दिसतं तसं नसतं - 57

Will Arnav and Anu get married or he will marry Taniya? A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next person is more happy than them. But in realty they both were equally happy and unhappy. Both have problems in their lives and sources of happiness as well. Many times in our lives we too think that others have better life than ours but who knows they may have more sufferings than us.

पुर्वावलोकन


अर्नव खुप मोठ्या दुविधेत अडकला आहे. त्याचे आईबाबा अनुला स्वीकारायला तयार नाहीत. त्यांनी त्याला कुटुंब आणि अनु दोन्हींपैकी एक निवडायला सांगितलं आहे. अनुने त्याला त्याच्या कुटुंबाला निवडण्याचा सल्ला दिला आहे.




आता पुढे


अनु अर्नवच्या नजरेआड झाली होती. तो थोडा वेळ ती ज्या वाटेवरून गेली त्या वाटेकडे बघत बसला. त्याला काय करावं हे समजत नव्हतं. त्याने दीर्घ श्वास सोडला व तो कार स्टार्ट करून निघून गेला.


अनु घरी पोहोचली होती. ती बराच वेळ दुःखात होती. नंतर तिने स्वतः ची समजूत काढली. ती अर्नवला विसरण्याचा प्रयत्न करत होती. ती शिलाई मशीन चालवू लागली. तिला दारात कुणीतरी दिसलं. ती व्यक्ती पुढे आली. तो तर अर्नव होता. ती आश्चर्यचकित होऊन उभी राहिली.


"अर्नव तू? ईथे?"


तो काहीही बोलत नव्हता. फक्त गालात हसत होता. तिने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तो अदृश्य झाला. तेव्हा तिला कळलं की तो तिचा भास होता. ती परत कामाला लागली. अर्नवला विसरणं तिच्यासाठी तेवढं सोपं असणार नव्हतं.


तो घरी परतला. त्याची आई समोरच उभी होती. तो आईशी काहीही बोलला नाही. त्याचा उदास चेहरा बघून त्याच्या आईला वाईट वाटू लागलं. त्या त्याच्यामागे गेल्या व त्याच्या जवळ जाऊन बसल्या.


"आईचा राग आला आहे का?"


त्याने नकारार्थी मान हलवली.


"अरे आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहोत ना अर्नव. कुठल्याही आईबाबांना वाटेल का की त्यांच्या मुलाचं वाईट व्हावं? तानिया खुप चांगली मुलगी आहे. तुझी बेस्ट फ्रेंड पण आहे. तू असं उदास होऊ नकोस बरं."


आईच्या समाधानासाठी त्याने खोटं हसू गालावर चढवलं. त्याची आई खुश झाली.


"चल, आता तुझ्या लग्नाची तयारी करायची आहे. खुप कामं करायची आहेत."


त्याच्याकडे दुसरा उपाय नव्हता. तो लग्नासाठी तयार तर झाला होता पण त्याच्या मनाचा एक कोपरा त्याला ओरडून बोलत होता.


"अर्नव, सोडून दे सगळं. अनु खुप चांगली मुलगी आहे. तुम्ही खुप खुश राहाल. सगळं सोडून तिला स्वीकार. निघून चल येथून."


पण त्याची हिंमत होत नव्हती. सगळं सोडून जाणं त्याच्यासाठी खुप अवघड होतं.


तानिया रूममध्ये बसलेली होती. तिच्या कानावर आईबाबांचा आवाज पडला. ती लक्ष देऊन ऐकत होती.


"त्यांनी पण होकार दिला आहे! लवकर तयारीला लागावं लागेल. भरपूर कामं करायची आहेत."


ती अवाक झाली होती. तिला वाटलं होतं की नक्कीच अर्नव त्याच्या घरी अनुबद्दल सांगेल व ते या लग्नाला नकार देतील. पण हे तर उलटंच घडत होतं. तिला कळालं की नक्कीच अनु गरीब असल्यामुळे त्याचे आईबाबा तिला स्वीकारायला तयार नसतील. ती खुश झाली. ती आनंदात तयारीला लागली.


तिने जे अर्ध विणलेलं स्वेटर फेकून दिलं होतं ते परत विणायला घेतलं. ती तुटून विखुरलेल्या स्वप्नांना अलगद उचलून परत जोडण्याचा प्रयत्न करू लागली. दोन्ही घरं तयारीला लागली होती. लग्नाचा सीजन संपत आला होता. त्यामुळे त्यांना लवकर एंगेजमेंट आणि लग्न आटोपायचं होतं.


