दिसतं तसं नसतं ( भाग - 31 )

A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next person is more happy than them. But in realty they both were equally happy and unhappy. Both have problems in their lives and sources of happiness as well. Many times in our lives we too think that others have better life than ours but who knows they may have more sufferings than us. In fact everybody has moments of both happiness and sadness in their lives. We need to accept them both.

पुर्वावलोकन


तानिया व रोहित चित्रपट बघण्यासाठी सिनेमागृहात गेलेले आहेत. चित्रपट बघून झाल्यावर तानियाला वेगळीच चिंता सतावत आहे. सत्यजितने अनुचा रस्ता अडवला आहे. सत्यजित म्हणत आहे की त्याला माहित होतं की तिच्या मनात त्याच्यासाठी भावना आहेत.


आता पुढे


"वेडा आहेस का तू? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मी म्हणाले ना की मला या गोष्टींमध्ये पडायचं नाहीए. सारखं तेच काय बडबडतोय? मी तुला यामुळे नाही वाचवलं की तू मला आवडतोस, यामुळे वाचवलं की तू चांगला मुलगा आहेस व तू तसंही मला काही त्रास दिलेला नाही. माझं काही प्रेमबीम नाहीए तुझ्यावर. परत रस्ता अडवलास तर बघ."


अनु तेथून निघून आली. ती घरी पोहोचली. तिने सर्व सामान जागेवर ठेवलं. तिने तिची शाळेची पिशवी काढली. त्यातून इंग्रजीचं पुस्तक काढलं. ते पुस्तक मांडीवर ठेवलं. तिचं मन थोडं अस्वस्थ होतं. जे काही तिच्यासोबत घडलं होतं त्या गोष्टीचा तिला राग आला होता.


ती पुस्तकामध्ये बघू लागली. तिच्यासाठी हळूहळू पुस्तकातील अक्षरं पुसट झाली व ती भूतकाळात जाऊन पोहोचली. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट होती. ती आईसोबत काही सामान आणण्यासाठी जात होती. तेव्हा तिला त्यांच्या शेजारी राहणारी ज्योती ताई दिसली. त्या रडत होत्या. अनु व तिची आई त्यांच्याजवळ गेल्या. त्यांना एक लहानसा मुलगा देखील होता. तो तिथे रांगत होता. अनुने त्याला उचलून घेतलं. तो खुश झाला.


"काय झालं ज्योती, का रडतेय? कुणी त्रास देत आहे का इथे?"


"नाही हो काकू. इथे सगळे चांगले आहेत. कुणाचा काहीच त्रास नाही. पण....."


"पण काय?"


"दुसऱ्याचा त्रास माणूस सहनही करतं. त्याचं एवढं काही वाटत नाही. काही ना काही वाट निघतेच. पण त्रास देणारी व्यक्ती जर आपलीच असेल तर माणसानं कुठं जावं? कुणाला दुःख सांगावं? त्यातही ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक प्रेम केलं तिच व्यक्ती असं करत असेल तर! फक्त सतरा वर्षाची होते मी जेव्हा मी त्याच्याबरोबर पळून आले. मला माहित होतं की आईबाबा आमच्या नात्याला संमती देणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी घरदार, आईबाबा, नातीगोती सगळं सोडून इथे आले. तेव्हा खुप आनंदी होते. त्याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत जगायला तयार होते. वेगळ्याच धुंदीत होते मी तेव्हा. तो सुद्धा खुप जीव ओतायचा माझ्यावर. शाळेत असतांना तर खूप मोठमोठ्या गप्पा करायचा. असं राहू आपण तसं राहू आपण. ते वयही तसं होतं. ना भविष्याची चिंता ना जगाचा अनुभव."


अनु बाळाच्या पाठीवर हात फिरवतांना गंभीर होऊन त्यांचं बोलणं ऐकत होती. त्या पुढे बोलू लागल्या.


"काही दिवसांपूर्वी त्याला एका मुलीबरोबर बघितलं होतं. मला काळजी वाटत होती. त्याला विचारलं तर तो चिडला. ओरडू लागला माझ्यावर. तेव्हापासून त्याची वागणूकच बदलली. बऱ्याच वेळा मारहाण पण केली. शेवटी ते दोघे पळून गेले."


त्या रडू लागल्या. अनुच्या आईने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अनुसाठी सर्वकाही सुन्न पडलं होतं. तिच्या मनात विचारांचं थैमान उठलं होतं. तिने तिच्या हातातील बाळाला कुरवाळलं. असं पण होतं जगात? त्या ताईंचा किती विश्वास होता त्यांच्या पतीवर. ज्या व्यक्तीवर इतकं प्रेम केलं त्यासोबत असं कुणी कसंकाय करू शकतं? चित्रपटात तर वेगळंच काही दाखवतात. ते तर दुसरी बाजू दाखवतच नाहीत. खरंच दिसतं तसं नसतं!


