Dec 06, 2021
मनोरंजन

भ्रमनिरास

Read Later
भ्रमनिरास

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


सकाळचे ११ वाजले असतील. शरद च्या ऑफिस मध्ये कामाला सुरवात होऊन आता full swing मध्ये चालू होतं. शरद purchase officer होता आणि रोजच्या रिपोर्टिंगची सकाळच्या मीटिंगची तयारी सुरू होती. अशातच त्याचा मोबाइल वाजला. सकाळच्या घाईच्या वेळेला कोण फोन करतय म्हणून कापाळाला आठ्या घालत फोन उचलला. फोन वर “ चित्रा ” अस लिहून आलं होतं. आत्ता हिला काय झालं सकाळी सकाळी ? बायको नावाच्या प्राण्यांचं काही खरं नाही. अस पुटपुटतच फोन उचलला.

काय ग ? मी जाम busy आहे. काय आहे ते पटकन सांग. पाल्हाळ लावू नकोस.

साहेब मी पोलिस constable शीतोळे बोलतोय. या बाईंना accident झाला आहे आणि त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो आहोत. तुमचं यांच्याशी काय नातं आहे.

माझी बायको आहे.

मग ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचा. मॅटर सिरियस आहे.

शरदच्या हातातून फोन गळून पडला. तो थरथरत तसंच उभा होता मग मटकन खाली बसला. स्टाफ त्यांच्या भोवती गोळा झाला. काही तरी गंभीर गोष्ट घडली आहे यांचा अंदाज सर्वांना आलाच होता. कोणीतरी पटकन पाण्याचा ग्लास त्याला दिला. पाणी प्यायल्यावर शरदला जरा हुशारी आली.

काय झालं सर ?

बायकोला अॅक्सिडेंट झाला आहे हॉस्पिटलला नेलं आहे. सिरियस आहे अस
पोलिस म्हणत होता.

बापरे ! ताबडतोब निघायला हवं. मी साहेबांना सांगून येतो. केळकर म्हणाले.

तितक्यात साहेबच बाहेर आले. त्यांना कोणीतरी सर्व सांगितलं.

ताबडतोब निघा. केळकर तुम्ही आणि देशमुख यांच्या बरोबर जा. काही मदत लागली तर लगेच फोन करा. कॅशियर कडून १०००० रुपये उचला मी त्याला सांगतो. निघा तुम्ही लगेच. साहेब म्हणाले.

हॉस्पिटलला गेल्यावर कळल की चित्राच्या डोक्याला मार लागला आहे. हात आणि पाय पण तुटले आहेत. रक्तस्त्राव पण खूप झाला आहे आणि आत्ता ती ऑपरेशन टेबल वर आहे. नर्स ने सांगितलं की इथे आणलं तेंव्हा पेशंट बेशुद्ध होती. emergency operation चालू आहे. तुम्ही रीसेप्शन ला जावून पैसे आणि फॉर्म भरून या.

हे सगळं ऐकल्यावर शरद च्या पायातली शक्तिच निघून गेली. तो असहाय्य होऊन खुर्चीवर बसला. केळकर रीसेप्शन ला गेले. जवळ देशमुख होते ते त्याला धीर देत होते. त्यांनीच शरदच्या आई वडिलांना आणि भावाला कळवल. तासांभाराने डॉक्टर बाहेर आले. म्हणाले की पेशंट ची कंडिशन सिरियस आहे. ऑपरेशन झालं पण ४८ तास काही सांगता येणार नाही. सध्या पेशंट ventilator वर आहे. तुम्ही जवळच्या लोकांना बोलावून घ्या. देशमुखांनीच मग चित्रांच्या आई, वडिलांना आणि भावाला पण कळवल. चित्राची बहीण लगेच यायला निघाली. संध्याकाळ पर्यन्त सर्वच जण येऊन पोहोचले. सगळे ICU च्या बाहेरच होते. अचानक डॉक्टरांची धावपळ चाललेली दिसली. ICU मध्ये ८ पेशंट होते नेमकी कोणासाठी धावपळ चालली आहे ते कळायला मार्ग नव्हता. कोणी बोलायला पण तयार नव्हतं. चिंताग्रस्त चेहऱ्यांनी सगळे गप्प बसले होते. अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की We have tried our best but we lost the patient. We are extremely sorry. आणि ते चालले गेले. शरदच्या डोक्यावर अभाळच कोसळलं. सगळे त्याला आपापल्या परीने धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं.

एखाद्या यंत्रा प्रमाणे शून्य मनाने शरदनी चित्राचे दिवस केले. पिंड दानांच्या दिवशी कावळे घिरट्या घालत होते पण शिवत नव्हते. गुरुजी म्हणाले की शरदराव कोणती एखादी इच्छा राहिली असेल तर पूर्ण करीन अस म्हणा. शरद घोटाळ्यात पडला. जेमतेम २ वर्ष झाली लग्नाला. काय काय स्वप्न रंगवली असतील पण ती सगळीच अपूर्ण राहिलीत आता. मला कसं कळणार ? शरद समोर आला आणि म्हणाला
मी तुझी सर्व स्वप्न पूर्ण करीन.
कावळे थोडे जवळ आले पण पिंडाला शीवायचं नाव नाही. गुरुजी म्हणाले अजून काही बोला. काही वचन दिलं असेल तर ते पूर्ण करीन अस म्हणा.
मी दिलेली आणि न दिलेली पण सर्व वचनं पूर्ण करीन अस शरद म्हणाला. आणि काय आश्चर्य कावळ्यांची एकदम झुबडच उडाली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
तेरवी झाली आणि सगळे आपापल्या घरी पांगले. शरद एकटाच घरी. त्या दिवशी रात्री त्याला बराच वेळ झोप आली नाही. केंव्हा तरी उशिरा डोळा लागला. त्यामुळे उशीराच उठला. मग त्या दिवशी जेवणाच्या डब्यांची सोय आणि इतर गोष्टी ज्या चित्रा सगळं सांभाळायची त्या करून टाकल्या. आता दुसऱ्या दिवसापासून ऑफिस.

ऑफिस सुरू झालं. शरदचं अर्थातच कशातच लक्ष नव्हतं. दिवसभरात त्याच्याकडून काहीच काम झालं नाही. संध्याकाळी घरी आल्यावर आणखीनच एकटं एकटं वाटायला लागलं. वेळ जाता जाईना. डबा आल्यावर त्या डब्यातले थंडगार बेचव अन्न घशाखाली उतरेना कसे बसे दोन घास खाऊन उठला. रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी तसंच भरा भरा आटपून ऑफिस ला गेला.

ऑफिस मध्येही काही वेगळं नव्हतच. कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं.
सहकारी चांगले होते म्हणून सगळं सांभाळून घेत होते. पण अस किती दिवस चालणार ? जवळ जवळ एक महिना उलटून गेला तरी परिस्थितीत फरक पडत नव्हता. सर्व सहकारी समजावून सांगून थकले. कामाची फारच खोटी व्हायला लागली होती. शेवटी साहेबांनी शरदला बोलावलं म्हणाले

कुलकर्णी, माणसाला आयुष्यात वेग वेगळ्या संकटांना सामोरं जावच लागतं. पण जसजसा काळ जातो तशी माणसं सावरतात. तुम्ही अजून त्यात अडकला आहात हे बरोबर नाही. मलाही वरच्या लोकांना उत्तरं द्यावी लागतात. तुम्ही जर आता कामाला सुरवात केली नाही तर माझाही नाईलाज होईल.

त्या दिवशी संध्याकाळी शरद ऑफिस मधून विमनस्क स्थितीतच घरी आला. मेंदूला झिणजिण्या आल्या होत्या. कुलूप उघडून आत आला. सोफ्यावर चित्रा बसली होती. शरद नी पाहिलं आणि त्याला भोवळच आली. तोंडातून फक्त भू भू भू एवढंच निघत होतं. खाली पडलेल्या शरदला चित्रांनी उचलून सोफ्यावर झोपवलं, तोंडावर पाणी मारलं. शरदनी डोळे उघडले आणि चित्राला बघितलं आणि पुन्हा भूत भूत करत बेशुद्ध झाला. पांच मिनिटांनी डोळे उघडले पुन्हा चित्रा समोर. त्याला कळेना की हे काय चाललंय, आज पर्यन्त तो भूता खेता च्या नुसत्या गोष्टीच ऐकत होता, पण आता प्रत्यक्ष चित्राच भूतच समोर बसलेलं. काय करांव ?

अरे, मी चित्रा आहे, तुझी बायको, भूत भूत काय करतो आहेस ?

आता मात्र शरद total confused. त्याला समजेना की गेले काही दिवस जे चाललं होतं ते स्वप्न की आता घडतंय ते स्वप्न ? जर हे स्वप्न नसेल तर चित्राचा मृत्यू झालाच नाही. या विचाराने एकदम त्यांचा चेहरा फुलला आणि तो उठून बसला.
तू खरंच चित्रा आहेस ?
तूच मला हात लाऊन बघ आणि खात्री करून घे.
चित्रांनी आपला हात समोर केला आणि शरदनी भीत भीतच हाताला हात लावला. तसाच मऊ मऊ मखमली स्पर्श जाणवला. त्यांच्या अत्यंत ओळखीचा. त्याला हर्षवायू व्हायचाच बाकी होता. शरदला आता कंठ फुटला. म्हणाला
म्हणजे गेले काही दिवस जे काही घडलं ते सगळं स्वप्नच होत म्हणायचं.

नाही, ते स्वप्न नव्हतं, ते सगळं खरंच होतं. चित्रा म्हणाली.

चित्रा अशी जीवघेणी थट्टा करू नकोस. स्वप्नात का होईना पण मी जे भोगलं ते फार कष्ट दायक होतं. आता तू समोर आहेस त्यामूळे आता त्याचा विचारही नको.

मी खरं तेच सांगते आहे. गेले काही दिवस जे घडलं ते स्वप्न नव्हतं. ते खरंच आहे आणि मी इथे आहे हे ही.

आता शरद पुरता गोंधळला त्यांनी चित्राला हात लाऊन पुन्हा खात्री करून घेतली. मग हसत सुटला. म्हणाला

चित्रा बास आता. चेष्टा पुरे. खूप ताणलस आता नको.
तेव्हडयात बेल वाजली. जेवणाचा डबा आला होता.

चित्रा म्हणाली की तू आधी जेवून घे. मग शांतपणे बोलू. तिने टेबलावर जेवाणाची तयारी करायला सुरवात केली.
एकच पान पाहून त्यांनी विचारलं की हे काय एकच पान मांडलं ? तू नाही जेवणार ?

नाही. मला जेवणाची आवश्यकता नाहीये.

शरदच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लपत नव्हता. प्रश्नार्थक मुद्रेने तो बघत राहिला. आधी माहीत असतं की चित्रा जीवंत आहे तर हा डबा लावलाच नसता, अस शरद स्वत:शीच म्हणाला आणि एकदम त्याला जाणवलं की चित्रा गेली हेच खरं, नाहीतर डबा कशाला लावला असता ? शरद ची मतीच गुंग झाली.

त्यांच्या चेहऱ्यावरचा संभ्रम पाहून चित्राच म्हणाली की मी सर्व सांगते. म्हणजे तुझ्या मनातला गोंधळ दूर होईल.

अरे मी जेंव्हा वर गेले तेंव्हा तिथे मला पाहिल्यावर एकदमच गडबड उडाली. तिथे उच्चासनावर जे कुणी बसले होते त्यांचं आणि इतरांचं आपापसात काही बोलणं झालं. मग सगळे घाई घाईने निघून गेले. थोड्या वेळाने आले आणि म्हणाले की चित्रगुप्त महाराजांच्या कडे जायचं आहे. तिथे गेल्यावर मला कळलं की मला चुकून आणण्यात आलं आहे. महाराज म्हणाले की माझ्यासाठी इथे जागाच नाहीये. त्यामूळे पुढची व्यवस्था होईपर्यन्त परीच्या रूपात तुला तुझ्या नवऱ्याकडे पाठवू शकतो, तुला जायला आवडेल का ? पण फक्त तुझा नवराच तुला पाहू शकेल, बोलू शकेल इतर कोणीही नाही. मी कशाला नाही म्हणतेय, मी हो म्हंटलं. दुसऱ्याच क्षणी मी इथे आले. आता सांग मी आलेली तुला चालेल का ?

शरदचं डोक गरगरायला लागलं, बायको असली म्हणून काय झालं आत्ता
तर भुतच आहे. भुता बरोबर राहायचं ? विचार कर करून त्याचं डोक फिरायची वेळ आली. त्याला दरदरून घाम सुटला. जीभ कोरडी पडली. तोंडातून शब्द फुटेना. हे असलं काही आपल्याच आयुष्यात का होतंय हाच विचार मनात. चक्कर येतेय असं वाटलं म्हणून तो सोफ्यावर पुन्हा बसला.

चित्रा त्याच्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होती.

थोड्यावेळाने तो जरा शांत झाला. सावरला. काही विचार पक्का करून त्यांनी बोलायला सुरवात केली.

नाही चित्रा आपण तू म्हणतेस तसं आयुष्य नाही जगू शकत. तुझ्या जग आता वेगळं आहे. दोन्हीची सरमिसळ शक्य नाही. तेंव्हा तू परत जावस हेच उत्तम.

चित्राला त्यांची अवस्था कळली. परीच होती ती. तिला सगळंच कळलं. तिच्या लक्षात आलं की आपल्या बरोबर राहायची शरदची मानसिक तयारीच नाहीये. तिला शरद ला त्रास द्यायची अजिबात इच्छा नव्हती. ती म्हणाली

ठीक आहे. मी जातेय पण जायच्या आधी मला एक वचन दे की तू दुसरं लग्न करशील आणि ते ही लवकरच.

हे कसं शक्य आहे ? आणि मी लग्न करून तुला काय फरक पडणार आहे ?

तू माझ्यात गुंतला आहेस. त्यामुळे जोवर तू लग्न करत नाहीस तोपर्यन्त मला मुक्ती मिळणं शक्य नाही. तेंव्हा निदान माझ्यासाठी तरी तू हा विचार कर. मला वचन दे.

शरदने थोडा विचार केला आणि तिच्या हातावर हात ठेवून वचन दिलं.

क्षणार्धात चित्रा अदृश्य झाली. शरद भानावर आला. आता मन एकदम स्वच्छ झालं होत. सगळी कोळीष्टक दूर झाली होती. ज्या भ्रमात तो इतके दिवस अडकला होता तो समूळ दूर झाला होता. आलेलं मळभ निघून गेलं होतं. तो बाहेर पडला. हॉटेल मध्ये जावून ताव मारून जेवला. इतक्या दिवसांचा उपास सोडून आला. रात्री शांत झोप लागली. सकाळी उठून अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याने ऑफिसला गेला. कोणी त्याला विचारलं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरची तरतरी बघून सगळ्यांनाच आनंद झाला होता.

आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं.


 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired