पुर्वावलोकन
अर्नव व अनुचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. त्यांची सुखी वैवाहिक जीवनाकडे वाटचाल सुरु झाली आहे. तानियानेही संगीत जगतात तिचा पाय रोवला आहे. तिला रायसिंग सिंगिंग स्टार चा अवार्ड पण घोषित झाला आहे. पण तिच्या लग्नाचा विषय काढताच ती थोडीशी उदास झाली आहे.
आता पुढे
अनुला तानियाचं आयुष्य बघून नेहमी वाटायचं की तिने श्रीमंत व्हायला पाहिजे. बालपणातील अनुभवामुळे तिचा असा समज होऊन गेला होता की पैसा असला तर जीवन आरामात व आनंदात जातं नाहीतर दुःखात व कष्टात. तिला पैसाच सर्वांत महत्वाचा वाटत होता. पण अर्नव तिच्या जीवनात आल्यावर तिला जाणीव झाली की जीवनात काही गोष्टी ह्या पैश्यांपेक्षाही जास्त महत्वाच्या असतात. जसं की नाती, प्रेम, सन्मान, साथ, वागणूक. नाहीतर तो फक्त तिच्यावरील प्रेमाखातीर सगळी धनदौलत सोडून नसता आला.
लहानपणापासून अनुच्या डोळ्यांना दिसलं होतं की तानियाचं जीवन खुप चांगलं आहे. अनुला नेहमी तिच्यासारखं जीवन हवं होतं. पण मुळात दिसतं तसं नसतं, हेच खरं. तिला हळूहळू जाणीव झाली की दुःखं सगळ्यांच्याच जीवनात असतात. त्यामुळे ती जरी पैश्याने तानियाईतकी श्रीमंत नसली तरी अर्नव, आईबाबा यांच्या सोबतीने तिच्या जीवनात सुखाची श्रीमंती मात्र होती.
******************************************
तानिया अवॉर्ड समारंभात पुढील शब्द बोलली.
"मी माझ्या यशाचं श्रेय माझ्या आईबाबांना देऊ इच्छिते. मी एक अनाथ मुलगी होते. त्यांनी मला दत्तक घेतलं. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. ते फक्त माझे आईबाबा नसून माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. हा अवॉर्ड त्यांच्या चरणी समर्पित आहे.
तुमच्या कानावर माझ्या जीवनाविषयी जे काही पडलं ते सर्व खरं आहे. माझ्या जीवनात बऱ्याच वाईट घटना घडल्या पण त्या घटनांनी मला बरंच काही शिकवलं. रोहित, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं होतं त्याने मला शिकवलं की बरेच लोक दिसतात तसे नसतात, ते लोक चांगुलपणाचा फक्त ढोंग करत असतात. वास्तविकता मात्र वेगळीच असते. त्या प्रसंगामुळे मी माणसं ओळखायला शिकले.
अर्नव, माझा बेस्ट फ्रेंड, ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं, तो एंगेजमेंट सोडून त्याच्या प्रेयसीसाठी निघून गेला. मला वाटू लागलं होतं की सगळं काही संपलं आहे. पण नंतर मला जाणवलं की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सोडल्याने किंवा नाकारल्याने तुमचं काहीच अडत नाही. माझी ओळख फक्त माझ्या नवऱ्यावरून नाही होत तर माझंही एक वेगळं अस्तित्व असल्याचं मला त्या घटनेने शिकवलं.
दुःखं सर्वांच्या जीवनात येतात. काही दुःखं अशी असतात की माणसाला सगळं संपलेलं दिसतं पण आपल्याला जे दिसतं ते नेहमी सत्य नसतं. थोडंसं संयम ठेवल्यावर, स्वतः ला सावरल्यावर आपल्याला जाणवतं की अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत.
तसंही अजून एक महत्वाची गोष्ट अशी की मी लहानपणापासून बघितलं आहे की मुलांच्या मार्कांना खुप महत्व दिलं जातं. जी मुलं अभ्यासात कच्ची असतात ती काहीच करू शकणार नाही, असा बऱ्याच जणांचा समज, मुळात गैरसमज असतो. बघणाऱ्यांना अश्या मुलांचं भवितव्य खराब दिसतं. पण तसं काहीही नसतं. परीक्षेतील गुणांच्या पलीकडे देखील बऱ्याच गोष्टी असतात आणि याचं एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे.
माझी एक ऍडव्हाइस आहे की एखाद्या गोष्टीला लगेच ती गोष्ट जशी दिसतेय तसं स्वीकारू नका. अगोदर विचार करा, तर्क लावा मंगच त्या गोष्टीला स्वीकारा. धन्यवाद."
टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. कॅमेऱ्यांचे फ्लॅश तिच्यावर चमकू लागले. मीडिया तिच्यासमोर माईक घेऊन गर्दी करू लागली. ती बोलली.
"एवढं मोठं स्पीच दिलं तर, आता अजून काय बोलू?"
ते सर्वजण बाहेर एका हॉटेलमध्ये आले. तिच्या आईबाबांच्या डोळयांत पाणी आलं होतं. त्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यावर तिचे बाबा म्हणाले.
"तानिया, सर्वेश हा माझ्या एका मित्राचा मुलगा आहे. मला वाटतं तुम्ही दोघांनी एकदा भेटून घ्यावं. तो याच हॉटेलमध्ये आहे."
"बाबा असं अचानक! म्हणजे..... नंतर कधी बघितलं असतं तर चांगलं....."
"अगं जा, बोलायचं तर आहे ना फक्त. आम्ही काय तुझं लगेच लग्न थोडीच लावणार आहोत?"
"अगं पण आई असं एका मिटिंग मध्ये सगळं कसं....."
"बोलून तर ये, लग्नाचं नंतर बघुत आपण."
त्यांनी तिला बळजबरी पाठवलं.
(काही तासानंतर)
"अहो साडे तीन तास झालेत. अजूनही एकमेकांशी हसून गप्पा मारताय ती दोघे. बघा ना!"
त्यांनी अनु व सर्वेश कडे बोट दाखवलं. तानियाच्या बाबांनी बघितलं की एका काचेच्या पलीकडे, अनु व सर्वेश हसतहसत गप्पा मारत होते.
"मी तिला बोलावून आणते."
"अगं थांब, कशाला त्यांना डिस्टर्ब करतेस? ही चिंता करायची गोष्ट थोडीच आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे ना!"
"हो! ही तर आनंदाची गोष्ट आहे. ( डोक्यावर हात ठेवत ) मी पण कधीकधी वेड्यासारखं करते!"
"मला माझ्या मुलीची पसंत माहित आहे. तिला असाच शांत, समजूतदार मुलगा हवा होता."
"हो, आपण काय करायचं आता?"
"आता लग्नाच्या तयारीला लागूयात."
"हो."
त्यांची नजर तानियावर पडली. खुप खुश दिसत होती ती सर्वेश बरोबर.
समाप्त.
सर्व वाचकांचे, त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रिया आम्हा लेखकांसाठी महत्वाचा प्रेरणास्रोत असतात, असंच प्रेम राहू द्या. तसेच ईरा वरील ईतर लेखकांचे देखील आभार, त्यांच्या कथा, लेख वाचूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. याबरोबरच संजना मॅम व ईरा टीमचे पण आभार, त्यांनी वाचक व लेखक यांच्यासाठी एवढा छान मंच उभारून दिला.
भेटूयात लवकरच, एका नवीन कथेबरोबर. धन्यवाद?
©Akash Gadhave
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा