पुर्वावलोकन
अनु गरीब घरातील असून तिची श्रीमंत होण्याची ईच्छा आहे तर तानिया श्रीमंत घरातील असून तिची अभ्यासात हुशार होऊन आईकडून लाड मिळवण्याची ईच्छा आहे. अनु आता तानियाबरोबर अभ्यास करायला येणार आहे. बघुयात तिच्याकडून काही चूक घडते काय? तानियाला अभ्यासात मदत होते का?
आता पुढे
अनुची आई अनुला तानियाच्या घरी घेऊन आली होती. अनु त्या डोळे दिपवणाऱ्या बंगल्याकडे बारकाईने बघत होती. नंतर अनु तानियाच्या रूममध्ये गेली. अनुची आई घरकाम करू लागली. तानियाची आई पण रूममध्येच होती.
त्या म्हणाल्या, "ये अनु. दोघी मिळून अभ्यास करा आता."
अनुने मान हलवली. तानियाची आई निघून गेली. अनुने नजर वर करून बघितलं तानिया तिला बघून खूप खुश झालेली होती.
तानिया म्हणाली, "ये अनु. बस."
अनुने मान हलवली. अनु फर्शीवर जाऊन बसली. तानिया उभी राहिली.
तानिया म्हणाली, "अगं अनु, वरती बस ना. खाली का बसलीस?"
अनु म्हणाली, "नाही नको. खालीच ठीक आहे."
तानिया पण तिच्या शेजारी येऊन बसली. तानियाने बघितलं की तिच्याजवळ पुस्तकं नव्हती.
तानियाने विचारलं, "अनु तू पुस्तकं नाही आणलीस?"
अनु उत्तरली, "ते शाळा उघडल्यावर मिळतात ना."
तानिया बोलली, "बरं तू माझं इंग्लिश चं पुस्तक घे. तू इंग्लिश चा अभ्यास कर मी मॅथ्स चा करते."
अनुने मान हलवली. तानियाने तिच्या हातात इंग्लिश चं पुस्तक दिलं. अनुने बघितलं त्यांचा टीव्ही खूप मोठा होता. अनुला तिची रूम थंड जाणवली. तिने वर बघितलं फॅन तर बंद होता. तिला नवल वाटलं फॅन बंद असूनही रूम थंड कशी? तिला ए. सी काय असते हे माहित देखील नव्हतं! तिने पुस्तक उघडलं. अभ्यासाला सुरुवात केली.
बऱ्याच वेळानंतर तानियाने अनुला विचारलं, "अनु यापुढचं जमतच नाहीए. मदत करशील का थोडी. तसेच मी अँडिशन बरोबर केलेत का ते बघ बरं."
अनुने तिचं बुक हातात घेतलं. तिने थोडा वेळ बारकाईने निरीक्षण केलं.
नंतर ती बोलू लागली, "काही उत्तरं बरोबर आहेत व काही चुकली आहेत."
तानिया म्हणाली, "सांग ना मला काय चुकलं तर आणि त्याला बरोबर कसं करायचं ते पण सांग. शाळेत कुणाला विचारलं तर ते म्हणतात की एवढं पण येत नाही का तुला? माझ्यावर हसतात! तू चांगली आहेस. तू तरी मदत करशील ना?"
अनु म्हणाली," हो करेल ना मी मदत. तू असं वाईट वाटून घेत जाऊ नकोस. आमच्या मॅडम म्हणतात, "हसतील त्याचे दात दिसतील." तसंही ज्ञान दिल्याने वाढत असतं ना. मंग. हे बघ हे तीन नंबरचं उदाहरण बघ. इथं मोठी संख्या मायनस आहे म्हणून उत्तरात मायनस येईल."
तानियाने खोडरबरने तिचं उत्तर खोडून त्याला बरोबर केलं. ती खूप आनंदित होती. तिच्याशी असं प्रेमाने तिच्या बाबा व तिचा मित्र अर्णव नंतर पहिल्यांदाच कुणी बोलत होतं. तिला ती गरीब होती, तिचे कपडे चांगले नव्हते या गोष्टींशी काहीही देणंघेणं नव्हतं. मैत्रीत हे सगळं थोडीच बघितलं जातं. तिला निखळ मैत्री हवी होती. पुढे अनु तिला समजावू लागली. तानिया सुद्धा जिज्ञासेने समजून घेऊ लागली. तिला तिच्या शिक्षकांकडून शिकण्यापेक्षा अनुकडून शिकणं आवडू लागलं. शिक्षक तिला शिक्षा करत होते. तिच्यावर रागावत होते. पण अनु काही तिला शिक्षा करणार नव्हती.
अनु म्हणाली, "या पुढचं मलाही माहित नाहीए. मला अगोदर ते वाचून समजून घ्यावं लागेल. नंतर मी तुला समजावेल. ठीक आहे?"
तानियाने मान हलवली. तेवढ्यात तेथे अनुची आई आली.
त्या म्हणाल्या, "चला जेवण तयार झालेलं आहे. जेवण करून घ्या. अनु मी तुझं जेवण पण सोबत आणलं आहे. तू पण चल माझ्याबरोबर. मी अगोदर तानिया व तिच्या आईला वाढून देते मंग आपण जेवूत."
दोघी मुली उठल्या. तानिया व तानियाची आई डायनिंग टेबलवर विराजमान झाल्या. अनुची आई त्यांना स्वयंपाक वाढू लागली. चमचमणारे ताट व वाट्या. त्यामध्ये त्यांनी गरमगरम व नरमनरम पुऱ्या वाढल्या. नंतर बटाट्याची भाजी वाढली. त्या जेवणाचा सुगंध तेथे दरवळू लागला. नंतर त्यांनी साजूक तुपात बनवलेला शिरा वाढला. त्या दोघींनी जेवायला सुरुवात केली.
अनुची आई अनुला घेऊन किचनमध्ये आली. त्यांनी तिला एका कोपऱ्यात बसवलं. त्यांनी नंतर कापडात बांधलेल्या पोळ्या काढल्या. भाजी तर नव्हती. त्यांनी एका पोळीवर चटणी टाकलेली होती. त्यांनी पोळी तिच्या हातात दिली. ही विषमता तिच्या बालमनाला ढवळत होती. असं का होतं? देव सर्वांना सारखं का देत नाही? असे प्रश्न तिला नेहमी सतावत होते.
तिने पोटभर जेवण केलं. ती उठून परत अभ्यासासाठी तानियाच्या रूममध्ये जाण्यासाठी वळली. तिच्या आईचं जेवण अगोदरच उरकलं होतं. त्या आता फर्शी पुसत होत्या. त्या राहून-राहून पाठीवर हात ठेवत होत्या. पाठीवर ताण देत होत्या. अनुला कळलं नक्कीच तिच्या आईची पाठ दुखत असणार. आईच्या वेदना तिला जाणवत होत्या. तरीसुद्धा तिची आई कामात खंड पडू देत नव्हती. त्या सतत कामच करत होत्या. तिने नजर वळवली. तानियाची आई सोफ्यावर टेकून बसलेली होती. त्यांनी चेहऱ्यावर काहीतरी पांढऱ्या रंगाचं लावलं होतं. तसेच डोळ्यांवर कापलेली काकडी ठेवलेली होती. तिला ते काय आहे हे कळलं नाही. मात्र तिच्या मनात श्रीमंतांचं आयुष्य चांगलं असतं व गरिबांचं आयुष्य कष्टाचं, दुःखाचं असतं, ही गोष्ट रुजली होती. आपण श्रीमंत व्हायलाच हवं अशी तीव्र इच्छा तिच्या मनात घर करून बसली होती. तसंच आपण श्रीमंत होऊत का? असे प्रश्न तिच्या मनात असुरक्षितता वाढवत होते.
तिला आठवलं तिने लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. तिला जर एक कोटीचं बक्षीस मिळालं तर तिचे सर्व प्रश्न सुटतील. निदान बरेच प्रश्न सुटतील, असं तिला वाटत होतं. पण मुळात तिला जाणीवच नव्हती की दुःख सगळ्यांच्याच वाट्याला येत असतं. तिला अजून जग बघायचं होतं. तिला प्रश्न पडला जर लॉटरी नाही लागली तर? तर मात्र दुसरे मार्ग शोधावे लागतील. ती तानियाच्या रूमच्या दिशेने चालू लागली.