पुर्वावलोकन
अनुला गरीब व श्रीमंत ही विषमता चिंतीत करत आहे व तिला वाटत आहे की श्रीमंतांच्या जीवनात आनंदच आनंद असतो. तर तानियाचा अभ्यास चांगला होत असल्याने तिच्या आईची चांगली वागणूक बघून तिची हुशार होण्याची ईच्छा होत आहे. अनु लॉटरी लागण्याची प्रार्थना करत असून तानिया अभ्यास सुधारण्याचे प्रयत्न करत आहे.आता पुढे
तानिया सकाळीच उठली. तिच्या आईने तिला तयार केलं. नंतर ती पुस्तकं व वह्या वगैरे अभ्यासाचं साहित्य काढून तयार होती. तेवढ्यात देशपांडे सरांचे आगमन झाले. तानिया त्यांना हसून "गुड मॉर्निंग " म्हणाली. त्यांनी पण हसून "गुड मॉर्निंग " अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी तिला होमवर्क बद्दल विचारले असता तिने होमवर्क त्यांच्या हातात सोपवला. ते होमवर्क बघतांना डोकं हलवत होते. तानिया खुश झाली.
ते म्हणाले, "अरे वा! आज होमवर्क अगदी पूर्ण आहे. तसेच एकही चूक नाहीए. शाबास. अशीच मेहनत राहू दे."
तिची आई दरवाजातून ऐकत होती. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्यांनी तानियाकडे प्रेमाने बघितलं व तिला अंगठा दाखवला. तिने पण अंगठा दाखवला. ती मनातल्या मनात अनुला धन्यवाद म्हणू लागली. ट्युशन घेतल्यावर होमवर्क देऊन सर निघून गेले.
तानिया अनुची वाट बघू लागली. अनु आल्यावर त्यांचा अभ्यास सुरु झाला. तानिया खुश होती. अनुच्या मदतीमुळे तिचा होमवर्क पूर्ण होत असे. तसेच काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं पण मिळत असे. नंतर त्यांचं जेवण झालं व नंतर परत अभ्यास. नंतर परत दररोज प्रमाणे अर्णव त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी आला. तानियाच्या आईने तानियाचा अभ्यास बघितला व त्यांना परवानगी दिली.
अनुची आई किचन आवरत होती. अनुजवळ लॉटरीचं तिकीट होतं. तिने बघितलं तानियाची आई हातात पेपर घेऊन बसली होती. तिला कळलं की ह्या काकू दररोज पेपर वाचत असतील. त्यांना नक्कीच लॉटरीबद्दल माहित असेल. ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्यांनी तिला बघितलं.
त्यांनी विचारलं, "काय झालं अनु? काय हवं आहे?"
ती म्हणाली, "तुम्ही रोज पेपर वाचत असता ना?"
त्यांनी होकारार्थी मान हलवली.
नंतर ती बोलली, "आज पेपर मध्ये लॉटरीबद्दल काही आलं आहे का?"
त्यांना तिचा प्रश्न नेमका कळला नाही. नंतर त्यांनी तिच्या हातातलं तिकीट बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यांनी ते आवरलं.
त्या म्हणाल्या, "तुझ्याकडे तिकीट आहे का लॉटरीचं?"
ती म्हणाली, "हो आहे ना."
त्या म्हणाल्या, "दाखव बरं."
तिने तिकीट त्यांच्या हातात दिलं. तेवढ्यात अर्णव व तानिया तिला आवाज देऊ लागले. ती खेळण्यासाठी निघाली.
ती म्हणाली, "काकू तुम्ही बघून ठेवा आमचं खेळणं होईपर्यंत."
त्या म्हणाल्या, "बरं ठीक आहे."
त्या तिच्या निराधार आशेवर हसू लागल्या. त्या मनात म्हणाल्या, आजकाल सगळ्यांनाच झटक्यात श्रीमंत व्हायचं आहे. असं कुठं होत असतं का? श्रीमंत होण्यासाठी किती मेहनत करावी लागते!
त्यांनी पेपर बघितला. पेपर मध्ये काहीच आलेलं नव्हतं. कदाचित उद्या येईल. मी पण असं बघतेय जसं की हिला एक कोटीचं बक्षीस मिळणार आहे! त्या स्वतः शीच हसल्या. त्यांनी ते तिकीट तेथेच ठेवलं व त्या हॉलमध्ये जाऊन बसल्या. त्यांना राहून-राहून हसू येऊ लागलं. त्या स्वतः ला म्हणाल्या जाऊद्या लहान आहे मुलगी. तसंही मोठेही लॉटरीचं तिकीट विकत घेतातच. ही तर लहान आहे.
इकडे अर्णव, अनु व तानियाची भन्नाट मस्ती चालली होती. त्यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. तानियाला अनुचा स्वभाव खूपच आवडायचा. तिच्यामुळेच तर तिला अभ्यासात मदत होत होती व त्यामुळेच तर तिची आई आता तिला अडवत नव्हती. ती मनसोक्त खेळू शकत होती. तसेच टीव्ही पण बघू शकत होती. तसेच अर्णवलाही तिचा स्वभाव खूप आवडला. तिची आई घराकडे निघाली होती. त्यांनी तिला आवाज दिला. अनु त्या दोघांना बाय म्हणून घराकडे निघाली. अर्णवही घरी गेला.
तानिया रूममध्ये येऊन बसली. ती तिचं आवडतं कार्टून बघत होती. तिची आई रूममध्ये आली. तिची आई तिच्याकडे बघून हसली. तानियाही हसली. त्या तिच्या जवळ येऊन बसल्या. तानियाला खूप बरं वाटलं. त्यांनी तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावर हात फिरवला. तिला कार्टूनपेक्षा किंवा ईतर अनेक गोष्टींपेक्षा भावनेचा ओलावा हवा होता. तोही आईकडून. ती आईला बिलगली. हळूहळू सर्व गोष्टी नीट होताना दिसत होत्या.
अनु घरी परतली. तिला खेळण्याच्या ओघात व घरी परतण्याच्या घाईत लक्षातच राहिलं नाही की ती तिचं लॉटरीचं तिकीट परत घेण्याचं विसरून गेली होती. तिचं तिकीट तानियाच्या घरीच टेबलावर ठेवलेलं होतं. त्या सर्वांनी जेवण वगैरे केलं. थोड्या गप्पागोष्टी झाल्या. अनुला पण अर्णव व तानिया सोबत खेळणं तसेच तानियासोबत अभ्यास करणं या गोष्टी खूप आवडू लागल्या होत्या. ती आतुरतेने तानियाच्या घरी जाण्याची वाट बघू लागली. ती आईच्या आवाजामुळे विचारांतून बाहेर आली.
तिची आई म्हणाली, "चल अनु. झोप आता. खूप उशीर होतोय."
ती म्हणाली, "हो आई आलेच."
ती आईच्या कुशीत येऊन झोपली. तिला अचानक आठवलं की ती तिकीट परत घ्यायचं व लॉटरीबद्दल विचारायचं विसरूनच गेली होती. तिला जाणवलं की आता खूप रात्र झाली आहे. आता कसं जावं? जाऊद्या तिकीट त्यांच्यापाशी सुरक्षित आहे. उद्या सकाळी जाऊ तेव्हा लॉटरीबद्दल विचारता येईल. अशी स्वतःचीच समजूत तिने काढली. ती निवांत झोपी गेली. तिला जाणीव देखील नव्हती की एक कोटी एवढी मोठी रक्कम आहे की त्यासाठी चांगल्या माणसाची सुद्धा नियत बदलू शकते. निरागस बाळाला जगाच्या मानसिकतेबद्दल तेवढी माहिती नव्हती.
क्रमश
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा