पुर्वावलोकन
आतापर्यंत आपण बघितलं की तानियाच्या आईला जाणीव झाली आहे की त्या त्यांच्या अपेक्षांचं ओझं तानियावर लादत होत्या. तानियाने पेपरमध्ये कॉपी केली होती पण पहिली चूक असल्याने व ती खोडकर नसल्याने तिला माफ करण्यात आलं आहे. तानियाच्या आईने तिला कमी मार्क येण्यामुळे रागावणं, तिच्यावर सक्ती करणं सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता पुढे
तानियाने आनंदात पेपर सोडवला. तिच्यावर चांगले गुण आणण्याचं कसलंच दडपण नव्हतं. तसेच कमी मार्क आल्यावर आई रागावेल, टीव्ही बघणं, खेळणं बंद होईल याची भितीही नव्हती. तिचं मन मोकळं होतं. त्यामुळे तिला पेपरही नेहमीपेक्षा बरा गेला. बऱ्याच वेळा दडपणाखाली, भीतीने एखादी गोष्ट करण्यापेक्षा जर मोकळ्या व आनंदी मनाने ती गोष्ट केली तर परिणाम चांगले येतात. परिणाम तर निकाल लागल्यावर कळणारच होते.
तानियाला ज्या गोष्टींबद्दल अनुचा हेवा वाटत होता त्या गोष्टी तिला मिळाल्या होत्या. जरी ती अनुईतकी हुशार झालेली नसली तरी आईचं प्रेम, मनमोकळेपणा या गोष्टी तिला मिळाल्या होत्या. तिला कळलं होतं की दुःख आयुष्यात येतं व निघूनही जातं. ते काही थांबत नाही. फक्त माणसाकडे संयम असायला हवं म्हणजे झालं!
तानियाचे पेपर संपले होते. तानिया आजकाल आनंदी राहू लागली होती. तिची आईपण तिच्यावर भरभरून प्रेम करू लागली होती. जणू काही त्यांनी तिच्यावर जी बंधनं घातली होती त्याची त्या भरपाई करत होत्या. अनु, अर्नव आणि तानिया तिघांची तर धमाल मस्ती चालू असायची. तानियाची आई आता तिला अडवत पण नव्हती व तिला देशपांडे सरांकडे सुट्ट्यामध्ये सुद्धा ट्युशनही लावणार नव्हत्या. त्या तिला तिचं बालपण मनसोक्त अनुभवू देणार होत्या. तानियाच्या बाबांनाही या गोष्टीचं नवल वाटत होतं. हा चमत्कार कसा झाला? असा त्यांना प्रश्न पडला होता.
तानिया लंगडीचा डाव मांडून बसली होती. समोरून अनु व तिची आई आली. मागून तानियाची आई आली.
"अरे वाह! लंगडी. मला खूप दिवस झालेत लंगडी खेळायला. आज खूप ईच्छा होत आहे", तानियाची आई म्हणाली.
तानिया म्हणाली,"राहूदे आई, तुला नाही जमणार ते."
सगळे हसायला लागले. त्यांनी कमरेवर हात ठेवले.
"थांबा तुम्हाला दाखवतेच आता. मी अगोदर ह्या खेळात चॅम्पियन होते."
त्यांनी पदर खोसला. त्यांनी अनुच्या आईला पण थांबवलं.
अनुची आई म्हणाली, "नाही बाई. हे काय वय आहे का? तसंपण मला ईतरही कामं आहेत."
त्या सर्वांनी त्यांना काही जाऊ दिलं नाही. मस्त लंगडीचा डाव रंगला. सगळे किती खुश होते! सगळ्यांनी मस्त धमाल केली. गरीब-श्रीमंत, लहानमोठे हे सर्व भेद बाजूला सारले गेले होते. प्रत्येकाच्या जीवनात दुखं होती. ती सर्व दुखं ते विसरले होते. जगातील प्रत्येक व्यक्तीने दररोज थोड्या वेळासाठी असं काही केलं तर! ज्याने ते थोड्या वेळासाठी का होईना पण सगळी दुखं विसरून जातील. ज्याप्रमाणे लहान मुलं पडल्यावर त्यांनी रडू नये म्हणून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवलं जातं, अगदी तसंच. मंगेश पाडगावकरांनी छान लिहिलं आहे, 'रडत रडतही जगता येतं व गाणं म्हणतही जगता येतं. रडत रडत जगायचं की गाणं म्हणत ते आपण ठरवायचं असतं.'
नंतर काही वेळाने तानियाची व अनुची आई आतमध्ये गेल्या. तानिया, अनु व अर्नव खेळू लागले. तानिया खूपच आनंदी होती. नंतर संध्याकाळी अनु व अर्नव निघून गेले. तानिया घरामध्ये परतली. ती फ्रेश होऊन रूममध्ये येऊन बसली. मागून आईपण आली. तिची आई आता तिची मैत्रीणच झाली होती. सकाळी त्या तिच्यासोबत लंगडी खेळल्या होत्या ना!
ती तिचं फेव्हरेट कार्टून बघू लागली होती. तिच्या आईने कधी तिच्यासोबत बसून कार्टून बघितलेलं नव्हतं. त्या आज तिच्या शेजारी येऊन बसल्या. त्या आवडीने कार्टून बघू लागल्या. त्यांना मधेमधे हसू येउ लागलं. एका विनोदी दृश्यानंतर तर दोघींपण खळखळून हसू लागल्या. तिच्या आईला पण खूप चांगलं वाटू लागलं. त्या मधेच थांबल्या. तानियाकडे मायेने बघू लागल्या. विचार करू लागल्या की आपण उगाच त्रास देत बसलो हिला! तिच्या भविष्याची त्यांना आता अति चिंता नव्हती. बऱ्याच वेळा भविष्याच्या अतिचिंतेमुळे आपण आपलं वर्तमान खराब करून टाकतो. ते तिच्या आईला आता करायचं नव्हतं. त्यांना कळलं होतं की ज्या गोष्टींसाठी ती योग्य असेल त्या गोष्टी तिला मिळणारच होत्या.
नंतर तानियाने टीव्ही बंद केली. ती आईजवळ येऊन बसली. आईने तिला जवळ घेतलं. त्या तिचे केस कुरवाळू लागल्या.
"तानिया, जेव्हा तुला कळलं की मी आणि तुझे बाबा आम्ही दोघे तुझे आईबाबा नाही आहोत. आम्ही तुला दत्तक घेतलेलं आहे. तू अनाथ आहेस. तेव्हा तुला खूप त्रास झाला असेल ना! रडू पण आलं असेल."
"हो आई. खूप त्रास झाला होता. मी रडले पण होते. सगळं घर सुन्न वाटत होतं. मला खूप दुःख झालं होतं. मी या जगात एकटी आहे. माझं या जगात कुणीच नाही. मी अनाथ आहे. तुम्ही माझे खरे आईबाबा नाही आहात. तुम्ही मला एके दिवशी सोडून देताल. असे अनेक विचार माझ्या मनात आले होते. काय करावं ते कळत नव्हतं. तसंच माझ्यासोबतच असं का झालं? माझी काय चूक आहे? असंही वाटत होतं."
"म्हणजे तानिया तू आमचा द्वेष करतेस. तू आमच्यावर प्रेम नाहीस करत?"
"नाही आई, तसं काहीही नाहीए. मी का तुमचा द्वेष करेल? तेव्हा मला भिती वाटत होती की तुम्ही मला सोडून देताल. पण नंतर देशपांडे सरांनी मला श्रीकृष्ण यांच्याबद्दल सांगितलं. ते लहानपणी कसं लोणी चोरून खायचे त्याबद्दल सांगितलं. मधेच त्यांनी यशोदादेवी चा उल्लेख केला. मी विचारलं की यशोदा श्री कृष्ण यांची आई का? तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना दोन आईबाबा होते. मी नंतर विचारलं की ते कसं? नंतर मला जाणवलं की माझ्यासोबतही तसंच घडलं आहे. मी त्यांना प्रश्न विचारले की म्हणजे देवकी श्रीकृष्ण यांची खरी आई का? आणि श्रीकृष्ण यांना यशोदा आईने सोडून दिलं होतं का? तेव्हा ते मला समजावू लागले की मी कसं चुकीचे समज डोक्यात घातले होते. नंतर मला समजलं की जन्मदेणारे व सांभाळ करणारे दोन्ही आईवडील सारखेच झाले ना. मंग मला जाणवलं की तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाही."
त्या तिचं बोलणं कुतूहलाने ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यांत पाणीच आलं.
"ईतकी हुशार कधी झालीस गं?"
ती त्यांच्या मिठीत शिरली. नंतर त्या झोपी गेल्या. ईकडे अनुच्या बाबांना एका कारखान्यात काम मिळालं होतं. आता त्यांना फुगे विकण्यासाठी उन्हात भटकावं लागणार नव्हतं. तसेच त्यांची परिस्थिती पण सुधारणार होती. अनु पण खूप खुश होती. तिच्या बाबांनी तिच्यासाठी बिस्कीट आणले होते. तिने तो पुडा नंतर खाण्यासाठी जपून ठेवला.
सगळ्यांचं आयुष्य आनंदमय होऊ लागलं होतं. अनु व तानिया दोघींना असं वाटू लागलं होतं की त्यांच्या आयुष्यात आता दुःख परत येणार नाहीत. पण आयुष्य जितकं साधं वाटतं तितकं ते साधं नसतं. आयुष्यात चढउतार तर येतच असतात. बघुयात त्यांच्या आयुष्यात कोणते चढउतार येतात तर! पुढील भागात.
क्रमश
#लाईन्स ऑफ द डे
तिला कळलं होतं की दुःख आयुष्यात येतं व निघूनही जातं. ते काही थांबत नाही. फक्त माणसाकडे संयम असायला हवं म्हणजे झालं!
©Akash Gadhave