दिसतं तसं नसतं ( भाग - 1 )

A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next

सकाळची वेळ होती. सूर्यप्रकाश मंद होता. एक काळ्या कलरची चमचम करणारी कार अनुच्या समोरून गेली. अनुची नजर त्या कारवरच खिळून राहिली. थोडं समोर जात ती कार थांबली. त्या कारचा दरवाजा उघडला. त्यातून एक अनुच्याच वयाची मुलगी बाहेर पडली. तिने पांढराशुभ्र फ्रॉक घातलेला होता. कानात सोन्याच्या बाळ्या होत्या. हातात ब्रेसलेट होतं. पायात छान गुलाबी कलरची सॅन्डल होती. तिचे केस पण किती नीटनेटके होते! अनुने तिच्या पुस्तकामध्ये जशी परी बघितली होती अगदी तशीच होती ती. तिच्यामागून तिची आई पण कारमधून उतरली व त्या मुलीला घेऊन समोर असलेल्या दुकानात गेली. अनु त्या दुकानाकडे बघू लागली. काचाने बनलेलं होतं ते दुकान. वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईनच्या, रंगाच्या चपला, सॅन्डल, बूट तिथे ठेवलेले होते. अनु त्या मोठ्या दुकानाकडे बघतच राहिली.

तिने नजर हटवली. तिने बघितलं तिचे बाबा फुग्यांमध्ये हवा भरत होते. त्यांच्यासमोर बरीच मुलं जमलेली होती. त्यांनी त्यांची सायकल स्टॅन्ड वर लावलेली होती. अजून थोडा वेळ त्यांना थांबावं लागणार होतं. सर्व मुलांना फुगे विकल्यानंतर ते दोघे पुढे जाणार होते. अनुला बाहेर फिरण्याची फार आवड. त्यामुळेच आज शाळेला सुट्टी असल्याने ती बाबांसोबत आली होती.

थोड्या वेळाने तिने बघितलं, ती मुलगी व तिची आई दुकानाबाहेर आले होते. अनुने परत तिच्या ड्रेसकडे बघितलं. नंतर तिने तिच्या फ्रॉककडे बघितलं. त्याचा रंग फिकट पडलेला होता. त्याला छिद्र पण पडलेले होते. तिला त्या मुलीचा हेवा वाटू लागला. ती विचार करू लागली की, देवबाप्पाने सगळ्यांना सारखं का दिलं नसावं? कुणाला जास्त आणि कुणाला कमी का दिलं असावं? तिने मागच्या जन्मात नक्कीच काही वाईट काम केलं असेल कदाचित. तिने गोष्टींमध्ये ऐकलं होतं. या जन्मातील कर्माची शिक्षा व फळ पुढच्या जन्मात मिळतं.

ती स्वतःशीच म्हणाली, "नाही रे बाबा. आता मी वाईट काम नाही करणार. चांगलेच काम करणार. मंग मलाही पुढच्या जन्मात तिच्यासारखे कपडे, सॅन्डल घालायला मिळतील."

त्या मुलीने निळ्या कलरची सॅन्डल विकत घेतली होती. तिच्या आईने बॉक्समधील सॅन्डल तिला घातली. तिने तिची जुनी सॅन्डल व बॉक्स तिथेच सोडून दिला. त्या दोघी कारमध्ये बसून निघून गेल्या. अनु त्या सॅन्डल कडेच बघत होती.

तिचे बाबा म्हणाले, "चल अनु. कुठे हरवलीस?"

तिने बघितलं सर्व मुलं फुगे विकत घेऊन निघून गेली होती. तिच्या बाबांनी सायकल चं स्टॅन्ड पण काढलं होतं. ते निघायच्या तयारीत होते.

ती म्हणाली, "थांबा बाबा दोन मिनिट."

ती धावत त्या सॅन्डल पाशी गेली. तिने कुणी बघत तर नाहीये ना याची खात्री करून घेतली व ती सॅन्डल व बॉक्स घेऊन ती तिच्या बाबांकडे परत आली.

तिचे बाबा म्हणाले, "अनु अशी दुसऱ्या कुणाची वस्तू चोरू नये बाळा. जा परत ठेऊन ये."

ती म्हणाली, "नाही बाबा. मी चोरी नाही केली. एका मुलीने ती सॅन्डल फेकून दिली होती. तीच मी घेतली. ती सॅन्डल तिला नको होती."

तिचे बाबा म्हणाले, "अच्छा. मंग ठीक आहे. चल."

ती म्हणाली, "हो."

ते चालू लागले. चालता-चालता अनुने बघितलं की ते एका मोठया बंगल्यासमोर येऊन थांबले. तिचे बाबा त्या बंगल्यामध्ये तिला घेऊन जात होते. त्यांना वाचमनने अडवलं.

