दिसतं तसं नसतं ( भाग - 5 )

A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next

पुर्वावलोकन

आपण आतापर्यंत बघितलं की अनु गरीब घरातील असून तानिया श्रीमंत घरातील मुलगी आहे. तानिया अभ्यासात थोडीशी कच्ची आहे. तिची आई सतत तिच्यावर बंधनं घालत असते. तिच्या आईने तिला 'कमी मार्क आले तर बघ ', अशी धमकी देखील दिली आहे. त्यामुळे ती थोडी चिंतेत आहे. इकडे अनुला तानियाचं जीवन तिच्यापेक्षा चांगलं आहे असं वाटतं. त्यामुळे तिच्या मनात श्रीमंत होण्याची तीव्र ईच्छा आहे.

आता पुढे

अनु सकाळी उठली. अंघोळ वगैरे करून तयार झाली. तिने तानियाने फेकून दिलेली सॅन्डल घरी आणली होती. त्या सॅन्डल ची फक्त एक स्ट्रीप तुटली होती. आई सकाळीच कामावर गेली होती.

ती बाबांना म्हणाली, "बाबा ही सॅन्डल शिवून घ्यायची आहे. माझ्यासोबत चला ना."

तिचे बाबा म्हणाले, " बरं चल. मी जातोय कामावर. रस्त्यात बघूत आपण. "

ती बाबांसोबत चालू लागली. रस्त्यात एक चप्पल शिवणारी व्यक्ती बसलेली होती. तिच्या बाबांनी त्यांना पैसे दिले.

नंतर ते अनुला म्हणाले, "बाळा मी जातो. तू चप्पल शिवणं झाल्यावर घरी जा. गाड्या वगैरे बघून जा. ठीक आहे?"

तिने मान हलवली. तिचे बाबा निघून गेले. ती सॅन्डल कशी शिवतात ते नवलाईने बघू लागली. कसा धागा विणतात! जेणे करून दोन भाग जुळतील, हे ती बारकाईने बघत होती. नंतर तिने ती सॅन्डल पायात घातली. ती खूप खुश झाली. ती घराच्या दिशेने चालू लागली. चालता-चालता ती रस्त्यांवरील गोष्टींकडे बघू लागली. विविध दुकानांच्या, स्टॉलच्या पाट्या वाचू लागली. तिने तिचा कंपास सोबत आणला होता. तिने त्या कंपासला हातात पर्सप्रमाणे पकडलं होतं. त्यात दहा रुपये होते. तिला तिचं बर्थडे गिफ्ट विकत घ्यायचं होतं.

तिला एक पाटी दिसली. ईतर पाट्यांपेक्षा तिला या पाटीचं नवल वाटलं, त्यावर लिहिलेलं होतं,'एका भाग्यवान विजेत्याला मिळतील' व त्यासमोर एकावर खूप सारे शून्य होते. अनुला तो अंक समजायला थोडा वेळ लागला. हजार, लक्ष, दशलक्ष. बापरे, एक कोटी रुपये मिळणार! त्याच्याखाली दुसरं बक्षीस होतं पन्नास लाख त्यानंतर पंचवीस हजार व नंतर हजार, पाचशे, शंभर. तिने बघितलं ते लॉटरीचं दुकान होतं.

ती विचार करू लागली एक कोटी मध्ये किती ड्रेस, सॅन्डल येतील? खूप येतील ना! ती स्वतः लाच म्हणाली. ती त्या दुकानासमोर गेली. तिने कंपास मधील नाणे काढले. त्या दुकानदाराला कुतूहल वाटले. तिने ते दहा रुपयांचे नाणे त्यांच्या हातात दिले. त्यांनी तिला तिकीट दिलं.

तिने विचारलं, "बक्षीस कधी कळणार?"

ते म्हणाले, "चार-पाच दिवसांनी पेपर मध्ये येईल."

ती म्हणाली, "ठीक आहे."

ती तेथून निघून आली. तिने ते तिकीट जपून ठेवलं. ती घरामध्ये एकटीच होती. ती एक कोटी रुपयांत काय घ्यायचं त्याचे स्वप्नं रंगवू लागली. तिला जाणीव नव्हती की पूर्ण देशात एका व्यक्तीला ते बक्षीस मिळणार होतं. कधीकधी काही आशा ह्या खूप निरागस असतात.

तानिया टीव्हीवर तिचं फेव्हरेट कार्टून बघत होती. अचानक टीव्ही बंद झाली. तिने वळून बघितलं. तिच्या आईच्या हातात रिमोट होतं व दुसऱ्या हातात पुढच्या वर्षीची पुस्तकं होती. त्यांनी ती पुस्तकं तिच्यासमोर मांडली. ती उदास चेहऱ्याने आईकडे बघू लागली.

त्या म्हणाल्या, "तोंड नको लटकवू. चल अभ्यासाला लाग. उद्या रिजल्ट आहे ना तुझा? मला माहित आहे यावेळेसही कमीच येतील म्हणून. तसेच मी देशपांडे सरांशी तुझ्या ट्युशन बद्दल पण बोलले आहे. ते येतील रोज तुला शिकवायला."

ती म्हणाली, "आई ट्युशन नको ना प्लिज. मी खरंच चांगला अभ्यास करेन."

त्या म्हणाल्या, "मागच्या वेळेस पण असंच म्हणाली होतीस. बघुत आता काय होतं ते. जर तुला 80% च्या वर आलेत तर ट्युशन नाही लावणार. ओके?"

तिने मान हलवली. ती चिंतेत होती. 80% येतील का आपल्याला? याचा विचार करत होती. नाही आले तर? उरलेल्या सुट्टीमध्ये पण अभ्यास करावा लागेल. मागच्या वेळेस सारखं मारेल आई. तिला काय करावं ते समजेना. ती हात जोडून प्रार्थना करू लागली. तिने बघितलं आई रूममध्ये परतली होती. तिने झटकन पुस्तक हातात घेतलं.

संध्याकाळ झाली होती. अनुचे आईबाबा घरी परतले होते. तिचे बाबा बसलेले होते. काहीतरी हिशोब लावत होते. तिच्या आईला घर आवरतांना ते लॉटरीचं तिकीट सापडलं.

त्या म्हणाल्या, "अहो, हे काय आहे? तुमचं काही आहे का?"

ते म्हणाले, "नाही."

अनु म्हणाली, "माझं आहे ते. माझ्याजवळ दहा रुपये होते ना त्याचं घेतलं मी. लॉटरीचं तिकीट आहे ते. त्यावर एक कोटीचं बक्षीस आहे."

तिने ते तिकीट आईच्या हातातून काढून घेतलं. तिचे आई बाबा हसायला लागले. तिला कळालं नाही. ती गोंधळलेल्या नजरेने बघू लागली.

तिची आई म्हणाली, "अगं बाई दुसरं काही घ्यायचं होतं ना. हे कशाला घेतलं. ते एक कोटी काय पूर्ण देशात तुलाच मिळणार आहेत का? खूप नशीबवान व्यक्तीला मिळतं ते."

ती गंभीर चेहऱ्याने सर्व ऐकत होती.

ती म्हणाली, "ती नशीबवान व्यक्ती मी असले तर? मिळू शकतं ना कुणालाही. नाहीतर नाही. प्रयत्न तर करायला हवा ना!"

तिची आई शांत झाली. त्यांना वाटलं उगाच हिला दुखवायला नको.

त्या म्हणाल्या, "हो मिळू शकतं. आम्ही पण प्रार्थना करतो तुझ्यासाठी. नाही मिळालं तर नाही. प्रयत्न महत्वाचा. पण मला सांग तुला श्रीमंत का व्हायचं आहे."

ती म्हणाली, "श्रीमंत झाल्यावर मला कपडे मिळतील. छान-छान सॅन्डल मिळतील. माझ्या वाढदिवसाला मोठा केक आणता येईल."

तिची आई व बाबा कुतूहलाने ऐकू लागले. ती पण उत्साहाने सांगू लागली.

ते म्हणाले, "अजून?."

अनु म्हणाली, "बाबावर काल तानियाची आई ओरडली तसं कुणी ओरडणार नाही. आईला दुसऱ्या कुणाच्या घरी कामाला जावं लागणार नाही. आई पण तानियाच्या आईसारखं आरामात राहिल. आईला शिळी पोळी खावी लागणार नाही. आई आजारी पडल्यावर बाबांना पैश्यांसाठी कुणासमोर हात जोडावे लागणार नाही."

तिच्या आईबाबांचे चेहरे गंभीर होते. डोळे पाण्याने आच्छादले होते. घरात नीरव शांतता पसरली होती. आईने तिला अलगद जवळ घेतलं. तिला हृद्याशी लावलं. तिच्या पाठीवर मायेची थाप दिली.

त्या म्हणाल्या, "एवढी हुशार कधी झालीस गं?"

ती म्हणाली, "मी हुशारच आहे."

ते हसायला लागले.

ती पुढे म्हणाली, "आई आज लवकर झोप. उद्या शाळेत निकाल घ्यायला जायचं आहे बरं."

तिची आई म्हणाली, "हो."

क्रमश.

आवडल्यास share नक्की करा.

©Akash Gadhave 

🎭 Series Post

View all