पुर्वावलोकन
अनुच्या मनात रुजलं आहे की गरिबांच्या जीवनात कष्ट, दुःखं असतात तर श्रीमंत लोक चांगले जीवन जगतात. त्यामुळे तिची श्रीमंत होण्याची ईच्छा तीव्र होत आहे. पण तिला माहितच नाही की दुःखं सगळ्यांच्याच वाट्याला येत असतात. खरंच श्रीमंत झाल्यावर तिचे सगळे प्रश्न सुटतील का? ती श्रीमंत होईल का? बघुयात.आता पुढे
तानिया रूममध्ये बसलेली होती. अनुही तेथे आली. दोघी अभ्यास करायला लागल्या. अनु यायच्या अगोदरच सकाळी देशपांडे सर तानियाचे ट्युशन घ्यायला आले होते. त्यांनी तिला होमवर्क दिला होता. तो पूर्ण करण्यात अनुने तिला मदत केली. ती खुश होती. ती विचार करू लागली, जर तिला सरांनी शाबासकी दिली किंवा कौतुक केलं तर तिच्या आईच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य नक्की येईल. ते बघून तिलाही बरं वाटेल. बऱ्याच वेळा आपण मोठ्या आनंदाच्या शोधात अश्या छोट्या आनंदांना दुर्लक्षित करतो. पण थेंबाथेंबाने तळे साचते ना! तसंच छोटेछोटे आनंदाचे क्षण जीवन बहरून टाकतात. त्यांना दुर्लक्षित केल्याने जीवन दुःखमय होते.
तेवढ्यात कुणीतरी तानियाला आवाज दिला. तानिया व अनु दोघींनी वळून बघितलं. तो अर्णव होता. तानिया अर्णवला बघून खुश झाली. तो तिचा बेस्ट फ्रेंड होता. जरी तो एका वर्षाने मोठा असला तरी त्या दोघांची छान गट्टी जमायची.
अर्णव म्हणाला, "चल काहीतरी खेळूया."
ती अनुचा हात पकडून उभी राहिली. अर्णवने अनुकडे बघितलं.
तो म्हणाला, "ही अनुच ना? हिनेच तुला मदत केली होती ना? "
तानियाने मान हलवली. अनुही थोडंसं हसली.
तो म्हणाला, "हिला पण घे सोबत. तिघांमध्ये जास्त मज्जा येईल. चला पटकन तुमचं सामान उचलून ठेवा."
त्यांनी त्यांची पुस्तकं उचलून ठेवली. ते खेळायला जायच्या तयारीत होते. तेवढ्यात रूममध्ये तानियाच्या आईचे आगमन झाले. त्यांनी सर्वांना अडवले.
त्या म्हणाल्या, "अरेअरे, कुठे निघाले सगळे? खेळायला? तानिया तुझा होमवर्क पूर्ण झाला का?"
तानिया म्हणाली, "होमवर्क सुद्धा पूर्ण झाला आणि पुढच्या भागाचं वाचन सुद्धा झालं व मागील भागाचा सराव पण."
त्या खुश झाल्या. त्यांना जाणवलं की अनुमुळे तानियाच्या अभ्यासात सुधारणा होत आहे. त्यांनी तिचा होमवर्क बघितला. तिने खरंच पूर्ण होमवर्क केलेला होता. त्यांनी सर्वांना जाऊ दिलं.
त्या म्हणाल्या, "रोडवर जाऊ नका फक्त."
ते हो म्हणत गायब झाले. ते लपंडाव खेळू लागले. तिघेही खेळाची मजा घेऊ लागले. खेळतांना त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली. अनु गरीब आहे, तिचे कपडे, तिचं राहणीमान ह्या गोष्टी बाजूला सारल्या गेल्या होत्या. ते सर्व एकमेकांसाठी समान होते. कोणताही उच्चनीच भाव त्यांच्या मनात नव्हता. त्यांच्यामध्ये काही होतं तर ती होती फक्त निखळ मैत्री. हीच निरागसता सर्वांमध्ये आली तर? किती छान होईल ना!
तानियाने बघितलं तिची आई त्यांना बाल्कनीतून बघत होती. पण त्या आनंदी दिसत होत्या. तानियाला खूप बरं वाटलं. आज त्यांनी तिला खेळायला जाण्यापासून अडवलं देखील नाही. त्या तिच्यावर ओरडल्या देखील नाही. तिने आज अभ्यास पूर्ण केला होता ना. हे सगळं अनुमुळे शक्य झालं होतं.
ती म्हणाली, "अनु थँक्यू. तुझ्यामुळे मला खूप मदत झाली. माझा अभ्यास वेळेवर पूर्ण देखील झाला. तसेच खेळण्यात पण मज्जा आली. तू खूप चांगली मुलगी आहेस. तू रोज येशील ना खेळायला?"
अनु उत्तरली, "हो मी रोज येईन. मला पण तुमच्याबरोबर खेळण्यात खूप मज्जा आली. तसंही तुला मदत करता-करता माझाही अभ्यास होतच आहे पुढच्या इयत्तेचा."
अनुला तानियाने मिठीच मारली. नंतर अनुच्या आईने तिला आवाज दिला. ती या दोघांना बाय करून निघून गेली. अंधार पडू लागला होता. अर्णवही तिला बाय करून निघून गेला. तानिया घरात परतली.
तिने टीव्ही सुरु केली. ती तिचं आवडतं कार्टून बघू लागली. ती आज खूपच आनंदात होती. मागून तिची आई आली. तिला वाटलं आता तिची आई टीव्ही बंद करेल. पण त्या काहीही बोलल्या नाही. तिला नवल वाटलं व आनंदही झाला. ती विचार करू लागली की तिने फक्त एक दिवस चांगला अभ्यास केला, सर्व होमवर्क पूर्ण केला तर तिच्या आईच्या वागण्यात एवढा फरक जाणवला. ती विचार करू लागली की अभ्यास करणाऱ्या मुलांचे त्यांच्या आया किती लाड करत असतील ना! त्यांना जे करायचं ते करू देत असतील. त्यांच्यावर कधीही ओरडत नसतील. अनु तर किती हुशार आहे! तिची आई तिचे किती लाड करत असेल! तिचं जीवन किती मस्त आहे ना! तिला तो प्रसंग आठवला जेव्हा अनुची आई तिचं कौतुक करत होती. अनुची आई किती आनंदात होती व अनुही. ती अनुच्या डोक्यावर हात फिरवत होती. आपण जर इतके हुशार असतो तर? तर किती छान झालं असतं ना! अनु खूप लकी आहे.
नंतर तानिया झोपी गेली. तिला सकाळी लवकर उठायचं होतं ना. देशपांडे सर येणार होते तिचं ट्युशन घ्यायला. अनु अंथरुणात पडून लॉटरीचं तिकीट हातात घेऊन त्याकडे बघत होती. ती विचार करत होती, आपणही तानियासारखं श्रीमंत होऊ शकू का? नंतर ते तिकीट ठेऊन ती झोपी गेली.
क्रमश.
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा