दिशा भाग 9

Sharayu Shows Sushant His Worth And His Place


दिशा:-भाग 9

तिच्या टॅक्सी या आवाजाने एक टॅक्सी शरयू च्या पुढ्यात येऊन थांबली तशी ती पटकन आत शिरली आणि प्रीती च्या हाताला धरून जणू प्रीतीला आत खेचलेच.
प्रीती हे सगळं बघतच राहिली आणि शरयूच्या बाजूला बसली.
शरयू ने ऑफिस चा पत्ता सांगितलं आणि टॅक्सी भरघाव त्या दिशेने निघाली.
शरयू च्या चेहऱ्यावर वेगळेच तेज जाणवत होते तिची चुळबूळ सुरू होती जणू काही एक सेकंदात तिला ऑफिसमध्ये पोचायचे आहे.

"प्रीती, सुशांत गेला तर नसेल ना?"
"नाही! त्याची आज मीटिंग होती एक क्लायंट बरोबर, कदाचित अजूनही ती चालूच असेल."
"हम्मम"
"शरयू तू नक्की काय करणार आहेस?"

"सुशांत ला त्याच्या वागण्याचा जाब मला द्यावाच लागेल. मी म्हणजे काही बाहुली नाही जिला कधीही, कसेही वागवले तरी चालेल. एकमेकांचा रिस्पेक्ट जर नसेल तर त्या नात्याला अर्थ नाही. त्याच्या मनात काय आहे हे मला कळलेच पाहिजे".

प्रीती शांत बसून राहिली आणि मनातल्या मनात "सगळे नीट असू देत" ही प्रार्थना करत होती.

बरोबर पंचवीस मिनिटात दोघीही टॅक्सी मधून ऑफिस च्या बिल्डिंगसमोर उतरल्या. शरय त जणू वारे संचारले होते, लगबगीने ती लिफ्ट च्या दिशेने निघाली आणि घड्याळाकडे पाहिले तर ऑफिस सुटायची वेळ झालीच होती.

शरयू आणि प्रीतीला या वेळी ऑफिसमध्ये आलेले पाहून सगळ्यांना नवल वाटले.

"शरयू बरं वाटतंय का? "मगाशी ज्या कलिग तिला उचलून आणले होते त्याने काळजीने विचारले.

"हो मी ठीक आहे, आदित्य!" ती हलकेच बोलली पण तिची नजर सुशांत ला शोधत होती. तेवढ्यात तो बॉसच्या केबिनबाहेर येताना दिसला तशी वाऱ्याच्या वेगाने ती त्याच्याजवळ पोचली.

"सुशांत!" ती बोलायला गेली तसे त्याने हाताने तिला थांब म्हणले आणि पुढे जायला निघाला तसे पटकन तिने वळून त्याच्या हाताला धरून त्याला मागे खेचले.

हाताला बसलेला झटका त्याला खूप अनपेक्षित होता. त्याने हात झिडकारला आणि तो रागाने तिच्याकडे बघू लागला.

"मला तुझ्याशी बोलायचे आहे" शरयू म्हणाली.

"पण मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे"

"का? काय झाले अचानक? कालपर्यंत तू माझ्याशिवाय राहू शकत नाही असे म्हणत होता. मी तुझा जीव आहे, सतत माझ्यासोबत राहायचे म्हणत होतास! मग अचानक काय झाले?" तावातावाने ती म्हणाली.

"मला तमाशा नकोय सगळ्यांसमोर! सांगितले ना की, नाही बोलायचे तुझ्यासोबत आणि यापुढे येऊ पण नकोस बोलायला" तोही रागात बोलत होता.

आता मात्र तिचा चेहरा उग्र झाला, " तमाशा मी नाही तू करतोय आपल्या प्रेमाचा"

"प्रेम !तेही तुझ्यासारखी वर?"

त्याचे विखारी शब्द तिच्या काळजाला झोंबले. एक क्षणात तिचे डोळे पाणावले पण दुसऱ्या क्षणी तिच्यातील स्वाभिमान जागा झाला. "तुझ्यासारखी म्हणजे काय म्हणायचे तुला?"

तो फक्त कुश्चित हसला. त्याची तिला पाण्यात पाहणारी नजर तिला खूप वेदना देत होती.

"बोल ना! काय म्हणायचे तुला?" शरयू म्हणाली.
"का स्वतःचे धिंदवडे काढून घेते आहेस? जा इथून " म्हणत जणू त्याने तिला समोर ढकलले.

ती पुन्हा मागे वळली त्याच्या हाताला धरायला गेली तसे तो ओरडला " तुझ्यासारख्या वेश्येच्या मुलीने मला हात ही लावायचा नाही"

सगळे त्या दोघांच्या हा तमाशा बघत होते. कोणाला काही कळायच्या आत "फड" असा आवाज आला. शरयू ची पाचही बोटे सुशांत च्या गालावर उमटली होती आणि हे इतके अचानक झाले की तोही कळायच्या आत गाल चोळत होता.

"तुझी हिम्मत कशी झाली असे बोलायची " म्हणत हातातील पर्स ने ती त्याला मारायला लागली तसे तो ते वार चुकवायचा प्रयत्न करत होता.

"प्रीती, तिला आवर" कोणीतरी म्हणाले तरी प्रीती हलली नाही.

"योग्यच करते आहे ती "प्रीती म्हणाली तसे सगळे तिच्याकडे बघायला लागले.

"तू माझी लायकी काढतोस? खरं तर तूच नाही पुरुष म्हणायच्या लायकीचा!तुझ्यासारख्या पुरुषांमुळेच मुलीची परिस्थिती वाईट होते. अरे तुझ्यात आणि माझ्या त्या पळून गेलेल्या बापात काहीच फरक नाहीय. पुळचट,षंढ आहेस तू! म्हणे शिकलेला! कुठल्या अर्थाने रे? फक्त डिग्री मिळाली म्हणून काय तू शिकलेला?
अरे संस्कार हे रक्तात लागतात जे तुझ्यात दिसत नाहीत"

शरयू तोंडाला येईल ते रागाने बोलत होती आणि बघे फक्त तोंडात बोट घालून बघत होते.

होणारा अपमान सुशांत च्या नजरेत निखारे फुलवत होता, तो शरयूला मारायला समोर धावला तितक्यात प्रीतीने मध्ये पाय घालून त्याला पाडले. तोंडावर पडलेल्या त्याला बघून शरयू रागाने लालबुंद झाली होती.

" तू काय मला म्हणतोस की तुला बोलायचे नाही, मीच तुला सांगते की मला तुझे तोंड बघायचे नाही. तुझ्यासारख्या सडक्या बुद्धीच्या माणसाला मी जोडीदार निवडले हे माझेच चुकले पण वेळीच कळले म्हणून बरे झालं." असे म्हणत त्याने दिलेली अंगठी तिने बोटातून काढून त्याच्या तोंडावर फेकली ती त्याच्या बरोबर नाकावर जाऊन आदळली आणि त्यातील खडा त्याला लागला आणि रक्त बाहेर आले.

शरयू अशी ठाम वागेल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते, हा त्याच्यासाठी धक्का होता. बाजूच्या टेबल ला धरून तो कसाबसा उठला, त्याला चांगलाच मुका मार बसला होता.

त्याने म्हणलेले शब्द तिच्या मनाला खूप लागले होते. ती तेवढ्याच त्वेषाने म्हणाली" हो आहे माझी आई वेश्या! पण अभिमान आहे मला तिचा! तुझ्यासारख्या पुरुषाला जे कधी जमणार नाही ते तिने करून दाखवले.तिला कोणी फसवले तर तो तिचा दोष नाही ना! पण माझ्या साठी माझ्या भविष्यासाठी तिने मनावर दगड ठेवला आणि माझ्या जोशी आईला मला सोपवले. अरे दोषी ती का तो षंढ ज्याने माझ्या आईला वाऱ्यावर सोडले इतकेच नाही तर बायको बनवून बाजारात नेऊन विकले.
लाज वाटायला पाहिजे तुला असे बोलताना. अर्थात हे कळायला अक्कल लागते जी तुझ्याकडे नाही. तू आणि तुझ्या सारखे लोक हेच खरे गुन्हेगार आहेत, या स्त्रियांना वेगळे आयुष्य तर देणे सोडाच तुम्ही दगड मारून ठेचून काढता. काय गुन्हा तर एक स्त्री म्हणून तिने सहन केले?" शरयू बोलत होती तिचा श्वास फुलला होता. तिथली मंडळी मान खाली घालुन तिने बोललेले कटू सत्य ऐकत होते.

प्रीती ने तिला पाणी दिले, तिने दोन घोट प्यायले आणि पुन्हा बोलली "सुशांत तुझी लायकी आधीच कळली खूप बरे झाले. तुझ्यासारख्या ची मला गरजही नाही, मी समर्थ आहे माझे आणि माझ्या आईचे आयुष्य मार्गी लावायला " असे म्हणत तिथून ऑफिसबाहेर निघाली.

तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे सगळे अवाक होऊन बघत होते तर सुशांत ला झालेल्या अपमानाने कुठे जावे कुठे नाही असे झाले होते.

तिथे असलेले चार डोळे मात्र अत्यंत अभिमानाने तिच्या जाणाऱ्या रस्त्याकडे पहात होते.
त्यातले एक होती प्रीती आणि दुसरा होता आदित्य!

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all