पूर्वावलोकन
आतापर्यंत आपण बघितलं अनु फार गरीब घरातील मुलगी आहे व तानिया एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. तानियावर तिची आई सतत बंधनं घालत असते तर तिचे नेहमी घराबाहेर राहणारे बाबा मात्र तिच्यातील मनसोक्तपणाला जपत असतात. अनुला तानियाचा थाटातील वाढदिवस बघून स्वतः च्या परिस्थितीबद्दल खंत वाटत आहे.
आता पुढे
तानिया खूप खुश होती. अनु मात्र थोडीशी उदास होती. कधीकधी माणसाला दुसऱ्याचं जीवन आपल्यापेक्षा खूप चांगलं आहे याची जाणीव व आपल्याला का ते सर्व नाही मिळालं? हा प्रश्न उदास करून टाकतो. अनुबरोबर तेच घडत होतं. तिला आठवलं तिची आई तानियावर रागवत होती. पण अनुची आई सुद्धा अनु वर कधीकधी रागवायची ना. मंग जर दुःखं सारखी मिळाली असतील तर सुखं वेगवेगळी का?
तानियाची आई म्हणाली, "चला सगळे जण बसा आता. तानिया तुम्हाला पोएम ऐकवणार आहे."
तानिया थोडीशी गंभीर झाली. तिला भीती वाटत होती की काही चुकलं तर! सर्वजण बसले. सर्वजण तिच्या बोलण्याची वाट बघत होते. ती सर्वांसमोर येऊन उभी राहिली.
तिने सुरुवात केली,
"धिस ईज द मॅप ऑफ
टायनी टाऊन
द टायनी रोड्स गो
अप अँड डाऊन."
ती थोडं थांबली. तिची आई म्हणाली, "हो बाळा पुढे."
ती पुढे बोलली,
"सम गो राईट अँड
सम गो लेफ्ट
द अँरोज पॉईंट टू
ईस्ट अँड वेस्ट."
तिला पुढे आठवेना. तिने डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न केला. तिला आठवत नव्हतं. ती भीतीने किंचित थरथरली.
तेवढ्यात अनु बोलली, "बिल्डिंग्स, ब्रिजेस."
सगळे अनुकडे बघू लागले. बऱ्याच जणांना तिला बघून हे मान्य होत नव्हतं की तिला पोएम येत असावी. कुणाच्या दिसण्यावरून थोडीच कुणाची बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व कळतं? ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं. तानिया खुश झाली. तिला सर्व आठवलं. ती अनुकडे बघून हसली. सर्वजण परत तानियाकडे बघू लागले.
ती पुढे बोलू लागली,
"बिल्डिंग्स, ब्रिजेस,
अ मार्केट अँड अ मिल,
गार्डन्स, फील्डस,
अ स्कुल अँड अ हिल.
व्हेअर वूड यु स्टार्ट?
हाऊ विल यु गो?
इफ यु चुस द प्लेसेस,
द मॅप विल शो."
सर्वजण टाळ्या वाजवू लागले. तानियाची नजर अनुला शोधू लागली. पण गर्दीमुळे तिला ती दिसली नाही. ती नंतर फोटो वगैरे काढण्यात व्यस्त झाली. तेवढ्यात मिसेस शिंदे तानियाच्या आईसमोर आल्या. त्यांनी हसून त्यांचं स्वागत केलं.
मिसेस शिंदे म्हणाल्या, "मानावं लागेल हा मिसेस दानवे. फार छान अरेंजमेंट केली आहे तुम्ही."
मिसेस दानवे म्हणाल्या, "हो. तुमची मुलगी रिया दिसत नाहीये!"
मिसेस शिंदे म्हणाल्या, "तानियाला विष केल्यानंतर ती लगेच निघून गेली. खूप स्टडीयस आहे ना ती. आठवतंय ना लास्ट टाइम क्लासमध्ये प्रथम आली होती! समर व्हॅकेशन मध्येही चालूच अहे तिचं. तानियाला किती पर्सेंट आले होते?"
त्या थोडयाश्या गंभीर झाल्या. चेहऱ्यावरील आनंद मावळला.
त्या म्हणाल्या, "तुम्ही काही घेतलंच नाही. वेटर कोल्ड्रिंक्स द्या. थांबा मी येते हा."