"अगं ज्योती सावर स्वतः ला. तो नालायक निघाला यात तुझी काय चूक आहे? तू रडत बसून काय होणार आहे? त्या बाळाचं काय होईल, तूच जर रडत बसली तर?"


त्यांनी स्वतः ला सावरलं. अनुने त्यांना पाणी दिलं.


"काकू एखाद्या घरी धुणीभांडी करायचं काम असेल तर सांगा नक्की. आता मलाच सगळं बघावं लागेल."


"हो सांगते नक्की."


अनुने बाळाला त्यांच्या हातात दिलं. त्या दोघी निघाल्या. तेव्हाच अनुने ठरवलं होतं की तिला या सगळ्या गोष्टींत पडून स्वतः च आयुष्य खराब करून घ्यायचं नाही. हीच नव्हे तर तिने अशा अनेक व्यथा डोळ्यांनी बघितल्या होत्या. ती त्या वयातच सजग झाली होती. कमाल आहे ना गोष्ट एकच होती, प्रेम ; पण त्याकडे बघण्याचा अनुचा व तानियाचा दृष्टीकोन किती वेगवेगळा होता!


अनु विचारांतून बाहेर आली. तिने दीर्घ श्वास घेतला व ती अभ्यासाला लागली.


तानिया व रोहित सिनेमागृहातून बाहेर पडले. तानियाला तर आता खूपच भिती वाटू लागली होती. जर घरी माहित झालं तर! तर मात्र आपली खैर नाही. आपल्याला खुप सांभाळून रहावं लागेल.


रोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवला.


"कुठे हरवलीस? चलायचं ना?"


"हो चल."


ते दोघे स्कुटीवरून जाऊ लागले. ढगांचा कडकडाट होऊ लागला होता. पाऊस सुरु झाला. ते दोघे भिजू लागले. रस्त्यात एक बसस्टॉप होता, तिथे तानियाने स्कुटी थांबवली. रात्र झाली होती. तिथे कुणीच नव्हतं. ते स्कुटीवरून उतरले व आडोश्याला आले. तानिया व रोहित दोघे चिंब भिजले होते. तानियाचा ड्रेस तिच्या अंगाला चिटकला होता. तिने तिचे केस झटकले. तिची नजर रोहितवर पडली. तो तिच्याकडेच बघत होता. तेवढ्यात रस्त्याने एक कार वेगाने निघून गेली. त्यामुळे हवेचा जोरदार स्पर्श तानियाला झाला. तिचं अंग शहारलं. रोहित तिच्या जवळ येऊ लागला. ती आजूबाजूला बघत होती. ती मागे सरकू लागली. तिला म्हणायचं होतं की आपण रोडवर आहोत. पण तिच्या ओठांतून शब्दच फुटले नाही. तिचा स्पर्श मागे असलेल्या दांड्याला झाला. तिने तिचे दोन्ही हात त्या दांड्यावर ठेवले. तिने नजर खाली झुकवली. तो तिच्या जवळ येऊ लागला होता. तेवढ्यात सायकलच्या घंटीचा आवाज त्यांच्या कानांवर पडला. रोहित दचकून मागे सरकला. ती सुद्धा दचकली. तो सायकलस्वार निघून गेला. दोघे हसू लागले. ती तिचे हात एकमेकांवर घासू लागली. हवेत गारवा होता.


तिने तिचा मोबाईल बाहेर काढला. तिला बघायचं होतं की मोबाईल भिजल्याने बंद तर नाही ना झाला? "थँक गॉड, बंद नाही झाला." तिने नोटिफिकेशन बघितली. आईचे सात मिस्ड कॉल होते. ती घाबरली. त्यांना बराच उशीर झाला होता. तिला वेळेचं भानच नव्हतं राहिलं. तिने झटकन आईला कॉल लावला.


"तानिया, कुठे आहेस तू? एवढा उशीर? तुझ्या मैत्रिणीला फोन लावला होता मी. ती तर म्हणाली की कुठलीच पार्टी नव्हती. कुठे आहेस तू? लवकर घरी ये. तुझ्यासाठी खुप प्रश्न आहेत माझ्याकडे. ठेव आता."


तिच्या आईने तिला काहीच बोलू दिलं नाही. ती खुप घाबरली होती. तिला चिंता वाटू लागली. आईला कळलं तर नसेल ना?


क्रमश.


©Akash Gadhave🎭 Series Post

View all