माझे आई. खरंच गोड दिसतेयस तू !" विकी मनापासून म्हणाला. 

            तशी संजनाच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. विकीनेही फिकट नारंगी रंगाचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असे फॉर्मल कपडे घातले होते. टाय बांधल्यामुळे तर विकी प्रमाणापेक्षा जास्त सभ्य आणि शांत दिसत होता. त्याने केस जेल लावून छान सेट केले होते. थोड्याच वेळात अमयसुद्धा तिथे पोहोचला. अमयनेसुद्धा फॉर्मल कपडेच घातले होते. गडद लाल रंगाचा शर्ट आणि ब्लॅक जीन्स ! केस छान सेट केलेले आणि शर्टाच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या ! एखादीच्या स्वप्नातला राजकुमार दिसावा तसा होता तो ! आधीच त्याच्या गोऱ्या वर्णावर लाल रंग उठून दिसत होता. 


"अम्या, लूकिंग नाईस हं ! " विकी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. 


"हा, हा. इंग्लिश किती येतंय ते दाखवायचं आहे तर पूर्ण तरी म्हण. अर्ध इंग्रजी, अर्ध मराठी कशाला ? " संजना त्याला वेडावत म्हणाली. 


"तु गप गं ! त्याला भावना पोहोचल्या ना ? ते महत्वाचं ! " विकीसुद्धा तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला. 


"अरे ए ! आज एवढा मस्त दिवस आहे. कशाला भांडताय ? तुम्ही दोघे पण एकदम क्लास दिसताय. संजू तू तर फार गोड दिसतेय आज ! बघणारा चांगलाच फसणार आहे. " अमय हसू दाबत म्हणाला. 


"थँक यु ! एक मिनिट, काय म्हणालास तू ?" संजना त्याला अजून काहीतरी बोलणार इतक्यात दिशा तिथे आली होती. 

            आजूबाजूच्या नजरा जरा तिच्यावर जास्तच जाणवत होत्या. ती फक्त सर्वांना रिटर्न स्माईल देत या तिघांजवळ आली. गडद लाल रंगाची वेलवेटची साडी आणि त्याला काळ्या रंगाची किनार. सावळ्या वर्णाची, बोलके डोळे असणारी, कमरेपर्यंत पोहोचतील इतके लांबसडक आणि स्ट्रेट केस असलेली दिशा मुळातच दिसायला सुंदर होती. दिशा त्यांच्याजवळ आली. अमय आणि दिशाने एकमेकांच्या हातात हात गुंफले. 


"अरे वा, ठरवून आलेलात वाटत !" विकी त्या दोघांच्या कपड्यांच्या मॅच होणाऱ्या रंगाकडे पाहून भलताच खुश दिसत होता. 


"हा मग. त्याला कपल वाइब्ज म्हणतात मित्रा. ज्याच्याशी तुझा फार दूरचा पण संबंध नाही." अमय. 


"ए असं कसं ? आहे ना माझा संबंध. ह्या इतक्या साऱ्या जणी.." विकीला वाक्य पूर्ण करायला मिळालंच नाही. 


"ह्या इतक्या साऱ्याजणींतील एकसुद्धा तुझ्याकडे पाहत नाही आहे. " संजना हसत म्हणाली. 


"ए संजू, गप गं. काही नाही रे विकी, असेल तुझी पण गर्लफ्रेंड कधीतरी !" दिशाही हसू आवरत बोलत होती. 


तसा विकी रागाने लालेलाल झाला होता. 


"यार ते सोड. आपल्या कॉलेज फ्रेंड्सच्या ग्रुपवर हे मेसेज बघ. सगळीकडे फक्त \"अदिशा\"च्या लुकची चर्चा आहे. " संजना मोबाईलवर मेसेज पाहत सांगत होती. 


"अदिशा ? ह्या नावाची पण मुलगी आहे आपल्या क्लासमध्ये ? मला कशी नाही माहित ? " अमय विचार करू लागला. 

तसा दिशाने डोक्याला हात लावला. 


"अरे अमय, अदिशा हे कपल नेम तयार केलंय त्यांनी. अमय आणि दिशा, म्हणजे अदिशा ! " दिशा त्याला हळू आवाजात सांगत होती. 


"अज्ञानी माणूस ! कुठून येऊन पडलास रे तू आमच्यात ?" आता हसण्याची टर्न विकीची होती. 


"ए गप रहा विकी. तो नसतो जास्त सोशल मीडियावर. हे कपल वाइब्ज पण एकदा मीच सांगितलेलं त्याला. पण तो विसरला परत. " दिशा. 


"वा. भलतीच प्रगती आहे म्हणजे ! " संजना.


"बर. उरका. सेन्डऑफ आज अटेंड करायचा आहे. तुम्ही काय दिवसभर इथे गप्पा मारत बसाल. " अमय. 


              सर्वजण सभागृहात निघाले होते. दिशा आणि अमय हातात हात गुंफूनच चालत होते. आजूबाजूला चालणारी मुलंही त्यांच्याबाबतच कुजबुजत होती. ते ऐकून अमय आणि दिशाच्या चेहऱ्यावर मात्र गोड हसू उमटलं होतं. सेन्डऑफचा कार्यक्रम झाल्यानंतर संजना, विकी, अमय आणि दिशा बाहेर आले. 


"आता काय प्लॅन आहे ?" विकी. 


"प्लॅन कसला ? आता पार्टी करूया. " अमय. 


"कुठे ? " संजनाने डोळे वटारले. 


"ऑफकोर्स, तुझ्याच रूमवर." अमय हसत म्हणाला. 


"नाही हा अम्या. तुम्ही फक्त पार्ट्या करायला येता. नंतर ते आवरायचं कोणी ? शनिवारी आपण पार्ट्या करतो आणि दर रविवारी आई येते माझ्या रूमवर. म्हणजे शिव्या मी खायच्या. " संजनाने थेट नकार दर्शवला होता. 


"मग दिशाच्या ? " अमयकडे दुसरा पर्याय तयार होताच. 


"ए नको ए. दिशाच्या घरी काय डोकं फिरलंय तुझं ? एकतर तिचे आई बाबा फार शिस्तीचे आहेत आणि दुसरं म्हणजे त्या पुस्तकांच्या राड्यात बसून पार्टी करणार काय ? " विकी. 


             आता पर्याय संजनाच होती. कारण अमय आणि विकी हॉस्टेलला राहत होते. तिथे पार्टी करणं तर दूरच, मुलींना हॉस्टेलमध्ये प्रवेश पण नव्हता. अगदी बहिणही असेल तरी बाहेर जाऊन भेटायचं. 


"संजू,यार.." विकीने खूपच गरीब चेहरा करून तिच्याकडे पाहिलं. 


"नाही. " संजना. 


"संजू, दिशासाठी. आम्ही दूर जाणार आहोत त्याचा तुला काही फरक नाही पडणार. पण दिशा कधी नव्हे ती पार्टीला यायला तयार झाली आहे. परत कुठे भेटणार ना आपण असे पार्टीला ? " अमय. 


"ए, माझ्यासाठी काय ? माझ्या नावावर बिल फाडतोयस तू ?" दिशा अमयला चापटी मारत म्हणाली. 


"श्श..! तू मजा तर बघ. तुझ्या नावावर काहीही ऐकेल ती. " अमय हळू आवाजात दिशाच्या कानात बोलला. 


"हा चालेल. फक्त दिशासाठी चालेल. पण एका अटीवर. नंतर तुम्ही सगळ्यांनी मला सगळं आवरायला मदत करायची. " संजना. 


"ओके. मी पहिला असेन मदत करायला. " विकी तिला दात दाखवत म्हणाला. 


"चला. निघूया मग. भेटूया नऊ वाजता संजूच्या रूमवर ! " अमय. 

             संजनाने तिची ऍक्टिव्हा आणली होती. विकी आणि अमय तर बाईकवरून जाणार होते हॉस्टेलला. जीवाला धोका नकोच म्हणून संजनासोबत न जाता दिशा रिक्षाने घरी जाणार होती. संध्याकाळी ते पुन्हा भेटणार होते. एकमेकांना निरोप देण्यासाठी !


क्रमशः. 


© तनुजा प्रभुदेसाई. 

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//