मिसेस शिंदेनी क्लेशात्मक हास्य केलं. मिसेस दानवे दुःखी होत्या. तानिया अभ्यासात थोडी कच्ची होती. हा प्रॉब्लेम फक्त तिच्या आईचा नव्हता तो बऱ्याच पालकांचा होता. आपल्याकडे अभ्यासावरूनच मुलांची गुणवत्ता ठरवली जाते. आर्टस्, स्पोर्ट्स या गोष्टी कुठं बघितल्या जातात? त्यामुळे बरेच पालक मुलांवर त्यांच्या अपेक्षांचं ओझं टाकतात. त्यामुळे ही नाजूक फुलं कोमेजून जातात.
हळूहळू सर्वजण घरी परतले. तानियाचे बाबा पण निघून गेले. अनु व तिचे बाबा पण पैसे घेऊन निघून गेले. अनुची आई सगळं आवरून घरी गेली. तानियाची आई रूममध्ये आली. तिने बघितलं तानिया गिफ्ट्स मधे आलेला व्हिडिओगेम खेळत होती. तिला मिसेस शिंदेचं बोलणं आठवलं. तिला राग आला. तिने ती व्हिडिओगेम हिसकावून घेतला. तानिया केविलवाण्या चेहऱ्याने आईकडे बघू लागली.
ती म्हणाली, "नेहमी टाईमपास करत असतेस तू. तुला माहित आहे ना तू स्टडीमध्ये वीक आहेस? मंग स्टडी करत जा ना. लास्ट टाइम फक्त 52% आले होते!"
तानिया म्हणाली, "पण आई आता तर सुट्ट्या आहेत ना? माझा वाढदिवस पण आहे आज."
ती म्हणाली, "सुट्ट्या आहेत म्हणून काय झालं? ती रिया बघ सतत अभ्यास करत असते आणि पोएम म्हणतांना मधेच अडखळली कशी होतीस तू? नीट लर्न केली नव्हती का?"
तानिया म्हणाली, "सॉरी आई. ते आठवतच नव्हतं. पण नंतर आठवली होती ना."
ती म्हणाली, "त्या मुलीने सांगितलं म्हणून! बस आता जास्त टाईमपास नको. पुढच्या वर्षीचा अभ्यास सुरु करून दे. परवा निकाल आहे ना तुझा? बघू आता किती येतात तर. कमी येउदे मंग सांगते तुला."
ती घाबरली. तिला तिच्या बाबांची खूप आठवण येऊ लागली. तिला निकाल काय लागतो याची चिंता वाटू लागली. इकडे अनुचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तानियाच्या घरी उरलेला केक व नाश्ता वगैरे अनुची आई घेऊन आली होती. अनुचाही वाढदिवस मागच्या पेक्षा चांगला झाला. तिचे आईबाबा पण खुश होते. तिच्या बाबांनी तिला बर्थडे गिफ्ट साठी पाच रुपये दिले. तिने ते पाच रुपये कंपास मधे ठेवण्यासाठी कंपास उघडला. त्यात एक-दोन रुपयाचे नाणे होते. तिने ते मोजले. एक-दोन. पाच रुपये होते आणि आता हे पाच. दहा रुपये झाले. तिने कंपास बंद केला व तो तिच्या शाळेच्या पिशवीमध्ये ठेऊन दिला.
तिने कॅडबरी काढली. त्याचे छोटे-छोटे तुकडे आईबाबांना दिले.
तिच्या आईने विचारलं, "अगं ही कुणी दिली?"
ती सांगू लागली, "ते तानियाने दिली. मी तिला मदत केली होती ना!"
तिची आई म्हणाली, "बरं."
ती नंतर तिच्या आईच्या कुशीत झोपली. इकडे तानिया चिंतेत होती. जर कमी मार्क आले तर? तिला झोप लागेना.
अनुने आईला विचारलं, "आई तू माझ्यावर कधीच रागावणार नाहीस ना?"
तिची आई म्हणाली, "तू मला त्रास दिला तर रागावेल पण आणि मारेल पण."
ती म्हणाली, "मी कुठं त्रास देते? "
तिची आई म्हणाली, "झोप आता."
ती शांतपणे झोपी गेली.
पुढील भाग लवकरच.
आवडल्यास share नक्की करा. तसेच कथा कशी वाटतेय? पुढील भागासाठी उत्सुक आहात का? ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा.
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा