दिसतं तसं नसतं ( भाग - 41 )

A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next person is more happy than them. But in realty they both were equally happy and unhappy. Both have problems in their lives and sources of happiness as well. Many times in our lives we too think that others have better life than ours but who knows they may have more sufferings than us. In fact everybody has moments of both happiness and sadness in their lives. We need to accept them both.

पुर्वावलोकन


तानिया प्रेमभंगाच्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नात तिने केलेल्या चुका तिला जाणवत आहेत. अनुला कळलं आहे की तिच्या बाबांचा अपघात झाला आहे. तिला खुप यातना होत आहेत.


आता पुढे


"अगं अनु काळजी करू नकोस. त्यांचा अपघात झाल्यावर लगेच त्यांना रुग्णालयात नेलं होतं. त्यामुळे ते लवकर बरे होतील."


ती अगदीच सुन्न झाली होती. वनवे काकूंच्या शब्दांनी तिला थोडासा दिलासा मिळाला. त्या नंतर निघून गेल्या. अनुची प्रार्थना अजून चालूच होती. बराच उशीर झाला तिची आई अजून आलेली नव्हती. वनवे काकू तिच्यासाठी एका कागदात पोळी व चटणी घेऊन आल्या.


"अनु बाळा हे घे. आईला यायला उशीरही होऊ शकतो. थोडंसं काहीतरी खाऊन घे."


तिने मान हलवून नकार दिला. त्या तिचं दुःख समजू शकत होत्या.


"बाळा थोडंसं तरी खाऊन घे. अंगात ताकद नाही राहणार. तुला तुझ्या बाबांना पण भेटायला जायचं आहे ना."


त्यांनी तिला आग्रह करून जेवू घातलं.


"हे बघ हे आईसाठी ठेवतेय. तुझी आई येईल तेव्हा तिला पण जेवू घाल. केव्हाची उपाशी असेल ती. तुझं ऐकेन ती. काळजी घे."


त्या निघून गेल्या. ती आईची वाट बघू लागली. थोड्या वेळाने तिची आई आली. ती लगेच जाऊन आईच्या हृदयाशी लागली. ती रडू लागली. तिच्या आईचंही मन भरून आलं.


"आई का घडलं असं? काय चूक होती त्यांची?"


तिच्या आईनेही तिला घट्ट पकडलं होतं.


"आई बाबा कसे आहेत?"


त्यांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. फक्त डोळ्यांतून पाणी बाहेर आलं. कसंबसं ध्येय एकवटत त्या बोलल्या.


"त्यांच्या उजव्या हातावरून एक मोठा ट्रक......"


अनुने डोळे गच्च मिटवून घेतले. तिची आई पण बोलतांना मधेच थांबली.


"ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत. पण डॉक्टर म्हणाले की काळजी करण्याची आवश्यकता नाही. लवकरच ते शुद्धीवर येतील."


तिने सुटकेचा श्वास सोडला.


"पण त्यांचा हात मात्र...."


त्या रडायला लागल्या. अनुने तिच्या आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले होते. त्यांचं रडणं थांबलं.


"आई थोडंसं काही खाऊन घे."


तिच्या हाताने आईची हनुवटी वर करत ती म्हणाली. त्यांनी नकारार्थी मान हलवली.


"प्लिज आई. माझ्यासाठी."


तिने आईला कसंबसं जेवू घातलं.


"अनु इकडं ये."


ती हातात पाणी घेऊन आली.


"आई पाणी."


त्यांनी पाणी हातात घेतलं. तिने कागद उचलून बाहेर फेकला.


"अनु माझं ऐकशील ना?"


"हो आई. का नाही ऐकणार?"


"हे बघ तुझ्या बाबांना आता काम करता येणार नाही. फक्त माझ्या एकटीच्या कमाईवर आपला खर्च भागणार नाही. तर बाळ म्हणजे मी म्हणतेय की..... तुला पण.... जरा."


आई पुर्ण बोलू शकली नाही. पण तिला परिस्थितीची जाणीव होती.


"हो आई. चालेल ना. मी आता खुप मोठी झाली आहे. चाळीतील माझ्या वयाच्या बऱ्याच मुली काम करतात. मीही करेन ना. जे काम मिळालं ते काम मी समर्थपणे करेन."


"तसं तुला या गोष्टींपासून मला दूर ठेवायचं होतं पण अगं परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे."


"काही हरकत नाही आई. मी तुला घरकामातही मदत करत जाईन."


त्यांनी तिच्या गालावर हात ठेवला.


"किती समजदार आहेस गं तू."


त्या निघाल्या.


"बरं जाते मी अनु. काळजी घे."


"आई मी पण येते ना."


त्यांनी विचार केला की तिला एकटीला घरी भिती वाटेल.


"हो ठीक आहे. चल."


ती उठली. तिने जातांना तिची नजर तिच्या शाळेच्या पिशवीवर ठेवलेल्या तिला मिळालेल्या पारितोषिकावर पडली. ती विचार करू लागली.


"आपल्याला अभ्यास व काम दोन्ही करणं जमेल का? आपला अभ्यास आता सुटून तर जाणार नाही? काय करणार परिस्थितीच तशी आहे. पण आपलं श्रीमंत होणं अवघड आहे. आपलं स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही का? आता कुठे हळूहळू आपली परिस्थिती सुधारू लागली होती. मधेच हे....."


"अनु चल."


आईच्या आवाजाने ती विचारांतून बाहेर आली. ती आईबरोबर चालू लागली.


"बाळा तू तानियाच्या घरचं काम बघत जा. मी दुसरीकडे काम करेन."


तिने आईला होकार दिला. तिच्या मनात विचार चालू होते.


"तानियाच्या घरी! काही हरकत नाही. आपल्याला तिच्याशी काय करायचं? आपण आपल्या कामाशी काम ठेवुत."


ती परिस्थितीसमोर न नमता परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज झाली होती.


तानियाला तिची पारितोषिकं बघून प्रेरणा मिळाली होती.


"आता आपण सिंगिंग वर फोकस करूयात. त्या मूर्ख रोहितसाठी कोण रडत बसेल? तसे छप्पन्न रोहित उभा करेन मी."


तिने तिच्या आईबाबांच्या फोटोला हृदयाशी लावलं. तिला लहानपणी कळलं होतं की ती अनाथ आहे. पण ज्याप्रमाणे नंतर तिने स्वतः ला सावरलं होतं. त्याचप्रमाणे ती उठून उभी राहिली. तिचं उज्ज्वल भविष्य तिला बोलावत होतं.


जीवनात दुःख येतच असतात. पण रडत बसून कुठं भागतं? काम करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावं लागतं. बघुयात, या दोघींच्या आयुष्यात अजून काय वळणं येतात?


लाईन ऑफ द डे 

ती परिस्थितीसमोर न नमता परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज झाली होती.


क्रमश


या कथेचा किशोर अध्याय येथे संपतो पुढील भागापासून शेवटचा अध्याय, युवाध्याय सुरु होत आहे. बाल व किशोर अध्याय आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. तसेच कथेत काही सुधारणा हव्या असतील तर तेही कळवा.


©Akash Gadhave 



🎭 Series Post

View all