पुर्वावलोकन
अर्नव व तानियाच्या एंगेजमेंट ची तयारी जोऱ्यात चालू आहे. अर्नव मात्र अजूनही दुविधेत आहे. त्याचं एक मन त्याला सगळं सोडून अनुला स्वीकारायला सांगत आहे तर दुसरं मन विचारत आहे की तो सगळी नाती तोडून खुश राहू शकेल का? अनुला बघायला आलेल्या राकेशच्या आईने त्यांच्याकडे सत्तर हजार रुपयांची मागणी केली आहे.
आता पुढे
राकेश व त्याचं कुटुंब निघून गेलं होतं.
"मला नाही करायचं त्याच्याशी लग्न."
"अगं अनु, असं काय बोलतेय?"
"कुठून आणणार एवढे पैसे?"
"अगं तुझं चांगलं होऊन जाईल. पैश्याची चिंता नकोस करू आम्ही बघून घेऊत."
"काही नको. मी मिळेल त्या परिस्थितीत राहून घेईन. तुम्ही नका कर्जबाजारी होऊ. कर्जाचे पैसे फेडण्यासाठी तुला म्हातारापणी पण मेहनत करावी लागेल. नाही, नको. मी गरीब घरी नांदून घेईन."
अनुचे बाबा उदास स्वरात बोलले.
"माझा हात जर चांगला असता तर...... तुझ्या लग्नाचे पैसे जमले असते. मी माझ्या अनुसाठी काहीही करू शकत नाही, याचं फार दुःख वाटत आहे."
त्यांचे डोळे ओलावले होते. अनु त्यांच्या जवळ गेली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत बोलली.
"बाबा असं नका बोलू ना. खुप काही केलं आहे तुम्ही आमच्यासाठी. तुमचा अपघात झाला ही काय तुमची चूक आहे का? तुम्ही काळजी करू नका माझ्या लग्नाची. सगळं चांगलंच होईल."
तिने त्यांच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं.
"हो बरोबर म्हणतेय गं अनु. तो नाही तर दुसरा. एवढं काय त्यांच्या पुढंपुढं करायचं!"
"हो."
त्या सर्वांच्या डोळ्यांत पाणी व चेहऱ्यावर हलकसं हास्य आलं होतं.
********************************************
एंगेजमेंट चा दिवस
********************************************
तानिया व अर्नव च्या एंगेजमेंट चा दिवस उजाडला. तानियाच्या हातावर छान मेहंदी रचली होती. तिने एंगेजमेंट साठी छान गुलाबी रंगाचा डिसाईनर घागरा घेतला होता. ती आरशासमोर बसलेली होती. तिचा मेकअप चालू होता. तिच्या पापण्यांनी काजळ साठवलं होतं. बोटांवर नेलपॉलिश लावली जात होती. कानामध्ये छान झुंबर व वेल घातले होते. हातामध्ये बांगड्या, माथ्यावर बिंदिया, गळ्यात नेकलेस सजला होता.
ती खुर्चीवरून उठली. तिची आई तिच्याकडे वरून खालपर्यंत बघून गालात हसली. त्यांनी डोळ्यातील काजळ बोटावर घेत त्याचा ठिपका तिच्या कानामागे लावला. तिच्या हनुवटीला अलगद पकडत त्या म्हणाल्या.
"खुप छान दिसतेय तू तानिया. नजर न लागो कुणाची माझ्या परीला."
ती गालात हसली व आईच्या गळ्यात पडली. तिच्या डोळ्यांत काही अश्रू जमा झाले होते.
"अगं आता नसतं रडायचं. अश्रू वाचवून ठेव. नाहीतर नंतर संपून जातील बरं."
तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं.
ईकडे अर्नव शेरवानी घालून तयार झाला होता. त्याचा चेहरा थोडासा उदास वाटत होता. तो आरशात बघत होता. त्याला त्याच्या प्रतिमेच्या बाजूला त्याच्या आईची प्रतिमा आरशात दिसली. त्याने त्याची उदासी लपवली.
"ही रिंग घे. जपून ठेव बरं. कोणत्या बोटात घालतात माहित आहे ना?"
त्याने मान हलवली.
"सांग बरं."
"अनामिकेत ना?"
"हम्म्म्म."
त्याची आई त्याच्या हातात डायमंड रिंग ठेवलेली लाल डब्बी देऊन निघून गेली. त्याचा चेहरा परत उदास पडला. तो त्या रिंगकडे बघू लागला. काही क्षणांनी त्याला त्याच्या प्रतिमेच्या बाजूला अनुची प्रतिमा दिसली. ती काहीही बोलत नव्हती. तिने त्याच्याकडे खालून वरपर्यंत बघितलं व ती अंगठा व तर्जनीने गोल बनवत त्याला इशऱ्यात सांगू लागली की तो छान दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य आलं. त्याच्या हातातील रिंग कडे बघत तिने स्वतः चा हात पुढे केला. त्याने पापण्यांची उगडझाप केली तर ती अदृश्य झाली. त्याने रिंग त्याच्या खिश्यात ठेवली. त्याचं मन परत अस्वस्थ झालं. त्याला तो खुप हतबल असल्या सारखं वाटत होतं.
सर्व पाहुणे मंडळी एंगेजमेंट हॉल मध्ये जमली होती. सर्वांच्या बोलण्याच्या आवाजाने पुर्ण हॉल गजबजला होता. तानिया मेकअप रूममध्ये थांबलेली होती. तिच्या कानांवर हॉलमध्ये चालू असलेल्या गाण्याचा आवाज पडत होता.
"मेहंदीच्या गंधाने मन दरवळले
श्वासात भास कुणाचे विरघळले
हे दुरून बघणे हळूच हसणे
हलके हलके लाजणे
नटले, सजले, मनात भरले
रूप तुझे गं चांगले
बावरी , बावरी ... बावरी ,
बावरी , बावरी , बावरी ..."
ती तयार होऊन बसलेली होती व खुप खुशही होती. ती विचार करू लागली.
"कधी येतो अर्नव? माझ्यापेक्षा त्याला जास्त वेळ लागत आहे. एवढा काय सजतोय!"
अनु शिलाई मशीन चालवत होती.
"आज त्यांची एंगेजमेंट आहे ना! चांगलं आहे. अर्नव छान शेरवानी घालून एंगेजमेंट मध्ये गेला असेल. चांगला कार्यक्रम ठेवला असेल त्यांनी. हम्म्म्म. शेवटी पैश्यावाले आहेत ते. पैसे असले की सगळं होतं."
तिच्या मनात कसलंही दुःख नव्हतं. ती स्वतःला सावरण्यात यशस्वी झाली होती. कुणीतरी दारातून येणारा प्रकाश अडवला. घरामध्ये अंधार दाटला. तिने मान वर करून बघितलं. ती व्यक्ती तिला नीट दिसत नव्हती. ती व्यक्ती समोर आली. तो अर्नव होता. त्याने छान शेरवानी घातलेली होती.
"हम्म्म्म. आता मी नाही फसणार. मला माहित आहे हा माझा भास आहे. नाहीतर काय! तो ईथे कशाला येईल? तेही शेरवानी घालून. तो तर हॉलमध्ये उभा असेल आणि त्याच्या समोर तानिया उभी असेल. त्या हॉलमध्ये खुप पाहुणे जमली असतील. तानिया पण छान सजलेली असेल. फोटोग्राफर, गाणी, डेकोरेशन सगळं जबरदस्त असेल. त्याच्या खिशात एका लाल डब्बीत छान डायमंड रिंग पण असेल."
त्याने खिशातून एक लाल डब्बी काढली. त्याचं झाकण उघडलं. त्यातली डायमंड रिंग चमकू लागली.
"हो अगदी अशीच रिंग असेल ती."
त्याने ती डब्बी मुठीत आवळली व तो हाताची घडी घालून भिंतीला खेटून उभा राहिला. तो काहीही बोलत नव्हता.
"हम्म्म्म्म. आता मी याला हात लावायला जाईन आणि हा गायब होऊन जाईल. माणसाला पण कसेकसे भास होतात."
तो गालातल्या गालात हसत होता. ती मशीन चालवू लागली.
क्रमश.
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा