पुर्वावलोकन
अर्नव तानियाच्या घरी आला आहे. अनुने मात्र तानियाचे कठोर शब्द, तिची झालेली अवहेलना आठवून त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तानियाच्या आईबाबांच्या बोलण्यावरून अनुला कळलं आहे की ते त्या दोघांच्या लग्नाचा विचार करत आहेत.
आता पुढे
तानिया अर्नवला तिच्या रूममध्ये घेऊन आली. तिचा बेड विखुरलेला होता. त्यावर तिचे कपडे पडलेले होते. कपाटामध्ये सुद्धा सर्व वस्तू योग्य पद्धतीने ठेवलेल्या नव्हत्या. तसेच टेबलवर तिचं मेकअप चं सामान पडलेलं होतं. तिने स्वतःचे डोळे घट्ट बंद केले व ओठ खात ती मनात म्हणाली.
"किती वेडी आहे मी! याला लगेच रूममध्ये घेऊन आले. माझ्या लक्षात का नाही आलं की रूममध्ये सगळं असं विखुरलेलं आहे? काय विचार करेल हा आता? म्हणेल की एवढी मोठी झाली पण बालपण अजून गेलं नाही."
ती थोडीशी संकोचली.
"अरे अर्नव आपण बाहेरच बसलो असतो. ते ईथे...... जरा..... म्हणजे."
तो गालातल्या गालात हसू लागल्या. तो सगळ्या विखुरलेल्या गोष्टी न्याहाळू लागला. तिच्याकडे बघत तो म्हणाला.
"नाही नको."
तिचे हावभाव लक्षात घेत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला व तो म्हणाला.
"तू सगळं विखुरलेलं आहे त्यामुळे चिंतीत होतेय का? असुदे. ईट्स ओके. असं गरजेचं थोडीच आहे की सगळ्यांनी सगळ्या गोष्टी टिपटाप ठेवायला हव्यात. चालतं थोडं फार. तसं मी पण काही व्हर्गो( सर्वकाही सिस्टमॅंटिक ठेवणारी व्यक्ती ) नाहीये. मी तुला जज नाही करणार त्यावरून. तसंही तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. टेक इट इजी."
ती विचार करू लागली.
"किती समजूतदार व फ्रेंडली झाला आहे ना हा! नाहीतर या जगात लहानलहान गोष्टींवरून जज करणाऱ्यांची कमी आहे का? मी उगाच चिंतीत होत होते. आय एम सो लकी की मला असा मित्र मिळाला."
नंतर तो तिची पारितोषिकं ठेवली होती तेथे आला. काचाच्या केस वर ती पारितोषिकं ठेवलेली होती. तो एकएक करून ती बघू लागला.
"बेस्ट सिंगर ऑफ द इअर मिस तानिया........ वाव ग्रेट."
तिचा चेहरा आनंदाने फुलला. कौतुक कुणाला आवडत नाही? तो त्याखाली ठेवलेले फोटो पण बघू लागला.
"ग्रेट तानिया. तू खरंच उद्याची स्टार आहेस. मलाही ऐकव एखादं गाणं."
"हो ऐकवेल ना!"
त्याने तिचे बेडवर पडलेले कपडे बाजूला केले व तो तिथेच बसला.
"अरे, बाहेर बसलो असतो ना!"
"नाही नको बस इथेच. मी तुझा मित्र आहे काही तुला बघायला नाही आलो मी जे एवढी खातीरदारी करतेय."
त्याने अत्यंत सहजतेने तिचा हात पकडून तिला ओढून त्याच्या बाजूला बसवलं. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव नव्हता. पण ती थोडीशी स्थिर झाली. तिचा हात तिने मागे घेतलाच नाही. तिची नजर खाली, तिच्या हातावर स्थिर होती. तिने पापण्या उचलल्या. तो भिंतीवरील पेंटिंग बघत होता. त्याने छान ब्लॅक कलर चा ब्लेजर घातलेला होता. बाह्या थोड्या वर केलेल्या होत्या. मजबूत बाजू, व्यवस्थित केस, हसरा चेहरा, गालावर हलकी दाढी. त्याने तिचा हात सोडला होता तरीही तिला हातावर त्याचा स्पर्श जाणवत होता. तिने तिचे पाय एकमेकांभोवती गुंडाळले. तिच्या मुलायम गालांवर गुलाबी रंगाचा सडा सांडला होता.
अचानक तिला काहीतरी जाणवलं. तिने तिचे पाय पूर्ववत केले. हात जवळ घेतला.
"नाहीनाही. हा माझा मित्र आहे. मी पण ना काहीही विचार करतेय."
तिने तिच्या मनात फडफडणाऱ्या प्रीतीच्या पाखराला उडवून लावलं. तिला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. ती उठली.
"अरे मी तुला पाणी पण नाही विचारलं. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते."
"अगं, राहूदे."
"नाही, बस तू, आलेच मी."
तिने तिची समोर घेतलेली वेणी हवेत उडवली. ती तिच्या पाठीशी जाऊन स्थिर झाली. ती बाहेर जाऊ लागली. तिच्या मानेच्या थोडं खाली असलेला तीळ बघताच त्याला अनुच्या ओठांच्या थोड्या वरच्या तिळाची आठवण झाली.
"आपण तर अनुला बघितलं होतं! ती झटकन कुठे निघून गेली असावी? आपण तानियाला विचारायला हवं का? नाही नको, मागे तिला विचारलं होतं तेव्हाचे तिचे हावभाव बघून असं वाटतं की दोघींमध्ये काहीतरी बिनसलं आहे. पण एक मात्र नक्की की ती या घरात काम करते. त्यामुळे ती आज नाही तर उद्या आपल्याला भेटेलच."
तो बाल्कनीत आला. मोकळी हवा त्याच्या अंगाला स्पर्श करू लागली. त्याने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला. ऊन उतरलं होतं. त्याने घड्याळात बघितलं. बराच वेळ झाला होता. तो खाली बघू लागला. काही लहान मुली लंगडी खेळत होत्या. खेळता-खेळता त्यांतील दोन मुलींमध्ये भांडण सुरु झाले. त्या एकमेकींचे केस वगैरे ओढू लागल्या. तेवढ्यात तेथे एक मुलगी आली. तीच तर होती ती. तोच गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस. तिने त्या मुलींचं भांडण थांबवलं. त्यांना प्रेमाने समजावून सांगू लागली. ती त्यांच्याशी अगदी लहान मुलांसारखं बोलू लागली. तिचे ते हावभाव बघून असं वाटत होतं की कुठलंही लहान मुल तिचं ऐकेल. तिच्या हलणाऱ्या मानेबरोबर डुलणारे तिचे कानातले अर्नवच्या मनात वेगळेच तरंग निर्माण करू लागले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य व डोळ्यांत वेगळीच चमक होती. अर्नव अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू लागला की काय म्हणत असेल ती? तिने त्यांना समजावलं होतं.
अनु निघून गेली. त्या मुलींची भांडणं मिटली. त्या मुली आनंदी वाटू लागल्या. अर्नव विचार करू लागला.
"कमाल आहे. काही वेळापूर्वी भांडणाऱ्या त्या मुली लगेच शांत झाल्या. काय जादू केली पोरीने? अनुचा स्वभावच असा आहे. ती कुणालाही आपलंसं करून घेते. तिने मला व तानियाला पण लगेच आपलंसं केलं होतं. अनु - द मॅजिक गर्ल. मंग तानियाला का तिचा राग येत असावा? काय झालं असेल दोघींमध्ये?"
त्याच्या कानावर आवाज पडताच तो विचारांतून बाहेर आला. तानिया त्याच्यासाठी चहा व नाष्टा घेऊन आली होती.
"बस ईथे."
तो येऊन बसला. त्याने ट्रे कडे बघितलं. ट्रे गच्च भरलेला होता.
"अगं येवढं सगळं मी कसं संपवणार? मदत कर मला."
"नाही सगळं तुझ्यासाठीच आहे. मला काही माहित नाही. तूच संपवणार आहेस सगळं."
"तानिया मस्करी नको करुस."
ती जाऊ लागली.
"अगं तानिया."
ती निघून गेली. त्याने श्वास सोडला व नाष्टा संपवायला सुरुवात केली. तो परत विचारांत हरवला.
"अनु संध्याकाळी घरी जाते. तेव्हाच तिच्याशी बोलावं लागेल. नाहीतर तानिया नाराज होईल. उद्या मी तयारच राहतो."
अनुचे ते डोलणारे कानातले, लोभस रूप, बोलके डोळे व हावभाव त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागले होते. अनुला भेटण्याची तीव्र ओढ त्याच्यात निर्माण होऊ लागली होती. तो त्याच्या भावनांपासून अंजाण होता. तो मैत्रीच्या पलीकडे जाऊ लागला होता.
ईकडे तानिया अर्नव मध्ये नकळत गुंतू लागली होती. ती बाजूच्या रूममध्ये येऊन बसली होती. तिच्या हातात मोबाईल होता. इन्स्टा वरील पोस्ट बघताबघता कधी तिच्या मनाने तिच्या बोटांना संकेत देऊन सर्च बॉक्स मधून अर्नवचं प्रोफाइल उघडलं, तिला कळलंच नाही. ती त्याचे फोटो न्याहाळू लागली. तिचं मन तिला सांगत होतं की अगं तो तुझा मित्र आहे. पण तो आवाज हळूहळू शमून गेला. ती पायाच्या अंगठ्याने फर्शीवर घर्षण करू लागली. आपले केस कानामागे लोटत त्याचे फोटो ती झूम करून बघू लागली.
अनु मात्र घराच्या वाटेवर चालतांना अरविंद बद्दल विचार करू लागली. तिला आठवलं की आज पुजाचं लग्न आहे. तिची चालण्याची गती वाढली. तिच्या मनात एक छोटीशी आशेची किरण होती की अरविंद तिला नक्की स्वीकारेल. आजही अरविंदशी लग्नात भेट होईल या विचाराने ती हर्षुन गेली होती.
क्रमश.
©Akash Gadhave