तो म्हणाला, "काय काम आहे?"

तिचे बाबा त्यांना काहीतरी म्हणाले. नंतर त्यांनी त्या दोघांना आत जाऊ दिलं. अनुने बघितलं, खूप मोठं घर होतं ते. घरासमोरच एक छोटासा बगीचा होता. त्यात गवत उगलेलं होतं. हिरवगार गवत व छान रंगीबेरंगी फुलं पण होती. एक व्यक्ती हातात नळी घेऊन तेथे पाणी सोडत होती.

तिने विचारलं, "बाबा हे कुणाचं घर आहे? आपण कशासाठी आलो आहोत येथे?"

ते उत्तरले, "बाळा हे एका श्रीमंत माणसाचं घर आहे. त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्याला फुग्यांची ऑर्डर दिली आहे. आपण त्यांचं घर सजवणार आहोत. तुझी आई पण इथंच काम करते. तिच्या बोलण्यावरूनच आपल्याला हे काम मिळालं आहे. चल जास्त प्रश्न नको करू. मला मदत कर आता."

ती म्हणाली, "हो बाबा."

ती विचार करू लागली. आई एवढ्या मोठ्या घरात काम करते! नंतर तिचे बाबा सायकल बाहेर लावून हवा भरण्याचा पंप घेऊन तिला आत घेऊन गेले. तिने तो बॉक्स सायकलवरच ठेवला.

तिने बघितलं खूप मोठा हॉल होता त्यांचा. त्या हॉलच्या मध्यभागी एक काचेचा टेबल ठेवलेला होता. त्यावर खूप मोठा केक ठेवलेला होता. त्यावर लिहिलेलं होतं, 'हॅपी बर्थडे तानिया.' आज अनुचा पण वाढदिवस होता. ती विचार करू लागली की ती छोट्या केक मध्ये पण खुश झाली असती पण तेवढंही तिच्या नशिबात नव्हतं.

ती पॅकेट मधून एक-एक फुगा काढून तिच्या बाबांच्या हाती देऊ लागली. तिचे बाबा त्यांत हवा भरू लागले. हवेने इकडे तिकडे पळणारे फुगे पण ती उचलून परत एका जागी गोळा करू लागली. थोड्या वेळानंतर तिची नजर तानियावर पडली. तिला आठवलं ही तर तीच मुलगी होती जिला तिने सकाळी बघितलं होतं. ती पायऱ्यांवरून वर जाऊन लागली होती. ती अचानक दचकली. खूप मोठा आवाज तिच्या कानांवर पडला होता. तिने बघितलं तिच्या बाबांकडून चुकून एक फुगा फुटला होता. तानिया पण दचकली होती. तेवढ्यात तिची आई धावत बाहेर आली व ती अनुच्या बाबांवर ओरडू लागली.

ती म्हणाली, "अहो दादा. जरा हळू ना. लहान मुलं येणार आहेत आज घरामध्ये. तसेच तानिया पण आहे. तुम्हाला कळत नाही का? किती घाबरली ती!"

तिने तानियाला जवळ घेतलं व तिला वर घेऊन जाऊ लागली. तिचे बाबा चुपचाप ऐकून घेत माफी मागत होते. थोड्या वेळाने अनु बाबांना म्हणाली.

"बाबा तुम्ही चुपचाप सगळं ऐकून का घेतलं, त्या काकू इतक्या ओरडल्या तरी?"

ते उत्तरले, "बाळा ते श्रीमंत आहेत. ते आपल्याला पैसे देणार आहेत. तसंही चूक तर माझीच होती ना."

ती म्हणाली, "हो पण तुम्ही मुद्दाम थोडीच केलं?"

ते म्हणाले, "जाऊदे ना अनु. तू मला मदत कर."

तिला जाणवलं की चूक तिच्या बाबांचीच होती. तरीही त्यांचं एवढं ओरडणं तिला खटकू लागलं. एकच शब्द तिच्या बालमनात फिरू लागला. 'श्रीमंत '. श्रीमंत लोकांचं जीवन मस्त असतं ना. छान कपडे, सॅन्डल, घर, केक. सगळं छानछान मिळतं श्रीमंत लोकांना. वरून कुणी त्यांना काही बोलू पण शकत नाही. ती विचार करू लागली.

तिने विचारलं, "बाबा श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागतं?"

तिच्या मनात काय चाललं होतं हे ते समजू शकत होते. तिच्या प्रश्नाचं त्यांना आश्चर्य व कौतुक दोन्ही वाटलं. असं म्हणतात की स्वप्नं काहीही घडवून आणू शकतात. तिला काय उत्तर द्यावं याचा ते विचार करू लागले.

पुढील भाग लवकरच.

आवडल्यास share नक्की करा.

©Akash Gadhave

🎭 Series Post

View all