पूर्वावलोकन
आतापर्यंत आपण बघितलं की अनु एका गरीब घरातील मुलगी आहे. तिला सुरुवातीला वाटलं होतं की तानिया जी श्रीमंत घरातील मुलगी आहे, तिचं जीवन चांगलं असेल. तिच्या जीवनात काहीही समस्या नसतील. पण नंतर तिला जाणवलं की समस्या सर्वांच्याच जीवनात असतात. तानियावर तिच्या आईने अनेक बंधनं घातलेली आहेत. तिला तिची आई मनसोक्त राहू देत नाही.
आता पुढे
तानियाची आई आरशासमोर केस वगैरे ठीक करत होती. तानिया मात्र तिचा वाढदिवस असूनही उदास झालेली होती. तिला तिच्या आईची फार भीती वाटायची. तिच्याकडून काही चूक झाली की लगेच तिची आई तिच्यावर ओरडायची. आईचं बोलणं तिच्या बालमनाला फार लागत असे. तिला आता बाहेर जमलेल्या मंडळीसमोर पोएम सादर करायची होती. तिला पोएम तर येत होती पण जर काही चूक झाली तर आई खूप रागावेल या गोष्टीची चिंता तिला सतावत होती. तसेच काही क्षणांपूर्वी तिच्यावर तिची आई रागावली होती, त्यात तिची काय चूक होती? हे तिला कळत नव्हतं. मनमोकळं हसणं, नाचणं वाईट थोडीच असतं? आईला एवढा राग का आला असावा? याचा पण ती विचार करत होती.
तेवढ्यात तिला पाठीमागून कुणीतरी पकडलं. त्यांनी त्यांचे हात तिच्याभोवती घट्ट बांधले. तानियाला कळलं की ते तिचे बाबा होते. तिचे बाबा एक बिजनेसमन होते. ते नेहमी कामानिमित्त बाहेरच असायचे. घरी खूप कमी वेळ राहायचे. त्या दोघांची खूप गट्टी जमायची. ती बाबांच्या खूप जवळ होती. त्यांनी तिचा उदास चेहरा बघितला.
तिचे बाबा म्हणाले, "सॉरी बाळा. मला थोडा उशीर झाला. असं नाराज होऊन बसू नको ना. प्लिज."
ती त्यांच्या गळ्यात पडली. त्यांनी तिच्या आईकडे बघितलं. ती त्यांना थोडी रागात भासली. त्यांना कळलं की आई तिच्यावर रागावली असणार.
ते म्हणाले, "आई रागावली वाटतं!"
तिची आई म्हणाली, "हो. रागावले. तिला पण विचारा एकदा ती कशी वागली ते. मी काय विनाकारण थोडीच रागावते. हाय सोसायटी मध्ये स्टॅन्डर्ड मेंटेन करावं लागतं ना! जग खूप शहाणं आहे. लोक साधे राहिले नाहीत. आजकाल तुमचं बोलणं, बसणं, वागणं, चालणं, राहणीमान या सर्व गोष्टी पारखल्या जातात. सगळं चांगलं असून सुद्धा लोक नाव ठेवण्यासाठी काही ना काही कारण शोधतातच. तिला पुढं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी तिला आतापासूनच तयार करतेय. मी शत्रू थोडीच आहे तिची? "
त्यांचं म्हणणं बऱ्याच अंशी योग्य होतं. पण लहान मुलांवर एवढी बंधनं घालणं पण जरा अयोग्यच.
तिचे बाबा म्हणाले, "बघ माझ्यावर पण ओरडते ती. पण मी मनावर नाही घेत. तू पण नकोस घेत जाऊ."
तानियाच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आला. जेव्हा तिची आई तिच्यावर रागवायची तेव्हा बऱ्याच वेळा तिचे बाबा तिला सावरून घ्यायचे. पण जेव्हा ते घरी नसायचे तेव्हा मात्र ती बराच वेळ उदास राहायची. ते दोघे हसायला लागले. त्यांना हसतांना बघून तिच्या आईने कमरेवर हात ठेवले. तिने तानियाचा हात पकडला.
त्या म्हणाल्या, "सोडा माझ्या मुलीला. तुम्हीच बिघडवलं आहे तिला. सोडा. अजून केक पण कापायचा बाकी आहे."
ते म्हणाले, "माझी पण मुलगी आहे ती. चल बाळा."
ते सर्वजण खाली आले. अनुने बघितलं थोड्यावेळापूर्वी उदास असलेली तानिया आता खूप खुश दिसत होती. सर्वजण तिचीच वाट बघत होते. ती व तिचे आईबाबा केक समोर येऊन उभे राहिले. अनुने परत केक बघितला. जवळपास तिच्या उंचीचा केक होता तो. तानियाने मेणबत्त्या फुंकून विझवल्या. तेव्हा सगळे टाळ्या वाजवू लागले. एक सुरात, "हॅपी बर्थडे टू यु तानिया," गाऊ लागले. कुणीतरी फॅन चालू केला. वरची फुलं तिच्या अंगावर पडली. कुणीतरी एक दंडाकृती साधन फिरवलं. त्यातून उडून चमकी तानियाच्या अंगावर पडली. अनु हे सगळं टक लावून बघत होती. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. तिने असा वाढदिवस कधीच बघितला नव्हता.
एवढं छान सेलिब्रेशन, केक, भेटवस्तू, डेकोरेशन हे सगळं तिला एका गोड स्वप्नाप्रमाणे भासत होतं. आज तिचा पण वाढदिवस होता. हे सगळं बघून तिला जाणवू लागलं की तिच्यासोबत असं काहीच होणार नव्हतं. अगोदर तिला या गोष्टीची कधीही खंत वाटली नव्हती. पण आज मात्र तिला उदास वाटू लागलं. आपल्याला पण हे सर्व मिळायला हवं होतं. अशी खंत व इच्छा तिच्या मनात तरंगू लागली. तिला तिच्या परिस्थितीचा, गरिबीचा त्रास होऊ लागला. ती तिच्या ड्रेस कडे बघू लागली. किती जुना झालेला होता तो! त्या आवाजात सुद्धा तिला नीरव शांतता जाणवू लागली. तिची श्रीमंत होण्याची इच्छा तग धरू लागली. तिच्या कानावर पडलेल्या आवाजाने ती विचारांतून बाहेर आली.
तिचे बाबा म्हणाले, "अनु त्या पॅकेटमधून चारपाच फुगे दे मला. या मुलांना हवी आहेत."
तिने बघितलं समोर काही मुलं उभी होती. तिने फुगे तिच्या बाबांच्या हाती दिले. ते त्यांत हवा भरत होते. त्या वयातही तिला जाणवलं होतं की तिला श्रीमंत बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. किती फरक होता तिच्या आणि तानियाच्या परिस्थितीत. एक स्ट्रीप तुटली म्हणून नवीन सॅन्डल घेणारी तानिया आणि मागील दोन महिन्यांपासून विनाचपलेची वावरणारी अनु. त्यांचा बंगला, नोकर-चाकर, बगीचा, गाड्या, कपडेलत्ते, टीव्ही, सोफा हे सगळं मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागेल! पण ती आता तयार होती. तिने ठरवलं होतं ती श्रीमंत होणारच.
पुढील भाग लवकरच.
आवडल्यास share नक्की करा.
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा