Oct 24, 2021
कथामालिका

दिसतं तसं नसतं ( भाग - 2 )

Read Later
दिसतं तसं नसतं ( भाग - 2 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

पूर्वालोकन

 

आता पर्यंत आपण बघितलं अनु एक खूप गरीब घरातील मुलगी आहे. तिचे वडील फुगे वगैरे विकतात व आई धुणीभांडी व इतर कामं करते. अनुला जाणवतं की श्रीमंत लोकांचं जीवन आनंदमय असतं. ती तिच्या बाबांना श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागतं? असा प्रश्न विचारते.

 

आता पुढे

 

तिचे बाबा उत्तरले, "बाळा असं एका दिवसात कुणी श्रीमंत होत नाही. काहीकाही लोक होतातही पण त्यांचं प्रमाण कमीच. श्रीमंत होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. खूप काम करावं लागतं. मेहनत करावी लागते. खूप पैसे कमवावे लागतात."

 

अनु डोळे मोठे करून सर्व ऐकत होती. मधून डोकं होकारार्थी हलवत होती. तिच्या डोक्यात अभ्यास, पैसे, मेहनत, श्रीमंत, आनंद, सुख या गोष्टी फिरत होत्या. ती तिच्या बाबांना मदत करत होती. हळूहळू हॉल छान सजला होता. तेथे मुलांची व मोठ्यांची गर्दी वाढू लागली. तेथे तानिया आल्यावर सगळे तिला शुभेच्छा देऊ लागले. तसेच तिला अनेक भेटवस्तू पण मिळाल्या.

 

अनु व तिचे बाबा तेथेच एका कोपऱ्यात थांबलेले होते. अनुने बघितलं दोन मुलं त्यांच्याकडेच येत होती. ते दोघे त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले.

 

त्यांतील एक मुलगा म्हणाला, "काका आम्हाला फुगे द्या ना प्लिज."

 

तिचे वडील म्हणाले, "हो देतो हा. एक मिनिट."

 

तो दुसरा मुलगा अनुकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. अनुला स्वतः च्या परिस्थितीबद्दल एवढं वाईट कधीच वाटलं नव्हतं जेवढं तेव्हा वाटत होतं. तो तिरस्कार तिच्या बालमनात वेगळेच तरंग निर्माण करून गेला. तिला वाटलं की सगळेच श्रीमंत लोक तिच्यासारख्यांचा तिरस्कारच करत असावेत. तिचा नेहमी हसरा असणारा चेहरा उदास झाला होता.

 

त्या दोघांनी फुगे घेतले व ते निघायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्या दुसऱ्या मुलाची नजर अनुवर पडली. तो तिच्याकडे बघून हसला. ते तिला अपेक्षित नव्हतं. ती पण हसली.

 

तो म्हणाला, "हॅलो. माझं नाव अर्णव आहे. तुझं नाव काय आहे?"

 

त्याने हात पुढे केला होता. त्याच्यासोबतचा दुसरा मुलगा त्याला अडवत होता पण त्याने ऐकलं नाही. तिने हात पुढे केला नाही हे बघुन त्याने त्याचा हात मागे घेतला.

 

ती उत्तरली, "अनु."

 

तो म्हणाला, "अनु चल ना आमच्यासोबत पार्टीमध्ये."

 

ती म्हणाली, "नाही नको. "

 

तो म्हणाला, "ओके."

 

ते दोघे निघून गेले. तो मुलगा अर्णवला काहीतरी म्हणत होता.

 

त्यावर तो म्हणाला, "अरे ती गरीब असेल. कपडे कसेही असले तरी काय फरक पडतो?"

 

अनुच्या चेहऱ्यावर परत रंगत आली होती. तिला जाणवलं की सर्वजण सारखे नसतात. सर्वजण कपडे बघून तिरस्कार किंवा सन्मान करत नाहीत.

 

अचानक तिच्या कानांवर गाण्यांचा आवाज पडला. कुणीतरी स्पीकर ऑन केलं होतं. अनु बघत होती सर्व मुलांना नाचतांना. तिची नजर तानियावर पडली. किती आनंदी दिसत होती ती! मनसोक्त हसत होती. मनसोक्त नाचत होती. नंतर तिची नजर तानियाच्या आईवर पडली. ती थोडीशी चिंतेत होती. ती तानियाला बोलावत होती पण तानियाने ऐकलं नाही. ती थोडीशी रागात तिच्याजवळ गेली व तिला पायऱ्यांवरून वरती घेऊन गेली. अनुने बघितलं तानियाच्या आईचा हातरूमाल तिथेच पडला होता. तिने तिथे जाऊन तो रूमाल हातात घेतला व ती त्यांच्यामागे गेली.

 

अनु दाराशी उभी राहून त्या दोघींकडे बघत होती. तिला ते दृश्य पाहून धक्काच बसला. तानियाची आई तिच्यावर ओरडत होती व तानिया उदास होऊन शांतपणे सर्व ऐकून घेत होती!

 

तिची आई म्हणाली, "वेडी आहेस का तू? तुला डोकं आहे का काही? मी तुला आवाज देत होते ना. मंग दुर्लक्ष का केलंस माझ्याकडे? फार शहाणी समजतेस का स्वतः ला?"

 

ती रडवेल्या स्वरात म्हणाली, "आवाजामुळे ऐकू नाही आलं."

 

तिची आई म्हणाली, "काय वेड्यासारखं नाचत होतीस? बाकीची मुलं बघितली का किती नीट डान्स करत होती. हे असं वेड्यासारखं हसणं त्यावरून. कुठून शिकलीस हे? सगळे लोक हसत असतील तुझ्यावर. जंगली आहे तू, असं म्हणत असतील."

 

अनु अवाक झाली होती. तानियाच्या आईची तिच्यावर नजर पडली. अनु घाबरली. ती लगेच मागे सरकली. तिला वाटलं आता ह्या काकू आपल्यावर पण ओरडणार!

 

ती म्हणाली, "काय आहे? इकडे काय करतेस?"

 

अनु म्हणाली, "तुमचा रुमाल पडला होता."

 

तिने तो रुमाल हातात धरून त्यांच्या दिशेने सरकावला. त्यांनी तो रुमाल घेतला.

 

त्या म्हणाल्या, "बरं ठीक आहे. जा आता खाली."

 

अनुने मान हलवली व ती खाली जाण्यासाठी चालू लागली. तानियाची आई तानियाकडे परतली.

 

ती म्हणाली, "रडू नकोस आता. डोळे पूस. वाढदिवस आहे ना तुझा आज? चल मंग. तुला सगळ्यांना पोएम पण ऐकवायची आहे ना. चल आता नीट वाग. थोडंसं हस नाहीतर सगळ्यांना काय वाटेल? "

 

तानियाने डोळे पुसले. ती शांत झाली. तिने खोटं हास्य गालावर चिटकवलं.

 

ती म्हणाली, "शाबास तानिया. गुड गर्ल."

 

इकडे अनु विचार करत होती की श्रीमंत मुलांच्या जीवनात पण समस्या असतात. तिला वाटलं होतं की तानियाच्या जीवनात काहीच समस्या नसतील. पण तिचं मत खोटं ठरलं. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असतं की दुसऱ्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं आहे. पण ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. कदाचित समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आपल्यापेक्षा जास्त समस्या असू शकतात. मुळात सुख, दुःखं सगळ्यांच्याच जीवनात असतात. दोन्हीचा स्वीकार करणं यालाच आयुष्य म्हणतात.

 

पुढील भाग लवकरच.

 

आवडल्यास share नक्की करा.

 

©Akash Gadhave 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Akash Gadhave

Writer

नमस्कार.