अनुलाही बघायला एक मुलगा आला होता. तिचंही लग्नाचं वय झालं होतं. तिची त्यासाठी काही हरकत नव्हती. तिला माहित होतं की अर्नव काही तिच्यासाठी सगळं सोडून येणार नाही. त्यासाठीच नाही तर कुठल्याही मुलासाठी तसं करणं खुप अवघड आहे. तसं तर तिने त्याच्याकडून तशी अपेक्षाही केली नव्हती. मुळात तिनेच त्याला कुटुंब आणि ती या दोन्हींपैकी कुटुंबाला निवडण्याचा सल्ला दिला होता. तिने स्वतःला समजावलं होतं की तो तिच्या नशिबात नाही.


राकेश अनुला बघायला आला होता. सोबत त्याचे आईबाबा पण होते. ते सर्वजण अनुच्या घरी बसले होते. त्यांचं घर एका रूमचंच होतं त्यामुळे अनु तयार होण्यासाठी शेजारच्या वनवे काकूंच्या घरी गेली होती. तिने छान गुलाबी रंगाची साडी नेसलेली होती. दोन्ही हातांत दोन हिरव्या बांगड्या आणि साधे कानातले, एवढाच तिचा शृंगार. तिच्या हातात चहाचा एक ट्रे होता. तिची नजर जमिनीकडे झुकलेली होती.


अनुने थोडी नजर वर करून बघितलं. सगळे एकटक तिच्याकडेच बघत होते. तिने झटकन नजर खाली वळवली. तिने सर्वांच्या हातात चहा दिला. मुलगी त्यांना पसंत पडणारच होती. त्यात कसलीच शंका नव्हती. राकेश म्हणाला.


"बसा ना तुम्ही."


तिने मान हलवली व ती त्यांच्या समोर बसली. राकेशच्या आईने खणखणीत आवाजात प्रश्न विचारायला सुरुवात केली.


"ह्म्म्म. तू दिसायला तर चांगली आहेस पण स्वयंपाक व ईतर घरकाम येतं ना? नाहीतर लग्न झाल्यावर सगळी कामं मी करायची आणि तू फक्त नट्टापट्टा करायचा, असं व्हायला नको."


"हो सगळी कामं जमतात मला. घरकामा बरोबरच शिवणकाम, विणकाम पण जमतं."


"हम्म्म्म. मंग ठीक आहे."


चंदा अनुच्या आईच्या कानात कुजबुजली.


"मुलाची आई खूपच कडक वाटतेय! सासू छळ तर करणार नाही ना अनुचा!"


त्या दबक्या आवाजात बोलल्या.


"श्शशश, चंदा शांत बस आणि हसणं बंद कर. उगाच काहीही बडबडू नको. त्यांनी ऐकलं तर?"


ती शांत झाली. राकेशचे बाबा म्हणाले.


"राकेश तुला काही विचारायचं असेल तर विचारून घे."


"तुमच्या हॉबीज कायकाय आहेत? शिक्षण किती झालं आहे?"


"शिवणकाम, पैंटिंग. मी नववी पास आहे."


"ठीक आहे."


ती नववी पास होती हे ऐकून त्याला चांगलं वाटलं. त्याने केसांवर हात फिरवला. तो दहावी पास होता. ते एकमेकांशी चर्चा करू लागले. चर्चा संपल्यावर राकेशची आई बोलू लागली.


"हे बघा आमचं चांगलं दुकान आहे. घरची परिस्थिती देखील चांगली आहे. तुमची मुलगी सुखात राहिल. पण आम्हाला सत्तर हजार रुपये हुंडा हवा आहे व लग्न चांगलं करून हवं आहे."


"अहो सत्तर हजार! खुप जास्त आहेत. आमची परिस्थिती तर बघा."


"तुमची मुलगी सुंदर आहे म्हणून नाहीतर.... बघा तुम्हाला मान्य असेल तर कळवा आम्हाला."


राकेश काहीतरी बोलू पाहत होता.


"आई... ऐक तर......"


"तू चूप रे. चला."


ते सगळे निघून गेले. अनुचे आईबाबा अस्वस्थ झाले होते.


अर्नव व तानियाच्या एंगेजमेंट ची तारीख ठरली. तयारी जोमात चालू होती. सर्व नातेवाईकांना निमंत्रणं गेली होती.


अर्नव मात्र अजूनही उदास होता. त्याचं एक मन त्याला सगळं सोडून अनुकडे जा असं सांगत होतं व त्याचं दुसरं मन त्याला विचारत होतं की सर्व नाती तोडून तो खुश राहू शकेल का? तो खुप अस्वस्थ झालेला होता.


क्रमश.


©Akash Gadhave



🎭 Series Post

View all